Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

रेडी फॉर एन्काउन्टर
भारत बांगलादेशशी आज भिडणार
नॉटिंगहॅम, ५ जून/ पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा गतविजेता भारत दुसऱ्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात उद्या बांगलादेशशी एन्काउन्टर करण्यासाठी रेडी झाला आहे. सराव सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्याने भारतीय संघाचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असले तरी बांगलादेशसारख्या ‘लिंबू-टिंबू’ समजल्या जाणाऱ्या संघाशी दोन हात करताना आम्ही गाफील राहणार नाही अशी स्पष्टोक्ती भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली आहे. भारताचा फॉर्म पाहता त्यांना कडवी झुंज देण्यासाठी बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता असेल.

सेहवागशी कसलेही मतभेद नाहीत - धोनी
नॉटिंगहॅम, ५ जून/पी.टी.आय.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार वीरेंद्र सेहवाग यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा भारतात सुरू असताना या वृत्ताने चांगलाच नाराज झालेल्या धोनीने हे वृत्त फेटाळून लावले. आज ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीपूर्वी घेण्यात येणाऱ्या वार्ताहर परिषदेत धोनी आपल्या संपूर्ण संघासह आला आणि संघातील एकजूट कायम असल्याचे त्याने दाखवून दिले.

वेस्ट इंडिजविरूद्ध ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड
लंडन, ५ जून/ वृत्तसंस्था

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हवेतसे यश मिळालेले नाही. त्यामुळे यंदाचा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी ते जीवाचे रान करतील. त्यांची उद्या पहिली गाठ पडणार आहे ती वेस्ट इंडिजविरूद्ध. ऑस्ट्रेलियाला विंडीजपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेटचा जास्त अनुभव आहे. त्याबरोबरच वेस्ट इंडिजचा संघ चांगल्या फॉर्मात नसल्याने ऑस्ट्रेलियाचेच पारडे उद्याच्या सामन्यात जड दिसत आहे.

इंग्लंडचे नेदरलॅंडपुढे १६३ धावांचे आव्हान
लंडन, ५ जून/ वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२०चा पहिला सामना जेथे खेळविण्यात आला त्याच क्रिकेटच्या पंढरीत आज दुसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामना थाटात खेळविण्यात आला. पावसामुळे स्वागत समारंभ न करता सरळ सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुबळ्या नेदरलॅंडसमोर इंग्लंड पहिल्याच सामन्यात मोठी धावसंख्या उभारून विक्रम प्रस्थापित करेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती.

अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्सच्या जागी कॅमेरुन व्हाइटला संधी
मेलबर्न, ५ जून, वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स हा पूर्वपरवानगी न घेताच हॉटेलमधून बाहेर गेला होता. त्यामुळेच त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेतर्फे आज सांगण्यात आले. अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स याच्या जागी कॅमेरुन व्हाईट याला पाठविण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची अचानक संधी मिळाल्यामुळे व्हाइट चांगलाच आनंदित झालेला दिसला. मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच चीज करीन, असे व्हाइट याने हेराल्ड सन या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

युवराजच्या फलंदाजीने पीटरसन घायाळ
लंडन, ५ जून/ पीटीआय

गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदावली मिरवणारा इंग्लंडचा केव्हिन पीटरसन गोलंदाजांची पिसे काढत असतो. त्याची विकेट घेणे भल्या-भल्या गोलंदाजांना जमत नाही. पण त्याची विकेट काढण्यात यशस्वी ठरला आहे तो भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग. त्याच्या आक्रमक फलंदाजीने पीटरसन घायाळ झाला असून त्याची खेळी पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो असे त्याने म्हटले आहे. ट्वेन्टी-२० हा खेळ फार जलद असून यासाठी अष्टपैलू खेळाडूंची गरज असते. त्याच्या फलंदाजीबद्दल काय बोलणार, त्याने तर गोलंदाजांची बोलतीच बंद केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये दोन हॅट्ट्रिक घेतल्याने तो एक चांगला गोलंदाज असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंमुळे क्रिकेटचा दर्जा उंचावलेला आहे, असे पीटरसनने सांगितले.

सॉडर्लिग प्रथमच अंतिम फेरीत; विजेतेपदासाठी सॅफिनापुढे कुझनेत्सोवाचे आव्हान
पॅरिस ५ जून/पीटीआय

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या विजेतेपदासाठी उद्या अग्रमानांकित दिनारा सॅफिना हिला सातव्या मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोवाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. रशियाच्याच या दोन्ही खेळाडूंमध्ये होणारी ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पुरुष गटात रॉबिन सॉडर्लिग याने फर्नान्डो गोन्झालिसला पराभूत करीत प्रथमच ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

गॅरी कर्स्टनने केले टेन्शन खल्लास!
विनायक दळवी
लंडन, ५ जून

पाकिस्तानविरुद्ध लढतीचे दडपण सर्वावर असते. प्रत्यक्ष मैदानावर उतरणाऱ्या खेळाडूंवर तर ते क्षणाक्षणाला जाणवत असते. देशवासियांचे अपेक्षांचे ओझे आणि प्रतिस्पध्र्याचे दडपण घेऊन भारत आणि पाकिस्तानचे संघ ओव्हलवर उतरले होते. भारतीय संघ यावेळी जय्यत तयारीत होता. भारतीय संघाने प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूंचा सखोल अभ्यास यावेळी केला होता. सराव सामना असला तरीही भारतीयांनी न्यूझीलंडविरुद्ध लढत गमाविल्यानंतर प्रत्येक गोष्ट गंभीरपणे घेतली होती.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे भारतापुढे कडवे आव्हान-कुंबळे
नवी दिल्ली, ५ जून/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा गतविजेता भारतीयय संघ यावेळीही चांगल्या फॉर्मात दिसत असून त्यांच्यासमोर यावेळी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असेल, असेमत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले आहे.ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये दर्जेदार युवा खेळाडू असून त्यांना ट्वेन्टी-२० या क्रिकेट प्रकाराचा पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे भारताला जर पुन्हा एकदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घालायची असेल, तर त्यांच्यापुढे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असेल, असे कुंबळेने यावेळी सांगितले.

