Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बहुमत आहे, पण उमेदवारी नाही
भगूर नगराध्यक्षपदासाठी सेनेची स्थिती
प्रकाश उबाळे / भगूर

नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने भगूर पालिकेत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असतानाही उमेदवार नसल्याने सत्तेवर पाणी सोडण्याचा बाका प्रसंग उभा राहिला आहे.

 

साडेपाच वर्षांपासून पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला गटासाठी आरक्षित झाले असून या प्रवर्गाची महिला सदस्या नसल्याने शिवसेनेला बहुमत असताना पायउतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जाती प्रभागातील शिवसेनेच्या एखाद्या सदस्याचा राजीनामा घेऊन त्याठिकाणी पोटनिवडणूक घेऊन अनुसूचित जाती महिला सदस्य निवडून आणण्याचीही चर्चा सुरू होती. विजय करंजकर व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा सुनिता करंजकर यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामुळे शिवसेनेत फारशी निराशाजनक स्थिती नाही. सावरकर उद्यान अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहेत. या उद्यानाचे काम मंदपणे सुरू असल्याने शिवसेनेला आपल्या कारकिर्दीत ते पूर्ण करण्याचे भाग्य मिळाले नाही. ही रुखरुख मात्र शिवसेनेच्या मनात कायम राहील, यात शंका नाही. येत्या १७ जूनला अधिकृतरित्या नवीन नगराध्यक्षाला पदभार घ्यावा लागणार आहे. शिवसेनेची गेल्या साडेसात वर्षांची सत्ता एकहाती असल्याने विरोधकांना त्याची फार मोठी किंमत राजकीयदृष्टय़ा मोजावी लागली आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.
नगरपालिकेत अनुसूचित जाती महिला सदस्य एकच असल्याने त्याची निवड अविरोध होणार हे निश्चित आहे. नगरपालिकेत राष्ट्रवादी व अपक्षांचा विरोधी गट आहे. गटनेते अॅड. गोरखनाथ बलकवडे, त्यांचे पुतणे अपक्ष सदस्य दीपक बलकवडे व भारती साळवे असा विरोधी गट आहे. तर शिवसेनेकडे १३ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. शिवसेना बंडखोर उत्तम आहेर हेही गटनेते करंजकर यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांना शिवसेनेशिवाय पर्यायच नव्हता. गेल्या पाच वर्षांत पालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्वच नव्हते. त्यानंतर २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे तीन सदस्य पालिकेत निवडून आले. मात्र शिवसेनेच्या सत्तेपुढे त्यांनाही आपला आवाज काढता आला नाही. विरोधकांची किंमत फक्त सभागृहात बसण्यापुरतीच होती. आता नेमकी तीन सदस्य असलेल्या विरोधी पक्षाकडे जाणार असल्याने न बोलता न काही करता विरोधी पक्षाला सत्तेची खुर्ची मिळणार आहे.
कामकाज करताना जरी शिवसेनेकडे बहुमत असले तरी सत्तेचे वारसदार विरोधी पक्ष राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी सत्ता राखण्यासाठी शिवसेना काय युक्ती करते त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्ष देखील सर्व डावपेचांवर लक्ष ठेऊन आहे. २००६ साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता करंजकर तर विरोधी पक्षाच्या वतीने भारती साळवे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सभागृहात शिवसेनेचे बहुमत असल्याने साळवे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याच भारती साळवे यांचे नशीब फुलण्याची वेळ आता आली आहे.