Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

निशाणी डावा अंगठा
कादंबरीकडून सिनेमाकडे..
आजवर साहित्यकृतींवर अनेक मराठी चित्रपट बनले, परंतु त्यांचे प्रमाण एकूण चित्रपटांच्या पाच ते दहा टक्के एवढेच आहे. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, गदिमा यांच्यासारखे लेखक- कवी तर प्रत्यक्ष चित्रपटनिर्मितीतही सहभागी झाले होते. नंतरच्या काळात कथा-कादंबऱ्यांवरून चित्रपटांची निर्मिती विरळ होत गेली. खास चित्रपटांसाठी म्हणून स्वतंत्र कथा-पटकथा लिहिल्या जाऊ लागल्या. तरीही नाटय़-चळवळीतून चित्रपटाकडे वळलेल्या दिग्दर्शकांना कथा- कादंबऱ्यांनी नेहमीच आकर्षित केले आहे. ते त्यांचा मराठी साहित्याशी एक सुजाण वाचक म्हणून असलेल्या संबंधांमुळेच!
१९९६ साली मी उत्तम बंडू तुपे यांच्या ‘भस्म’ या कादंबरीवरून त्याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं. नंतरच्या काळात मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश मिळेनासे झाले. आर्थिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे माझ्यासारखे अनेक निर्माते-दिग्दर्शक (काही अपवाद वगळता) चित्रपटनिर्मिती करण्याबद्दल धास्तावून गेले.
 

दिग्दर्शक म्हणूनही मी गॅप घ्यायची ठरवली. ज्या पद्धतीचे चित्रपट ग्रामीण भागांत किंवा जत्रेत चालायचे तसे चित्रपट काढत राहणे आणि आपल्या नावावर चित्रपटांची संख्या वाढवत राहणे मला पटत नव्हते.
या गॅपमध्ये मी ‘मामी फेस्टिव्हल’, ‘एशियन फेस्टिव्हल’ पाहत होतो. दर शुक्रवारी सिनेमा पाहण्याचा जुना छंद सुरूच होता. त्याशिवाय परीक्षक म्हणूनही विविध स्पर्धाना हजेरी लावल्यामुळे आजवरचे सगळे मराठी चित्रपट पाहता आले. प्रत्यक्ष सिनेमा करीत नसलो तरी सर्व प्रकारचे सिनेमा पाहणे आणि दुसऱ्या बाजूला आजचे ताजे साहित्य वाचत राहणे- या दोन्ही गोष्टींमुळे मी जुन्या सिनेमांचा अभ्यासक आणि नवीन सिनेमांचा प्रेक्षक या नात्याने कायमच चित्रपटांशी संबंधित राहिलो.
२००५ साली ‘श्वास’ आला आणि मराठी चित्रपटांना नावीन्याचं वरदान मिळालं. नवीन विचार, ताज्या दमाचे दिग्दर्शक, धाडसी कथाविषय, चित्रपटविषयक जाणिवा असलेले निर्माते- दिग्दर्शक यांचं प्रमाण त्यामुळे वाढलं. दूरचित्रवाणी व्यवसाय फोफावल्यामुळे एक-दोन मालिकांमधून एकदम सिनेमा करायची संधी दिग्दर्शकांना मिळू लागली. वेडेवाकडे प्रयत्नही गाजू लागले. हे सर्व मी पाहत होतो. पुन्हा वेगळ्या, चाकोरीबाह्य कथा मराठी रसिक स्वीकारतोय, हे दिसत होतं. आता आपणही काहीतरी करायला पाहिजे, हा विचार बळावला आणि त्याचवेळी ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी वाचनात आली.
साक्षरता अभियान १९९७ ते २००० या तीन वर्षांत संपूर्ण भारतभर राबवले गेले. करोडो रुपयांचे हे अभियान निरक्षरांपर्यंत पोहोचले; पण कसे, याचा उपहासगर्भ, तिरकस लेखाजोखा विनोदी पद्धतीने या कादंबरीत मांडलेला आहे. बुलढाण्यातल्या एका खेडेगावातल्या प्राथमिक शिक्षकाने- रमेश इंगळे उत्रादकर या लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. या अभियानात एक शिक्षक म्हणून उघडय़ा डोळ्याने ते वावरले. त्यातला वेळेचा, पैशाचा अपव्यय त्यांच्या कविमनाला डाचला. त्यांच्यातला लेखक जागा झाला आणि कागदोपत्री १०० टक्के यशस्वी, पण प्रत्यक्षात बोजवारा उडालेल्या या अभियानावर त्यांनी लिहिलेली ही कादंबरी खूपच गाजली.
