Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

नाशिक पालिकेच्या १,४५७ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी
लोकल सेवा, सायकल ट्रॅक, सिटी पार्क प्रकल्प प्रस्तावित

प्रतिनिधी / नाशिक

प्रवासी वाहतुकीसाठी बीओटी तत्वावर लोकल सेवा, त्र्यंबकनाका ते सातपूर रस्त्यावर दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गंगापूर धरणालगत सिटी पार्क, सायन्स टेक्नॉलॉजी पार्क व मध्यवर्ती वाचनालयाची उभारणी, केर कचऱ्यापासून वीज निर्मिती अशा विविध योजनांचा समावेश असणारे महापालिकेचे २००९-१० या वर्षांसाठीचे तब्बल १,४५७ कोटी ४६ लाख रूपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेत दुरूस्त्यांसह मंजुर करण्यात आले.

पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संजय बागूल
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेच्या आर्थिक किल्ल्या हाती असणाऱ्या स्थायी समितीवर सत्तारूढ भाजप-शिवसेना व अपक्ष गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून शुक्रवारी सभापतीपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेचे संजय बागूल यांनी बाजी मारली. बागूल व काँग्रेस आघाडीचे उद्धव निमसे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने सभापतींची निवड करण्यात आली. या विजयाच्या माध्यमातून युतीने गेल्या वर्षी हातातून निसटलेली स्थायी समिती पुन्हा एकदा ताब्यात घेण्यास यश मिळविले आहे.

जोडगोळीपुढे गटबाजी मिटविण्याचे आव्हान
अखेर अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुनील बागूल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जिल्ह्य़ात संघटनात्मक पातळीवर फेरबदल न करणे म्हणजे शिवसेनेत आलेल्या सुस्तपणाला मान्यता दिल्यासारखे झाले असते, म्हणूनच विधानसभा निवडणूक ऐन उंबरठय़ावर आली असतानाही फेरबदल करण्याचे धाडस कार्याध्यक्षांना करावे लागले. लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई व ठाणे पट्टा वगळता ग्रामीण भागात शिवसेनेची कामगिरी उत्कृष्ट झाली असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र त्यांची पाटी कोरी राहिली.

ठेवी मोकळ्या होण्यासाठी ‘सॉफ्ट लोन’ हवेच..
आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे बंद पडत असलेल्या वा डबघाईस आलेल्या नागरी सहकारी बँका-पतसंस्थांमध्ये सर्वसामान्यांचे कोटय़वधी रुपये अडकून पडले आहेत. अशा ठेवीदारांचे हीत जोपासण्यासाठी पाच वर्षांपासून नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीतर्फे सतत संघर्ष सुरू आहे. या काळात संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने विविध मुद्दय़ांचा बारकाईने विचार करून आणि त्याच्या सगळ्या बाजू समजावून घेतल्यानंतर समितीने १००० कोटी रुपयांच्या ‘सॉफ्ट लोन’ची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामागे ठेवीदारांच्या हितसंवर्धनाबरोबरच संपूर्ण सहकार चळवळीचे रक्षण हीच भूमिका आहे.

देवळा तालुक्यात खत विक्रीच्या नियोजनाची मागणी
देवळा / वार्ताहर

खरिप हंगामामध्ये देवळा तालुक्यात बियाणे व रासायनिक खतांची टंचाई जाणवू नये, यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे खतांचा व बी-बियाणांचा पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन जितेंद्र आहेर यांनी तहसीलदारांना दिले. विक्रेत्यांकडून खताचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना खतांसाठी इतरत्र भटकावे लागते. ज्या विक्रेत्यांकडे खतांचा साठा उपलब्ध आहे ते चढय़ा दराने विक्री करतात व इतर औषधे घेण्याची सक्ती करतात, असे आहेर यांचे म्हणणे आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे पुरवण्यासाठी पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयास त्वरित सूचना देवून जास्त भावाने खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यास भाग पाडावे व आठ दिवसाच्या आत प्रमाणित बियाणे शासकीय दरात उपलब्ध करून दिले जावे असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माजी सरपंच प्रकाश गांगुर्डे, किरण आहेर, दिलीप आहेर, भटय़ा जाधव, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस
नांदगाव / वार्ताहर

पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक बैठकीस उपस्थित न राहणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध नोटीस काढण्याचा निर्णय तहसीलदार सुनील गाढे यांनी घेतला आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत वीज कंपनी, जलसंचन, पशुवैद्यकीय, पोलीस, नगरपरिषद व व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची माहिती घेण्यात आली. नगरपालिकेने लेंडीनदीपात्रातील गाळ तातडीने काढावा व संभाव्य धोका टाळावा असे निर्देश तहसीलदारांनी मुख्याधिकारी राहुल पाटील यांना दिले. सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या काळात सावध राहून शासकीय यंत्रणा कार्यक्षमतेने राबवून जनतेचेही याकामी सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

चांदवडमध्ये भटक्या विमुक्ताचा बोंबाबोंब मोर्चा
नाशिक / प्रतिनिधी

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चांदवड तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघातर्फे १५ जून रोजी बोंबाबोंब मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाचे नेतृत्व संघाचे जिल्हा अध्यक्ष मोठाभाऊ गवळी हे करणार आहेत. दारिद्र्य रेशेखाली पिवळे रेशनकार्ड, जातीचे दाखले, भूमिहीनांना जमीन, ज्यांना घरे नाहीत त्यांना घरे, ताब्यात असलेल्या जमिनींचा सातबारा त्यांच्या नावावर करावा, रेणके आयोग लागू करावा, ज्यांचे निवडणूक यादीत नाव नाही त्यांचे नाव नोंदवून त्यांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र देण्यात यावे, धनगर समाजाच्या वाडय़ावर वारंवार होत असलेल्या दरोडा व त्यांचे नुकसान यासाठी बचाव करण्यासाठी त्यांना शस्त्राचा परवाना देऊन शस्त्र त्वरित द्यावीत, त्यांना चराऊ करून उपलब्ध करून द्यावीत, तसेच भूमिहीनांना जमीन, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा या मिळाव्यात आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

वनविभाग व लायन्स क्लब ऑफ पंचवटीतर्फे वटपूजन
नाशिक / प्रतिनिधी

वटपौर्णिमेचे महत्व अनन्यसाधारण आहे. शहरीकरणाकडे वडाचे झाड दिसणेही दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे वडाच्या फांद्या तोडून पूजा केली जाते. वडाची ही तोड थांबावी व नवीन वडाच्या झाडाची लागवड व्हावी या उद्देशाने नाशिक वनविभाग व लायन्स क्लब ऑफ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वटपूजनाचा कार्यक्रम यावर्षीही आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.३० ते २ पर्यंत जवाहरलाल नेहरू उद्यान (नक्षत्र उद्यान) मुंबईरोड येथे वटवृक्षाखाली सामूहिक वटपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून पूजनासाठी पुजारी उपलब्ध असतील तरी या पूजनाचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन नाशिक वनविभाग प्रमुख व्ही. के. मोहन व लायन्स क्लब पंचवटीचे झोन अध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव व क्लबचे पदाधिकारी उमेश भदाणे, सचिन शहा व केशव चिंचोरे यांनी केले आहे. यानिमित्ताने वडाच्या झाडांची लागवडही करण्यात येणार असून लागवडीसाठी वडाची रोपेही वनविभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हा पूजनाचा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वनविभाग व लायन्स क्लब पंचवटी यांच्याकडून करण्यात आले आहे.