Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये नक्षलवादग्रस्त भागावर अन्याय
गृहमंत्र्यांची घोषणा फसवी

चंद्रपूर, ५ जून / प्रतिनिधी

नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवू, असे राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळात जाहीर केले असताना त्यांच्याच खात्याने दोन दिवसापूर्वी केलेल्या अडीचशे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादग्रस्त भागावर अन्याय करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी गेल्या चार महिन्यात ३४ पोलिसांचे बळी घेतल्यानंतर राज्य सरकारने ही चळवळ मोडीत काढण्यासाठी अनेक नव्या योजना तीन दिवसापूर्वी विधिमंडळात जाहीर केल्या.

पडीक जमिनीवर ‘भद्राचलम पॅटर्न’ने वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार
यवतमाळ, ५ जून / वार्ताहर

खाजगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी आंध्रप्रदेशातील आय.टी.सी. ‘भद्राचलम पॅटर्न’ यवतमाळात सुरू करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने एक चळवळ म्हणून पडीक जमीन हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने खाजगी पडीक जमिनीवर रोजगार हमी योजनेशी निगडित वृक्ष लागवड व वैरण विकास योजना १९९२-९३ मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश पाणलोट क्षेत्राच्या वरच्या बाजूकडील भागामध्ये सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी परिणामकारकपणे करून ग्रामीण भागात चारा, गवत, इंधन व किरकोळ लाकूडफाटा यांची गरज भागवणे हा होता. मात्र, ही योजना मध्यंतरी स्थगित ठेवण्यात आली.

विकास कामांचा झपाटा कायम ठेवणारा लोकप्रतिनिधी
राम भाकरे

उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघ राखीव असून गेल्या दहा वर्षांपासून नितीन राऊत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून नितीन राऊत विजयी झाले. त्यांनी मतदारसंघात विकास कामांचा झपाटा सुरू केला. उत्तर नागपूरच्या विकाससोबतच नितीन राऊतांची लोकप्रियता वाढत गेली. विशेषत दलित समाजाचे अनेक नेते नितीन राऊत यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल्याने २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर नागपुरातूनच नितीन राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि त्यावेळी ३२ हजार मताधिक्याने राऊत विजयी झाले. गेल्या पाच वर्षांत राऊत यांनी बरीच विकास कामे केली आहेत.

ग्रामसभेत सरपंचास मारहाण
वडनेर, ५ जून / वार्ताहर

गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून संतापलेल्या गावकऱ्यांनी आमसभेत चक्क सरपंचाला मारहाण केल्याची घटना येरणगाव येथे नुकतीच घडली. गावकऱ्यांनी आमसभेत सरपंचाला बेदम मारहाण केल्याची वर्धा जिल्ह्य़ातील ही पहिलीच घटना आहे. हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या येरणगाव येथे ग्रामपंचायतची पहिली वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. गावातील सर्व नागरिक सकाळी १० वाजता आमसभास्थळी जमा झाल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप शंकर गिरी होते.

अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार
गोंदिया, ५ जून / वार्ताहर

अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्याकडे केली आहे.
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत २९ मे रोजी अंगणवाडी सेविकांची निवड प्रक्रिया पार पडली व नियमानुसार त्याच दिवशी निवड यादी माहिती फलकावर जाहीर करावयाची होती पण, येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी नियमाची पायमल्ली करून ही यादी तीन दिवसांपर्यंत प्रकाशित न केल्यामुळे उमेदवारात चर्चेचे पेव फुटले.

कृष्णाच्या सरपंचासही मारहाण
वाशीम, ५ जून / वार्ताहर

कृष्णा येथे गुरूवारी ग्रामपंचायत सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या वादात सरपंच शोभा विलास बोडखे यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत सरपंच बोडखे जखमी झाल्या आहेत. कृष्णा येथे गुरूवारी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शोभा बोडखे यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वासावर चर्चा होती. या दरम्यान सत्ताधारी व विरोधी गटामध्ये प्रथम वाद झाला. सरपंच शोभा बोडखे यांच्याविरुद्ध गटाने प्रथम शिवीगाळ केली. नंतर त्यांना दगडाने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून आरोपी विलास ठाकरे (रा. आमला), आत्माराम सोनाजी बोडखे, सोपान कडूजी डुकरे, भारत नरसिंग चव्हाण (रा. कृष्णा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत. अनसिंग पोलिसांनी कृष्णा येथील झालेल्या या घटनेमध्ये आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच गटाने पोलिसांकडे केली आहे.

