Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
दु:ख आणि सुख; दान आणि कर्म

 

दारिद्रय़ हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्रय़नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.हा बौद्ध जीवनमार्ग होय. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसांत आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वीतराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते; म्हणून विषयानासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो. कारण जित हा दु:खी असतो. जय-पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही. द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दु:ख नाही. शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्यकरतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकान्तप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे. जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोडय़ाला भरधाव चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोडय़ासारखा कोणी आहे काय? की, जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही.कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दु:खकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल.रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, नि:स्वार्थीपणा आहेत.हा बौद्ध जीवनमार्ग आहे.खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. असत्य भाषण टाळावे.सम्यक् मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
कृष्णविवर- ५
कृष्णविवराच्या आत पडत असलेल्या वस्तुंचं काय होतं?
जेव्हा एखादी वस्तू कृष्णविवराच्या जवळ जाताना दिसेल तेव्हा तिच्या बाबतीत आपल्याला अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसतील. दूरवरून कृष्णविवराच्या परिसराचे निरीक्षण करणाऱ्याला कोणतीही वस्तू कृष्णविवरांमध्ये पडताना कधीच दिसू शकत नाही. कारण तीव्र गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कालमापनावरही होत असल्यामुळे, आपल्यासारख्या दूरवरील निरीक्षकाच्या दृष्टीने कृष्णमापनावरही होत असल्यामुळे, आपल्यासारख्या दूरवरील निरीक्षकाच्या दृष्टीने कृष्णविवराजवळचा काळ हा कमी गतीने पुढे सरकत असतो. त्यामुळे तिथे घडणाऱ्या घटना या आपल्याला मंद गतीने घडताना दिसतात. कृष्णविवरात पडणाऱ्या वस्तूची गतीही आपल्याला मंदावलेली दिसते. वस्तू कृष्णविवराच्या जितकी जवळ, तितकं तिच्यावरचं गुरुत्वाकर्षण जास्त. त्यामुळे कृष्णविवराच्या जवळ पोहोचल्यावर तिची गती अधिकाधिक मंदावत जाऊन, कृष्णविवराच्या सीमेच्या थोडीशी बाहेर ती वस्तू कायमची थांबलेली दिसते. मात्र, असा परिणाम फक्त दूरच्या निरीक्षकालाच दिसेल. कृष्णविवरामध्ये पडणाऱ्या वस्तुला (किंवा व्यक्तीला) मात्र स्वत:चा वेग कमी झालेला जाणवणार नाही. कृष्णविवराची सीमा ही खरं तर एक काल्पनिक रेषा असते. तिच्या अलिकडे या पलिकडे भौतिकशास्त्राचे नियम काही अचानक बदलू शकत नाहीत. कृष्णविवराची सीमा ओलांडून आपण कृष्णविवरांत शिरलो की नाही हे कोणालाही प्रयोग करून (किंवा खिडकीतून बाहेर पाहून) आपण ठरवू शकत नाही. या सर्व ऊहापोहामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कृष्णविवराच्या जवळ, प्रत्येक बिंदूवरील गुरुत्वाकर्षणाचे बल हे कृष्णविवरापासूनच्या अंतरानुसार खूपच बदलत असते. आता समजा, एखादी व्यक्ती कृष्णविवरामध्ये पडते आहे. पडताना तिचे पाय कृष्णविवराच्या दिशेकडे आहेत आणि डोके विरूद्ध बाजूस आहे. अशा व्यक्तीचे पाय जास्त बलाने ओढले जातील आणि डोके कमी बलाने ओढले जाईल. या ओढाताणीमध्ये त्या दुर्दैवी व्यक्तीचे मात्र तुकडे होतील.
