Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९

असं सजवलं घर माझं
माझ्या नवऱ्याचं घर..

घर आणि आपल्या घराचे सुख काय असतं हे घराबाहेर एकटे राहायला लागल्यावर प्रकर्षांने जाणवतं. खरं आहे हे! माझे पती नोकरीनिमित्ताने ५ वर्षे सौदी अरेबियात राहिलेत, त्या वेळी स्वत:चे घर व फॅमिली हा पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यामुळे सुट्टीची वाट बघून आपल्या घरी जाणे हा एकच मार्ग होता. सौदीतल्या वाळवंटातील आयुष्य तसं रूक्षच गेलं. त्यानंतर गुजरातमध्ये एका कंपनीत नोकरी मिळाली. ६-७ महिने बॅचलर क्वॉर्टरमध्ये काढल्यानंतर कंपनीचे ‘फॅमिली क्वॉर्टर’ मिळाले. ते ‘रोहाऊस’ प्रकारातील घर आहे. समोर व पाठीमागे अंगण असलेले, ज्याचे मुंबईकरांना नेहमीच अप्रूप असते. अर्थात तेच माझ्या नवऱ्याचे घर-

 

जामनगर तसे कच्छच्या वाळवंटाजवळचं पण फरक इतकाच की या वाळवंटातही हिरवळ फुलवणं शक्य झालं.
घर पाहावे बांधून..! असे म्हणतात, तेव्हा एक घर डोंबिवलीत थाटलेले असताना दुसरं घर लावायचे होते तरीही नवीन संसार थाटावा याच्या उत्साहात घर थाटलं. कमीतकमी सामान घेऊन पण आपल्या आवडीनुसार नीटनीटके, सुटसुटीत असे घर लावले.
किचन लावताना फ्रीज, मिक्सर, गॅस, कुकर इ. वस्तू नवीन घ्याव्या लागल्या. भांडी आमच्या घरातच भरपूर होती तीच या ‘नवीन’ घरातील संसाराला उपयोगी पडली. नवीनपण दिसायलाही हवं म्हणून दिसायला नवीन, एकसारखी, एकात एक राहणारी अशी भांडी जमवली. एक डिनर सेट घेऊन टाकला पाहुणे आल्यास वापरायला सुंदर, छोटय़ाशा देवघराने घराला आणखी घरपण आणलं.
हॉलमध्ये डायिनग टेबल, टी.व्ही. राहील एवढीच ट्रॉली व म्युझिक सिस्टीम, दोन कर्लऑनच्या सिंगल बेड एकावर एक ठेवून सीटी तयार केली त्यावर छान क्रोशियाचे कुशन्स वा डिझायनर मेट्रेस वापरले. त्यामुळे हॉल सिंपल पण क्यूट झाला. डोंबिवलीतील घरात जास्तीचे (पूर्वी वापरलेला सेट पुन्हा नव्याने वापरला) असलेले पडदे वापरायचे ठरवले पण दोन दारांना ते व्यवस्थित झाले, खिडक्यांना मापाचे होईना मग आम्ही त्याला कॉन्ट्रास्ट मॅचिंग पण मिळतेजुळते पडदे डोंबिवलीतून शिरुन पॅचवर्क करून बनवून घेतले. त्यामुळे हॉलच्या सौंदर्यात भरच पडली. शेवटी या सगळ्यांना मॅचिंग असे भिंतीवरील घडय़ाळ माझ्या सासू-सासऱ्यांनी लेकाच्या घरी प्रथमच जातोय म्हणून गिफ्ट केलंय. जामनगरची खासीयत असलेला बांधणी प्रकार. त्यात कौतुक म्हणून मी स्वत: बांधणीचे कापड रंगवून त्यावर वर्क करून तयार केलेल्या फ्रेममुळे भिंतीचे सौंदर्य खुलले. हॉलला ताजेपणा, फ्रेशनेस देण्यासाठी हिरवेगार कृत्रिम झाड आम्ही कुंडीत लावले.
बेडरूममध्ये भिंतीतील कपाटं असल्यामुळे कपाट खरेदी करावी लागली नाहीत. एक डबल बेड घेतला. या रूमचे पडदेपण आमच्या घरातीलच एक सेट उपयोगात आणता आला.
एकूण काय कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त छान, आरामदायी व सुटसुटीत घर तयार झालं.
मी तर काय जाऊन येऊन राहणार, आमच्यासाठी ते हॉलिडे होम होतं, पण ते माझ्या नवऱ्याचं मात्र घर होतं. मी नवऱ्याला या घरात राहताना आपलेपणा निवांतपणा, एकांतता स्वत:च्या घराची स्वत: काळजी घेताना पाहू शकले. घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवणे याची धडपड या गोष्टी बघितल्या. दार उघडून घरात आल्या आल्या चला आपल्या घरात आलो, छान आहे. मंजू आपलं घर? ऐकायला गोड वाटलं. छान आवडती गाणी ऐकत, वाचत, मनाप्रमाणे घरात वापरता येतं हे आनंद, सुख त्याच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर मीही मनोमन सुखावते, बायको मुलांपासून दूर राहतोय ही खंतही असतेच. त्यातही त्यांनी सुख शोधण्याचा केलेला प्रयत्न!
नवऱ्याच्या या घरामुळेच ८०-९० त असलेल्या माझ्या सासू-सासऱ्यांना आणि मावशी, काकांना नुकतीच द्वारका यात्रा करता आली हेही नसे थोडके!
मंजुषा सेलुडकर
mseludkar@yahoo.com