Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नांदगाव नगराध्यक्ष निवडीवरून काँग्रेसमध्ये मतभेद
नांदगाव / वार्ताहर

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना व नांदगाव पालिकेत काँग्रेस-जनसेवा आघाडीचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करण्याचा घाट माजी आमदार अनिल आहेर यांनी घातला असून त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होवू देण्यात येणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते

 

दिलीप पाटील व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी कवडे यांनी दिला.
पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व जनसेवा मंडळाची आघाडी होती. ठरल्याप्रमाणे आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर जनसेवा मंडळाला नगराध्यक्षपदाची प्रथम संधी मिळाली. पुढील अडीच वर्षांसाठी काँग्रेसचा नगराध्यक्ष करण्याचे वचन जनसेवा मंडळाने दिले होते. अडीच वर्षांचा काळ संपत आला असताना देखील कोणतीही चर्चा न करता अनिल आहेर यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबर आघाडी करून सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी हलविले आहेत. राष्ट्रवादीची शहरात व तालुक्यात काय ताकद आहे सर्वाना माहित असून आघाडीच्या धर्माशी फारकत घेवून राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी म्हणजे काँग्रेसलाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कवडे यांनी केला. काँग्रेसचा कोणताही नगरसेवक नगराध्यक्षपदी विराजमान होत असेल तर त्याला जनसेवा मंडळाच्या नगरसेवकांचा पूर्ण पाठींबा राहील असेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे विचार तळागाळात रूजविण्याची हीच संधी असून लोकसभा निवडणुकीत मनमाड व नांदगाव शहरातील सर्व नेत्यांनी एकजुटीने काम केले असतानाही भाजप-शिवसेना उमेदवाराला सुमारे सहा हजार मतांची आघाडी मिळाली आहे. जनसेवा मंडळ राष्ट्रवादीबरोबर नसते तर ही आघाडी आणखी वाढली असती असे संबोधून काँग्रेस पक्ष एकटय़ा आहेर यांचा नाही. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मागण्याच्या शर्यतीत मीही आघाडीवर असून काँग्रेसचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय आपण खपवून घेणार नसल्याचे मविप्रचे दिलीप पाटील यांनी सांगितले. कोणी काँग्रेस कमजोर करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही व अशांना काँग्रेसचे तिकीट मागण्याचा अधिकारही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पंकज पगारे, शैलेश चोपडा, अभय देशमुख, बबलू सैय्यद, महेश जाधव आदी उपस्थित होते.