Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रवेश साऱ्यांनाच मिळणार, प्रतीक्षा मात्र सीईटीची
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना आता ‘मिशन

 

अॅडमिशन’चे वेध लागले असून अनेक महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खुणावत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन महाविद्यालयांचे भरमसाट वाढलेले पीक लक्षात घेता कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता फारच कमी आहे. असे असले तरी वैद्यक आणि अभियांत्रिकीसाठी एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षाही विद्यार्थ्यांना आहे.
पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये प्रथम वर्षांला प्रवेश घ्यायचा की मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट आदी विषयांकडे वळायचे, यावरील पालक व विद्यार्थ्यांनी गप्पा थांबवून थेट प्रवेशासाठी विचारपूस करणे सुरू केले आहे. एव्हाना असंख्य विद्यार्थ्यांनी यापूर्वीच इतर विद्यापीठातील प्रवेश परीक्षा देऊन त्या यशस्वीपणे उत्तीर्णही केल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या अनेक नामांकित संस्था व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यांना प्रतीक्षा होती ती केवळ बारावीच्या निकालाची.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून नागपूर विभागातून एकूण १,३९,१७४ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. त्यापैकी १,०२,५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्याच महिन्यात १,३९,१७४ विद्यार्थ्यांपैकी नागपूर जिल्ह्य़ातून ३८,७४३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र हेल्थ अॅण्ड टेक्नॉलॉजी कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एमएचटी-सीईटी) दिली. ही परीक्षा अभियांत्रिकी आणि वैद्यक या दोन्ही शाखेसाठी यावर्षी घेण्यात आली होती, हे विशेष. त्यामध्ये जीवशास्त्र, पदार्थविज्ञान-रसायनशास्त्र आणि गणित अशा तीन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जीवशास्त्र विषयासाठी ८,३०४ विद्यार्थी, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रासाठी १६,०८३ आणि गणित विषयासाठी १५,२३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जीवशास्त्र विषयाला ११९ विद्यार्थी गैरहजर होते. पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रासाठी ३७६ आणि गणित विषय घेतलेल्यांपैकी ३८७ विद्यार्थी गैरहजर होते. आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, विद्यार्थी मोठय़ा संख्येने वैद्यक व अभियांत्रिकी विषयाकडे वळतात.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले १,०२,५३३ विद्यार्थी, त्यानंतर एमएचटी-सीईटी दिलेले ३८,७४३ विद्यार्थी पाहता अजूनही फार मोठा विद्यार्थ्यांचा चंग हा प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा प्रवेशासाठी खुणावत आहेत. विद्यापीठाशी संलग्नित विविध कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी एकूण ६८,१०० जागा आहेत. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित कला महाविद्यालये २१२ आहेत. त्यात ३९,२०० विद्यार्थी क्षमता आहे. वाणिज्य महाविद्यालये ११८ आहेत. त्यात १७,६०० विद्यार्थी क्षमता आहे तर, विज्ञान महाविद्यालये ९४ असून त्यांची एकूण विद्यार्थी क्षमता ११,३०० एवढी आहे. त्यानंतरही लॉ, फॅशन डिझाईन, बीसीएस, बीसीसीए, बीबीए, एमबीए यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या संस्था व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहेच.