Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९

चर्चा
आणखीही काही बंधने?
‘‘तर बंधनेही पाळावयास हवीत!’’ (वास्तुरंग- २ मे) हा श्रीनिवास घैसास यांचा लेख वाचल्यावर मला लॉर्ड ब्राइस, यांनी अमेरिकन राजकीय परिस्थितीवर केलेल्या भाष्याची आठवण झाली. ते म्हणतात, ‘‘अत्यंत सामान्य दर्जाचे लोक सत्ताधारी होतात ही लोकशाहीमधील न टाळता येणारी उणीव आहे.’’ घैसास यांचा सल्ला अगदी योग्य आहे; पण आपल्याकडे कायदा

 

पाळण्यापेक्षा कायद्यातील पळवाटा शोधण्यात बरेच निष्णात असतात. सहकारी सोसायटीचा कारभार हाही लोकशाहीचाच आविष्कार आहे. शिवाय जाऊ तेथे खाऊ हा तर आपला वेदमंत्र आहे.
अनुभव असा येतो सहकारी सोसायटीचा कारभार लोकशाही पद्धतीने निवडणुका इ- चालत असल्यामुळे निवडून आलेली मंडळी सत्ताधारी होतात. मग आपल्या हातातील सत्तेचा दुरुपयोग इतरांना त्रास देणे हेही प्रकार होऊ शकतात. काही सदनिकाधारकांच्या तक्रारींकडे लक्षच द्यायचे नाही आणि एकदा एखाद्या व्यक्तीस त्रास द्यायचा ठरविल्यावर ‘मार्गही’ सुचतात. त्यातही परत गटबाजी सुरू होते. प्रारंभी काही फायदा नसल्यामुळे कार्यकारी मंडळात येण्यास सहसा कोणी तयार होत नाही, पण एकदा इथेही ‘सोर्स ऑफ टॅक्स फ्री इन्कम’ असे लक्षात आले की मग इलेक्शन फीवर सुरू होतो. तळे राखल्यामुळे पाणी चाखावयास मिळते, शिवाय ऑनररी काम केल्याचे श्रेयही मिळते. या संदर्भात बिल डय़ुरांट यांचे उद्गार आठवतात. तो म्हणतो, आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा शहाणेही व्हावयास हवे होते या गोष्टीचा आपणास विसर पडला.’’
सहकारी निवासाची कल्पना स्वीकारल्यावर प्रत्येक सदनिकाधारकाने पाळावेत असे २३ नियम लेखात दिले आहेत. त्यात सदनिकाधारकांना असणाऱ्या कायदेशीर हक्काबाबत व अधिकाराबाबतच्या तरतुदी आहेत. त्यांचे पालन मध्ये ‘फांदे घातल्याशिवाय’ करू दिले जातं का? शिवाय कायद्यात पळवाटाही असतात.
या पलीकडेही काही अलिखित नियम आहेत, पण ते पाळले जातात की नाही व नसल्यास संबंधितांकडून त्या नियमांचे पालन करून घेण्यासाठी काय तरतूद आहे? उदाहरणार्थ सोसायटीत राहणाऱ्या अन्य सदनिकाधारकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक सदनिकाधारकाचे कर्तव्य आहे पण त्याचे पालन कितपत होते! पण प्रत्यक्षात घडत असते वेगळेच!
घैसास यांनी दिलेल्या नियमांना कायद्याचा आधार आहे तरीही ते चुकविण्याचे प्रयत्न होतात मग ज्यांना दंडसंहिता लागू नाही त्यांचे पालन कोण करणार?
सहकारी गृहनिर्माण हा शाप की वरदान? सहकाराचा अनेकांना नेहमी येणाऱ्या अनुभवापैकी हे काही!
धुंडिराज ना. वैद्य, कल्याण