Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाच्या सोबतीने करा पर्यटन
नागपूर ५ जून / प्रतिनिधी

उष्मा- उन्हाचा जोर अजून कायम असला तरी मान्सूनचे संकेत देणारा वादळी वाऱ्यासह बरसून जाणारा पाऊस वातावरणात आल्हाददायक रंग भरून जातो. अशा काळात नजिकच्या निसर्गरम्य

 

स्थळांना भेट देण्याची मजा काही औरच असते. विदर्भातील बहुतेक सर्व शाळा २६ जूनला सुरू होणार असल्याने बच्चे कंपनीला अजूनही किमान तीन आठवडय़ाची सुटी आहे. अजूनही सुटीचे तीन आठवडे हाती असल्याने अंगाची लाही लाही करणारा उकाडा काही अंशी सौम्य करण्यासाठी आसपासच्या घाटाच्या परिसरात दोन-चार दिवस जाण्यास नक्कीच हरकत नाही. दारात येऊन ठेपलेल्या पर्जन्यराजाचे स्वागत घाट परिसरातील निसर्गरम्य वातावरणात करण्याची कल्पना लोकांना नक्कीच आवडेल.
उष्मालाटेच्या काळात ४२ ते ४७ अंश सेल्सियस डिग्रीत अडकलेला संपूर्ण विदर्भ आता बऱ्याच प्रमाणात बाहेर पडला आहे. नको-नकोसा वाटणारा उन्हाळा लवकरात लवकर संपावा व पावसाच्या सरीत चिंब भिजून जावे असे प्रत्येकाला वाटत असले तरी उन्हाळा काही अद्याप संपलेला नाही. काही काही ठिकाणी अधून-मधून वळवाचा अथवा वादळी पाऊस हजेरी लावत असला आणि बऱ्याच ठिकाणी सुखद वारे वाहत असले तरी उन्हाळा अजून दारातून बाहेर पडलेला नाही. आग ओकणारा सूर्य व अंगाची लाही लाही करणारा उकाडा आपले अस्तित्व जाणवून देत आहे. मे महिना संपला असला तरी उन्हाची दाहकता अजूनही काही कमी झाली नाही. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवतो आणि सायंकाळी मात्र येणाऱ्या ढगाळ वातावरणातील उकाडय़ाने मात्र जीव अगदी नकोसा होतो. येणाऱ्या दिवसात वादळी पावसाचे ढग येतील व कमालीच्या उकाडय़ातून सुटका करण्याची आशा लावून जातील. अशा या वातावरणातून बाहेर पडून रिलॅक्स होण्याची संधी तुम्हाला नक्कीच आवडेल.
परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुटय़ा लागत नाही तोच पालकांनी मुलांना शहरातील विविध शिबिरात एंगेज करून ठेवले होते. आता तर शिबिरेही संपली आहेत. बहुतेक शाळांचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल लागला. दहावीची शिकवणी काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे त्यामुळे अनेक पालकांनी शहरापासून दूर एखाद्या निसर्गस्थळी जाण्याचा बेत आखायला हरकत नाही.
जलधारा अंगावर घेत हिरव्यागार घाटात फिरल्याने नक्कीच फ्रेश-रिचार्ज होता येईल. अर्थात, गर्दीच्या आणि बजेटबाहेरच्या हिल स्टेशन किंवा पर्यटन स्थळी जाण्यापेक्षा आसपासच्या निसर्गस्थळी जाणे केव्हाही खिशाला परवडणारे. दूरवरच्या अंतरावर पर्यटनासाठी जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या दीर्घ नियोजनाचीही याला फार गरज नाही. ताडोबा, सालबर्डी, चिखलदरा, मेळघाट इत्यादी निसर्गरम्य वातावरण असलेल्या परिसरात दोन-चार दिवस वास्तव्य करून रिलॅक्स होता येईल.