Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

वीजटंचाईचा अजगरी विळखा
मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली टक्कर देत काँग्रेसने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सरस कामगिरी केली. काँग्रेसला मिळालेल्या सर्वाधिक जागांसाठी मध्य प्रदेशचाही हातभार लागला आहे. राज्यातील २९ पैकी १२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर, भाजपला १६ जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा बसपने जिंकली. यंदा मध्य प्रदेशातील निवडणूकपूर्व अंदाज सपशेल कोलमडले आणि काँग्रेसने राजकीय पंडितांचे भाकीत खोटे ठरवून स्थिती एकदम सुधारली. वास्तविक, मध्य प्रदेशात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवराज सिंह चौहान यांच्या राजवटीवर पसंतीची मोहोर उमटवून भाजपला पुन्हा सत्तेची संधी दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत २९ पैकी २३ जागांवर सट्टेबाजांनी भाजपला क्रमांक १ वर आणून ठेवले होते परंतु, मतदानाचा कौल येऊ लागला तसे सारे चित्रच पालटून गेले. लोकसभा निवडणुकांचा धुराळा आता खाली बसल्यासारखे वाटत असले तरी निवडणूक प्रचाराच्या काळातील बिजली-सडक-पानी हे मूलभूत विकासाचे ज्वलंत मुद्दे आत्ता कुठे ऐरणीवर येऊ लागले आहेत.

मराठी माणसांची ‘घर..घर’ !
मुंबईत सर्वसामान्यांना आणि त्यातही मराठी माणसाला घरांची किती नितांत आवश्यकता आहे, हे म्हाडाच्या घरांसाठी आलेल्या लाखो अर्जानी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या निर्मितीला साठ वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्याच्या राजधानीतील भूमीपुत्रांची निवाऱ्याची गरज जर पूर्ण होत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी एवढा काळ नेमके केले तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. दोष केवळ सत्ताधाऱ्यांचाच नाही. राज्यकारभारात महत्त्वाच्या धोरणांबाबत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या त्या - त्या वेळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काय केले, की केवळ खुच्र्या उबवून आपली सेवा पूर्ण केली, हाही प्रश्न तितकाच गंभीर आहे. या अधिकाऱ्यांच्या सुदैवाने अद्याप त्यांच्या कालावधीतील घोटाळे, भ्रष्टाचार यासाठी त्यांना सेवानिवृत्तीनंतरही जबाबदार धरण्याची कायदेशीर व्यवस्था नाही. ती जर निर्माण झाली तर गैरकमाईसाठी विविध स्तरांवरील दलालांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी धडपडणाऱ्या प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याची तशी हिंमत होणार नाही.

