Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

ग्रंथविश्व

जीवनाच्या मर्माचा इतिहास

 

आधुनिक वैद्यकविज्ञान हे संशोधनात मिळालेल्या पुराव्यावर आधारित आहे. जी तत्त्वे या संशोधनाच्या ज्वालेत तावूनसुलाखून निघतात तीच मागे उरतात व त्यांच्या पायावर वैद्यकीय विज्ञानाची उभारणी चालू असते. त्याचे जीवनातील व्यावहारिक फायदे हळूहळू दिसू लागतात. पर्यायी वैद्यकात (Alternative Medicine) हे घडत नाही. पारंपरिक पद्धतीने चालू असलेले उपचार पुढे चालू राहतात. रुग्णाला बरे वाटणे आणि रोग बरा होणे या दोन वेगळ्या घटना आहेत. पण सगळ्या रोगावर रामबाण उपाय आहेत असे आधुनिक वैद्यकविज्ञान म्हणत नाही. रोगाची लक्षणे व रोगाची कारणे या दोहोंचा शोध रुग्णालयात तसेच प्रयोगशाळेत चालू असतो.
कार्ल पॉपर या विज्ञानाच्या तत्त्वज्ञाने सांगितल्याप्रमाणे एखादी थिअरी चुकीची आहे असे दाखवणे (falsification) हा विज्ञान पद्धतीचा गाभा असतो. त्यामुळे पूर्वीची थिअरी चुकीची होती, असे स्वीकारण्याची विज्ञानाची तयारी असते. यातूनच आधुनिक वैद्यकविज्ञान पुढे सरकत असते. याचे उत्तम दर्शन ‘द मोस्ट सीक्रेट क्विन्टेसन्स ऑफ लाइफ’ या वैद्यकविज्ञानाच्या इतिहासाच्या पुस्तकात चांडक दासगुप्ता यांनी घडविले आहे. शिकागो युनिव्हर्सिटी प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. चांडक दासगुप्ता हे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे हिस्टरी ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड सायन्स या विषयाचे व्याख्याते आहेत.
Quintessence या शब्दाचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत. वस्तूचा महत्त्वाचा घटक किंवा त्याचे परम सार हा एक अर्थ. ‘अर्थ, ‘वॉटर’, ‘एअर’, ‘फायर’ ही चार मूलतत्त्वे- महाभूते आहेत, असे पुराणकाळाच्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात मानले जाते. या चारांइतकेच जे महत्त्वाचे मूलतत्त्व ते पाचवे मूलतत्त्व त्यास ‘क्विन्टेसन्स’ म्हणतात. या दोन्ही अर्थानी जीवनाचे महत्त्वाचे गुप्त मूलतत्त्व म्हणजे ‘हॉर्मोन्स’! या हार्मोन्सच्या शोधाचा इतिहास या पुस्तकात आहे.
मानवी शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी हृदय, यकृत, मेंदू, जठर असे निरनिराळे अवयव काम करत असतात, हे सर्वपरिचित आहे. पण शरीरातील अंत:स्रावी ग्रंथी शरीराचे काम सुरळीत चालू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे मात्र सर्वाना माहीत असतेच असे नाही. या ग्रंथींमधून जी जैवरसायने रक्तात पाझरतात त्यांना हार्मोन्स म्हणतात. हार्मोनला मराठी प्रतिशब्द आहे ‘संप्रेरक’. पण जो इतिहास हार्मोन या शब्दाला आहे तसा इतिहास संप्रेरक या शब्दाला नाही. कारण हार्मोन ही संकल्पना आधुनिक वैद्यकीय विज्ञानात निर्माण झाली. ज्या भाषेत नवीन ज्ञानाची निर्मिती होते त्या भाषेत सार्थ शब्द तयार होतात. १९०५ साली ब्रिटिश फिजिऑलॉजिस्ट (शारिरक्रियातज्ज्ञ) डॉ. अर्नेस्ट स्टर्लिग यांनी हार्मोन हा शब्द वापरात आणला. हार्मोन तयार करणाऱ्या पिटय़ुटरी, थायरॉइड, वृषण, बिजांडकोष, अ‍ॅड्रीनल्स (अधिवृक्क) या महत्त्वाच्या ग्रंथी आहेत.
स्त्री आणि पुरुष यांच्या अवयवांची विवक्षित ठेवण, पुरुषांना दाढी-मिश्या, महिलांचे ऋतुचक्र याचे मूळ हार्मोन्समध्ये दडलेले असावे असा विचार वैद्यकविज्ञानात १९ व्या शतकाच्या मध्यास सुरू झाला होता. युरोप, अमेरिका येथे यावर विविध प्रयोग होत होते. ‘एन्डोक्रायनॉलॉजी’ या वैद्यकविज्ञानाच्या शाखेच्या विकासास सुरुवात झाली होती. १८५० ते १९५० या शतकात दोन महायुद्धे होऊन गेली. पण एन्डोक्रायनॉलॉजीचा विकास थांबला नाही. दोन महायुद्धांच्या धामधुमीतसुद्धा इतर विज्ञानशाखा वाढत होत्या. त्यातील जैवरसायनविज्ञान- बायकेमिस्ट्री या शाखेतील प्रगतीचा फायदा एन्डोक्रायनॉलॉजीला झाला. हार्मोन्सचे जैवरासायनिक रूप समजू लागले, ही एक महत्त्वाची पायरी होती.
