Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शहरात सहा झाडे कोसळली
अग्निशामक दलाच्या जवानांची तारांबळ
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

वादळी पावसामुळे गुरुवारी पडलेली झाडे उचलण्याची धावपळ सुरू असतानाच आज पुन्हा शहरात सहा ठिकाणी झाडे पडल्याने अग्निशामक दलाच्या जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. आज पडलेल्या झाडांमुळे कुठेही प्राणहानी झाली नसली तरी, नागरिकांना मात्र त्रास सहन करावा

 

लागला.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास वंजारीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ झाड कोसळले. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. हे झाड कापून वेगळे करण्यात येत असतानाच दुपारी १२ वाजता त्रिमूर्तीनगरातील देशपांडे ले-आऊट येथे झाड पडल्याने जवानांना तिकडे धाव घ्यावी लागली. यानंतर दुपारी एक वाजता तेलीपुरा, भांडेवाडी येथे झाड कोसळले. या झाडामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन झाड तोडून रस्ता मोकळा केला. यानंतर दुपारी ४ वाजता अयोध्यानगरातील नगरसेवक देऊळकर यांच्या घरासमोर एक झाड कोसळले. दुपारी साडे चार वाजता लालगंज येथील विठ्ठल महाजन यांच्या घरासमोर झाड पडले.
आज सहा ठिकाणी झाले पडली. रस्त्यावर पडलेल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना काही वेळ त्रास सहन करावा लागला. गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसानेही सात-आठ ठिकाणी झाडे पडली होती. कारवर झाड पडल्याने कारचे नुकसान झाले असले तरी, कुणी जखमी झाले नाही. मात्र, तारा तुटल्याने काही भागातील वीज प्रवाह खंडित झाला होता.