Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शहादा आगारानेही कात टाकण्याची गरज
शहादा / वार्ताहर

सलग तिसऱ्या वर्षी एसटी महामंडळाने नफा कमविण्याचा विक्रम केला आहे. महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतनश्रेणी मिळेल अशी आशा वाटू लागली आहे. त्याचवेळी प्रवाशांना देखील आता आपल्याला अधिक सुखकारक प्रवासाचा आनंद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, शहादा आगारातील प्रवासी अशा सुखकारक जलद प्रवासापासून वंचित

 

राहण्याची चिन्हे आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळ सतत नफा कमवित आहे. तो ही चढत्या भाजणीने. त्याला कारण हे आहे की, महामंडळाने आता व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे. अधिक सुसज्ज गाडय़ांचा ताफा महामंडळात जमा होतो आहे. व्हॉल्व्हो, किंगलाँग सारख्या अत्याधुनिक बसेस आता जनतेच्या सेवेसाठी महामंडळाने रस्त्यावर उतरविल्या आहेत. खासगी वाहतुकदारांची मनमानी, अरेरावी, अनियमितता आणि चढेदर यामुळे प्रवासी जनता पुन्हा एकदा महामंडळाच्या सेवेकडे वळली आहे.
या हंगामात धुळे विभाग देखील प्रथमच घवघवीत नफ्यात असल्याचे वृत्त आहे. यावर्षी धुळे विभागाने सुमारे दीड कोटीचा नफा प्राप्त केला आहे. ज्यात शहादा आगाराचा वाटा अत्यल्प आहे. एक काळ असा होता की, शहादा आगार राज्यात नफ्यात असणाऱ्या पहिल्या २० आगारात स्थान राखून होते. आज शहादा आगाराचा क्रमांक कदाचित शेवटच्या २० आगारात लागेल. असे का व्हावे याचा शोध आगाराच्या व्यवस्थापकांनी आणि विविध कामगार संघटनांच्या नेत्यांनी घेण्याची गरज असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
कालबाह्य़ झालेल्या गाडय़ांचा सर्वाधिक ताफा शहादा आगारात आहे. आसन तुटलेले, खिडक्या खिळखिळ्या, गाडय़ांच्या धावण्याच्या गतीवर मर्यादा, अशी कारणे आहेत. १९९२-९४ मध्ये या आगारातून ९५ वा त्यापेक्षा अधिक नियते चालविली जात होती.
आज ८१ नियते चालविली जातात. त्यात गर्दीच्या हंगामात वाढीव नियतांचा समावेश आहे. कर्मचारी संख्या कधीच पुरेशी नसते. आताही चालक २८ ते ३०, वाहक साधारणत: याच संख्येने आणि तंत्रकर्मचारी सुमारे ४० ते ४२ कमी आहेत. परिणामी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतो. चालक-वाहकांना अतिकालीक भत्ते द्यावे लागतात. असे भत्ते दिली की, अधिकाऱ्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई विभागीय अधिकारी करतात.
शहादा आगाराला लांब पल्याच्या सेवा द्यायच्याच नाहीत हे तर धुळे विभागीय अधिकाऱ्यांचे जणू ब्रीद असल्याच्या तक्रारी आहेत. शहादा आगारातून रोज किमान ५० पेक्षा अधिक प्रवासी अहमदाबादकडे जातात. पण रातराणीसेवा सुरूच केली जात नाही. ज्यामुळे त्यांना अन्य आगारातून येणाऱ्या गाडय़ांमध्ये सुमारे ४०० कि. मी. चा प्रवास अनेकदा उभ्यानेच करावा लागतो. या बाबीकडे ना आगार व्यवस्थापक लक्ष देतात ना विभागीय कार्यालय लक्ष देते.
प्रसिद्धी माध्यमांनी यावर टीकेची झोड उठविल्याने आता तीन नव्या पस्तीस आसनी गाडय़ा शहादा आगाराला देण्यात आल्या. परिवर्तन सेवेच्या नव्या आशा फक्त सहा गाडय़ा आहेत. अन्य ठिकाणच्या तुलनेत नवीन गाडय़ांचा प्रवासी सेवेत शहादा आगारात समावेशच नसल्याने आगाराचा नफा कमी झाला. त्यात पुन्हा डिझेल वाचविण्यासाठी ६० वा त्यापेक्षा कमी गतीने गाडय़ा चालविल्या जातात. लांब पल्याच्या गाडय़ांचीही धावताना दमछाक होते. यात सुधारणा करावी असे ना आगार व्यवस्थापकांना वाटते ना विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना, अशी स्थिती असल्याने प्रवाशांमध्ये त्याबाबत नाराजीची भावना पसरली आहे.