त्यावर चित्रपट करायचे ठरले. माझे मित्र महेंद्र तेरेदेसाईंनी या कादंबरीचे माझ्याकडे बरेच कौतुक केले. या कादंबरीवर एक मस्त चित्रपट होईल, असे सांगून त्याने, बरेच लोक या कादंबरीच्या मागावर आहेत, असा सावधगिरीचा इशाराही दिला.
मीही मग ही कादंबरी वाचून काढली आणि वेळ न दवडता ताबडतोब बुलढाण्यात असलेल्या रमेश इंगळे उत्रादकरांना फोन लावला. वाचक म्हणून कादंबरीचे तोंडभरून कौतुक केले आणि चित्रपटासाठी हक्क मागितले. तुम्हाला ते देण्यात इंटरेस्ट आहे का, विचारले. मला कशा पद्धतीचा सिनेमा करायचा आहे, हे त्यांना सांगितले. मी जे वर्णन केले त्यावर ते खूपच समाधानी आणि उत्तेजित वाटले. त्यांनी माझा उत्साह बघून होकार दिला आणि ‘अष्टविनायक चित्र’च्या दिलीप जाधव यांना मी चित्रपटनिर्मितीसाठी हक्क घ्यायला लावले.
‘टूरटूर’ नाटकापासून (१९८३ पासून) दिलीप जाधव हे माझ्याबरोबर आहेत. कधी माझ्या नाटकाचे व्यवस्थापक म्हणून, तर अलीकडे ‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची आई’ या नाटकांचे निर्माते म्हणून. माझ्यावरच्या विश्वासामुळे त्यांनी कादंबरीचे चित्रपटासाठी हक्क घेतले. आणि सुहास जोशी व विक्रम जोशी यांच्यासोबत दिलीप जाधव यांनी अष्टविनायक चित्रतर्फे चित्रपटनिर्मिती प्रक्रिया सुरू केली.
दिग्दर्शक म्हणून या कादंबरीची पटकथा व्यवस्थित होणं ही माझी पहिली जबाबदारी होती. आजवर मी जे सात चित्रपट केले त्यांच्या पटकथा माझ्याच होत्या. परंतु या कादंबरीचा पसारा, आवाका, लेखनशैली बघता या पटकथेकडे त्रयस्थपणे बघता यायला हवं, असं मला वाटलं. मीच पटकथा लिहिली असती तर हा त्रयस्थपणा संपला असता. त्यावेळी ‘कायद्याचं बोला’ आणि ‘कदाचित’ हे चित्रपट गाजून गेले होते. अजित दळवी आणि प्रशांत दळवी हे नाटककार- पटकथाकार या चित्रपटांचे लेखक होते. त्यांच्या नाटकांतून आणि चित्रपटांतून मला नेहमीच एक वाङ्मयीन, साहित्यिक दृष्टिकोन दिसत आलेला आहे. शिवाय मराठवाडय़ातले असल्यामुळे (विदर्भाच्या जवळ) या चित्रपटाची पटकथा त्यांनीच लिहावी असं वाटलं. त्या दोघांनी कादंबरी वाचली होतीच. त्यांनी ताबडतोब होकार कळवला.
फेब्रुवारी २००८ पासून या सर्व गोष्टींना वेग आला. एप्रिल-मेच्या रणरणत्या उन्हातच शूटिंग करणं आवश्यक होतं. बुलढाण्यातला- म्हणजे विदर्भातला रणरणता उन्हाळा, दुष्काळी प्रदेशातली वणवण, करपलेल्या मनांचा अभियान यशस्वी करण्यासाठीचा आटापिटा- या सगळ्या गोष्टी पडद्यावर जिवंत करायच्या होत्या. एप्रिल-मे सरला असता तर पुढे पावसाळा होता. ‘हिरवळ’ किंवा ‘हिरवा रंग’ या कथावस्तूला मारक ठरला असता. निसर्गाने अवकृपा केलेल्या या प्रदेशाचे चित्रण पडद्यावर ‘सुखद’ न वाटता ‘ड्राय’ (सुके) वाटले पाहिजे. सिनेमाचा रंग ‘पिवळा’ (यलो ऑकर) हवा, हा अट्टहास. म्हणूनच एप्रिल-मेचा चटके देणारा उन्हाळा हवा. अजित दळवी- प्रशांत दळवींकडे फक्त दोनच महिने होते. इतक्या कमी वेळात कादंबरीला न्याय देणारी पटकथा लिहिणे ही कठीण परीक्षा होती. पण त्यांनी आव्हान स्वीकारले ते ‘पिवळ्या’ रंगासाठी.. ‘ड्रायनेस’साठी. कादंबरीचे व्यवस्थित संकलन करून पटकथा तयार करणे सोपे नव्हते. कादंबरीत भरमसाट पात्रे.. भरपूर गावे, शेकडो शाळा. त्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा इरसाल आणि जिवंत. हे एवढं सगळं एका सिनेमात अडीच तासांत उभं करायचं! शिवाय ‘संवाद’ ही कादंबरीची सर्वात उजवी बाजू. तिचा ‘स्वाद’ तसाच ठेवायचा. दिग्दर्शक म्हणून सर्व बाजूंनी माझ्यावर जबाबदारीचं ओझं होतं.