विज्ञानाची प्रगती फक्त वैज्ञानिकांच्या विचारामुळे होत नसते तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे परिमाण तिला लाभलेले असते. एन्डोक्रायनॉलॉजीच्या विकासाला कोणत्या सामाजिक विचारांचा प्रभाव पडला होता त्याचे काही नमुने पाहू. वीर्यनाश म्हणजे शरीराचा नाश हा विचार १९व्या शतकात पाश्चात्य समाजात प्रचलित होता. वीर्य (semen) वाचवणे, हस्तमैथुनाने त्याचा नाश होऊ दिला नाही तर पुरुषत्व म्हातारपणातही टिकून राहते, असा समज होता. स्त्रीचे स्त्रीपण ‘ओव्हरी’वर तर पुरुषाचे पुरुषत्व ‘टेस्टिस’वर अवलंबून असते, त्यामुळे या ग्रंथींचे अर्क दिले तर स्त्रीत्व व पुरुषत्व उतारवयातही टिकून राहील, असे वैज्ञानिकांनाही वाटत होते. त्यामुळे या ग्रंथींवरील संशोधनावर प्रचंड भर होता.
सदाबहार तरुण राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते, हे स्टेनॅक या युरोपीयन एन्डोक्रायनॉलॉजिस्टने ओळखले होते. साठीतील पुरुषांनी जर नसबंदी करून घेतली तर वीर्यनाश होणार नाही, हार्मोन्स वाढतील व त्यांचे पुरुषत्व टिकून राहील, अशी थिअरी स्टेनॅकने मांडली. त्याप्रमाणे त्याने नसबंदीच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. थोडय़ाच काळात नसबंदी ययातीकरणासाठी लोकप्रिय झाली. ययातीकरणासाठी विल्यम यीटस् या कवीने वयाच्या ६९व्या वर्षी नसबंदी करून घेतली. सिग्मंड फ्रॉइड याने वयाच्या ६७व्या वर्षी नसबंदी करून घेतली. त्याला कर्करोग होता, त्यासाठीसुद्धा नसबंदीचा फायदा होईल, असे त्याला वाटले होते. वकील, डॉक्टर्स, नट यांच्यात जशी ती लोकप्रिय झाली तशी सर्वसामान्यांतही. १९२६ च्या सुमारास अमेरिकेत आठ हजार पुरुषांनी तर युरोपमध्ये २४ हजार पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती.
स्टेनॅकची थिअरी चुकीची आहे, असे बऱ्याच वैज्ञानिकांना वाटत होते. लोकप्रियता हा विज्ञानासाठी निकष नसतो. स्टेनॅकच्या या थिअरीवर संशोधन चालू होते. टेस्टोस्टीरॉनची निर्मिती कशी होते यावर प्रकाश पडू लागला. नसबंदीने टेस्टोस्टीरॉनचे प्रमाण वाढत नाही हेही सिद्ध झाले. नसबंदीचा उपयोग फक्त कुटुंबनियोजनासाठी आहे, हे वैद्यकविज्ञानात सर्वमान्य झाले. ययातीकरणासाठी नसबंदी शस्त्रक्रिया थांबल्या.
जैवरसायन विज्ञानातील संशोधनामुळे टेस्टोस्टीरॉनचे जैवरासायनिक रूप समजले. टेस्टोस्टीरॉन तयार करण्यासाठी प्राण्यांच्या टेस्टीसचा अर्क काढावा लागे. टेस्टोस्टीरॉनचे जैवरासायनिक रूप कळल्यामुळे कृत्रिमरीत्या टेस्टोस्टीरॉन प्रयोगशाळेत तयार करणे शक्य झाले. प्राण्यांच्या टेस्टीसचे अर्क वापरणे बंद झाले. टेस्टोस्टीरॉन सहज मिळू लागल्यामुळे उंदरावर प्रयोग करून टेस्टोस्टीरॉन या हार्मोन्सचे प्रभाव-उपप्रभाव समजू लागले. अशा तऱ्हेने जैवरसायनातील संशोधनामुळे एन्डोक्रायनॉलॉजीची प्रगती योग्य दिशेने होऊ लागली. नोबेलसाठी सहा वेळा नामांकन होऊनही स्टेनॅकचे संशोधन चुकीच्या मार्गाने गेले आहे, हे सिद्ध झाल्यामुळे त्याला नोबेल मिळाले नाही.
एन्डोक्रायनॉलॉजिकल ग्रंथी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांचे कार्य एकमेकांत गुंफलेले असते व या सर्वाचे नियंत्रण मेंदू करतो. या संकल्पनांच्या शोधांचा इतिहास वाचला म्हणजे आधुनिक वैद्यकविज्ञान विकसित होणारे ज्ञान आहे, हे समजण्यास मदत होते.
डॉ. आनंद जोशी
द मोस्ट सिक्रेट क्विन्टेसन्स ऑफ लाइफ
लेखक : चांडक सेनगुप्ता
प्रकाशक : द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस, शिकागो