Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९

आठवणीतील घर
यवतमाळमधील डॉ. काणे यांची हवेली

’१९३६ सालच्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची व्यायामपटूंची एक चमू गेली होती. त्याचं नेतृत्व डॉ. सिद्धनाथ काणे यांनी केलेलं होत. तिथे हिटलरसमोर ‘वंदे मातरम्’ हेच आमचं राष्ट्रगीत आहे तेच आम्ही म्हणणार, असं म्हणून स्वत:च्या बरोबर नेलेली वंदे मातरम्ची रेकॉर्ड वाजवली होती. त्यामुळे त्यांची देशभक्ती बघून हिटलर भारावून गेला. त्यांनी माझ्या आजोबांचा सत्कार केला. अशा या माझ्या आजोबांनी यवतमाळमध्ये पणजोबांची जी बैठय़ा घराजवळची रिकामी जागा होती त्यावर मोठ्ठं घर बांधल तेच आमचं ‘सिद्धनाथ भवन.’
वास्तूकडे नजर जाताच घराण्याची संपन्नता लक्षात यावी, अशीच ही एक देखणी वास्तू. एखाद्या भयपटात झाडीत असणाऱ्या

 

मोठय़ा हवेलीसारखीच, पण अगदी हमरस्त्यावर असणारी ही हवेली, म्हणजे यवतमाळातील माझ्या माहेरचं, डॉ. काणे यांचं ‘सिद्धनाथ भवन.’ माझे पणजोबा कृष्णाजी नारायण काणे हे वयाच्या सोळाव्या वर्षी कोकणातून येथे एकटेच आले. त्यांचं शिक्षण आठवीपर्यंत झालेलं होते. इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता, त्यांना चांगलं येत होतं. त्यामुळे ब्राह्मण कुटुंबात पूजापाठ करता करता त्यांना बोरीअरब या यवतमाळ जिल्ह्यातल्या खेडेगावात सरकारी शाळेत ‘हेडमास्तर’ म्हणून नोकरी मिळाली. त्या काळी शेतकरी लोकं सावकारी पाशात अडकले जायचे. त्यांना जमिनीविषयक कायद्याची तेव्हढी जाण नसायची, शिक्षणाची वानवा असायची. त्यामुळे कृष्णाजी काण्यांनी जमिनीबद्दलच्या कायद्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्याबद्दल त्यांनी सनद मिळवली. त्यामुळे लोकांना ते जमिनींबद्दल सल्ला द्यायला लागले. कित्येकांच्या जमिनी त्यांना सोडवून दिल्या. मग त्यांनी हेडमास्तरची नोकरी सोडून ‘शेतीविषयक सल्लागार’ म्हणून आपला व्यवसाय सुरू केला. यात त्यांना यश मिळालं आणि त्यांनी मग शेतीवाडी विकत घेतली. खुद्द यवतमाळात प्लॉट घेऊन त्यावर कौलारू बैठं घर बांधलं आणि कोकणातून मग आपल्या बायकोला घेऊन आले. या त्यांच्या बैठय़ा घराला लागूनच एक दर्गा होता त्या धुमालशावलीच्या दग्र्यावर पणजोबांनी कौलाचं छप्पर केलं आणि या दग्र्याला लागूनच पलीकडला प्लॉट अजून रिकामाच होता. कृष्णाजी काण्यांचे दोन्ही मुलगे मोठे दत्तात्रय आणि दुसरे सिद्धनाथ हे चांगले शिकले. सिद्धनाथ तर कोलकात्याला जाऊन डॉक्टर झाले. हेच माझे आजोबा डॉ. सिद्धनाथ कृष्ण काणे.
माझे आजोबा डॉ. सिद्धनाथ काणे म्हणजे एक देशभक्त. जबरदस्त व्यक्तिमत्व. १९३६ सालच्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची व्यायामपटूंची एक तुकडी गेली होती. त्याचं नेतृत्व डॉ. सिद्धनाथ काणे यांनी केलेलं होत. तिथे हिटलरसमोर ‘वंदे मातरम्’ हेच आमचं राष्ट्रगीत आहे तेच आम्ही म्हणणार, असं म्हणून स्वत:च्या बरोबर नेलेली वंदे मातरम्ची रेकॉर्ड वाजवली होती. त्यामुळे त्यांची देशभक्ती बघून हिटलर भारावून गेला. त्यांनी माझ्या आजोबांचा सत्कार केला. त्यांना एक ‘स्वस्तिक’ असलेलं मेडल दिलं. तर अशा या माझ्या आजोबांनी पणजोबांची जी बैठय़ा घराजवळची रिकामी जागा होती त्यावर हे मोठ्ठं घर बांधल तेच आमचं ‘सिद्धनाथ भवन.’
