Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

विविध

दिल्लीत पकडलेल्या मदनीचे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या म्होरक्याशी संबंध
दहशतवादी प्रशिक्षणासाठी तरूणांना नेपाळमार्गे पाकिस्तानात नेण्याचा डाव

नवी दिल्ली ५ जून/पीटीआय

दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी महंमद ओमर मदनी याला दिल्लीतील एका न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मदनी हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा या संघटनेचा संस्थापक हाफीझ सईद याचा प्रमुख साथीदार असून दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरातून तरूणांची भरती करण्याचे काम त्याला देण्यात आले होते.

आसाममध्ये चकमकीत चार अतिरेकी ठार
गुवाहाटी ५ जून/पीटीआय

आसाममध्ये काल रात्रीपासून झालेल्या चकमकीच्या दोन घटनांमध्ये चार अतिरेकी ठार तर एक लष्करी जवान जखमी झाला. यावेळी मोठय़ा प्रमाणात स्फोटके व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उल्फाचे दोन अतिरेकी काल आसाममधील सोनितपूर जिल्ह्य़ात मारले गेले. रेड हॉर्न डिव्हीजनच्या कारवाईत खानमुख येथे दोन तास चाललेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले, या घटनेमुळे महामार्ग क्रमांक ५२ काही काळ वाहतुकीसाठी बंद होता. जखमी जवानाला लष्कराच्या तेजपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी दोन पिस्तुले, १३ काडतुसे इतर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. जिंजेबिल येथील दुसऱ्या चकमकीत दोन अतिरेकी पोलीस व लष्कर यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत मारले गेले. कुमाऊ रेजिमेंटने सादिया भागातील अमरपूर नजीकच्या जंगलात केलेल्या खोदकामात १८ जिलेटिन कांडय़ा व ६३ डेटोनेटर सापडले आहेत.

माहिती देण्यास विलंब लावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड
नवी दिल्ली, ५ जून/पीटीआय

माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कामगार मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्यास केंद्रीय माहिती आयोगाने २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. महेंद्रकुमार गुप्ता या अर्जदाराने श्रम मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय भांडारसंबंधात माहिती मागविली होती. पण केंद्रीय जनसंपर्क अधिकारी आर.के. सिंग यांनी ती माहिती अर्जदाराला २१५ दिवसांनंतर पुरविली. माहितीचा अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार ती माहिती २७ सप्टेंबर २००७ रोजीच देणे संबंधित संस्थेवर बंधनकारक होते. आयोगाने संबंधित अधिकाऱ्यावर प्रति दिवशी २५० रुपये इतका दंड ठोठावला आहे. हा दंड सिंग यांच्या वेतनातून थेट अथवा वेतनामध्ये दरमहा ५००० रुपये कपात करून वसूल करण्याचे आदेशही केंद्रीय भांडाराच्या अध्यक्षांना दिले आहेत. या आधी केंद्रीय माहिती आयोगाने संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

जी.के.पिल्ले नवे गृह सचिव
नवी दिल्ली, ५ जून/पीटीआय

नवे गृह सचिव म्हणून व्यापार सचिव जी.के.पिल्ले (वय ५९) यांची नेमणूक करण्यात आली असून, ते ३० जूनला मधुकर गुप्ता यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. पिल्ले यांच्या नेमणुकीवर मंत्रिमंडळाच्या समितीने शिक्कामोर्तब केले असून, या समितीच्या प्रमुखपदी पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत. पिल्ले हे केरळ केडरच्या १९७२ च्या तुकडीतील अधिकारी असून, त्यांनी गृह मंत्रालयात दोन वर्षे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. मधुकर गुप्ता यांचा कार्यकाल ३१ मार्चला संपला असून, त्यांना लोकसभा निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

ब्रिटनमध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे पंतप्रधान ब्राऊन यांच्या राजीनाम्याची मागणी
लंडन, ५ जून/पीटीआय

ब्रिटनमध्ये आणखी दोन मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यासमोर संकट उभे राहिले. ब्राऊन यांच्या मजूर पक्षाची अलीकडेच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पिछेहाट झाली असून युरोपीय संघाच्या येत्या निवडणुकांमध्येही त्याचा ब्रिटनला फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आपले सरकार वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून ब्राऊन लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार आहेत.कामगार मंत्री जेम्स पर्नेल आणि संरक्षण मंत्री जॉन हटन यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिल्यावर ब्राऊन यांच्या सरकारसमोर संकट उभे ठाकले आहे. स्थानिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर होताच पर्नेल यांनी राजीनामा देत ब्राऊन यांनाही पदावरून पायउतार होण्यास सांगितले. स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात पर्नेल यांनी म्हटले आहे की, ब्राऊन यांच्या नेतृत्वामुळेच मजूर पक्षाची कामगिरी खालावलेली आहे.