Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

थोरात यांनी घडवली वन्यजीवांची सफर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराईचा उपक्रम
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हय़ापासून ते काश्मीरातील वन्यजीवांची अनोखी सफर प्रसिद्ध निसर्गप्रेमी व वनांचे अभ्यासक स्वागत थोरात यांनी घडवली. निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

 

वनराईच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे.
दिवं. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात स्वागत थोरात यांचा ‘वन्यजीव व आपण’ या विषयावरील ध्वनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहन अग्रवाल व प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण तापडिया होते.
स्वागत थोरात यांनी देशातील अनेक भागात फिरून वन्यजीवांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यात आलेले अडथळे, संकटे या सर्व बाबी त्यांच्या ध्वनी चित्रफितीद्वारा मार्गदर्शनपर कार्यक्रमातून दिसून आल्या. मोर त्याला पाहिजे त्या दिशेने, पाहिजे त्या उंचीवर पिसारा फुलवू शकतो. या मोराचे दर्शन थोरात यांनी घडवले. त्याचवेळी त्यांनी मोराची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कस्तुरीचा सुगंध साऱ्यांनाच भारावून टाकतो पण, एक किलो कस्तुरीसाठी २०० मृगांचा बळी जातो हे त्यांनी सांगितले. काश्मिरात आढळणारा डबल बॅक्टेरीयन कॅमलची सैर त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव त्यांनी कथन केले. चित्रीकरणादरम्यान, अनेकदा त्यांच्यावर वन्यजीवांनी आक्रमण करण्याचासुद्धा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी जंगल आणि वन्यजीवावर आधारित कवितेने केली.
प्रवीण तापडिया यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त केली. जग झपाटय़ाने प्रगती करत आहे पण, त्याचबरोबर निसर्गप्रकृतीच्या नियमाविरुद्ध बदल घडून येत असल्याचे त्याचे तोटेसुद्धा पर्यावरण ऱ्हास आणि प्रदुषणातील वाढीच्या रुपात सहन करावे लागत आहे. प्रकृतीचक्रात बदल घडवण्यामागे मनुष्य कारणीभूत असल्याचे तापडिया म्हणाले. याप्रसंगी मोहन अग्रवाल यांनीसुद्धा उद्बोधन केले.
कार्यक्रमाचे संचालन नितीन जतकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.