Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘सिल्ला किडीपासून संत्रा बहाराचे संरक्षण करा’
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

मृग बहारामध्ये सिल्ला किडीपासून संत्रा बहाराचे संरक्षण करा, अशी शिफारस लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रिया करणाऱ्या औद्योगिक मिशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकारला केली आहे.

 

विदर्भामध्ये लिंबूवर्गीय पिकांचा अनेक कारणांनी ऱ्हास होत आहे. त्यामध्ये संत्र्याच्या बागा दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्या दृष्टीने वेळीच उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘विदर्भाकरता लिंबूवर्गीय फळावर तंत्रज्ञान मोहीम’ राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या अंतर्गत विदर्भातील संत्रा बागायतदारांसाठी काही शिफारशी मिशनने सुचवल्या आहेत. विदर्भामध्ये संत्र्याचा मृग बहार घेण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. कारण जून-जुलैमध्ये येणाऱ्या फुलांपासून मार्च-एप्रिलमध्ये फळे निघतात. त्यांना चांगला भाव मिळतो. जून, जुलैच्या वेळी पाऊस आल्याबरोबर संत्र्यांला नवीन पालवी आणि फुले येतात. या वेळी संत्र्यावर ‘सायला’ किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होतो. सायलाचे प्रौढ आणि पिल्ले दहा ते शंभराच्या समुहात राहून झाडाची कोवळी पाने, शेंडा आणि कळ्यातून रस शोषून घेतात. परिणामत: नवीन कळ्या, पाने आणि फुलांची अत्याधिक प्रमाणात गळ होते आणि फांद्या सुद्धा वाळतात. पिल्ले मधासारखा चिकट गोड पांढरा पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी झपाटय़ाने वाढते. शिवाय ‘सायला’ झाडामध्ये विषारी द्रवसुद्धा सोडते. त्यामुळे ‘फादीमार’ रोग झाडांना होण्याची शक्यता बळावते. अधिक महत्त्वाचे म्हणजे सायला कीड फायटोप्लाझमासारख्या विषाणुमुळे होणाऱ्या ‘ग्रीनींग’ नावाचा व्हायरस अधिक हानीकारक समजला जातो. याबाबत एन.आर.सी.सी.ने संत्रा उत्पादक शेतकरी बंधुंना/ उत्पादकांना कोणतीही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी ०७१२-२५००३२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.