दळवी बंधूंनी या सर्व गोष्टी अभ्यासून पटकथा-संवादांसह संहिता सिद्ध केली. माझी जबाबदारी आणखीनच वाढली. चटपटीत संवादांची ही संहिता ‘बोलपट’ होण्याची शक्यता होती. दळवींनी चित्रपटीय भाषेत काही नवीन गोष्टी त्यात जमवल्या होत्या. परंतु चित्रीकरणासाठी त्या विचारपूर्वक सादर होणं आवश्यक होतं.
हा अतिशय वेगळा असा आविष्कार पडद्यावर साकार करण्यासाठी कलावंतही तेवढेच ताकदीचे हवेत, हेही पटकथेइतकेच महत्त्वाचे होते. पटकथा लिहून होईपर्यंत आमच्या चर्चेनुसार मी अजित व प्रशांतला पात्रयोजना सांगितली. अशोक सराफ, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, विनय आपटेपासून ते भारत गणेशपुरेपर्यंत.
या कादंबरीवरून चित्रपट तयार करताना त्यात ‘संगीत’ असणं, हा विचार धाडसाचाच होता. परंतु कादंबरीकाराने जसे या रुक्ष विषयाला उपरोधिक विनोदाने नटवले होते तसे मला हा चित्रपट मनोरंजक होणे आवश्यक आहे असे वाटले. अनेक गोष्टी संगीताच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून येणे आवश्यक वाटले. डॉ. सलील कुलकर्णी या आजच्या संगीतकाराने आणि कवी संदीप खरे यांनी कादंबरी वाचून त्याची नस बरोबर पकडली आणि त्यात वेगळाच संगीतसाज चढवला.
अशोक सराफांनी मेमधल्या तारखा अ‍ॅडजेस्ट केल्या. निर्मिती सावंतने नाटकाचा दौरा पुढे ढकलला. दिलीप प्रभावळकर दक्षिणेतून शूटिंगला येत होते. डॉ. मोहन आगाशे अमेरिकेहून आले. तर विनय आपटेचा अमेरिका दौरा पुढे ढकलला. मकरंद अनासपुरे इतर मराठी चित्रपटांच्या तारखांमधून सर्वाना ‘अ‍ॅडजेस्ट’ करीत होता. समीर आठल्ये रणरणत्या उन्हाचं ‘पिवळेपण’ जपत होता. अरुण रहाणेने साताऱ्यामध्ये ‘बुलढाणा’ उभं केलं. अस्मिता नार्वेकरने कपडय़ांमध्ये ग्रामीण साधेपणा ठेवला. राजेश रावचं वेगवान संकलन सिनेमाचं शक्तिस्थान ठरलं. सर्वात महत्त्वाचं- सुहास जोशी आणि विक्रम जोशी यांनी या वेगळ्या विषयात पैसा गुंतवला आणि दिलीप जाधव यांच्या निपुण ‘प्लानिंग’मुळे चित्रपट वेळेत पूर्ण झाला.
नुकताच तो सर्वत्र प्रकाशित झाला आहे. आज सर्वच स्तरांतून हा चित्रपट पाहून मला फोन येताहेत. प्रेक्षक चित्रपट आवडल्याचे आवर्जून सांगताहेत. चित्रपटाला रसिकांची गर्दी वाढत आहे. पुढच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राने कादंबरीइतकाच हा चित्रपट डोक्यावर घेतला तर आश्चर्य वाटणार नाही, इतका मराठी रसिकांवर माझा विश्वास आहे.
पुरुषोत्तम बेर्डे