Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा सोमवारी समारोप
न्या. के.टी. थॉमस प्रमुख पाहुणे
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस येणार असून त्यामुळे कथित

 

धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या सुमारे महिनाभरापासून सुरू असलेल्या रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप येत्या ८ तारखेला सायंकाळी रेशीमबाग मैदानावर होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्या. के.टी. थॉमस यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हेही यावेळी उपस्थित राहतील. हिंदुत्व हे मूळ धोरण असलेला संघ मुसलमान व ख्रिश्चनांच्या विरोधात असल्याचा समज आहे.
ओरिसामध्ये भाजप व बिजू जनता दल यांची राजवट असताना ख्रिश्चनांवर हल्ले झाले होते आणि चर्चेसची जाळपोळ करण्यात आली होती. याशिवाय, कर्नाटकमध्येही ख्रिश्चनांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही प्रकरणी भाजपसह संघ परिवारावर प्रचंड टीका झाली होती. या पाश्र्वभूमीवर न्या. के.टी. थॉमस यांनी संघाच्या जाहीर कार्यक्रमात हजर राहणे हा चर्चेचा विषय ठरणार आहे.
के.टी. थॉमस हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. मूळचे केरळचे असलेले कल्लुपुरक्कल थॉमस यांचा जन्म १९३७ साली झाला. बी.ए. केल्यानंतर त्यांनी बार-अॅट-लॉ ची पदवी मिळवली. त्यांनी १९६० सालापासून केरळ उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. नंतर उच्च न्यायालायाचे न्यायाधीश, मुख्य न्यायमूर्ती, अशी वाटचाल करत ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोहोचले. गेल्या सुमारे सहा वर्षांपासून ते सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत.