Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणूक आयोगाची विधानसभेसाठी जोरात तयारी
नागपूर जिल्ह्य़ासाठी ५ हजार ईव्हीएम
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आटोपल्यावर निवडणूक आयोगाने आता विधानसभेसाठी जोरात तयारी चालविली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ऑफ हैदराबाद येथे ५०

 

हजार ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) तयार करण्याचे कार्यादेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएममधील ढाचा सहा महिने नष्ट करता येत नाही. प्रसंगी कुणी निकालाविरुद्ध न्यायालयात गेले तर अडचण नको म्हणून निवडणुकीनंतर सहा महिने ईव्हीएममधील माहिती कायम ठेवली जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडणार नाहीत. याच कारणामुळे नव्या ईव्हीएम तयार करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्य़ात ३ हजार ७१३ मतदान केंद्र आहेत. रिंगणात २६ पेक्षा कमी उमेदवार राहिले तर प्रत्येक केंद्रावर एक ईव्हीएम लागेल. १० टक्के ईव्हीएम राखीव ठेवाव्या लागतात. त्यानुसार नागपूर जिल्ह्य़ासाठी किमान ४ हजार ८५ ईव्हीएम लागतील.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात चुका दिसून आल्या. यापासून निवडणूक विभागाने चांगला धडा घेतला असून, प्रथम निर्दोष मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. निवडणूक विभाग वेळोवेळी मतदार नोंदणीसाठी, यादीतील दुरुस्तीसाठी मतदारांना आवाहन करीत असतो. मात्र मतदार त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे यावेळी मतदार नोंदणीसाठी लोकप्रतिनीधींनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार राजेंद्र मुळक हे पश्चिम नागपूर मतदारसंघात १५ गाडय़ा लावून नागरिकांना मतदार नोंदणीचे आवाहन करणार आहेत. या गाडय़ांवर त्यांचे बॅनर, होर्डिगदेखील राहील. गाडीत निवडणूक विभागाचे कर्मचारी असतील. ते पश्चिम नागपुरातील वॉर्डामध्ये जाऊन मतदार नोंदणी करतील. याशिवाय आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष जैस्वाल हे आपापल्या मतदारसंघात नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करणारे बॅनर व होर्डिग लावणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने त्यासाठी त्यांना परवानगीही दिली आहे. या माध्यमातून आचारसंहितेपूर्वी आमदारांचा निवडणूक प्रचारदेखील होईल.
त्यामुळे इतर आमदारही असाच पुढाकार घेतील, अशी शक्यता आहे. जिल्ह्य़ातील ३ हजार ७१३ मतदान केंद्रावर मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. सुमारे ७ हजार ४२६ शिक्षकांना मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील दुरुस्ती व नव्या मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एक ‘कम्युनिकेशन प्लॅन’ तयार केला आहे. या अंतर्गत मतदार नोंदणीच्या कामासाठी शिक्षकांसह लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल व दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करण्यात आली आहे. तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकारी दररोज या यादीतील कोणत्याही कर्मचाऱ्यांना फोन करतील व कोणत्या भागात मतदार नोंदणी सुरू आहे, याची विचारणा करतील. जिल्हाधिकारी दराडे हे स्वत: आकस्मिक भेटी देऊन मतदार नोंदणीसाठी शिक्षक घरोघरी जात आहेत की नाही, याची पाहणी करणार आहेत. कामात निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळून आले तर जबाबदार शिक्षकाविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५५ अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे.
मतदार याद्यांमधील चुका टाळण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसोबत (बीएलओ) व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (बीएलए) देण्याचा निर्णय आयोगाने घेतला, त्यानुसार राजकीय पक्षांना बीएलएची यादी देण्यास सांगण्यात आले. मात्र, पक्षांनी मतदार नोंदणीसाठी अद्यापि आपले प्रतिनिधी दिलेले नाहीत.
मतदार याद्यांची छपाई मुंबईत करण्यात आली. तीत अनेक त्रुटी आहेत. दुरुस्तीसाठी सर्व माहिती मुंबईला पाठवावी लागते.
यात होणारा त्रास टाळण्यासाठी मतदार याद्यांची छपाई स्थानिक पातळीवर नागपुरातील शासकीय मुद्रणालयात करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. स्थानिक पातळीवर छपाई झाली तर यादीची त्वरित पडताळणी करता येते. त्यातील त्रुटीही त्वरित दूर करता येतात.