गोंदियात महाराणा प्रताप जयंती साजरी
गोंदिया, ५ जून / वार्ताहर

स्थानिक पूनाटोली येथील भवभूती रंगमंदिरात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रिपुदमनसिंग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्रसिंग राठोड उपस्थित होते. प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराणा प्रताप मेमोरियल संस्थेचे अध्यक्ष शशिकुमार सिंग चौहान, उपाध्यक्ष उदयकुमार प्रमर उपस्थित होते. शशिकुमार चौहान यांनी संस्थेच्या एक वर्षांच्या कालावधीतील कामाचा आढावा सादर केला. संस्थेचे सदस्य बनून संस्था व समाजाला मजबूत करण्याचे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष उदयकुमार प्रमर यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य शैलेंद्रसिंग राठोड यांनी महाराणा प्रताप यांचा संघर्ष व स्वाभिमान अंगी बाळगावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन शिवगोपालसिंग बडगुजर यांनी केले. आभार सुधा बनाकर यांनी मानले. या कार्यक्रमास विजय बैस, बिपीन बैस, इंदल बडगुजर, वीरेन्द्र चौहान, मनमोहन सोमवंशी, क्रांतीकुमार चौहान, वर्षां बडगुजर, सुनीता बैस, ज्योती सोमवंशी, रुक्मिणी बैस आदी उपस्थित होते.

कारंजा तालुक्याचा उत्कृष्ट निकाल
कारंजा-लाड, ५ जून / वार्ताहर

अमरावती विभागीय उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत कारंजा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. धामणी खडी येथील नरसिंग कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के आहे. या संस्थेतून ४८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वच उत्तीर्ण झाले आहेत. कारंजा शहर व तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी अशी आहे, जे.सी. हायस्कूल कारंजा ८६.८२, के.एन. कॉलेज कारंजा ७०.८२, मुलजी जेठा कारंजा (मराठी) ७८.५७, मुलजी जेठा कारंजा (उर्दू) ८६.५९, विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय कारंजा ८१.२३, झेड.पी. कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव ८१.३०, झेड.पी. कनिष्ठ महाविद्यालय उंबर्डा बाजार ४१.३०, मोहनलाल भन्साळी कनिष्ठ महाविद्यालय धनज ८३.०५, वसंत उच्च माध्यमिक पोहा ८९.०४, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, लोहगाव ९१.४३, गुलाम नबी आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय कारंजा ६६.६७. कारंजा तालुक्यातून एकूण १४२५ विद्यार्थी या परीक्षेला प्रथमच बसले. त्यापैकी ११६० उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८१.४० टक्के आहे.

प्रणव सोनटक्के विभागात दुसरा
अंजनगावसुर्जी, ५ जून / वार्ताहर

येथील सीताबाई संगई उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी प्रणव रवींद्र सोनटक्के हा ९४.५० टक्के (५६९) गुण मिळवून अमरावती विभागातून गुणानुक्रमे दुसरा आला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाने संगई विद्यालयाची खंडित झालेली गुणवत्ता यादीतील प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाल्याचा आनंद विद्यालयातील सर्वाना झाला आहे. याच गावातील समाज प्रबोधन विद्यालयात त्याचे वडील शारीरिक शिक्षक आहेत, तर आई रेखा सोनटक्के विज्ञान विषय शिकवतात. प्रणवच्या आईला प्रथम ही बातमी वृत्त प्रतिनिधींकडूनच सांगण्यात आली. त्यांनी यजमानांना दूरध्वनीने ही आनंदवार्ता सांगताच येलकीच्या आत्मोदय मठाचे भगवंत महाराज, माजी उपसभापती केशवराव कळमकर, सुधीर खोडे, प्रवीण मानकर हे रवींद्र सोनटक्केंसह त्यांच्या घरी आले. प्रणवसुद्धा निकाल घेऊन आला आणि पेढे वाटून आनंद साजरा करू लागला. नंतर मात्र कौतुक, अभिनंदनार्थ त्यांचा दूरध्वनी सतत खणखणत होता. प्रणवला भविष्यात इंजिनिअर व्हायचे आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिन
चंद्रपूर, ५ जून / प्रतिनिधी

जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभाग व मानसिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रमेश बांडेबुचे, क्ष-किरण विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बारापात्रे तसेच दंत विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पिपरे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना दंत शल्य चिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांनी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये व्यावसायिक व युवापिढी यांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले. तंबाखूचे सेवन विविध मार्गाने केले जाते. तंबाखूमुळे कर्करोग कशाप्रकारे उद्भवतो व उपाययोजना कशाप्रकारे करावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. अशोक बारापात्रे यांनी मार्गदर्शनामध्ये लोक तंबाखूच्या आहारी कशाप्रकारे जातात व कोणकोणते रोग होतात व तंबाखू सोडण्याची विशिष्ट पद्धत त्यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रमेश बांडेबुचे यांनी आजच्या धावपळीतील जीवन खूप ताणतणावाचे आहे. लोक तंबाखू, सिगारेट, बिडी यांचे सेवन करून ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मानसिक रुग्ण होतातच व त्याचबरोबर व्यसनाधिनताही वाढत जाते. त्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडतात. तसेच त्यांनी कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्यामुळे त्याच्यापासून होणाऱ्या परिणामाला कशाप्रकारे तोंड द्यावे लागते, असे सांगितले.

