Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९


बोजवारा
पुणे, ५ जून/ प्रतिनिधी

शहर व परिसरामध्ये आज झालेल्या पहिल्याच मोठय़ा वादळी पावसाने ‘महावितरण’च्या वीजपुरवठय़ाच्या यंत्रणेचा पुरता बोजवारा उडविला. झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने व वादळामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने आज संध्याकाळनंतर पुणे व िपपरी-चिंचवड शहरातील जवळजवळ सर्वच भागामधील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी दुरुस्तीची अनेक कामे रखडली असल्याचा फटका नागरिकांना बसला. विजेअभावी काही ठिकाणी वाहतूक दिवे बंद असल्याने चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती.

हद्दवाढ झालेल्या महापालिकांना विशेष अनुदान मिळावे
महापौर परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, ५ जून / प्रतिनिधी

राज्यभरातील ज्या महापालिकांची हद्दवाढ झाली आहे, अशा पालिकांना विकासकामांसाठी शासनाने विशेष अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी महापौर परिषदेने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. राज्यातील सर्व महापौरांच्या विविध अधिकार व मागण्यांबाबत मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासमवेत मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्षिण भारतातील केरळ पालिकेप्रमाणे महाराष्ट्रातील पालिकांच्या महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार देण्यासह विविध मागण्या महापौरांनी यावेळी केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

छोटय़ा सदनिकांसाठी पालिकेतर्फे प्रीमियम शुल्कात सवलत देणार
पुणे, ५ जून / प्रतिनिधी

लहान व मध्यम आकाराची घरे बांधण्यासाठी विकसकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ३० ते ८० चौरसमीटर आकाराच्या सदनिकांना प्रीमियमध्ये २५ ते ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. लहान आकाराच्या घर बांधणीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा प्रकारच्या घरबांधणीला चालना देण्यासाठी महापालिका देखील जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यत जावा या हेतूने हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

कामगार रुग्णालयाच्या जागा हस्तांतरास टाळाटाळ
विविध योजना जागेअभावी रखडल्या

पुणे, ५ जून / प्रतिनिधी

चार महिन्यांपूर्वीच अन्य ठिकाणी स्थलांतर के ल्यानंतर औंध येथील राज्य कामगार विमा रुग्णालयाची (इएसआय) मोकळी जागा जिल्हा रुग्णालयास हस्तांतर करण्यास कामगार रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ चालविली असून त्यामुळे विविध योजना राबविण्यास अडथळा निर्माण झाला आहे. औंध येथील आरोग्य खात्याची ८५ एकर जागा आहे. त्यातील काही एकर जागेमध्ये चार इमारती आहेत. त्यातील एका इमारतीत असलेले पूर्वीचे इएसआय रुग्णालय हे मोहननगर (चिंचवड) आणि बिबवेवाडी येथे चार महिन्यांपूर्वीच स्थलांतर केले होते. गेल्या ४० वर्षांपासून कामगार विमा रुग्णालय तेथे कार्यरत होते.

एटीएम मशिनमधून चार लाखांची चोरी
पिंपरी, ५ जून / प्रतिनिधी

काळेवाडी रहाटणी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या थेरगाव शाखेमधील एटीएम मशिनला पासवर्ड व चावीचा वापर करून चोरटय़ांनी तीन लाख ९५ हजार सातशे रुपयांची रोकड चोरून नेली. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रवीणदत्त भास्कर कुलकर्णी (वय ४७, रा. मयुरकुंज हौसिंग सोसायटी, कोथरुड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. कुलकर्णी हे थेरगाव शाखेमध्ये शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. शाखेच्या एटीएम मशिनमध्ये रविवार २८ मे ला चोरटय़ांनी पासवर्ड व चावीचा वापर करून मशिनमधील रोख तीन लाख ९५ हजार सातशे रुपये चोरून नेले. अधिक तपास फौजदार हिंदूराव मदने करीत आहेत.

‘ईटीएच’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे अतुल व्होरा यांनी स्वीकारली
पुणे, ५ जून / प्रतिनिधी

अतुल व्होरा यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या ईटीएच लिमिटेड या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. व्होरा यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनपदावर काम केले असून, ग्राहक संबंधित व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा मानला जातो. विपणन (मार्केटिंग), धोरण (स्ट्रॅटेजी), साखळीपद्धतीचे व्यवस्थापन (चॅनेल मॅनेजमेंट), शैक्षणिक व्यवस्थापन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. ईटीएच येथे रुजू होण्यापूर्वी त्यांनी एचईआय या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तसेच माया एंटरटेन्मेंट लि. या संस्थेचे ग्लोबल एज्युकेशन विभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ऑटोडेस्क या कंपनीच्या आशिया खंडाचे व्यवस्थापक तसेच अॅप्टेक या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी सुमारे दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी काम केले आहे. व्होरा यांनी १९८८ साली पुण्यातील एमआयटी या संस्थेतून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त केली. त्यांना २००२ साली नेतृत्वातील उत्तमता (एक्सलन्स इन लीडरशीप) तसेच उत्तम व्यवस्थापक (बेस्ट मॅनेजर) म्हणून सलग तीन वेळा पुरस्कार मिळाले आहेत. ईटीएचचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी व्होरा यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