‘सिद्धनाथ भवन’ हे दुमजली पश्चिमाभिमुख घर. विटा, दगड चुन्यात हे घर बांधलं गेलेलं होतं. याच्या भिंती दीड फुटी मजबूत अशा होत्या. १९२३ साली माझे वडील डॉ. मधुसूदन काणे हे तीन महिन्यांचे होते तेव्हा या घराची वास्तुशांत झाली. या घरात माझे आजोबा आणि त्यांचे बंधू असं एकत्र कुटुंब राहायच तेव्हा प्रत्येकाला ९/१० मुलं होती त्यामुळे या घरात घरातलीच २२/२३ माणसं शिवाय गडी- माणसं मिळून सतत ३०/३२ माणसांचा राबता होता. या टोलेजंग हवेलीची उंची ४५ फूट, घराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबी ७० फूट आणि घराची पुढची बाजू ते पाठची बाजू अशी रुंदी होती ४५ फूट.
हमरस्त्यावर असणाऱ्या तीन पायऱ्या चढल्या की, कमानीचं प्रवेशद्वार होतं. याच्या दोन्ही बाजूला दोन लाकूड आणि लोखंडी नक्षीकाम केलेल्या जाळ्यांनी बंद केलेल्या कमानी होत्या. प्रवेशद्वाराला एक लोखंडी गजाचं दार होतं. ते रात्री बंद करण्यात यायचं. सुरुवातीला यायचा तो व्हरांडा. याच्या उजव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठीचा एक लाकडी जिना होता. व्हरांडय़ातून बैठकीच्या हॉलमध्ये जाण्याचं लाकडी दार हे ६।। फूट तरी उंच होतं. यावर एक गणपतीचा फोटो बैठक खोलीत होता. किमान १० मुलं बसू शकतील असा लाकडी झोपाळा होता. याच्या भिंतीवर शिवाजीमहाराजांचा फोटो, सरस्वती, श्रीकृष्ण यांची चित्रे जिग, टिकल्या, रेशमी कापड यांनी सजवून मग त्या फ्रेम्स केलेल्या होत्या. त्याही इथे हॉलमध्ये भिंतीवर लावलेल्या होत्या. या हॉलच्या पाठीमागे माजघर होतं, त्यात गाद्या, अंथरुणं, पांघरुणं, सतरंज्या यांच्या चळती ठेवलेल्या असायच्या. या माजघराच्या एका बाजूला बाळंतिणीची खोली, कोठीची खोली होती. हॉलमधून आणि माजघरातून प्रवेश करता यायचा, तो जेवणघरात. जेवणघर लांबट होतं. माजघराच्या पाठच्या बाजूला ओटी होती, तिला लागूनच पाण्याची खोली होती. इथे पिण्याच्या पाण्याचे उन्हाळ्याच्या दिवसात मातीचे रांजण, तांब्या पितळेच्या डेगी, कळशा, पिंप भरलेले असायचे. ओटीवर वापरासाठीचं पाणी लोखंडी हौदांमध्ये भरून ठेवलेलं असायचं. दर सहा महिन्यांनी या लोखंडी हौदांना रंगविण्यात यायचं की जेणेकरून ते गंजू नयेत. जेवणघराला लागूनच देवघर होतं. देवघरात देवांचं तांब्याचं कमळ होतं, तांब्याचीच गंगाजळी होती. पितळी टांगती समई होती. शिवाय चौरंगावर एक उंच पितळी समई तेवत असायची. देवघरातच एक लक्ष्मीकेशवाची दगडी किमान ३-३।। फुटी मूर्ती होती. स्वैपाकघरात वैलाच्या चुली होत्या. जातं, उखळं, खलबत्ता, पाटावरवंटा, रवी या गोष्टींची खास जागा होती. स्वैपाकघराला लागूनच न्हाणीघर होतं. न्हाणीघरात पितळी तपेल्या, पितळी घंगाळ असायचं. स्वैपाकघर आणि ओटीवरून अंगणात जाता यायचं. बैठकीच्या हॉलच्या डाव्या बाजूला दोन खोल्या होत्या. अगदी घराच्या एका टोकाकडची खोली षटकोनी होती. या दोन्ही खोल्यांना रस्त्यावर उघडणाऱ्या खिडक्या होत्या. जेवणघरालाही दोन रस्त्यावर उघडणाऱ्या खिडक्या होत्या. बैठकीच्या हॉलच्या दोन बाजूला खिडक्या होत्या. त्या व्हरांडय़ात उघडायच्या. जेवणघरातही एक झोपाळा होता.
