Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९

टेरेस गार्डन..
कल्पकतेला जोड हवी नियोजनाची

असावे घरकुल अपुले छान.. या ओळी आठवल्या की घरासमोरच्या अंगणातील वा गच्चीवरील बागही आठवते. टेरेसवर जागा असेल किंवा गॅलरीत मोकळी जागा असेल तेथे कुंडीमध्ये शोभेची झाडे आवर्जून लावली जातात. अशाच एका हौशी पुणेकराने घराच्या छतावर बाग फुलवली आहे आणि ती सुद्धा चक्क पावसाच्या पाण्यावर. पद्मावती येथील नंदू कुलकर्णी हे त्यांचे नांव!
कमी वेळेत उपलब्ध जागेवर फुलझाडे, वेली आणि लॉनही साकार करता येत असल्याचे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. त्यासाठी भरपूर जागा, वेळ पाहिजे असे काही नाही; तर त्यासाठी हवे फक्त नियोजन आणि मनाची तयारी! थोडीशी कल्पकता

 

वापरली तर आपल्या घराची टेरेस फुलझाडे, वेलींनी बहरलेली पाहिल्यावर ‘क्रिएटीव्हीटी’ चे मिळणारे समाधान शब्दात वर्णन करता येत नाही असे कुलकर्णी यांनी त्यांच्याच शब्दात सांगितले. पावसाळ्यामध्ये छतावर पडणारे पाणी एका टाकीमध्ये साठवून ते पाणी वर्षभर बागेला वापरण्याचा प्रयोग केला त्यांनी केल्या आहे. त्यातून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळाले.
भविष्यात पाण्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ महत्त्वाचे ठरणार आहे. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीखालील व टेरेसवरच्या टाकीत साठवायचे आणि ते पाणी बागेसाठी वापरण्याची नवी कल्पना आता रूढ होऊ लागली आहे. घर बांधताना पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली तर वीज न वापरता साठवलेले पाणी वापरणे सोपे होते. असाच एक प्रयोग नंदू कुलकर्णी यांनी यशस्वी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घरावरील टेरेस गार्डन ऐन उन्हाळ्यातही बहरल्याचे पाहायला मिळते. कपडे धुणे, शौचालय साफ करणे अशा इतर कारणांसाठीही ते या पाण्याचा वापर करीत आहेत. त्यांचा प्रयोग नक्कीच सर्वाना प्रेरणादायी आहे. कुलकर्णी यांनी टेरेसवर सुमारे एक हजार चौरस फुटामध्ये वृक्ष, वेली, लॉन फुलविले आहे. या ठिकाणी फक्त फुलझाडे, वृक्षवेलींची अर्धसुपारी, गुलाब, जास्वंद, पाम, तसेच वेलीमध्ये चमेली, मधुमालती, अ‍ॅलामंडा, शतावरी, सावलीतील अशी सुमारे ८०० कुंडय़ांतील झाडे आहेत. पक्ष्यांना अंघोळ करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोयही त्यांनी केली असल्यामुळे त्यांच्या टेरेसवर गेल्यावर नैसर्गिक वातावरणात फेरफटका मारून आल्याचा आनंद मिळतो. बी.ए. सोशोलॉजी केल्यानंतर बागकाम प्रशिक्षण, पर्यावरणाचा डिप्लोमा केला आहे. बागकामाबरोबर पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावून ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे बरोच काही शिकता आले. कुलकर्णी यांनी बारा महिन्यांचे मराठी कॅलेंडर तयार केले आहे, तसेच उद्यान दर्शनच्या सहलीही ते आयोजित करतात. या सहलींमध्ये सहभागी झालेल्यांना तेथील देशी आणि परदेशी झाडांची माहिती देणे, त्याचे महत्त्व आदी माहिती ते देतात. टेरेसवर कुंडय़ांतील फुलझाडे, तसेच वेली आणि लॉनमुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो पक्षी या ठिकाणी येतात. बागेची सजावट करताना कुठेही डामडौल नाही, भडकपणा नाही. