Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दगडी इमारतीला ‘जुनी’ झळाळी !
शतकाहून अधिक काळापासून उभ्या असलेल्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करताना जुना बाज जपून या इमारतीचे सौंदर्य अधिकाधिक खुलवले गेले आहे. त्याची दखल घेऊन राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता स्पर्धा व अभियानमध्ये या उपक्रमास विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त, इमारतीच्या पुनरुज्जीवनाच्या या

 

काही आठवणी..
जुनाट वास.. कुंद हवा.. अपुरा प्रकाश.. हातमोडक्या खुच्र्या.. आणि जिन्याच्या कोपऱ्यात पानाच्या पिचकाऱ्या.. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयांचे आढळणारे हे रुढ आणि रटाळ चित्र. इमारत जितकी जुनी तितके हे चित्र भेसूर. बऱ्याच जुन्या बांधकामांमध्ये सध्या अनेक महत्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. या रटाळ वातावरणाची गडद छाप इथल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही अगदी ‘सेम टू सेम’ उमटलेली. जिथे माणसाचं सौंदर्यही लोपतं त्या इमारतीच्या प्रत्येक दगडाला पुन्हा जुनीच चकाकी, मूळ सौंदर्य प्राप्त करून देण्याची किमया साधली ती सध्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळचे तसेच आताचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रेरणेने आणि परवानगीने तत्कालीन नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धनंजय धवड यांच्या कल्पकतेमुळे! त्यासाठी त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे संपूर्ण सहकार्य लाभले. केवळ आत्मियता आणि सौंदर्यदृष्टी यातून या शंभरी ओलांडलेल्या इमारती पुन्हा सजीव झाल्या. मरणासन्न झालेल्या दगडांमध्ये पुन्हा श्वास फुंकला गेला आणि या निर्जीव इमारती पुन्हा बोलू लागल्या.. राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता स्पर्धा व अभियानमध्ये या उपक्रमासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला विभागीय स्तरावर ३५ हजार रुपयांचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातवरण निर्माण झाले आहे. कोणत्याही शहरातील ऐतिहासिक वास्तू त्या शहराचे वैभव असतात, अभिमान असतात. पण त्याचे मूळ स्वरुपात जनत होणे आवश्यक असते. अनेक ऐतिहासिक वास्तुंमध्ये तितक्याच ऐतिहासिक खात्याने म्हणजेच महसूल खात्याने आपला पसारा मांडलेला. हळूहळू हा पसारा वाढत गेला. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पण इमारतींचा आकार मात्र तेवढाच. कालांतराने या सुंदर दगडी वास्तू भोवतीचा फास आवळत गेला. अशा वातावरणात काम करणे म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.. काहिशा अशाच पठडतली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू होती. १९०७ साली ती बांधण्यात आली. या वास्तुने आपली शंभरी पूर्ण केली. आज ही इमारत दिमाखात उभी आहे. पण, मध्यंतरी ही इमारत दुर्लक्षिली गेली होती.
मुळात पूर्णत: दगडी असलेल्या या इमारतीवर काळाच्या ओघात रंगाची पुटं चढविल्यानं इमारतीच्या काळ्या दगडांचे अप्रतिम जातिवंत सौंदर्यच लोप पावले. शंभर वर्षांत प्रशासकीय गर्दी वाढत गेली तशीतशी इमारत अपुरी पडू लागली. रिकाम्या वऱ्हांडय़ांची जागा देखील टेबल खुच्र्यानी घेतली. वऱ्हांडय़ांमध्येही अधिकाऱ्यांच्या केबीन झाल्या. माळ्यांवरची जागा जुन्या रेकॉर्डस्नी बळकावली. खिडक्या दरवाजे बंद होऊ लागले. नैसर्गिक हवा, प्रकाश यांना प्रवेश बंद असल्यामुळे दिवसाढवळ्या दुपारी १२ वाजताही टय़ुबलाइट आणि थंडीच्या दिवसातही एसी आणि पंख्यांचा वापर ठरलेला. या साऱ्यामुळे वास्तूचे मूळ सौंदर्यच झाकोळून गेले. पण २००७ साल उजाडले अन् या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. त्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले. रंगाची पुटं खरडली जाताच दगडाचे अप्रतिम सौंदर्य पुन्हा दिसू लागले. नूतनीकरणाच्या या कामात बैठकीसाठी अद्ययावत सभागृह उभारण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी व कामकाजासाठी लागणारे सर्व फर्निचर नव्या स्वरुपातील घेऊन नव्याने त्यांची मांडणी केली. दरवाजे खिडक्या मोकळ्या केल्या. पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाची सर्व दारे, खिडक्या बंद असायच्या आता त्याच दालनाचे दोन दरवाजे उघडलेले राहतात. संपूर्ण इमारतीस ‘हेरिटेज’ला साजेशा रंग संगतीचे पडदे लावले आहेत. टबरे व्हेंटीलेटर बसविल्याने हवा खेळती राहून वातावरण कामाचा उत्साह वाढविणारे बनले. स्काय लायटर, पारदर्शक काचेचे दरवाजे, खिडक्या यामुळे नैसर्गिक प्रकाश पुरेसा उपलब्ध झाला. आता दिवसा कृत्रिम प्रकाशाची गरज भासत नाही. थंडित पंख्यांची गरज नाही आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त वीज बचत होते.
इमारतीने अशाप्रकारे कात टाकल्यावर काही बाबी प्रकर्षांने जाणवायला लागल्या. वास्तू जुनीच पण काळाच्या ओघात आलेले ओंगळेवाणे नवेपण दूर करताच जुने दगड मनाला भुरळ पाडणारे वाटू लागले. या साऱ्या सकारात्मक बदलामुळे सर्वात महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचा कामातील उत्साह वाढून त्यांची कार्यक्षमता वाढून जनतेची कामे लवकर होऊ लागली. टेबलावर कर्मचारी सापडत नाही हा सामान्य माणसाला सामान्यपणे येणारा अनुभव आता बदलत आहे. प्रत्येकाला संगणक व आधनिक पद्धतीच्या टेबलखुच्र्या दिल्याने त्यांचाही कामाचा उत्साह दुणावला आहे. खरे सांगायचे तर यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षाही तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणसांचाच जास्त फायदा झाला आहे. सामान्य माणसाला भेसूर वाटणारी ही इमारत आणि नकोसे वाटावेत असे इथले बहुसंख्य चेहरे जणू दोन्ही हात पसरून आता आपले स्वागत करत असतात. याचा अनुभव घ्यायचा असेल तर या जिल्हाधिकारी कार्यालयात काही काम काढून जा आणि नाहीच सापडलं निमित्त तर सहज भेट द्यायला कोणी मनाई का केली आहे ? एकूणात काय, काळ्या दगडांचं जातीवंत सौंदर्य माणसाच्या मनाला नुसतं भुरळच घालत नाहीत तर माणसाच्या मनाचं सौंदर्यही वाढवतं या प्रत्यय येथे आल्याशिवाय रहात नाही..
वर्षां पाटोळे,
सहायक संचालक (माहिती), नाशिक.