Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

विलासराव आणि वैशालीताई टॅक्सीतून रेल्वेस्टेशनवर उतरतात. हातात बॅग घेऊन प्लॅटफॉर्मच्या दिशेनं चालू लागतात.
वैशालीताई- काय हो? तुम्ही एवढे दिल्लीला चालला आहात मंत्री होऊन आणि तुम्हाला निरोप द्यायला एकही कार्यकर्ता नाही?
विलासराव- अगं, सगळे कार्यकर्ते थकून गेले आहेत प्रचार करून. आराम करत असतील. (तेवढय़ात ‘सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, प्रियंका आगे बढो’ अशा घोषणा ऐकू येतात.)
वैशालीताई- आले वाटतं कार्यकर्ते! बरं झालं बाई, नाही तर उद्या पेपरमध्ये छापून आलं असतं- ‘विलासराव गेले दिल्लीला, कळलं नाही कुण्णाला!’
 

विलासराव- हे काय भलतंच!
वैशालीताई- हो! अहो, हल्ली वृत्तपत्रांच्या बातम्यांची शीर्षकं अशीच असतात.. यमकं जोडलेली!
विलासराव- यमकं? यमकं म्हणजे?
वैशालीताई- तुम्हाला नाही कळायचं ते. तुम्ही आधी आपले कार्यकर्ते शोधा. आत्ता आवाज आला होता त्यांचा..
विलासराव- (इकडे तिकडे पाहत) दिसत नाहीत कुठं. आणखी कुणाला निरोप द्यायला आले असतील..
वैशालीताई- आणखी कुणाचे कार्यकर्ते कसे थकले नाहीत प्रचार करून? तुमचेच बरे थकले?
विलासराव- आता राहू दे.. किती कीस काढणार एखाद्या गोष्टीचा?
वैशालीताई- बघा बघा.. वयाची पासष्टी झाली तरी उपमा मात्र बरोबर किसचीच सुचते ह्यांना..
विलासराव- अगं, हा कीस म्हणजे काही तो किस नव्हे.. बटाटय़ांचा, रताळ्यांचा असतो तसा कीस..
वैशालीताई- बरं तर बरं.. आधी कार्यकर्ते कुठं आहेत ते शोधा.. कुणी निरोप द्यायला आलं नाही म्हणजे कसं हकालपट्टी झाल्यासारखं वाटतं.. राज्यातून!
विलासराव- तुझं आपलं उगाचच काहीतरी. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि तुला ते हकालपट्टीसारखं वाटतं?
वैशालीताई- मग? कधी कधी पनिशमेंट म्हणून दूरच्या गावी बदली करतात ना, तसं वाटलं मला हे! तुमचे कार्यकर्ते शोधा आधी कुठंय ते!
विलालराव- तू या बॅगांवर लक्ष ठेव, मी शोधून आणतो त्यांना.

(नारायणराव आणि त्यांचे दोन सुपुत्रही स्टेशनवर आले आहेत. एका सुपुत्राच्या हातात टेपरेकॉर्डर आहे. एकाच्या हातात बॅग.)
नारायणराव- (नीलेशला) दिल्लीत नीट राहा. दिवसातून राहुलला किमान एकदा तरी गुड मॉर्निगचा मेसेज पाठवत जा..
नीलेश- बाबा, अहो गुड मॉर्निगचा मेसेज फक्त सकाळीच पाठवायचा असतो!
नारायणराव- (नीलेशकडे कौतुकानं पाहत) असा फायदा होतो बघ इंग्रजी शिकल्याचा. आमचं ते राहूनच गेलं. (नितेशकडे पाहत) हा डबडा कशाला आणलास सोबत?
नीलेश- डबडा? हा टेपरेकॉर्डर आहे!
नारायणराव- दिवसभर कानात बोंडं खुपसून गाणी एकतोस ना? मग आता इथं तरी जरा वेळ शांत राहा. दादाला नीट बाय कर! (नीलेश आणि नितेश एकमेकांकडे पाहून अर्थपूर्ण हसतात..)
नीलेश : बाबा, तुम्हाला एक गंमत दाखवतो, या इकडे!
नितेश : ते बघा, तिकडे कोण दिसतं?
नारायणराव- (निरखून बघत) अरे! विलासराव आणि वहिनी? दिल्लीला चालले वाटतं हे पण!
नितेश - आता गंमत बघा..
(नितेश त्याच्या हातातल्या टेपरेकॉर्डरचं बटन दाबतो. त्यातून आवाज येतो- सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, प्रियंका आगे बढो!)
नीलेश- बाबा, आता चटकन या बोगीच्या दारामागे लपा आणि गंमत बघा.
(तिघेही लपतात. विलासराव कावरेबावरे होऊन इकडेतिकडे पाहू लागतात. मग विलासराव आणि वैशालीताई दोघांमध्ये संवाद होतो. जरा वेळानं विलासराव निघतात, वैशालीताई बॅगांजवळ थांबतात, नारायणराव आणि त्यांचे दोन सुपुत्र एकमेकांना टाळ्या देतात!)
नारायणराव- शोधायला निघाले वाटतं कार्यकर्त्यांना.. नितुल्या, कसं काय सुचतं रे तुला हे?
(दोन्ही मुलं नारायणरावांकडे हस-या चेहऱ्यानं पाहतात)

विलासरावांना अखेपर्यंत कार्यकर्ते सापडतच नाहीत. नारायणराव आणि नितेश निरोपाचे हात हलवून नीलेशला टाटा करून निघतात. गाडी निघून जाते! अशोक चव्हाण एका खांबाआडून बाहेर येतात. त्यांच्या हातात एक कागद असतो. त्यावर विलासराव आणि नारायणरावांची नावे असतात. अशोकराव सफारीच्या खिशाचे पेन काढून विलासरावांच्या नावापुढं फुली मारतात.
अशोकराव (स्वत:शीच)- एक तो दिल्ली चला गया, अब एकही बचा है!