Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

फेरीवाल्यांचा शिवसेना स्टाईल बंदोबस्त
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या सॅटिस प्रकल्पास अडथळा ठरणाऱ्या फेरीवाले आणि अतिक्रमणांविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी रात्री महापौर स्मिता इंदुलकर आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना ‘सेना स्टाईल’ हुसकावून लावण्यात आले. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सॅटिस प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रिक्षावाले, फेरीवाले यांच्या अतिक्रमणामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा येत असून, लोकांनाही तेथून जाणे मुश्किल झाले आहे. याबाबत नागरिकांच्या नाराजीची दखल घेऊन शिवसेनेने गेल्या तीन दिवसांपासून स्टेशन परिसरातील फेरीवाला हटाओ मोहीम हाती घेतली आहे.

शिवसेनेच्या दादागिरीला राष्ट्रवादी उत्तर देणार
ठाणे / प्रतिनिधी

ठाण्यात शिवसेनेची गुंडगिरी सुरू झाली असून विनाकारण दुकानदारांना त्रास देऊन त्यांचे सामान फेकून दिले जात आहे. ज्या भागातून शिवसेनेला लोकसभेला कमी मते मिळाली, त्या भागात मुद्दाम दहशत पसरवली जात असल्याने या दादागिरीला राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देईल, असा इशारा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेच्या या दादागिरीविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहापूरमधून वैशाली घुमरे तालुक्यात प्रथम
शहापूर/वार्ताहर :
बारावी परीक्षेत शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयाची वाणिज्य शाखेतील वैशाली अनिल घुमरे ही विद्यार्थिनी ८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यातील एकूण आठ विद्यालयांचा निकाल ८३.३८ टक्के इतका लागला आहे. तालुक्यातून दोन हजार ४६ विद्यार्थी विविध शाखांमधून परीक्षेला बसले होते, त्यापैकी एक हजार ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १७८ रिपिटर विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कावेरी बोर्लीकर ७१.८३ टक्के मिळवून द्वितीय, तर प्राची शहा ७१.६७ टक्के मिळवून तृतीय आली आहे. विज्ञान शाखेचा ८२.२३ टक्के इतका निकाल लागला असून, मुलांनी जमीर युसुफ याने ७८.३३ टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे. प्रियंका पांडे हिने ७८.१७ टक्के मिळवून द्वितीय, तर ओमकार जगे याने ७७.५० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.

रिलायन्स गॅस कं पनीविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
ठाणे/ प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या रिलायन्स गॅसच्या पाइपलाइनमुळे होत असलेल्या शेतक ऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीविरोधात, तसेच कंपनीच्या कारभाराविरोधात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवार, ६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता बदलापूर येथील गणेश मंदिर हॉलमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, प्रा. रवींद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.

भिवंडी महापालिकेची निर्मल भरारी
रतनकुमार तेजे

महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह म्हटले की डोळ्यांसमोर पहिले चित्र येते ते अस्वच्छता, दुर्गंधी, तुटलेले दरवाजे, फुटलेल्या टाइल्स व तुंबलेली प्रसाधनगृहे याचे. मात्र सध्या हे चित्र बदलतेय ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या निर्मल एमएमआर अभियान या लोकाभिमुख योजनेमुळे! अत्याधुनिक पद्धतीची व आकर्षक अंतर्गत सजावटीने सुशोभित असलेल्या चकाचक बहुमजली स्वच्छतागृहांच्या इमारतीमुळे सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोनदेखील बदलत चालला असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल व परिचालनाचे काम स्थानिक वस्तीतील सामाजिक संस्थांना दिल्याने, शौचालयाच्या वापराबाबत शहरातील झोपडपट्टी विभागातील नागरिकांमध्ये जाणीव जागृती वाढल्याचे दिसून येत आहे.

