Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जोडगोळीपुढे गटबाजी मिटविण्याचे आव्हान
अखेर अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुनील बागूल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जिल्ह्य़ात संघटनात्मक पातळीवर फेरबदल न करणे म्हणजे शिवसेनेत आलेल्या सुस्तपणाला मान्यता दिल्यासारखे झाले असते, म्हणूनच विधानसभा निवडणूक ऐन उंबरठय़ावर आली असतानाही

 

फेरबदल करण्याचे धाडस कार्याध्यक्षांना करावे लागले.
लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई व ठाणे पट्टा वगळता ग्रामीण भागात शिवसेनेची कामगिरी उत्कृष्ट झाली असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र त्यांची पाटी कोरी राहिली. युतीच्या जागा वाटपात वाटय़ास आलेली एकमेव नाशिकची जागा सेनेला जिंकता तर आली नाहीच, परंतु थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाल्याने सेनेच्या स्थानिक नेतृत्वाचा वकूबही लक्षात आला. एखाद्या प्रभागाची निवडणूक लढवावी, त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन केल्यास अशी घसरण होणे साहजिकच. प्रचारादरम्यान त्रुटी दिसल्यास ती तत्काळ दूर करण्याची व्यवस्था राष्ट्रवादीकडून करण्यात येत असताना सेनेच्या प्रचारप्रमुखांना अनेकांनी कुठे, कसे नियोजन करण्याची आवश्यकता आहे, हे सांगूनदेखील त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेल्याने सेना उमेदवाराला माथी पराभवाचा टिळा लावावा लागला. उमेदवारच जिल्हाप्रमुखही असल्याने ग्रामीण भागात वाहू लागलेले ‘मतलई’ वारेही त्यांच्या लक्षात आले नाही, हे कोणाचे अपयश म्हणावे ?
विजयी होण्याच्या अपेक्षेने मैदानात उतरलेला उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जात असेल तर एखाद्याने प्रचंड थयथयाट केला असता. अशा वेळी आत्मपरीक्षण न करता पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून कशी साथ मिळाली नाही, याचे तुणतुणे हमखास वाजवले जाते. शिवसेनेने यापूर्वी हा अनुभव घेतलेलाच होता. त्यामुळे पराभूत उमेदवार कोणाच्या नावाने बोटे मोडतात याकडे सर्वाचे लक्ष असताना दत्ता गायकवाड यांनी पराभवाचे खापर कोणावरही न फोडता सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. उलट गायकवाड यांनी कुणालातरी ‘टार्गेट’ करावे म्हणून पक्षातील व पक्षाबाहेरीलही काही मंडळी उत्सुक होती. कारण त्यामुळेच २००४ च्या निवडणुकीपासून सुरू झालेले गटबाजीचे राजकारण पुढे सुरू ठेवण्यास मदत झाली असती. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीतील गणित पूर्णपणे वेगळे असते, आणि त्यात एकसंघ सेनेला पराभूत करणे म्हणजे एक आव्हान, याची विरोधकांना पूरेपूर जाणीव असल्याने सेनेतील गटबाजी कायम राहाणे हेच त्यांच्या हिताचे. परंतु गायकवाड यांनी समंजसपणाचा प्रत्यय आणून देत आपल्यासाठी सर्वानीच मनापासून काम केल्याचे सांगत या पराभवाचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे आव्हान केले. मानसिक व आर्थिकदृष्टय़ा खचलेल्या दत्ताजींनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यावा याविषयी संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती शिवसेनेत दिसून आली.
अॅड. उत्तमराव ढिकले, जिल्हा उपप्रमुख विजय करंजकर यांनी आपणास संधी मिळाल्यास जिल्हाप्रमुखपद स्वीकारण्यास आपण समर्थ असल्याचा दावा केला. उपनेते आ. बबन घोलप यांनी मात्र वास्तवतेचे भान ठेवत काहीशी वेगळी भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीसाठी असलेला कमी कालावधी लक्षात घेता जिल्हाप्रमुखपदी नवीन नेत्याची निवड करण्यापेक्षा काही ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्तरित्या काम पाहण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. संबंधित नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच आपण हा प्रस्ताव मांडल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु या प्रस्तावामुळे गटबाजीचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेर सुनील बागूल यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी टाकण्याचे निश्चित करण्यात आले. विश्वनाथ नेरूरकर यांच्याऐवजी संपर्कप्रमुख म्हणून घोलप यांना पसंती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर आगामी काळ या दोन्ही नेत्यांच्या कार्यकुशलतेची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. ग्रामीण भागात सेनेची स्थिती बऱ्यापैकी असली तरी महानगरात मात्र सध्या शिवसेना गलितगात्र झाली आहे. महानगरातच विधानसभा निवडणुकीसाठी चार मतदारसंघ झाल्याने शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या दोन्ही नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने महानगरप्रमुखपदाविषयीही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे बागूल यांनी ‘वृत्तान्त’ कडे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मरगळ झटकून उभी राहिलेली शिवसेना तुम्हांला पाहावयास मिळेल, असा आत्मविश्वास व्यक्त करणारे बागूल यांनी ग्रामीण भागावरही लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाप्रमुख म्हणून काम केल्याचा अनुभव गाठीशी असलेल्या बागूल यांना सेनेतील सर्व खाचाखोचा माहित असल्याने दु:खी कोण, सुखी कोण, समदु:खी कोण याची त्यांना चांगलीच जाण आहे. आत्मविश्वास वास्तवात उतरविण्यासाठी घोलप-बागूल जोडगोळी कोणत्या उपाययोजना आखणार ते लवकरच सर्वासमोर येईलच.