अनिकेत खुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
युआनशी - काई
युआनशी - काईचा जन्म १८५९ च्या सुमारास झाला. बुद्धिमान असलेल्या युआनने शासकीय परीक्षा उत्तीर्ण होऊन मांचू दरबारात लष्कराचे प्रमुखपद मिळविले. डॉ. सन्-येत्-सेन यांच्या नेतृत्वाखाली जुलमी मांचू राजवटी विरूद्ध चिनी लोकांनी क्रांती घडवली. तेव्हा संधीसाधू युआनने मांचू सम्राटाला पदच्युत करून क्रांतिकारकांशी समेट केला. डॉ. सेन यांनी मोठय़ा मनाने चीनच्या भल्यासाठी युनानला नव्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष बनवले. पण अध्यक्षपदी येताच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. सेन यांच्या ‘कॉमिन्टाँग’ पक्षाला आव्हान म्हणून स्वत:ची रिपब्लिकन पार्टी स्थापन केली. तरीही पार्लमेंटमध्ये कॉमिन्टाँग पक्षाला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधानपदाचे उमेदवार सुंग यांचा खून केला. परिणामी डॉ. सेन यांना परदेशात आश्रय घ्यायला लागला. मग तर त्यांचे चांगलेच फावले. चीनच्या सम्राटपदी विराजमान होण्यासाठी त्याने एक प्रमुख नागरिकांची परिषद स्थापन करून त्या परिषदेच्या आग्रहामुळे आपण सम्राटपद भूषवतो आहे, असे भासवले. ३ जानेवारी १९१६ रोजी त्याने स्वत:चा राज्याभिषेक करून चीनचे ‘सम्राटपद’ ग्रहण केल्याचे जाहीर केले. या सुमारास जपानने चीनकडे आपल्या २१ कुप्रसिद्ध मागण्या पाठविल्या. त्याही त्याने मान्य करून चीनचा स्वाभिमान जपानकडे गहाण टाकला. परिणामी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. चीनच्या अनेक प्रांतात बंड होऊन त्यांनी स्वातंत्र्य जाहीर केले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहताच त्याने सम्राटपदाचा त्याग केल्याचे जाहीर केले. पण आता खूप उशीर झाला होता. पार्लमेंटचे सदस्य, अधिकारी, लष्करी नेते या सर्वानी त्याला अक्षरश: सत्तेवरून हाकलून दिले. या अपमानास्पद धक्क्य़ातून तो स्वत:ला सावरू शकला नाही. परिणामी तो खचला आणि ६ जून १९१६ रोजी मृत्यू पावला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
तेजस्वी होऊया
खूप प्राचीन काळातली गोष्ट आहे. त्या काळात राजे हरिणाची शिकार करण्यात भूषण मानत. अर्थात त्या काळातली परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. हरिणांची संख्या भरपूर होती. प्रजेच्या शेतीची राजा काळजी घेई. शेतीमधील पिकांची नासाडी हरिणे करत. त्यामुळे हरिणांची शिकार करणे गैर समजले जात नसे त्या वेळची ही गोष्ट आहे. आज हरिणे संख्येने खूप कमी झाली आहेत. अशावेळी आहेत ती हरिणे जपणे, त्यांच्या संख्येत वाढ होईल असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर कुणी हरिणांना इजा पोहोचवेल तर त्याला शासन होणेही गरजेचे आहे. जोपासना व संवर्धन याची प्राणीमात्रांना गरज असण्याचा आजचा काळ आहे. हे आपण सगळे जाणतो.
पौरव कुळातला पराक्रमी राजा दुष्यंत शिकार करत कण्व मुनींच्या आश्रमात येऊन पोहोचला. आश्रमाचा परिसर रम्य होता. हरिणे आणि त्यांची बालके निर्भयपणे हिंडत होती. अनेक वृक्षवेलींनी सारे वातावरण सुंदर झाले होते. फुलांमुळे रंग आणि गंधाची उधळण होत होती. फळांचे मधुर गंध हवेत दरवळत होते.
हरिणाचा पाठलाग करीत आलेल्या राजा दुष्यंताने शिकार करण्यासाठी धनुष्यावर भात्यातला बाण लावून नेम धरला. इतक्यात एक तेजस्वी कुमार तिथे धावत आला. राजाला त्याने आडवले. दोन्ही हात जोडून नम्रस्वरात कुमार म्हणाला-
आश्रममृगो अयम्, न हन्तव्यो न हन्तव्यो।
(राजन् हा आश्रमामधील मृग आहे. त्याला मारु नका.)
कुमाराचे ते बोल ऐकून राजा थबकला. धनुष्याच्या दोरीला लावलेला बाण त्याने परत आपल्या भात्यामध्ये घातला. हरिण दूर पळून गेले.
आश्रमातला एक धीट कुमार प्रत्यक्ष राजाला सर्वसत्ताधीश आणि महाबलाढय़ राजाला विरोध करू शकला आणि राजानेही त्याच्या विरोधाचा स्वीकार केला ही आहे भारतीय संस्कृती.
आपल्याला जे योग्य अथवा अयोग्य वाटते. ते निर्भीडपणे, स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. आपण लहान आहोत, अजाण आहोत, मोठय़ांना आपले सांगणे आवडणार नाही म्हणून आपले विचार व्यक्त न करणे चुकीचे आहे. आपले म्हणणे नम्रपणे पण ठामपणे सांगता येणे हा तेजस्वीपणा आहे.
आजचा संकल्प- मला योग्य वाटते ते मी न भीता व्यक्त करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com