घराला पाठीमागे अंगण होतं. अंगणाच्या एका टोकाला चार शौचकूप होते. अंगणात स्वैपाकघराला लागून ४० फूट खोल असलेली विहीर होती. विहिरीला रहाट आणि खिराडी दोन्हीही पाणी काढण्यासाठी होते. विहिरीच्या तोंडावर पाठच्या बाजूला एक छोटासा माळा होता. या माळ्यावर स्वयंपाकघरातून छोटं दार होतं. या माळ्यावर स्वयंपाकाची लाकडं रचलेली असायची. शिवाय विहिरीत पडलेल्या बादल्या काढण्यासाठीचा लोखंडी गळही ठेवलेला असायचा. अंगणात घोडय़ाचा तबेला, गायीचा गोठा होता. शेवगा, उंबर, रायफळ, चिंच, लिंबू ही झाडं आणि घंटी, कण्हेर, स्वस्तिक, जास्वंद ही फुलझाडं होती. कुंडय़ांमध्ये शेवंती, लीली, मोगरा, गुलाब ही झाडं लावलेली असायची. विहिरीच्या बाजूला अंगणात तुळशी वृंदावन होतं. माजघरातून वरती जाण्यासाठी आतला असा लाकडी जिना होता. स्वयंपाकघर, ओटी, न्हाणीघर, पाण्याची खोली यावरती साधीच नळीची कौलं होती. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी ती शाकारली जायची.
वरच्या मजल्यावर एकूण चार हॉल होते. दोन आडवे आणि दोन उभे हॉल होते. एका बाजूला त्रिकोणी अडगळीची खोली होती. आडव्या मधल्या हॉलला बाहेरच्या बाजूनी मोठी गॅलरी होती. याच्या बाजूच्या दोन्ही उभ्या हॉलला बाहेरच्या बाजूला सज्जे होते. या शिवाय वरती दोन गच्च्याही होत्या.
उन्हाळ्यात गच्चीत झोपायला मजा यायची. माडीवरच्या हॉलना लाकडी फॉल्स सिलिंग होतं आणि मंगलोरी कौलाचं छप्पर होतं. समोरच्या मोठय़ा गॅलरीत सांबराची शिंगं भिंतीवर लावलेली होती. खालची बैठकीची खोली, जेवणघर, वरचे चारही हॉल हे साधारण ३०० चौरस फुटांचे प्रशस्त असे होते. वरच्या माडीवरच्या मधल्या हॉलमध्ये बंदूक, तीन तलवारी, भाला, ढाल, गुप्ती ही शस्त्रे टांगलेली होती. शस्त्राची पूजा दसऱ्याला व्हायची. घरातल्या सर्व खोल्यांमध्ये खुंटय़ा, कोनाडे, भिंतीतली कपाटं होती. माडीवरच्या पाठच्या हॉलमध्ये आणि खाली माजघरात कपडे वाळत घालण्यासाठी बांबू लावलेले होते. घरामध्ये खोल्यांना फरशी नव्हती तर साधी जमीन होती. एकदिवसा आड सर्व खोल्या शेणांनी सारवल्या जायच्या. काळानुरूप पुढे माझ्या वडिलांनी, डॉ. मधुसूदन काणे यांनी पूर्ण घराला फरशी केली. असं हे १५ खोल्यांचं खूप मोठ्ठं घर माझे आजोबा आणि त्यांचे मोठे भाऊ यांच्यात वाटणी झाल्यावर माझ्या आजोबांचे झाले. माझे वडील डॉ. मधुसूदन काणे हे १९४७ साली बनारस हिंदू विद्यापीठातून डॉक्टर होऊन यवतमाळला आले. त्यांनी खालच्या मजल्यावरच्या टोकाच्या दोन खोल्यांमध्ये आपला दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच त्यांना एक सेवाभावी गरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळाला. माझ्या आजोबांच्या मित्रपरिवारात डॉ. हेडगेवार, डॉ. मुंजे, दादासाहेब खापर्डे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, लोकनायक बापूजी अणे हे होते. त्यामुळे त्यांचं जाणं-येणं आमच्या घरी असायचं. दस्तुरखुद्द सुभाषचंद्र बोस यांचे खासगी डॉक्टर असलेले आणि महात्मा गांघी, पं. नेहरूंच्या समकालीन राजकीय वर्तुळात असलेले व पुढे वऱ्हाड आणि मध्य प्रांताचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले नागपूरचे डॉ. ना. भा. खरे हे तर डॉ. सिद्धनाथ काण्यांचे व्याही म्हणजे माझ्या आईचे वडील, त्याचंही आमच्याकडे येणं व्हायचं. डॉ. मधुसूदन काणे यांचे म्हणजे माझ्या वडिलांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर देशमुख, जांबुवंतराव धोटे यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. ही मंडळीदेखील आमच्या घरी आलेली आहेत. अशा या चैतन्यपूर्ण घरात
सर्व सण साजरे व्हायचे. घराला लागूनच असलेल्या धुमालशाकीच्या सहभागी व्हायचो ते आमचं श्रद्धास्थान आहे.
सुहासिनी जोशी
लेखक संपर्क ०२२/२८३३२१६१