Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

किशोर इंगळे ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा गडकरींचा आरोप
गृहमंत्र्यांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

योगिता ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणाचा गैरफायदा घेऊन किशोर इंगळे ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची

 

मागणी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
गडकरी वाडय़ातील पार्किंगमध्ये असलेल्या फियाट लिनिया गाडीत गेल्या १९ तारखेला योगिता अशोक ठाकरे या मुलीचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असताना स्वत: गडकरी यांनी आजच या घटनेच्या सी.आय.डी. मार्फत चौकशीची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांचा हा आरोप खळबळजनक ठरणारा आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात गडकरी म्हणतात, ‘घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी लिफ्टने खाली उतरून बाहेर जाण्यासाठी गाडीत बसलो असता किशोर इंगळे नावाचा इसम माझ्याजवळ आला. मृत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि मलासुद्धा काही आर्थिक मदत केल्यास हे प्रकरण आपण त्वरित मिटवू, असे तो म्हणाला. मी त्याला पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असल्याने अशाप्रकारची कुठलीही मदत मी देणार नाही, असे बजावून मी गाडीत बसून निघून गेलो. या घटनेच्या वेळी सचिन चिंतले व राजेश तोमर हे अंगरक्षक माझ्यासोबत होते. किशोर इंगळे हा ब्लॅकमेलिंग करत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती गडकरी यांनी केली आहे.
किशोर इंगळे याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. नागपूर होमिओपॅथिक कॉलेजच्या प्रकरणात त्यानेच खोटय़ा तक्रारी करून कॉलेजला ब्लॅकमेल केले होते. त्याला नागपूर विद्यापीठाने १९८३ साली बडतर्फ केले होते. २००१ पर्यंत, म्हणजे १८ वर्षे तो सेवेत नव्हता. त्यानंतर सभ्यपणाने व योग्यरीतीने वागेन, असा बाँड लिहून दिल्यानंतर २००३ साली त्याला सेवेत घेण्यात आले. लालगंजमधील राष्ट्रसेवा विद्यालय ही शाळा ताब्यात घेण्यासाठी शाळेच्या प्रशासकाला हाताशी धरून त्याने खोटा पत्रव्यवहार केला. याही प्रकरणी त्याच्याविरुद्ध केस सुरू आहे. इंगळे याने युवक काँग्रेसचे बनावट लेटरहेड छापून गैरव्यवहार केल्याची तक्रार बिज्जू पांडे यांनी केल्याची बातमीही वृत्तपत्रांत छापून आली आहे.
अशी बदनाम व्यक्ती माझ्याकडे काही विशिष्ट लोकांना घेऊन व पोलिसांवर दबाव टाकून मृत बालिकेच्या आई व बहिणीला गाडीत बसवून माझ्या वाडय़ावर आणते. वाडय़ावरील दुसऱ्याच गाडीचे फोटो घ्यायला लावते आणि वृत्तपत्रात छापून आणून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करते. किशोर इंगळे पोलिसांनाही ब्लॅकमेल करत असल्याचे चित्र उद्भवले आहे. योग्य दिशेने सुरू असलेल्या पोलीस कार्यवाहीला कलाटणी देण्याचा प्रयत्नही तो करत आहे. विश्वसनीयता गमावलेली ही व्यक्ती माझ्या काही राजकीय हितशत्रूंना हाताशी धरून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करते, ही गंभीर बाब आहे. याची शहानिशा इंगळे याच्या फोनची तपासणी केल्यास होऊ शकेल. त्यामुळे या प्रकरणी जातीने लक्ष घालून किशोर इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गडकरी यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.