Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महापालिकेच्या अंदाजपत्रकात मॉडेल स्कूलचा प्रस्ताव
वार्ताहर / धुळे

महापालिकेने सादर केलेल्या १२० कोटी ४७ लाख ७३ हजार रूपयांच्या अंदाजपत्रकात २३ कोटी ६१ लाखाची वाढीव तरतूद सूचवून स्थायी समिती सभापती सतीश महाले यांनी आज १४४ कोटी,

 

आठ लाख, ७३ हजार ६०० रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी मॉडेल स्कूल, नागरिकांचा विमा, शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, अॅन्टी रेबीज लस, श्वानगृह, श्वानांचे निर्बिजीकरण आणि मल्लांच्या सरावासाठी मॅट खरेदी या विषयांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
महाले यांनी अंदाजपत्रक सादर करताना आयुक्त अजित जाधव, उपायुक्त गणेश गिरी, सदस्य राजू पाटील, रवींद्र काकड, प्रकाशमल खेतिया, कैलास चौधरी, विमलबाई जाधव, मंगलाबाई नेरकर उपस्थित होते.
मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, शैक्षणिक गुणवत्ता राखणे, खासगी शाळांप्रमाणे सोयी सुविधा देण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त करणे, यासाठी मॉडेल स्कुल तयार करण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय समुह विमा प्रकल्पातंर्गत सर्व नागरिकांचा प्रत्येकी एक लाख रूपयांचा विमा काढण्यासाठी ७५ लाख रूपयांची तरतूद, सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
अत्याधुनिक पध्दतीच्या तीन व्यायामशाळांसाठी ७५ लाखाची तरतूद सूचविण्यात आली आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी दोन कोटी, विद्यार्थ्यांचा व पालकांचा महापालिकेच्या शाळांविषयीचा दृष्टीकोन बदलण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एक गणवेश, दप्तर, वॉटर बॅग देण्यासाठी तीन लाखाची वाढ सूचविण्यात आली असली तरी मोफत गणवेशसाठी १२ लाखाची तरतूद करण्यात येणार आहे.
सण व उत्सव प्रसंगी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांसाठी रस्त्याची डागडुजी करणे, लाईटची व्यवस्था करणे, साफसफाई करणे यासाठी तात्काळ कार्यवाही म्हणून पाच लाख रूपयांची तरतुद सुचविण्यात येत आहे. कुस्तीमध्ये आधुनिकता यावी म्हणून मॅट खरेदीसाठी १५ लाखाची तरतूद सुचविण्यात आली आहे.
शहरातील ३५० पेक्षा अधिक खुल्या जागांचा दुरूपयोग करण्यात येतो. यासाठी खुल्या आवारातील जागांभोवती भिंती घालणे, वृक्षलागवड करणे याकरीता दहा लाख रूपयांची तरतूद आहे. अॅन्टीरेबीजची लस उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख, मनपा रूग्णालयात स्त्री प्रसुत झाल्यावर पोषाख देणे व किरकोळ स्वरूपात मदत करण्यासाठी पाच लाख, नकाणे रोड जॉगींग ट्रॅकसाठी २५ लाख, याप्रमाणे तरतूद करण्यात येणार आहे.
‘श्वान गृह व श्वानांचे निर्बीजीकरण’ यासाठी १० लाख, नवीन वसाहतींमध्ये पथदिव्यांसाठी
एक कोटी, अॅम्युजमेंट पार्कसाठी दोन कोटी, विविध भागात पाणीपुरवठय़ासाठी नवीन
पाईपलाईन टाकण्याकरिता ७५ लाख, शहरात नवे रस्ते तयार करण्यासाठी, रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी दोन कोटी ४२ लाख, काँक्रिट रस्ते तयार करण्यासाठी २५ लाख, ना नफा ना तोटा या तत्वावर रूग्णवाहिका खरेदी तसेच शववाहिकेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद सुचविण्यात आली आहे.