स्वामी समर्थाच्या पालखीचे वाशीमला स्वागत
वाशीम, ५ जून / वार्ताहर

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या पालखीचे बुधवारी सकाळी येथे आगमन होताच वाशीम परिसरातील बहुसंख्य भक्तांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. मंगरूळपीर येथून वाशीम शहरामध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थाच्या पालखीचे आगमन झाले. येथील राजनी चौकातील बंडू धामणे यांच्या निवासस्थानी पालखीचे पूजन करून असंख्य भाविकांनी पालखीचे मोठय़ा उत्साहाने दर्शन घेतले. स्वामी समर्थाच्या पालखीच्या स्वागतासाठी शहरातील भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ही पालखी राजनी चौकातून नगर परिषद चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौक, बालू चौक, शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकातून मार्गस्थ होऊन विठ्ठलवाडीमध्ये पालखीची सांगता करण्यात आली. विठ्ठलवाडीमध्ये शहरातील व परिसरातील असंख्य भाविकांनी स्वामी समर्थाच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीच्या मिरवणूक व दर्शन सोहोळ्यासाठी बंडू धामणे, बंडू शर्मा, बाळू पोहरे, रंगदळे, विठ्ठल श्रीमेवार, गणेश गिरी, राजू इंगळे, नरेश सिसोदिया, बंडू गांजरे, कृष्णा काढोळे, गोपाल कणसे, विनोद ब्रrोकर, सतीश बकाले, दत्ता टाकळकर आदी भाविकांनी परिश्रम घेतले.

भंडारा जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे आज धरणे
तुमसर, ५ जून / वार्ताहर

अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करावी या मागणीसाठी ६ जूनला जिल्ह्य़ातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्यावतीने शनिवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोषीविरुद्ध एक महिण्याच्या आत कार्यवाही करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या मागणीसाठी भंडारा जिल्ह्य़ातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवार ६ जून रोजी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्यावतीने धरणे धरण्यात येणार असल्याची घोषणा न्यासाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. घनश्याम गौरकर यांनी आज येथे केली. न्यासाच्या तातडीच्या सभेत हत्येच्या कटाचा निषेध करण्यात आला आहे. अण्णा हजारे यांच्या कार्यावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन घनश्याम गोरकर (तुमसर), नितीन कारेमोरे (भंडारा), वासुदेव रायपूरकर (पवनी), श्रावण मते (मोहाडी), शेषनारायण गुप्ता (लाखनी), नामदेव श्रुंगरपवार (अडय़ाळ), शंकर बडवाईक (तुमसर) यांनी केली आहे.

बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजर गाडी सुरू
बल्लारपूर, ५ जून / वार्ताहर

यापूर्वी गोंदिया-बाबूपेठ-गोंदिया धावणारी रेल्वेगाडी बल्लारपूपर्यंत वाढविण्यात यावी, ही रेल्वेप्रवाशांची जुनी मागणी अखेर रेल्वे प्रशासनाने मंजूर करून ही गाडी आता बल्लारपूर गोंदिया-बल्लारपूर अशी गेल्या २ जून पासून सुरू करण्यात आली आहे. ही ब्रॉडगेज मार्गावरील गाडी बल्लारपूर रेल्वस्थानकाच्या ५ क्रमांकाच्या फलाटावरून सुटत आहे. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी संजय ढेंगर यांनी दक्षिण-पूर्व रेल्वेचे प्रबंधक कस्तुरी राजन यांची बल्लारपूर रेल्वे स्थानकावर भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करून मागणीचे निवेदन दिले होते. कस्तुरी राजन यांनी याबाबत लवकरच ही गाडी बल्लारपूरपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. व याप्रकारे आपल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली आहे. या रेल्वेगाडीचा लाभ विशेष करून गरीब व श्रमिक प्रवाशांना होणार आहे. अत्यल्प दरात हा प्रवास असला तरी रेल्वेच्या महसुलातही वाढ होणार आहे. या गाडीस एकूण १२ कोच असून दोन ‘एस.एल.आर.’चाही त्यात समावेश आहे. अनेक संघटनांनी त्यासाठी कस्तुरी राजन व ढेंगर याचे अभिनंदन केले आहे.

