Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

‘अर्थ’पूर्ण मान्सून !
मान्सूनचा पाऊस देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतो. त्याचा प्रभाव शेती, उद्योग, शेअर बाजार आणि सरकारी योजनांचे-नियोजन सर्वावर पडतोच. अलीकडे अर्थकारणातील मान्सूनचा टक्का कमी होत असल्याचे बोलले जात आहे, पण ते अर्धसत्य आहे..
वायदे बाजारात मान्सूनबद्दल एक बातमी आली आणि लगेचच गवारीचे भाव तेजीत गेले. २८ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बातमी आली- ‘मान्सूनचे पुढे सरकणे आणखी चार-पाच दिवस लांबणार आहे’. वायदे बाजारात लगेचच त्याचा अर्थ लावला गेला. मान्सून लांबणार म्हणजे गवारीच्या उत्पादनासाठी प्रतिकूल परिस्थिती, म्हणजेच उत्पादन कमी आणि उत्पादन कमी म्हणजे दरात वाढ होणार. त्याची प्रतिक्रिया वायदे बाजारात उमटली
 

आणि या बातमीनंतर अवघ्या २५ मिनिटांमध्ये गवारीचे क्विंटलचे भाव ३८ रुपयांनी वाढले. याच कालावधीत एकटय़ा गवारीमध्ये झालेल्या व्यवहारात तब्बल सात कोटी रुपयांचा फायदा-तोटा झाला. प्रत्यक्ष उलाढाल तर काही शे-कोटी रुपयांच्या घरात गेली. हे एका दिवसापुरते मर्यादित नाही. या वर्षीचा मान्सून कसा असेल यानुसार वायदेबाजारातील गवारीचे दर प्रतिक्विंटलला १५०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान वर-खाली होऊ शकतात.
वस्तू, शेतीउत्पादने व इतर पदार्थाचे वायदे बाजारातील दर कमी-जास्त होणे यामध्ये अनेक योग्य-अयोग्य घटक कारणीभूत ठरतात. पण त्यापैकी मूलभूत घटकांचा विचार केला तर ‘मान्सूनचा पाऊस’ हा एक प्रमुख घटक ठरतो. मान्सूनचा अशा व्यवहारांवर आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होतो याचा अंदाज या उदाहरणावरून येतो. गवारीप्रमाणेच कापूस, सोयाबीन व इतर काही पिकांच्या दरांवरही मान्सूनचा थेट परिणाम होतो. तोच पुढे इतर प्रक्रियाकृत उत्पादने आणि वस्तूंवरही पाहायला मिळतो.
केवळ वायदे बाजारातच नाही तर वस्तूंच्या प्रत्यक्ष दरांवरही पावसाचा परिणाम होतो. कमी-जास्त पावसानुसार भाजीपाल्याचे, फळांचे, अन्नधान्यांचे बदलणारे भाव आपण सर्वच अनुभवतो. मान्सूनचा प्रभाव शेती, उद्योग, शेअर बाजार आणि सरकारी योजना-नियोजन या सर्वावर होत असतो.. मान्सूनचे प्रमाण चांगले असेल तर तो एकूणच ‘फील गुड फॅक्टर’ ठरतो, अन्यथा त्याच्या विपरीततेचा फटकाही बसतो. कारण त्याच्यावरच शेतीचे, संबंधित उद्योगांचे उत्पादन अवलंबून असते. आणि याचाच थेट परिणाम सामान्य जनतेची क्रयशक्ती वाढण्यावर किंवा ती कमी होण्यावर होतो. हीच क्रयशक्ती (म्हणजेच लोकांच्या हाती पैसा आल्याने त्यांची वस्तू खरेदी करण्याची वाढलेली शक्ती) एकूणच अर्थव्यवस्थेला चालना देते. या संपूर्ण चक्राची सुरुवात होते ती मान्सूनच्या म्हणजेच मोसमी पावसाच्या आगमनापासून! म्हणून तर मान्सूनचे केरळमधील आगमन आणि मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये पडणारा पाऊस हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ‘इव्हेंट’ ठरतात. त्यात काही कसूर झाला तर मान्सूनची कामगिरी खालावते, त्यानुसार अर्थव्यवस्थासुद्धा हेलावते.
मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर असा प्रभाव असणे स्वाभाविकच आहे. कारण देशातील कोरडवाहू शेती आजही मान्सूनच्या मर्जीवर अवलंबून आहे. इतकेच नाही, तर बागायती शेतीसाठी पाण्याची उपलब्धता किती असणार, तेही तोच ठरवतो. आपल्या राष्ट्रीय उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा सुमारे एक-चतुर्थाश इतका आहे. शेतीक्षेत्र २० टक्के उद्योगांना कच्चा माल पुरवते. याच शेतीच्या उत्पादनामुळे ग्रामीण भागात विविध उत्पादनांची मागणी वाढते. आजही देशातील ग्राहकोपयोगी वस्तूंची ४० टक्के विक्री ग्रामीण भागातच होते.
मान्सून हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या पावसाची वर्षे आणि कमी पावसाची वर्षे यांची तुलना केली हे महत्त्व अधोरेखित होते. निसर्गाशी सामना करायला माणूस कितीही सज्ज झाला असले, तरीही एकंदर अर्थकारणात मान्सून स्वत:चा टक्का आजही टिकवून आहे, हे स्पष्ट दिसून येते. अगदी अलीकडच्या १९८७ आणि २००२ च्या भीषण दुष्काळांनीही हेच दाखवून दिले आहे.
अर्थव्यवस्थेबरोबर राजकीय-सामाजिक स्थैर्यावरही मान्सूनने प्रभाव टाकल्याचे काही हजार वर्षांच्या इतिहासात पाहायला मिळाले आहे. ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मधुकर ढवळीकर यांनी यावर विस्तृत प्रकाश टाकला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, इसवी सन पूर्व ६०० ते इसवीसन ३०० या साधारणत: नऊशे वर्षांमध्ये भारतात समृद्धी होती. या काळात भारताचा रोमन साम्राज्याशी उत्तम व्यापार होता. महाराष्ट्रातही इसवी सनाच्या आसपासची सातवाहनांची राजवट याच कालखंडातील! नंतरच्या काळात मात्र अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याने ही भरभराट ओसरू लागली. परिणामी, नागरी वस्तींचे प्रमाण कमी होऊन ग्रामीण किंवा भटके जीवन वाढीस लागले. याबाबतचे पुरातत्वीय पुरावे देताना विविध ठिकाणच्या उत्खननात कोणत्या कालखंडात दर्जेदार वस्ती होती व कोणत्या काळात ती कमी दर्जाची होती, याचा दाखला त्यांनी दिला आहे. त्यानुसार, इसवी सन पूर्व ६०० ते ३०० या काळात भारतभर बहुतांश ठिकाणी भरभराटीचा काळ होता, असे दिसते. याउलट त्याच्या आधीच्या व नंतरच्या काळात तशी समृद्धी कमी प्रमाणात पाहायला मिळते. याच्या जोडीलाच डॉ. ढवळीकर यांनी परदेशी प्रवाशांच्या नोंदींचे दाखले दिले आहेत. त्यात इसवी सन ६२९ ते ४१ या काळात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्य़ुएन् त्संग याच्या नोंदीचा समावेश आहे. याशिवाय तत्कालीन वाङ्मयीन पुराव्यांमधील दुष्काळाच्या उल्लेखांवरूनही त्या काळची आर्थिक स्थिती समजते. दुष्काळांच्या काळात शेतीचे स्थिर जीवन बदलून भटके जीवन वाढीस लागल्याचे पुरावे म्हणजे- वीरगळ! या काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पशुपालनाचा व्यवसाय वाढीस लागला. त्यामुळे पशुधन ही प्रमुख संपत्ती बनली. विविध टोळ्यांकडून या धनाची चोरी होत असे. त्याचे रक्षण करताना अनेकजण मारले जात. त्यांची स्मृती म्हणून वीरगळ उभे केले गेले.
