Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ट्रकच्या धडकेत एक ठार; दुसरा जखमी
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

वेगात असलेल्या ट्रकची धडक लागल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही अपघाताची घटना गुरुवारी रात्री दाभा, रिंग रोड येथे घडली.

 

धामना येथील लालाजी सुदर्शन यादव (२५) आणि त्याचा मित्र नईमउद्दीन अंसारी (२५) हे दोघे गुरुवारी रात्री ९.४५ वाजता मोटारसायकलने (एमएच-४० क्यू १४१८) जात असता दाभा, रिंगरोडजवळ वेगात असलेल्या ट्रकची (क्र.एमपी ०९ केडी १५८) मोटारसायकलला जोरदार धडक लागली. या धडकेत लालाजी यादव हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. तर मागे बसलेला नईमुद्दीन अंसारी हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर चालक ट्रक घटनास्थळी सोडून पळून गेला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
क्षुल्लक कारणावरून हल्ला
क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे.
विजय गबरुदास कागडे (४२) असे जखमीचे नाव असून तो स्विपर कॉलनीतील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री ८.३० वाजता विजय त्याच्या घरापुढे बसला असता आरोपी सन्नीलाल रामसिंग गुदरिया (५८) रा. कपिला वस्ती हा तेथे आला व शिवीगाळ करून विजयशी भांडण करू लागला. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, आरोपीने घरी जाऊन लोखंडी खंजर आणला व विजयच्या छातीवर वार करून जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कुणीतरी इमामवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर जखमी असलेल्या विजयला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले. याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.
महिलेची आत्महत्या; एकास अटक
महिलेने केलेल्या आत्महत्येवरून तिच्या पतीस हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सविता विजय निनावे (३४) या महिलेने ३ जूनला विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. सविताच्या सासरच्या कुटुंबातील सर्व सदस्य व्यवसायासाठी २० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावत होते. त्यांनी ही मागणी पूर्ण न करू शकल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार सविताचे वडील चंद्रशेखर वासुदेवराव सावले (२५) रा. रामटेक यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सविताचा पती विजय (३४), दिर हरीश व सासू पुष्पा निनावे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून विजय निनावे याला अटक केली.