Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आंतरराष्ट्रीय कार्गोहबसाठी दिल्ली तर ‘नॅशनल हब’साठी नागपूर योग्य
नियोजन आयोगाच्या समितीचे मत
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

कार्गोहबमुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना आणि या प्रकल्पासाठी विदर्भातील आजी-माजी केंद्रीय मंत्री प्रयत्न करीत असताना नियोजन आयोगाच्या

 

एका समितीने आंतरराष्ट्रीय कार्गोहबसाठी नागपूर ऐवजी दिल्ली योग्य असल्याचे मत त्यांच्या अहवालात व्यक्त केले आहे. ‘नॅशनल हब’साठी नागपूरची शिफारस या समितीने केली आहे.
दिल्लीकडे येणाऱ्या हवाई प्रवाशांची व त्यामुळेच विमानाबरोबर येणाऱ्या माल वाहतुकीची कार्गो टक्केवारी नागपूरपेक्षा अधिक असल्याचे समितीने त्यांच्या शिफारसीमध्ये म्हटले आहे. मुंबईतही दिल्लीच्याच प्रमाणात प्रवासी व माल वाहतूक होते. मात्र तेथे विमानतळ विस्तारास जागा नसल्याने कार्गो हब विस्तार व विकासासाठी दिल्ली विमानतळ उपयुक्त ठरेल, असे समितीचे म्हणणे आहे.
मिहान प्रकल्प नागपूरसह संपूर्ण परिसरात बहुचर्चित झाला आहे. मिहानच्या नावे राजकारणही बरेच झाले आहे. मात्र सद्यस्थितीत प्रकल्पात पायाभूत सुविधांच्या उभारणीव्यतिरिक्त केवळ दोन ते तीन कंपन्यांची कामे अत्यंत प्राथमिक स्तरावर सुरू आहेत. ती देखील कार्गो हबमध्ये न होता, सेझमध्ये सुरू आहेत.
विमानतळाचा पुढील विकास करण्यासाठी राज्य शासकीय स्तरावरील महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त कंपनीची नोंदणी प्रक्रिया मागील तीन महिन्यांपासून रखडली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार मिहानमध्ये सुमारे सव्वा वर्षांपासून एका रुपयांचीही नवीन गुंतवणुक झाली नसली तरी, आतापयर्ंत मिहान व सेझमध्ये विविध कंपन्यांच्या जमीन वितरणाच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयापेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे. पुढील पाच वर्षांत या प्रकल्पात १० हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक अपेक्षित आहे. याद्वारे आगमी १० ते १५ वर्षांत ४० हजार रोजगारानिर्मितीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शासन, लोकप्रतिनिधी सर्वाच्याच मिहानच्या दृष्टीने नागपूरची हवाई प्रवासी वाहतूक वाढवण्याचा नेटाने विचार करावा लागेल, असे स्पष्ट संकेत नियोजन आयोगाच्या समितीच्या शिफारशीने दिले आहेत.