त्याच्याही पुढच्या काळात काही अपवाद वगळता सामान्य लोकांची परिस्थिती अतिशय हलाखीचीच होती. पुढे इसवी सन १३०० ते १८०० या कालखंडाला तर डॉ. ढवळीकर यांनी ‘दुष्काळपर्व’ असेच म्हटले आहे. त्या काळातील दीर्घ दुष्काळ (त्यापैकी काही दुर्गादेवीचे दुष्काळ म्हणून ओळखले जातात), अन्न-पाण्यावाचून झालेली लोकांची तडफड याबाबतचे तत्कालीन वाङ्मय व परकीय प्रवाशांच्या नोंदींमध्ये अतिरंजीत वाटावी अशी वर्णने आढळतात. त्यापैकी सतराव्या शतकातील दुष्काळाबाबत बादशहानाम्यातील वर्णन ढवळीकर यांनी दिले आहे, ‘लोक भाकरीच्या तुकडय़ासाठी स्वत:ला विकून घेत, पण विकत घ्यायला कोणीच नसे. ज्या हाताने लोकांनी मुठी भरभरून दाने दिली, तेच हात आता भीक मागण्यासाठी पसरले जात होते. कुत्र्याचे मांस विकले जात होते. त्यात माणसाच्या हाडाची भुकटी मिसळत. पुढे लोक एकमेकांना खाऊ लागले. बापसुद्धा मुलाला खाण्यास तयार झाला. रस्ते प्रेतांनी भरल्यामुळे त्यावर चालणे अशक्य झाले होते. अर्थात लोकांच्या अंगात चालण्याचेही त्राण उरले नव्हते. ज्यांना चालणे शक्य होते, त्यांनी आपली घरेदारे सोडली. कित्येक गावे उजाड झाली.’ अशी अनेक धक्कादायक वर्णने आढळतात.. तत्कालीन हवामानातील हे टोकदार चढ-उतार आणि त्यानुसार लोकांचे समृद्ध किंवा हलाखीचे जीवन या सर्वाचा थेट मान्सूनशीच संबंध असल्याचे डॉ. ढवळीकर यांनी दाखवून दिले आहे. त्या काळच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुपालनाचे स्थान अतिशय मोठे होते. परिणामी त्या काळचे जीवन प्रामुख्याने मान्सूनच्या लहरीवरच ठरत होते.
मान्सूनची ही लहर आजही प्रभावी ठरत आहे, पण काहीशा वेगळ्या रुपात. स्वातंत्र्यानंतरच्या काळात उद्योग क्षेत्राची वाढ आणि गेल्या दोन-तीन दशकांमध्ये सेवा क्षेत्राच्या वाढ यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात शेतीक्षेत्राचा वाटा आता २२ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे. तरीसुद्धा दुष्काळाच्या वेळेस शेतीचा (म्हणजेच अप्रत्यक्षपणे मान्सूनचा) प्रभाव तितकाच असल्याचे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात सर्वात भीषण दुष्काळ ठरलेल्या २००२ साली हे वास्तव प्रकर्षांने पाहायला मिळाले. त्या वर्षी भारतात सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस पडला. शेतीसाठी महत्त्वाच्या ठरणारा जुलै महिना तर पूर्णपणे कोरडाच गेला. गेल्या शतकातील १९१८ (७५ टक्के पाऊस) व १९८७ (८१ टक्के पाऊस) या दोन वर्षांचा अपवाद वगळता इतका कमी पाऊस तोपर्यंत झालेला नव्हता. २००२ सालच्या जून महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३२४४ अंशांवर होता. तो एकाच महिन्यात म्हणजे जुलैच्या अखेरीस २५७ अंशांनी घसरून २९८७ अंशांवर आला होता. ही घसरण केवळ मान्सूनच्या खराब कामगिरीमुळेच झाली होती, असे निरीक्षण अभ्यासक नोंदवतात. याउलट परिस्थिती या वर्षी पाहायला मिळाली.
