Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

आता पोलिसांना मिळणार मोठी घरे
प्रतिनिधी

गृहमंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने सीबीडी बेलापूर येथील मोडकळीस आलेली चाळ टाइप घरे पाडून तेथे सिडकोमार्फत इमारत बांधून पोलिसांना मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. गेली ३० ते ३५ वर्षे पोलीस कर्मचारी मोडकळीस आलेल्या १० बाय १० च्या चाळ टाइप घरांमध्ये राहात होते.

ऑनलाइन निविदांच्या सादरीकरणातील अडचणी सोडविण्याचे आदेश
बेलापूर/वार्ताहर

२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई नगरीत येथील मनपाने तब्बल १७ वर्षांनंतर खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत मनपा क्षेत्रातील सर्व कामांच्या निविदा मॅन्युअली पद्धतीने काढल्या जात होत्या वा स्वीकारल्या जात होत्या. आता वेबसाइटद्वारेच त्यांचे विक्री व सादरीकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेला अधिक गती यावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाइन निविदांच्या सादरीकरणातील ठेकेदार व तत्सम घटकांना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्याचे आदेश पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी दिले आहेत.

जेएनपीटी बंदर कामगार ट्रस्टपदी दिनेश पाटील
उरण/वार्ताहर

जेएनपीटी बंदराच्या कामगार ट्रस्टीपदी जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख दिनेश पाटील यांना दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी मरिन वर्कर्स युनियन जेएनपीटी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच कामगार संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेएनपीटी बंदरात टग, पायलट लॉच व बोटींवर विविध विभागात सुमारे दोनशे कामगार काम करीत आहेत. कामगार स्थानिक असल्याने अनेक जेएनपीटी कामगार संबंधित कामगारांचे नातेवाईक आहेत. जेएनपीटीच्या ९ जून रोजी होणाऱ्या कामगार ट्रस्टीपदाच्या निवडणुकीत अशा जेएनपीटी कामगारांचे सहकार्य व पाठबळ मिळवून देण्यासाठी मरिन वर्कर्स युनियन जेएनपीटीचे अध्यक्ष जयवंत म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस सरचिटणीस बळीराम ठाकूर, सुहास गवस, मनीष मुंबईकर, शिवाजी अरगडे, तांबरे मास्तर, अजित पाटील व संघटनेचे बहुसंख्य कामगार उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना कामगार ट्रस्टीपदी सर्वतोपरी सहकार्य करून पुन्हा निवडून आणण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.

पनवेलमध्येही मुलींनीच मारली बाजी
पनवेल/प्रतिनिधी :
बारावीच्या परीक्षेच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये राज्याप्रमाणे पनवेलमध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयाच्या बारावीच्या तिन्ही शाखेत मुली प्रथम आल्या आहेत. विज्ञान शाखेत विशाखा उडपीकर (८७ टक्के), वाणिज्य शाखेत भाग्यश्री पाटणकर (८१.६७ टक्के), तर कला शाखेत उज्ज्वला जाधव (७७.१७ टक्के) प्रथम आली. या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.३७ टक्के लागला, तर वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अनुक्रमे ५९.६६ आणि ७८.३० टक्के लागला. कोएओच्या के. वि. कन्या विद्यालयाच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले.

उरणमधून प्रणाली मढवी बारावीत प्रथम
उरण/वार्ताहर

उरण तालुक्यातून बारावी परीक्षेत यूईएस स्कूलच्या विज्ञान शाखेची प्रणाली मढवी ही विद्यार्थिनी ८८.१७ टक्के गुण मिळवून पहिली आली. गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. उरण तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी १८०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळानिहाय निकाल पाहता यावर्षी सेंट मेरी उरणचा निकाल १०० टक्के लागला, तर उरण एज्युकेशन संस्थेचा ९७.६५ टक्के निकाल लागला आहे. तुकाराम हरी वाजेकर विद्यालय फुंडे-६३.५७, छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई-६२.९८, सेकंडरी स्कूल चिरनेर-८५.८०, के.बी. पाटील हायस्कूल पिरकोन- ८७.१०, सिटिझन हायस्कूल- ८३.९२, रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे- ९८. ६७, आर.एन. ठाकूर हायस्कूल दिघोडे- ६५.७९, एन.आय. हायस्कूल उरण- ४०.३५ टक्के निकाल लागला आहे. उरण तालुक्यातील १० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये उरण एज्युकेशन संस्थेची विज्ञान शाखेची प्रणाली मढवी ही विद्यार्थिनी ८८.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यातून पहिला क्रमांक मिळविण्याचा मान पटकाविला आहे. प्रणालीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी यूईएसच्या स्नेहल प्रधान, खजिनदार आनंद भिंगार्डे, मिलिंद पाडगावकर, राजेंद्र भानुशाली, विद्यार्थी, पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रायन इंटरनॅशनल शाळेवर शिवसेनेचा हल्लाबोल
बेलापूर/वार्ताहर :
नेरुळ (उरण फाटा) येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाने बेकायदेशीरपणे २२५ शिक्षक व शिक्षकेतर मराठी कामगारांना कामावरून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रायन शाळेवर हल्लाबोल करत प्रशासनाला याबाबत जाब विचारला. या जुन्या कामगारांच्या ऐवजी नवीन कामगार भरतीचा डाव शिवसैनिकांनी यावेळी उधळून लावला. यापूर्वी या शाळेतून काढलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घ्यावे, तसेच वरील २२५ कर्मचाऱ्यांपैकी एकासही कामावरून काढू नये, या मागण्या शिष्टमंडळाने प्रशासनासमोर ठेवल्या. १५ जूनपर्यंत या मागण्या मान्य न केल्यास रायन ग्रुपच्या ४० शाळांविरुद्ध बेमुदत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनोहर गायखे यांनी दिला आहे.