विठू भक्तांची अशीही सेवा
कारंजा-लाड, ५ जून / वार्ताहर

विठू माऊलीच्या दर्शनासाठी असंख्य वारकरी दरवर्षी दिंडय़ा घेऊन पंढरपूरला जात असतात. कारंजामार्गे अनेक दिंडय़ा जातात. गावकरी आपापल्यापरीने या वारकऱ्यांची सेवा करतात.
कारंज्यातील नाभिक समाज संघटनेने मात्र एका वेगळ्याच पद्धतीने विठूच्या भक्तांची सेवा सुरू केली आहे. एकआंबा व दापुरा या गावातील दिंडय़ा पंढरपूरला निघाल्या. महावीर भवनाजवळच्या मधुकर मापारी यांच्याकडे मुक्कामाला थांबल्या. नाभिक समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी या वारकऱ्यांचे पाय धुऊन त्यांचे स्वागत करीत आदर सत्कार केला, तर नाभिक समाज संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांची कटींग व दाढी मोफत करून त्यांची सेवा केली. वारकऱ्यांच्या सेवेचा एक वेगळा मार्गच त्यांनी अंगीकारला. नाभिक समाज संघटनेचे शहर अध्यक्ष प्रमोद खिरडकर, तालुका अध्यक्ष श्याम तायडे, उपाध्यक्ष सुधीर घोडसाड, गोपाल महाराज ठिल्लोरकर, दत्ता घर्डीनकर, राजेश ढोके, पुरुषोत्तम भुजाडे, अनिल घर्डीनकर, प्रवीण घोडसाड, राम तायडे, दत्ता भुजाडे, शिवा घर्डीनकर, शिवा व आकाश भुजाडे, स्वप्निल घर्डीनकर, सागर चौधरी, अतुल घोडसाड, प्रदीप भुजाडे आदी कार्यकर्ते या सेवा कार्यात सहभागी झाले. या आगळ्यावेगळ्या सेवेने वारकरीही भारावून गेले.

डॉ. मोळवणेंना मारहाण; आरोपीला अटक
चिखलीत डॉक्टरांचा मूक मोर्चा
चिखली, ५ जून / वार्ताहर

डॉ. शिवकुमार मोळवणे यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ व आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून शहरातून मूक मोर्चा काढला. पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयात चिखली मेडिकल असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. डॉ. मोळवणे यांच्या जुन्या शहरातील रुग्णालयात अनिल भुतेकर याने मारहाण केल्याच्या आरोपावरून आरोपीस पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करीत चिखली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजींच्या पुतळ्यापासून मूक मोर्चा आयोजित करण्यात आला. शहरातील सर्व पुरुष-महिला डॉक्टरांसह औषध विक्रेतेही मोर्चात सहभागी झाले. पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

अपघातात विद्यार्थी ठार
वाशीम, ५ जून / वार्ताहर

बारावी परीक्षेचा निकाल आणण्यासाठी वाशीमवरून पातूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दुचाकी गुरूवारी दुपारी सावरगाव बर्डे नजीक झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दुसरा विद्यार्थी जबर जखमी झाला. त्यास अकोला येथील विदर्भ क्रिटीकल रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वाशीम येथील मोहम्मद शाहीद मोहम्मद शफी (१८) हा पातूर (जि. अकोला) येथील शाहबाबु कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी शिकत होता. मोहम्मद शाहीद हा १२ वी मध्ये उत्तीर्ण होऊन त्याला ६२ टक्के गुण मिळाले होते. शाहीद त्याचा मित्र मोहम्मद मुफीज मोहम्मद एजाज याच्यासोबत गुरूवारी दुपारी वाशीम वरून पातूरला दुचाकीने जात होता. सावरगाव बर्डे गावानजीक त्यांच्या दुचाकीने एका झाडाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात शाहीद घटनास्थळीच मृत्यू झाला.

निलंबित पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला, ५ जून / प्रतिनिधी

मारहाण केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुरुवारी केला. ओझोन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पोलीस मुख्यालयात शिपाई अनिल रोठे याने एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ याने रोठेला निलंबित केले होते. निलंबनामुळे रोठेने गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून ओझोन रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. उपचारानंतर रोठेची प्रकृ ती स्थिर आहे. दरम्यान, पोलीस मुख्यालयात रोठेने केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचा सोमवारी मोर्चा
बुलढाणा, ५ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २००८ चा कायदा लागू करावा, या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी, ८ जूनला मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानावरून निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व समितीचे संस्थापक अध्यक्ष अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष अरुण इंगळे करणार आहेत.