दिगंबर डवरी यांचा आंदोलनाचा इशारा
पुणे, ५ जून / प्रतिनिधी

नगरसेविका मालन भिंताडे यांचा प्रलंबित असलेला जातपडताळणी समितीकडील निकाल जाहीर न केल्यास येत्या अकरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे. दक्षिण पुणे व्यासपीठाचे अध्यक्ष दिगंबर डवरी यांनी आज पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. निकालाबाबत डवरी यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता या प्रकरणावर अद्याप समितीचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती मिळाली असे ते म्हणाले. या वेळी रामदास भोसले, सुहास शेलार, मनोज आवाडे, संजय कपिले, संजय यादव, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

‘हायड्रो चाचणी सुविधेशिवाय रिक्षा तपासणी बंधन नको’
पुणे, ५ जून / प्रतिनिधी

शहरात हायड्रो चाचणीची सुविधा उपलब्ध होत नाही, तोवर रिक्षांना ती बंधनकारक करू नये, अशी मागणी पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनने केली आहे. एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांच्या गॅस टाक्यांची तपासणी दर पाच वर्षांनी बंधनकारक करण्यात आली असून या तपासणीशिवाय वाहनाचे पासिंग होऊ शकत नाही. तथापि, टाक्यांच्या चाचणीची अशी सुविधा मुंबई व नागपूर खेरीज अन्यत्र कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनाच्या पासिंगपूर्वी त्याच्या टाक्या रिक्षा व्यावसायिकांना मुंबई वा नागपूर येथून तपासून घेणे गरजेचे झाले आहे. या तपासणीसाठी येणारा खर्च तसेच त्यासाठी लागणारा वेळ रिक्षा चालकांना परवडणारा नाही. त्यामुळे पुण्यात अशी सुविधा उपलब्ध होईपर्यंत टाक्या तपासणीचा निकष शिथिल करण्यात यावा, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या मागणीबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास पुणे शहर रिक्षा संघटनांच्या कृती समितीला त्यासाठी आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशाराही फेडरेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.

मागासवर्गीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ
पुणे, ५ जून / प्रतिनिधी

मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना पाचशे रुपये निर्वाहभत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. महागाई निर्देशंकानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निवार्हभत्त्यात वाढ केली जावी अशी मागणी आमदार चंद्रकांत छाजेड यांनी विधानसभेत केली होती. ही मागणी मान्य करून सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यातील विभागीय स्तरावरील वसतिगृहांना दिला जाणारा दोनशे रुपये निर्वाहभत्ता वाढवून पाचशे रुपये केला आहे. जिल्हा स्तरावरील वसतिगृहांचा पंचाहत्तर रुपये निर्वाहभत्ता वाढवून तीनशे रुपये करण्यात आला आहे. तर तालुका पातळीवरील वसतिगृहांना पन्नास रुपयांऐवजी दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

ई गव्हर्नन्सद्वारे नागरिकांशी संपर्क साधण्याचा पालिकेचा प्रयत्न
पिंपरी, ५ जून / प्रतिनिधी
नागरिकांशी प्रभावीपणे संपर्क साधण्याकरिता िपपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांची संपूर्ण माहिती संकलित करणे, त्यांचा संपूर्ण डेटा तयार करण्याच्या दृष्टीने संकेतस्थळावर नोंदणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नागरिकांनी संकेतस्थळावर नियोजित ठिकाणी आपला मिळकतकर क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर कुटुंबातील माहिती माहिती भरण्यापूर्वी नागरिकांना स्वत:चा ई-मेल अथवा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. पालिकेच्या योजना राबविणे, एखाद्या प्रकल्पासाठी मते मागविणे, प्रतिक्रिया नोंदविणे, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने नागरिकांशी संपर्क साधणे आदींसाठी ई-गव्हर्नन्सचा प्रभावी ठरणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते आज झाले. प्रकल्पाची संकल्पना अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, सहायुक्त सुधाकर देशमुख यांनी मांडली. ही माहिती पालिकेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असल्याने नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेऊन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चिंचवडमध्ये एक लाख रुपयांचा ऐवज लंपास
पिंपरी, ५ जून / प्रतिनिधी

चिंचवड सुदर्शननगर येथील एका कर सल्लागाराच्या बंगल्यावर चोरटय़ांनी रविवारी रात्री हात साफ करुन एक लाख ३८ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जगदीश प्रसाद अगरवाल (वय ३९, रा. श्यामगोपाल निवास, सुदर्शनगर, चिंचवड) हे कर सल्लागार म्हणून काम करतात. ३१ तारखेला पुतण्याच्या नामकरणासाठी घराला कुलूप लावून आकुर्डी येथील कुंदन पॅलेस हॉटेलमध्ये गेले होते. तेथून ते रात्री भावाच्या घरी एम्पायर इस्टेट येथे गेले. तेथे त्यांना त्यांच्या भाच्याचा अपघात झाल्यामुळे ते रुग्णालयात गेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोरीची घटना कळूनही ते तक्रार देऊ शकले नाहीत. घरामधून सत्तर हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख ३८ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी अधिक तपास फौजदार विश्वास जातक करीत आहेत.