कर्नाटकातील धीमी वाटचाल
साठच्या दशकात चित्रपट निर्मिती होत असलेल्या राज्यात फिल्म सोसायटी चळवळ मूळ धरू लागली. कर्नाटकातही या दृष्टीने प्रारंभ झाला. पुढे इफीचे संचालक बनलेल्या एम. व्ही. कृष्ण स्वामींनी बंगलोरमध्ये ‘फिल्म सोसायटी ऑफ बंगलोर’ १९६७ मध्येच सुरू केली. पण वर्षभरातच ती बंद पडली. बंगलोरला म्हैसूरच्या महाराजांनी पॉलिटेक्निक सुरू केले होते. त्यात छायालेखन व ध्वनीमुद्रण हे विषयही शिकवले जात. गुरुदत्तचे छायालेखक मूर्ती, गोविंद निहलानी हे नावारूपाला आलेले छायालेखक याच पॉलिटेक्निकमध्ये सिनेमाटोग्राफी शिकले. तेथेच एम.डी.एस.प्रसाद छायालेखन शिकले. प्रसाद आणि इंडस्ट्रीयल म्युझियमचे संचालक राम मूर्ती यांनी मयूरा फिल्म सोसायटी १९६९ मध्ये सुरू केली. या सोसायटीने मुंबईच्या ‘आनंदम्’प्रमाणे उत्तम काम केले. सत्यजित रायही आपले चित्रपट घेऊन या सोसायटीत गेले होते. रॉजर मॅनवेल हा युरोपियन समीक्षक भारतात आला होता. त्याचेही व्याख्यान मुंबईनंतर बंगलोरला ‘मयूरा’ने आयोजित केले. या दोन सोसायटय़ांनी फिल्म सोसायटी चळवळीची पायाभरणी बंगलोरमध्ये केली. १९७० मध्ये पट्टाभिरामा रेड्डी दिग्दर्शित ‘संस्कार’ हा अनंतमूर्तीच्या कादंबरीवर आधारित चित्रपट प्रकाशित झाला. गिरीश कर्नाडनी तो लिहिला होता व त्यात प्रमुख भूमिकाही केली होती. सेन्सॉरने ‘संस्कार’ला प्रमाणपत्र नाकारले. कारण ‘संस्कार’ प्रकाशित झाला तर दंगे होतील अशी भीती होती. ‘संस्कार’ ही भिक्षूक व खालच्या जातीची चंडी यांची कथा होती.
सेन्सॉरने नाकारताच त्यावर पट्टाभीराम रेड्डींनी माहिती मंत्रालयाकडे अपील केले. गुजराल तेव्हा माहिती मंत्री होते. गुजराल हे फिल्म सोसायटी चळवळीतून आलेले होते. खऱ्या सिनेमाबद्दलची त्यांची जाणीव पक्की होती. त्यांनी ‘संस्कार’ पाहिला व ताबडतोब प्रकाशित करायला परवानगी दिली. ‘संस्कार’ला वृत्तपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. फिल्म सोसायटी चळवळ वाढायला ‘संस्कार’ सहाय्यभूत ठरला.
मयुरा फिल्म सोसायटी मुंबईच्या ‘आनंद्म’ प्रमाणे सदस्य नोंदण्याबाबत फारच कडक होती. फिल्म सोसायटी चळवळीत ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या नरहरी राव यांना त्यांनी सदस्यत्व नाकारले होते. राव यांनी एम. व्ही. कृष्णस्वामींना ही हकिकत सांगितली. कृष्णस्वामींनी त्यांना बंगलोरमध्ये नवीन फिल्म सोसायटी काढायला सांगितले.त्यांच्या सांगण्यावरून नरहरी राव यांनी सुचित्रा फिल्म सोसायटी १९७१ मध्ये सुरू केली. तिकडे मयूरा फिल्म सोसायटीने सहकारी तत्वावर ‘कंकणा’ हा चित्रपट निर्माण केला. त्यासाठी फिल्म सोसायटीतील प्रत्येक सभासदाने दोन हजार रुपयांचे शेअर घेऊन भांडवल उभे करण्यात आले. मयुराचे सेक्रेटरी व सिनेमाटोग्राफर एम. डी. एस. प्रसाद यांनी ‘कंकणा’चे दिग्दर्शन केले. ‘कंकणा’ हा ‘संस्कार’प्रमाणे कानडीतला मैलाचा दगड मात्र ठरला नाही. या चित्रपटानंतर भांडण-तंटे सुरू होऊन ‘मयूरा’ बंद पडली. या वेळेपर्यंत नरहरी राव यांच्या संघटना चातुर्यामुळे सुचित्रा फिल्म सोसायटी वेगाने पुढे गेली. मुंबईत फिल्म फोरमने ज्याप्रमाणे सामान्य चित्रपट रसिकांपर्यंत फिल्म सोसायटी चळवळ नेली त्याप्रमाणे ‘सुचित्रा’ने सामान्य चित्रपट रसिक हे आपले ‘लक्ष्य’ ठेवले. ‘सुचित्रा’च्या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण करून कर्नाटकात अनेक फिल्म सोसायटय़ा सुरू झाल्या.सुचित्राने नरहरी राव यांच्या नेतृत्वाखाली इतकी प्रगती केली की, फिल्म सोसायटीने बांधलेले देशातले पहिले आर्टथिएटर बंगलोरमध्ये उभे राहिले. त्यानंतर म्हणजे सत्तरचे दशक संपताना अन्य शहरात फिल्म सोसायटय़ा सुरू झाल्या. तरी या चळवळीची कर्नाटकातील वाटचाल धीमीच राहिली.
सुधीर नांदगांवकर
फेडरेशनचे केंद्रीय सचिव
cinesudhir@gmail.com