Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संजय बागूल
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेच्या आर्थिक किल्ल्या हाती असणाऱ्या स्थायी समितीवर सत्तारूढ भाजप-शिवसेना व अपक्ष गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून शुक्रवारी सभापतीपदासाठी झालेल्या चुरशीच्या

 

निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेचे संजय बागूल यांनी बाजी मारली. बागूल व काँग्रेस आघाडीचे उद्धव निमसे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने सभापतींची निवड करण्यात आली. या विजयाच्या माध्यमातून युतीने गेल्या वर्षी हातातून निसटलेली स्थायी समिती पुन्हा एकदा ताब्यात घेण्यास यश मिळविले आहे.
सत्ताधारी व विरोधी गटाचे समसमान बलाबल आणि त्यातच सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अतिशय चुरशीच्या ठरलेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. यापूर्वीच्या निवडणुकांप्रसंगी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत पोलीस यंत्रणेने विशेष खबरदारी घेतली. सकाळपासून महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्थायी समितीचे सदस्य, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वगळता इतरांना या परिसरात प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला. पालिकेलगतच्या रस्त्यांवर सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवेशद्वार बंद करून केवळ एकाच ठिकाणाहून सदस्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय महसूल कार्यालयातील अपर आयुक्तांनी काम पाहिले. सकाळी दहाला त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या विशेष सभेला सुरूवात झाली. प्रारंभी, अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली. या कालावधीत अपक्ष गटाचे संजय साबळे, काँग्रेसचे शाहू खैरे व माया दिवे तसेच मनसेचे यतीन वाघ यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सेनेचे संजय बागूल व काँग्रेसचे उद्धव निमसे या रिंगणात राहिलेल्या दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. हात उंचावून झालेल्या मतदानात बागूल व निमसे यांना प्रत्येकी आठ मते मिळाली.
दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींची माहिती देवून चिठ्ठी पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठय़ा बनवून सभागृहात उपस्थित महिला पत्रकाराच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यामध्ये बागूल यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी अंतिम निकाल जाहीर केला.
बागूल विजयी झाल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून फटाके फोडले. महापौर विनायक पांडे, शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, भाजपचे शहराध्यक्ष विजय साने यांनी सभागृहात येऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शिवसेनेचे अर्जुन टिळे, चंद्रकांत खोडे यांच्यासह भाजपच्या नगरसेविका व स्थायी समितीच्या सदस्या सीमा हिरे, प्रशांत आव्हाड, सचिन मराठे, संजय साबळे आदी उपस्थित होते. विरोधी उमेदवार उद्धव निमसे यांच्यासोबत शाहू खैरे व इतर सदस्यांनी बागूल यांचे अभिनंदन केले.
सत्ता असूनही मागील वर्षी युतीला स्थायी समितीचे सभापतीपद गमवावे लागले होते. त्यामुळे महापालिकेत युतीची सत्ता असली तरी स्थायी समितीवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व होते. स्थायी पुन्हा ताब्यात आल्याने सत्तारूढ आघाडीची समीकरणे परस्परांना पूरक ठरू शकणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बसपाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार होती. कारण, गटनेत्यांच्या नियुक्तीवरून बसपाने यापूर्वीच सत्ताधारी युतीचा पाठींबा काढला आहे. त्यातच स्थायीच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवारास देऊ केलेला पाठींबाही नाकारण्यात आला होता. या घडामोडींचा प्रत्यक्ष मतदानात प्रक्रियेवेळी कोणताही परिणाम झाला नाही. बसपाच्या नगरसेविका कविता कर्डक यांनी युतीला पाठींबा कायम ठेवून सेना-भाजप व अपक्ष गटाचे संख्याबळ कायम ठेवले.
शहर विकासाची अशीही ‘आयडिया’
विजयानंतर भारावून गेलेले नूतन सभापती संजय बागूल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, महापालिकेतील सहकारी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून ‘आयडिया’ घेवून शहर विकासाला चालना दिली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहून महापौर विनायक पांडे यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत ‘आयडिया’ म्हणजे ‘मार्गदर्शन’ असे स्पष्टीकरण करीत या विषयावर पडदा टाकला. पाठोपाठ पांडे यांनी स्थायीच्या सभागृहात ‘आयडिया’ या विषयावर त्यांचा छोटेखानी अभ्यासवर्गही घेतल्याने उपस्थितांमध्ये त्याची चर्चा रंगली.