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडी महत्त्वाची आहेत. ती नुसती लावून चालणार नाही, तर वाढवली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. लहानपणापासून अनेक चित्रं कुलकर्णी यांनी काढली आहेत. ती त्यांनी प्रदर्शनामध्ये मांडली असून, त्यांना पारितोषिकेही मिळाली आहेत. सौंदर्यदृष्टी असेल तर सजावट करण्यासाठी फार खर्च येत नसल्याचे कुलकर्णी आवर्जून सांगतात. रोझ सोसायटी पुणेचे ते उपाध्यक्ष आहेत. एम्प्रेस गार्डनच्या नियोजनात त्यांचा कायम सहभाग असतो. निसर्गसंवाद ही त्यांची संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून पाणी वाचवा मोहीम कुलकर्णी राबवित आहेत. पर्यावरणाच्या संतुलित विकासासाठी ते काम करीत आहेत. दुर्मीळ झाडे वाचविण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. परदेशी झाडांपेक्षा देशी झाडांची जोपासना केली पाहिजे, यासाठी त्यांची तळमळ आहे. वॉटर शेड व्यवस्थापनासाठी ते मदत करतात. पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी ते म्हणतात, शक्य असेल तर टेरेसवरील टाकीमध्ये पाणी साठवावे. म्हणजे विद्युत मोटार लावावी लागणार नाही. महापालिकेच्या बागांसाठी अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कुलकर्णी डिझायनिंग करण्यासाठी रोपांचा, झाडांचा वापर करतात. त्यामुळे टेरेसवरील बाग फुलविण्यासाठी उपयोग होतो. पर्यावरणाचे काम करणाऱ्यांसाठी विशेषकरून ते जास्त मदत करतात. पूर्वी शहरामध्ये पाण्याचे हौद असायचे, आता फारसे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची अडचण असते. त्यासाठी टेरेसवर पाण्याची सोय महत्त्वाची आहे. बागेचा विकास करण्याच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते आवर्जून सांगतात. बागेची देखभाल करण्यासाठी दररोज एक तास पुरतो. आठवडय़ातून एक दिवस दोन-तीन तास वेळ दिला तरी भरपूर होतो. बागकामाबरोबरच ते पक्षी निरीक्षणाचेही काम करतात. प्लॅस्टिकचे रिसायकलिंगचे काम करून पाणी वाचवा, ही मोहीम राबविण्यासाठी ते सतत अग्रेसर असतात.
कुलकर्णी यांनी सांगितले की, पावसाच्या पाण्याचा वापर प्रत्येकाने करायला हवा. पुणे शहर, तसेच आसपासच्या परिसरात जवळजवळ २५ इंच पाऊस पडतो. सर्वसाधारण पाहिले तर एक हजार चौरस फूट क्षेत्रात पन्नास ते साठ हजार लीटर पाणी चार महिन्यांत जमा होऊ शकते. यासाठी घराचे बांधकाम करताना योग्य नियोजन करून इमारतीची रचना केली तर पावसाच्या पाण्याचा वापर काही महिने सहज होऊ शकतो. पावसाच्या पाण्याच्या टाकीमध्ये गप्पी मासे सोडले तर डासांचाही उपद्रव होणार नाही. आपल्या गॅलरीमध्ये अथवा गच्चीमध्ये छोटय़ा जागेतही फुलझाडे लावून घराच्या सजावटीसाठी हे पाणी महत्त्वाचे ठरते. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, वाढदिवस असे कार्यक्रम असतील त्या वेळेस कुंडय़ांमधील फुललेली झाडी, वेली ठेवल्या तर सजावट आयतीच तयार होते. हाही महत्त्वाचा भाग आहेच. कृत्रिम फुले आणून सजावट करण्यापेक्षा या फुलांची सजावट नक्कीच चांगली दिसेल आणि इतरांनाही आवडेल, असा हा प्रयोग आहे. पहा, तुम्हालाही असे नियोजन करून जागा उपलब्ध असेल तर टेरेसवर बाग फुलवता येईल.
अशोक बालगुडे
ashok.balgdue@gmail.com