Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

योगिता ठाकरे मृत्यू प्रकरण
गरज असल्यास सीआयडी चौकशी
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

नितीन गडकरींना ‘क्लीन चिट’
गृहमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप
महालातील गडकरी वाडय़ातील कारमध्ये योगिता ठाकरे ही मुलगी संशयास्पदरीत्या मृतावस्थेत

 

आढळल्याच्या घटनेची गरज भासल्यास सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज मुंबई येथे विधान परिषदेत सांगितले. या प्रकरणात त्यांनी नितीन गडकरी यांना ‘क्लीन चिट’ दिली. विशेष म्हणजे खुद्द गडकरी यांनीच आपण या प्रकरणी कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचे पूर्वीच जाहीर केले होते, अशी माहिती मुंबई येथील ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने दिली.
१९ मे रोजी महालातील गडकरी यांच्या निवासस्थानाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये योगिता ठाकरे या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. तिच्या तोंडातून रक्त आले होते आणि तिच्या कपडय़ांवरही रक्ताचे डाग आढळले. संबंधित कारच्या ड्रायव्हरने कारच्या मागच्या बाजूचे दार उघडल्यानंतर त्याला हा मृतदेह आढळला. यानंतर मुलीच्या आईवडिलांना बोलावून मृतदेह नेण्यास सांगण्यात आल्यामुळे त्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तपास केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यावेळी पहाऱ्यावर असलेले पोलीस व इतर काहीजणांचे बयाण घेतले असले तरी या संशयास्पद मृत्यूचे रहस्य न उलगडल्यामुळे त्यामागील गूढ वाढले आहे.
योगिता मृत्यू प्रकरणाची सी.बी.आय. मार्फत चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका योगिताच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर न्यायालयाने पोलिसांना येत्या १० तारखेपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आज नितीन गडकरी यांनीच औचित्याच्या मुद्याव्दारे हा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला. योगिता ठाकरेच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून अनेक संघटना ब्लॅकमेल करीत असल्याने आपल्याला मन:स्ताप होत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात नितीन गडकरी यांचा काहीही दोष नसल्याचे खुद्द गृहमंत्र्यांनीच स्पष्ट केले. या संदर्भात उलटसुलट बातम्या येत असून गडकरी यांना या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. त्यावर जो निर्णय होईल त्याबद्दल गडकरी व याचिकाकर्ते समाधानी नसतील तर या प्रकणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची आमची तयारी आहे, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.