जागतिक मंदीच्या सावटामुळे या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस निर्देशांक ९७०९ अंशांवर होता. त्या वेळी जागतिक मंदीबरोबरच भारतात निवडणुकांचे वातावरण होते. निवडणुकांनंतर राजकीय अस्थिरताच निर्माण होईल, असाच अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यामुळे या काळात निर्देशांक वाढण्याच्या दृष्टीने पूरक अशी परिस्थिती नव्हती. तरीसुद्धा एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजे एकाच महिन्यात तो सुमारे १७०० अंशांनी वाढून ११,४०३ अशांवर झेपावला. अभ्यासकांच्या मते याचे श्रेय मान्सूनच्या चांगल्या अंदाजालाच जाते. कारण दरम्यानच्या काळात १७ एप्रिल रोजी हवामान विभागातर्फे मान्सूनचा अंदाज जाहीर झाला. देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा हा अंदाज होता. त्यानेच शेअर बाजारात उत्साह भरला. पाऊस चांगला असेल, तर शेतकरी शेतीत गुंतवणूक करतो. आणि त्यामुळेच बी-बियाणे, खते-कीटकनाशके, शेतीसाठी लागणारी अवजारे, पंप, ट्रॅक्टर अशा गोष्टींची मागणी व खपही वाढतो. शेतीवर आधारित असलेले प्रक्रिया उद्योग व इतर उद्योग अधिक बहरतात. सुगीचा हंगाम चांगला असेल तर अनेकांना रोजगार मिळतो, शेतकऱ्याच्याही हाती पैसा येतो. परिणामी, बाजारातील इतर वस्तूंची विक्री वाढते. छोटय़ा-मोठय़ा वस्तूंपासून टीव्ही, फ्रीज, मोटारसायकल अशा वस्तूंची बाजारपेठ बहरते.. मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेतील ही उलाढाल अपेक्षित असल्याने शेअर बाजार पावसाच्या आगमनाला प्रतिसाद देतो, उगीचच नाही!
शेवटी पश्न उरतो, आपल्या अर्थव्यवस्थेतील मान्सूनचा टक्का घसरतो आहे का? देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील शेतीचा वाटा कमी झालेला असल्यामुळे वरवर पाहता तसे वाटेलही, पण ते अर्धसत्य आहे. याबाबत बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’च्या (आय.आय.एस्सी.) डॉ. सुलोचना गाडगीळ आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष अतिशय आश्चर्यकारक आहेत. त्यांनी १९५१ ते २००३ या काळातील पावसाचे प्रमाण, त्यातील चढ-उताराचा अन्नधान्य उत्पादनावर आणि देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) झालेला परिणाम याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले आहे की, मान्सूनचा पाऊस चांगला असताना त्याचा अन्नधान्य उत्पादन आणि देशाच्या जीडीपीवरील प्रभाव अलीकडच्या काळात कमी झाला आहे. विशेषत: १९८० नंतर ते प्रकर्षांने आढळले आहे. १९८० च्या आधीच्या काळात पाऊस सरासरीपेक्षा १५ टक्के कमी असल्यास शेती उत्पादनात सरासरी १० टक्के घट असायची, ती आताच्या काळात नऊ टक्के आहे. त्यात विशेष फरक झालेला नाही. पण पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त असताना होणाऱ्या उत्पादन वाढीमध्ये १९८० च्या आधीच्या आणि त्यानंतरच्या काळात बरीच तफावत झाल्याचे आढळते. पावसाचे सरासरी प्रमाण १५ टक्क्य़ांनी जास्त असल्यास पूर्वी शेतीचे उत्पादन सहा टक्क्य़ांनी वाढायचे. आता मात्र ही वाढ केवळ ०.७ टक्के इतकीच असते. म्हणजेच आता आपण चांगल्या पावसाचा फायदा करून घेण्यास असमर्थ ठरत आहोत. त्या दृष्टीने पावसाचा जीडीपीवर परिणाम कमी झाल्याचे म्हणता येईल, पण तो आपल्या नाकर्तेपणामुळे! दुष्काळी वर्षांत मात्र देशाचा जीडीपी दोन ते पाच टक्क्य़ांनी कमी होत असल्याचे पाहायला मिळते. ही स्थिती १९५१ पासून आजपर्यंत होती तशीच कायम आहे. त्यामुळेच मान्सून आजही अर्थव्यवस्थेतील आपले महत्त्वाचे स्थान व टक्कासुद्धा टिकवून आहे, हेच वस्तुस्थिती सांगते.
मान्सूनने भारताची संस्कृती, इतिहास व धर्मावर प्रभाव टाकला. याच मान्सूनच्या वाऱ्यांनी समुद्रावरून ढगांच्या माध्यमातून पाऊस तर आणलाच, शिवाय अनेक संस्कृती व धर्माना जलमार्गाने भारतात पोहेचण्यास मदतही केली. हेच वारे प्राचीन काळापासून व्यापारासाठी पूरक ठरले.. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था उभी केली. आपण कायम मान्सूनच्या ऋणात राहिले पाहिजे आणि त्याचा अधिकाधिक लाभ उठवला पाहिजे.
अभिजित घोरपडे
abhighorpade@rediffmail.com