Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांची आता प्रवेशासाठी धावपळ
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

करिअरमध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आठवडाभरातच सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असून आता विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने त्याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी विद्यार्थ्यांपुढे अॅडमिशनसाठी

 

धावपळ हाच एककलमी कार्यक्रम असणार आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असतो. तसेच वाणिज्य, कला या शाखांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निकालानंतर आता कुठले महाविद्यालय, अभ्यासक्रम निवडायचा, यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी संबंधित अभ्यासक्रम व त्यात प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची माहिती काही दिवस आधीपासूनच घेऊन ठेवली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला सीईटीचा निकालही येत्या काही दिवसात लागणार असून त्यात अपेक्षित यश आले नाही, तर इतर शाखांमध्ये प्रवेश निश्चित करण्यावरही विद्यार्थ्यांचा भर दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाण्याचा कल वाढला आहे. यात हॉटेल मॅनेजमेंट, अॅव्हीएशन, इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, चार्टर्ड अकाऊन्टटस आणि इतरही अनेक अभ्यासक्रमांकडे कल दिसून येत आहे. एकीकडे मंदीमुळे अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर उद्योगावर याचा अधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तरीही विद्यार्थ्यांचा या दोन क्षेत्रांकडे अधिक कल दिसत आहे. सीईटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेशाला अधिक पसंती दिल्याचे यंदा सीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनही दिसून येते.
वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात आली. सध्या राज्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या ८३ हजार १६१ जागा आहेत. यात नंतर वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात अभियांत्रिकीची १७४, वैद्यकीय ५८ आणि फार्मसीची ११८ महाविद्यालये आहेत. बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, सीईटीचा कटऑफ पॉईंट किती राहील, हे १४ जूनला जाहीर होणाऱ्या सीईटीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.