Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

रोहिदास पाटील यांच्यावर युवा नेतृत्वाकडूनही प्रश्नांचा भडीमार
वार्ताहर / धुळे

गेल्या ३०-३५ वर्षांपासून एकहाती सत्ता खेचून आणत धुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणातील तोलामोलाचा नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्रात परिचित असलेल्या आ. रोहिदास पाटील यांची उलट तपासणी आता युवा नेतृत्वही घेऊ लागल्याचे समोर येऊ लागल्याने जिल्ह्य़ातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आणि म्हाडाचे किरण शिंदे यांनी निरनिराळे जवळपास डझनभर सवाल उपस्थित करून रोहिदासदाजींना आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. दाजींचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी या प्रश्नांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केल्याने दाजी प्रथमच बचावाच्या पवित्र्यात गेल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात मॉडेल स्कूलचा प्रस्ताव
वार्ताहर / धुळे

महापालिकेने सादर केलेल्या १२० कोटी ४७ लाख ७३ हजार रूपयांच्या अंदाजपत्रकात २३ कोटी ६१ लाखाची वाढीव तरतूद सूचवून स्थायी समिती सभापती सतीश महाले यांनी आज १४४ कोटी, आठ लाख, ७३ हजार ६०० रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी मॉडेल स्कूल, नागरिकांचा विमा, शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, अॅन्टी रेबीज लस, श्वानगृह, श्वानांचे निर्बिजीकरण आणि मल्लांच्या सरावासाठी मॅट खरेदी या विषयांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. महाले यांनी अंदाजपत्रक सादर करताना आयुक्त अजित जाधव, उपायुक्त गणेश गिरी, सदस्य राजू पाटील, रवींद्र काकड, प्रकाशमल खेतिया, कैलास चौधरी, विमलबाई जाधव, मंगलाबाई नेरकर उपस्थित होते.
मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, शैक्षणिक गुणवत्ता राखणे, खासगी शाळांप्रमाणे सोयी सुविधा देण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त करणे, यासाठी मॉडेल स्कुल तयार करण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘बर्ड फ्लू’ग्रस्त पोल्ट्री फार्मचे संचालक आर्थिक मदतीपासून वंचित
वार्ताहर / नवापूर

नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूर व परिसरात फेब्रुवारी २००६ ला बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे पोल्ट्री फार्म धारकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यापैकी शासनाकडून नंदुरबार जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने थोडय़ा काही प्रमाणात आर्थिक मदत प्राप्त झाली होती. परंतु झालेल्या आर्थिक नुकसानीपेक्षा शासनाने केलेली आर्थिक मदत अल्प असल्याची संबंधितांची तक्रार आहे.
परिसरातील पोल्ट्री व्यवसायिक अजूनही पूर्णपणे बर्ड फ्लूमुळे झालेल्या नुकसानीतून पूर्वस्थितीत आलेले नाहीत. पोल्ट्री व्यावसायिकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत काही मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील शासनाच्या आदेशान्वये बर्ड फ्लू घोषित होण्यापूर्वी मरण पावलेली पक्षांची संख्या तसेच बर्ड फ्ल्यूची लागण अन्य ठिकाणी पसरू नये म्हणून पोल्ट्री धारकांनी स्वत: नष्ट केलेली पक्षांची संख्या याची शासनाच्या दप्तरी नोंद आहे. मात्र असे असूनही त्याची नुकसान भरपाई अद्याप अदा केलेली नाही. मात्र नवापूर सोडून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या कोंबडय़ा जिवंत होत्या त्यांना शासनाने २० रुपये प्रति कोंबडी नुकसान भरपाई दिली. या अर्थाने शासन दुटप्पी धोरणाचा अवलंब करीत असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. पोल्ट्री फार्मवर त्यावेळी लाखोच्या संख्येने अस्तित्वात असलेली अंडी, औषधे व खत (विष्ठा) शासनाने पंचनामे करून नष्ट केले. त्यांची नुकसान भरपाई देखील अदा झालेली नाही. शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित असते. पोल्ट्री व्यवसाय हा शेती उद्योगाप्रमाणेच आहे. त्यामुळे याबाबत सरकारने पुढे यायला हवे, अशी अपेक्षा पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अरिफभाई बलेसरिया यांनी व्यक्त केली.

जादा दराने खतांची विक्री केल्यास परवाना रद्द करणार
मालेगाव / वार्ताहर

रासायनिक खते विक्रेत्यांनी वाजवी दरातच खतांची विक्री करावी आणि खते घेणाऱ्या शेतकऱ्यांना अन्य उत्पादने घेण्यास सक्ती करू नये, जर अशा तक्रारी प्राप्त झाल्या तर संबधित दुकानदारांचा परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अंकुश मोरे यांनी येथे दिला. पंचायत समिती सभागृहात शेतकरी कृषी निविदा विक्री करणारे दुकानदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रासायनिक खत टंचाईवर विचारविनीमय करण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना मोरे यांनी एक मेपासून रासायनिक खतांच्या वाहतुकीच्या खर्चाचा भार राज्य शासनातर्फे उचलण्यात येत असल्याचे सर्वाच्या निदर्शनास आणून देतांनाच दुकानदारांनी वाजवी दरातच खतांची विक्री करावी. तसेच शेतकऱ्यांनीही वाढीव दराने खरेदी करू नये असे आवाहन केले. दुकानदार टंचाईचा बागुलबुवा उभा करून जादा भावाची मागणी करीत असेल तर ही बाब सर्वाच्या निदर्शनास आणून द्यावी, त्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बैठकीस पंचायत समिती सभापती उषा देवरे, उपसभापती कासार, गटविकास अधिकारी प्रकाश जेधे, तालुका कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, कृषी अधिकारी हेमंत काथेपुरी आदी उपस्थित होते.