ईरा घोष स्मृती ट्वेन्टी-२० क्रिकेट : डीप्लोला हरवून काऊंटी सी. सी. विजेते
मुंबई, ५ जून/क्री.प्र.

धवल पांचाळ आणि ऐश्वर्य सुर्वे यांच्या अष्टपैलू खेळामुळे काऊंटी क्रिकेट क्लबने ईरा घोष स्मृती (१९ वर्षांखालील) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या चुरशीच्या लढतीत त्यांनी डीप्लो स्पोर्टस् क्लबवर सहा धावांनी निसटता विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या काऊंटी सी.सी.ला डीप्लोच्या आशुतोष गोखले (२६/३) व विशाल धनेरा (१९/३) यांनी टिच्चून गोलंदाजी करीत ७ बाद ११६ धावांवरच रोखले.

बुद्धिबळ : आनंदची लेकोविरुद्ध एका गुणाची आघाडी
हंगेरी, ५ जून/पी.टी.आय.
विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने हंगेरीच्या पीटर लेकोविरुद्धच्या लढतीत आपली आघाडी कायम राखली आहे. आठ फेऱ्यांच्या या लढतीत चौथ्या फेरीअखेर आनंदने (२.५) लेकोवर (१.५) एका गुणाची आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी दोन्ही लढतींमध्ये गोंधळलेल्या पीटल लेकोने दुसऱ्या दिवशी मात्र थंड डोक्याने खेळ केला. तिसऱ्या लढतीत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना त्याने ही लढत बरोबरीत सोडविली तर चौथ्या लढतीत जबरदस्त चाली करून त्याने आनंदला चांगलेच कोंडीत पकडले होते. मात्र विश्वविजेत्या आनंदने आपला संपूर्ण अनुभव पणास लावून जबरदस्त बचावाचे प्रात्यक्षिक दाखवून ही लढत बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले.
हंगेरीचा सर्वोत्तम खेळाडू असणाऱ्या पीटर लेकोविरुद्ध खेळण्यासाठी बुद्धिबळ विश्वातील एलिट गटातील एखाद्या खेळाडूला बोलाविण्यात येण्याची ही प्रथा गेली चार वर्ष अविरत सुरू आहे. यात पहिल्या वर्षी लेकोने कार्पोव्ह विरुद्ध विजय मिळविला होता; त्यानंतर मात्र २००७ मध्ये रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिक आणि २००८ मध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध त्याला पराभूत व्हावे लागले होते. या लढतींमध्ये तो अजूनही आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

राष्ट्रीय रिगाटा स्पर्धा; अयाज शेख व राजेशकुमार यांची आघाडी कायम
पुणे, ५ जून/प्रतिनिधी
आर्मी रिगाटा संघाच्या अयाज शेख- राजेशकुमार यांनी राष्ट्रीय रिगाटा स्पर्धेत गोल्डन फ्लिट विभागात तिसऱ्या दिवशीही आघाडी कायम राखली.खडकवासला येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आर्मी रिगाटा संघाच्याच पी.मुथ्थुराजन व निजेश भास्करन यांनी दुसरे स्थान घेतले आहे. आयएनडब्लूटीसी संघाच्या नरेश यादव व एम.तारा यांनी तिसरे स्थान घेतले आहे. रौप्य फ्लीट विभागात निनाद मयेकर व धर्मेश ठक्कर (आयडब्लूएसए) ही जोडी आघाडीवर आहे. सीएमईच्या सी. के. राव व नरेंद्रकुमार ही जोडी दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईच्या ब्रिजराज वर्मा व आनिका पनवार यांनी तिसरे स्थान घेतले आहे.या स्पर्धेतील शेवटची फेरी उद्या सकाळी नऊ वाजता होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

आंतर संस्था कॅरम स्पर्धेत अन्सारी, सोमांची विजेते
तिरुवअनंतपुरम, ५ जून/पीटीआय

महंमद अन्सारी (एअर इंडिया) व कविता सोमांची (रिझव्‍‌र्ह बॅंक) यांनी ११ व्या अखिल भारतीय आंतर संस्था कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपदाचा वेध घेतला.पुरुषांच्या अंतिम सामन्यात अन्सारी याने प्रकाश गायकवाड(आयुर्विमा महामंडळ) याच्यावर १३-३, १०-० असा सहज विजय नोंदविला. उपांत्य फेरीत गायकवाडने योगेश परदेशी (पेट्रोलियम मंडळ) याला ०-१७, १५-०, ११-३ असे हरविले होते तर अन्सारीने बॅंक ऑफ इंडियाच्या राजू कटारे याचा ३-७, ९-५, ८-७ असा पराभव केला होता.महिलांच्या अंतिम सामन्यात सोमांचीने आपलीच सहकारी संगीता चांदोरकर हिच्यावर ९-३, ३-७, १७-० अशी मात केली होती. उपांत्य फेरीत सोमांचीने रश्मी कुमारी (बीएसएनएल) हिचा ९-८, ७-६ असा पराभव केला होता. चांदोरकरने डी.स्वर्णलता (आयएएडी) हिला ०-७, ९-४, १०-५ असे हरविले होते.