सेनेचा कल्याणसाठी स्वतंत्र सुभेदार ?
ठाणे /प्रतिनिधी

शिवसेनेचा भगवा झेंडा फडविण्याचा पहिला मान मिळवून देणाऱ्या ठाणेकरांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड नाराजी व्यक्त करीत विरोधात मतदान केल्याची घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागली आहे. या पराभवामुळे ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून कल्याणसाठी स्वतंत्र जिल्हाप्रमुख नियुक्त करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’ वर सुरू झाल्या आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे आणि उपनेते अनंत तरे यांनी नकार दिल्यानंतर माजी महापौर राजन विचारे यांच्या नावावर कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शविली होती.

कल्याण-डोंबिवली पालिकेविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका
घनकचरा नियमावली हाताळणी नियमांचे उल्लंघन

कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण-डोंबिवली पालिकेने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या घनकचरा हाताळणी नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी पालिका अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दोषी असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी एक याचिका काल सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. घनकचरा नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

भिवंडीत अरहम अन्सारी अव्वल
भिवंडी/वार्ताहर:
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत येथील के. ई. एम. एस. या शाळेतील विज्ञान शाखेच्या अरहम अन्सारी या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. बी. एन. एन. कॉलेजमधील गौरव लक्ष्मीचंद जखरीया या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांने ८६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन गौरविले. उपविभागीय अधिकारी रेवती गायकर, महापौर जावेद दळवी व नवनिर्वाचित खासदार सुरेश टावरे यांनी शाळेत जाऊन या दोन्ही विद्यार्थ्यांंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहरातील ग्रामीण व शहरी भागात एकूण २२ कनिष्ठ महाविद्यालये असून या महाविद्यालयातून एकूण ४६२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरातील श्रीराम हायस्कूल, नारपोली व ग्रामीण भागातून जे. एस. भगत, डुंगे या कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. नवभारत हायस्कूल (९६.६२), आटगाव विद्यालय (९८.५३), के. ई. एम. एस. (९२.४१), रईस हायस्कूल (९०), चाचा नेहरू (७९.४५), समधीया हायस्कूल (८४.८४), शहा आदम शेख हायस्कूल (८३.११), न्यू इंग्लिश स्कूल, वज्रेश्वरी (८०.७७), रेणुका विद्यालय, झिडके (८३.०२), पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय (७६.२५), बी. एन. एन. कॉलेज (७५.९०), महसूद पठाण ज्यू. कॉलेज (७५.६८), हलारी विसा ओसवाल ज्यू. कॉलेज (८३.५३), ए. डी. जाधव कन्या विद्यालय, वज्रेश्वरीचा (८७.३२) निकाल लागला.

कल्याण-डोंबिवलीत बारावीच्या निकालात मुलींची आघाडी
डोंबिवली/प्रतिनिधी -
कल्याण-डोंबिवली विभागाचा बारावीचा निकाल ७७.६० टक्के लागला. या निकालामध्ये आघाडी घेण्यात मुलींनी बाजी मारली आहे. प्रगती महाविद्यालयाचा निकाल ९०.५० टक्के, के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय ८२.५५, टिळकनगर विद्यालयाचा ९०.५२ टक्के निकाल लागला आहे. प्रगती महाविद्यालयात विज्ञान शाखेत शर्मिली शहा, सागर गांधी, अविनाश पाटील, हार्दिक गांधी यांनी, वाणिज्य शाखा मीनाक्षी ब्रिस्ट, अभिषेक गावंडे, कोमल दोशी, कला शाखेतून दीप्ती भांबुरे, प्रियांका कांबळे, समीर कांचनबडे यांनी यश मिळवले आहे. पेंढरकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून तुषार मांगले, मिहीर घागरे, कौशिक आगटे, वाणिज्य शाखा प्रियेश जैन, राजेंद्र पटवर्धन, आदित्य दामले, मेरियम अन्सारी, कला शाखेत राजश्री जोशी हिने यश मिळवले आहे. मॉडेल कॉलेजच्या वाणिज्य शाखेतून महेश अय्यर, रितीवाज जोशी, केतकी जोगळेकर, विज्ञान शाखेत कृष्णकुमार रायमाया यांनी यश मिळवले आहे. कल्याण-डोंबिवली विभागातून १७ हजार ३६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३ हजार ४३१ विद्यार्थी पास झाले आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी शिवसेनेची मदत केंद्रे
डोंबिवली/प्रतिनिधी -
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शिवसेना डोंबिवली शहर शाखेने शहराच्या विविध भागांत मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. शहरप्रमुख शरद गंभीरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शिवसेना डोंबिवली शहर शाखा, शिवाजी पुतळ्याजवळ, संपर्क ९८३३१३१७६७, शिवसेना विभागीय कोपर रोड शाखा, संतोषी माता मंदिरासमोर, संपर्क ९८६७२९७४६६, शिवसेना शाखा, सारस्वत कॉलनी, पंचायत बावडीसमोर, संपर्क ९८२१३४५४४०. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा भरायचा याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेल्या या केंद्रांचा विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वाडय़ातून हेमंत पाटील प्रथम
वाडा/वार्ताहर

