Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

राज्य

पडीक जमिनीवर ‘भद्राचलम पॅटर्न’ने
वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार
यवतमाळ, ५ जून / वार्ताहर
खाजगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी आंध्रप्रदेशातील आय.टी.सी. ‘भद्राचलम पॅटर्न’ यवतमाळात सुरू करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने एक चळवळ म्हणून पडीक जमीन हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने खाजगी पडीक जमिनीवर रोजगार हमी योजनेशी निगडित वृक्ष लागवड व वैरण विकास योजना १९९२-९३ मध्ये सुरू केली.

जिल्हा रुग्णालयाची चतुर्थ श्रेणी भरती प्रक्रिया रद्द
नाशिक, ५ मे / प्रतिनिधी
नाशिक जिल्हा रुग्णालयाने २००७ मध्ये चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी राबविलेली भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे अखेर ती रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य संचालनालयाने घेतला आहे. सदरच्या प्रक्रियेत अनेक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले होते. समितीच्या अहवालानुसार भरतीत गैरप्रकार झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद केले होते.

नाशिकमध्ये पथनाटय़ांव्दारे पर्यावरणविषयी जनजागृती
नाशिक, ५ जून / प्रतिनिधी

पर्यावरणविषयी जागृतीचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी येथील नेचर क्लब ऑफ नाशिक, अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, कागद, काच पत्रा कष्टकरी पंचायत, लोकविकास सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांची सुरूवात करण्यात आली.महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे केशव पेडणेकर व सहकाऱ्यांनी पथनाटय़ाव्दारे प्लास्टिकचा वाढता वापर, प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. मंडळातर्फे उद्योग भवन परिसरात सायकल रॅलीही काढण्यात आली.

रायगड जिल्हा प्रशासन टाटा-रिलायन्सची चाकरी करीत नसल्याचे सिद्ध करा
नऊ गावांतील शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनास खडा इशारा
अलिबाग, ५ जून/प्रतिनिधी
शहापूर-धेरंडसह नऊ गावांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी रायगडचे जिल्हा प्रशासन टाटा व रिलायन्सच्याच चाकरीत असल्यासारखे वागत आहे. जिल्हा प्रशासनाने आपले वागणे बदलून ते टाटा-रिलायन्सचे नव्हे, तर आमजनतेचेच प्रशासन आहे हे सिद्ध केले नाही तर १५ जूनपासून शेतकऱ्यांच्या आक्रमकतेलाच रायगड जिल्हा प्रशासनास सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा नऊ गाव शेतकरी कृती समिती व श्रमिक मुक्ती दलाने आज दिला. या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला होता.

पवनचक्क्य़ा बंद पाडल्याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा
धुळे, ५ जून / वार्ताहर
सुझलॉन पवन उर्जा कंपनीच्या साक्री तालुक्यातील खोरी, फोफादे आणि वसंतनगर भागातल्या पवनचक्क्या बंद पाडल्या प्रकरणी मनिषा पाटील यांच्यासह १६ जणांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाठय़ा-काठय़ांसह एका ठिकाणी गोळा होवून या लोकांनी सुझलॉनच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मार, कंपनी बंद पाडा असे म्हणत हल्ला चढविला व दंगल घडवून मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. गेल्या १ जून रोजी सकाळी साडेआठ ते दहा दरम्यान ही घटना घडली. या संदर्भात सुझलॉनचे सुनिल नारायण पाटील यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी संबंधितांनी लाठय़ा काठयांसह जमून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावले तसेच त्यांना धक्काबुक्कीही केल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘आयसोलेटर’ दाबून पवन चक्क्या बंद पाडल्याने कंपनीच्या काही ट्रान्सफार्मरचे सुद्धा या घटनेत मोठे नुकसान झाल्याचा आरोपही केला होता. त्यानुसार पोलिसांनी मनिषा पाटील यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा नोंदविल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांच्या संख्येत आणखी वाढ होवू शकेल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

निलंबित पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला, ५ जून / प्रतिनिधी

मारहाण केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुरुवारी केला. ओझोन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पोलीस मुख्यालयात शिपाई अनिल रोठे याने एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ याने रोठेला निलंबित केले होते. निलंबनामुळे रोठेने गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून ओझोन रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. उपचारानंतर रोठेची प्रकृ ती स्थिर आहे. दरम्यान, पोलीस मुख्यालयात रोठेने केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दुर्घटनेनंतर सास्ती खाणीतील काम बंद
राजुरा, ५ जून / वार्ताहर

सास्ती कोळसा खाणीतील दुर्घटनेला पस्तीस तास उलटून गेले असले तरी अद्याप मातीखाली दबलेल्या दोन कामगार व एका पोकलॅन मशीनचा ठावठिकाणा लागलेला नाही. शुक्रवारी कामगारांच्या कुटुंबीयांनी खाण परिसरात येऊन टाहो फोडला. दरम्यान, कामगारात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होण्याच्या पाश्र्वभूमीवर येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. खाणीचे कामकाज दोन दिवसापासून बंद आहे. माती उपसण्याचे काम अविरत सुरू असून त्यासाठी चार पोकलॅन मशीन व सोळा मोठे डंपर लावण्यात आले आहेत. बल्लारपूर क्षेत्रातील पोकलॅन मशीन कमी पडत असल्याने आता घुग्घुस व माजरी माईनमधून दोन पोकलॅन मशीन बोलावण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळावर तात्पुरते टेंट उभारण्यात आले असून तेथून क्षेत्रीय मुख्य व्यवस्थापक हरीशरण खरे, वेकोलिचे सुरक्षा महाव्यवस्थापक डी.डी. डहरवाल, महाव्यवस्थापक (ऑपरेशन) बख्तीयार काम पाहात आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रकाश वाणी
नाशिक, ५ मे / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रकाश वाणी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले वाणी यांनी या अगोदर आदिवासी विकास आयुक्तालयात प्रदीर्घ काळ सहआयुक्त म्हणून काम पाहिले. कायदा, समाजकार्य, पत्रकारिता, व्यवस्थापन विषयातील ते पदव्योत्तर पदवीधारक आहेत.