Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रोहिदास पाटील यांच्यावर युवा नेतृत्वाकडूनही प्रश्नांचा भडीमार
वार्ताहर / धुळे

गेल्या ३०-३५ वर्षांपासून एकहाती सत्ता खेचून आणत धुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणातील तोलामोलाचा नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्रात परिचित असलेल्या आ. रोहिदास पाटील यांची उलट तपासणी आता युवा नेतृत्वही घेऊ लागल्याचे समोर येऊ लागल्याने जिल्ह्य़ातील राजकारण

 

कोणत्या दिशेने जात आहे, त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आणि म्हाडाचे किरण शिंदे यांनी निरनिराळे जवळपास डझनभर सवाल उपस्थित करून रोहिदासदाजींना आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. दाजींचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी या प्रश्नांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केल्याने दाजी प्रथमच बचावाच्या पवित्र्यात गेल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊ लागताच सर्व राजकीय पक्ष एकमेकांविरोधात सक्रिय झाले आहेत. विरोधक समवयस्क असला की नेता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी स्वत:ही पुढे सरसावतो. परंतु विरोधक आपल्या मुलाच्या वयाचे असले तर? असाच काहीसा पेच धुळे तालुक्यात रंगला आहे. जिल्हा परिषदेच्या निमडाळे या राजकीयदृष्टय़ा संवेदनशील गटात आ. रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पराभूत झाले. राष्ट्रवादीचे किरण पाटील यांनी त्यांचा धुव्वा उडवला. कुणाल पाटील यांना अशा निवडणुकीत दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे साहजिकच दाजींच्या राजकीय पटलावर कुणाल पाटलांचा पराभव कमीअधिक प्रमाणात परिणाम करणाराच ठरला आहे.
गेली ३५ वर्षे धुळ्याच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या दाजींना युवा पिढीतील किरण पाटील व किरण शिंदे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांमुळे जवाहर गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली, आणि ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनीही मग तेवढय़ाच आक्रमकपणे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशींनी या जोडगोळीस धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नावावर ‘दुकान’ चालविणाऱ्यांनी स्वत:ची नीतीमत्ता तपासून पाहावे, असा सल्ला दिला आहे.
काँग्रेसने सर्व काही दिल्यानंतरही आपण दगा दिलात, धुळे तालुक्यातील जनतेला वेठबिगार समजून त्यांना अक्कलपाडा धरणासाठी तीस वर्षे झुलविले, निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे सूचणाऱ्या नेत्यांना भविष्यात अक्कलपाडा प्रकल्प हा निवडणूक जिंकण्याचे साधन म्हणून वापरता येणार नाही, असा आरोप शिंदे-पाटील यांनी केला आहे. २४ वर्षांंपासून अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचे तसेच बोगद्याच्या कामाची निविदा निघू शकली नव्हती, ती जलसंपदामंत्री अजित पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशाने निघाली. एक वर्षांपूर्वी राज्यातील काही आमदारांना पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आल्याची आठवण करून देत या जोडगोळीने २० कोटी रुपये खर्चावरून थेट साडेतीनशे कोटी एवढय़ा वाढीव खर्चाच्या अक्कलपाडा प्रकल्पाचे काम का रखडले, असा खडा सवाल दाजींना केला आहे. यामुळेच एरव्ही विरोधकांच्या अशा पत्रकांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण करणाऱ्या जवाहर गटाने सूर्यवंशीच्या माध्यमातून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
दाजींना ‘खान्देशचे नेते’ हे बिरुद लोकांनी लावले आहे. अक्कलपाडा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एकेकाळी कुणी मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको केले, याची माहिती वडिलधाऱ्यांना विचारावी, असा सल्ला सूर्यवंशी यांनी जोडगोळीला दिला आहे. अक्कलपाडा होऊ न देण्याचे पाप कुणी केले ? खरे तर २१ मार्च १९८४ मध्येच या धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचवेळी डाव्या-उजव्या कालव्याचे प्रयोजन होते व तसा आराखडाही मंजूर होता. त्या काळात आपण शालेय शिक्षण घेत होतात, या शब्दांत किरण पाटील यांना सूर्यवंशींनी फटकारले आहे. धुळे तालुक्यातील १५ रस्त्यांच्या कामावर पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, त्याचे पत्र दाजींनी अर्थमंत्र्यांना दिले.
हे पत्र मंत्रालयात जावून गुपचूप वाचून आलेल्यांनी हे रस्ते आम्ही करणार आहोत असे पत्रक काढले, मग निमडोळमधील पाणी टंचाई का दूर होत नाही, असा सवाल सूर्यवंशींनी केला आहे. या दोन्हीही परस्पर विरोधी
पत्रकांमध्ये दाजींसह दोन्ही गटातील प्रमुखांच्या नावाचा उल्लेख नाही. या पत्रकांमुळे मतदारांची सध्या चांगलीच करमणूक होत आहे.
विरोधक समवयस्क असला की नेता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी स्वत:ही पुढे सरसावतो. परंतु विरोधक आपल्या मुलाच्या वयाचे असले तर? असाच काहीसा पेच धुळे तालुक्यात रंगला आहे.