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत वाडा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान अ. ल. चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा हेमंत केशव पाटील या विद्यार्थ्यांने मिळविला आहे. त्याला ८८.५० टक्के गुण मिळाले, तर याच विद्यालयाची विज्ञान शाखेची प्राजक्ता बाळकृष्ण पाटील हिने ८७.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला. तालुक्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयांतून १७१८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यामधून १४९४ विद्यार्थी (८९.२९ टक्के) उत्तीर्ण झाले. अ. ल. चंदावरकर, वाडा (९२.६५), स्वामी विवेकानंद, वाडा (८३.९४), अंबिस्ते (९३.२४), उचाट (८९.४०), आदिवासी आश्रमशाळा गुहीर (८८.१०), ह. वि. पाटील विद्यालय चिंचघर (९०.३१), गुरुदेव आश्रम अंभई (९७.३७) या सात कनिष्ठ महाविद्यालयांचा याप्रमाणे निकाल लागला आहे.

मीराकुमार यांच्या निवडीबद्दल महिला कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
ठाणे/प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षपदी मीराकुमार यांची निवड करून देशातील महिलांचा जगामध्ये सन्मान वाढविल्याबद्दल ठाणे शहर काँग्रेस महिला आघाडीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सरचिटणीस शिल्पा सोनोने यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईचे वाटप केले. या कार्यक्रमात शारदा आरेकर, माजी नगरसेविका रजनी पांडे, अनिता पडवळ, उर्मिला सावंत, शोभना वटकरा आदी अनेक कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

शिवसेना जिल्हा उपप्रमुखाची गाडी फोडून चोरी
ठाणे / प्रतिनिधी

शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह नगरसेविका संगीता मिलिंद बनकर यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीतील डीव्हीडी, एलसीडी, सीडी प्लेअर यांची चोरी करण्यात आली. आनंद नगर कोपरी परिसरात कामगार कल्याण कें द्रापाशी या गाडय़ा उभ्या होत्या. रात्री अज्ञात इसमाने तेथे उभ्या असलेल्या चार गाडय़ांच्या काचा फोडून गाडीतील सामानाची चोरी केली. सकाळी हा चोरीचा प्रकार लक्षात आला.

कल्याणच्या अभिनव शाळेचा सुवर्णमहोत्सव
कल्याण/वार्ताहर

अभिनव शाळा ५० व्या वर्षांंत पदार्पण करीत असल्याने आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी केले आहे. छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेची अभिनव विद्यामंदिर ही पहिली शाळा २००९-१० या वर्षांत ५० व्या वर्षांंत पदार्पण करीत आहे. यानिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. ७ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्त या शाळेतील १९६० ते २००२ या वर्षांंतील माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांनी सकाळी ११ वाजता कार्यक्रमासाठी अभिनव विद्यामंदिर पारनाका येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पाच शिक्षकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पर्यवेक्षक मुळेस्माधवी कुलकर्णी, मोहपे, शिंगवार, सचिव गणेश भामरे, ठोसर यांचा समावेश करण्यात आला आहे. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी अभिनव विद्यामंदिर पारनाका येथे सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दूरध्वनी-२२०३४२६ यावर संपर्क साधावा.