Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘शिवाजी महाराजांनी अस्तित्वाचा मार्ग दाखवला’
इतिहास संसोधक डॉ. भा.रा. अंधारे यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार प्रदान
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्मितेसोबतच अस्तित्वाचा मार्गही दाखवला. त्यामुळे प्रत्येकाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी विचार करावा, असे प्रतिपादन दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे

 

कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक स्मृती समारोहानिमित्त इतिहास संशोधक डॉ. भा.रा. अंधारे यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजय बाराहाते, शिवकथाकार विजयराव देशमुख व प्रवचनकार विवेक घळसासी उपस्थित होते. २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ देऊन डॉ. पठान यांच्या हस्ते डॉ. अंधारे व मीरा अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. मिश्रा म्हणाले, भा. रा. अंधारे हे केवळ इतिहासाचे संशोधक नाही तर, चालते बोलते विद्यापीठ आहे. आजही आपण गुलामगिरीत जीवन जगत आहोत. मुळात आज प्रत्येकाला स्वधर्माची जाण असणे आवश्यक आहे. स्वदेश, स्वधर्म, स्वावलंबन व स्वाभिमान या चार पुरुषार्थाचा विचार करून जीवन जगलो तर, हा देशच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती गुलामीतून मुक्त होऊ शकते, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. मां जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढले. निस्तेज, निष्प्रभ समाजात त्यांनी परिवर्तन घडवून आणले, असेही डॉ. मिश्रा म्हणाले.
डॉ. भा.रा. अंधारे म्हणाले, या सत्कार समारंभाने भारावून गेलो आहे. आज शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे. शिवसृष्टीत असल्याचा भास होत आहे. गुरू माऊलीच्या कृपेने आजपर्यंत इतिहासाचा अभ्यास केला आहे. अनेक विद्याथ्यार्ंनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा हा पुरस्कार असल्याचे डॉ. अंधारे म्हणाले. यावेळी कुलगुरू एस.एन. पठान यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बाराहाते यांनी केले. प्रसन्न बारलिंगे यांनी मानपत्राचे वाचन केले. मिलिंद तुळणकर यांनी शिवगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण देशपांडे यांनी केले. आभार कल्याण पुराणिक यांनी मानले.