Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

गोष्ट - कारण
‘‘बाहेर किती अंधारून आलंय- पाहिलंस?’’
नयनाच्या स्वरात भीती होती.
‘‘मी काय म्हणतेय जान्हवी! आतासे साडेतीन वाजलेत. संध्याकाळ झाल्यासारखी वाटतेय..’’ नयनानं जान्हवीला पुन्हा गदागदा हलवलं. जान्हवी कॉम्प्युटरमध्ये डोकं खुपसून बसली होती. ती म्हणाली, ‘‘मघाशी तो कुकरेजा सांगत होता. २४ तास धुवाँधार पाऊस कोसळेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.’’
‘‘२४ नाही, ४८ तास..’’ नयनानं लगेच दुरुस्ती केली.
‘‘तेच ते.’’
‘‘तेच ते काय? लवकर निघू या. लक्षात आहे ना, मी आज आईकडे जाणार आहे- चेंबूरला.’’ नयना म्हणाली.
‘‘बाप रे! म्हणजे मी एकटीच?’’ आता जान्हवीनं मनावर घेतलं. ‘‘मी पॅकअप् करते लगेचच.’’
तिनं झरझर फाइल्स रॅकमध्ये टाकल्या. पीसी ऑफ केला. स्वत:ची समजूत घातल्यासारखी ती म्हणाली, ‘‘अगं, अजून पाऊस सुरू व्हायला, मग पाणी साठायला, त्यानंतर गाडय़ा बंद पडायला पुष्कळ अवकाश आहे, नाही का? तोपर्यंत मी पोचेन कल्याणला.’’
निघताना तिनं घरी फोन लावला. सासूबाईंनी पावसाचंच वर्णन सुरू केलं.. ‘‘अगं, मुसळधार म्हणजे खरंच मुसळाएवढी धार आहे. तासभर झाला- अखंड पडतोय. सौरभला क्लासला
 

पाठवणार नाहीए मी. सिद्धीची शाळा मधल्या सुट्टीतच सोडून दिलीय. तूही लवकर निघ. काळजी वाटते गं..’’
फोन ठेवल्यावर तिनं नयनाला म्हटलं, ‘‘नयना, कल्याणमध्ये पाऊस खूप कोसळतोय. इथपर्यंत यायला त्याला वेळ लागायचा नाही. फास्ट गाडीनं येईल तो!’’
ती असं म्हणतेय तोवर बाहेरचे व्हेंटिलेटर्स थाडथाड आपटले. कॉरिडॉरसमोरची अशोकाची फांदी मोडून पडल्यासारखी वाकली, पुन्हा वाऱ्याच्या रेटय़ानं उठली आणि तडतड ताशा वाजवत पाऊस आला.. नि त्याबरोबर बरेच दिवस कोरडे गेल्याने मातीचा जीव वेडावणारा गंधही.
‘‘आता भिजून जाणार आपण. तू म्हणत होतीस तेच बरोबर. आधीच निघायला हवं होतं, नाही?’’ जान्हवी पुटपुटली.
‘‘अगं, आधीच निघालो असतो तरी स्टेशनवर जाईपर्यंत गाठलंच असतं की पावसानं!’’ नयनानं समजावलं.
गेटपाशी चोरडिया भेटला.
‘‘जल्दी निकलो! कुर्ला में पानी भर रहा है।’’
‘‘अय्या! मी चेंबूरला कशी जाऊ?’’ नयना चिंतातुर.
‘‘तू मग माझ्याबरोबर कल्याणला चल.. नेहमीसारखी.’’ जान्हवी हसून म्हणाली.
‘‘थट्टा सुचतेय. पावसाचा आवेश बघ.’’
पावसाचा आवेश होताच. सौरभ, सिद्धी घरी सुखरूप आहेत, या जाणिवेनं थोडं बळ येतंय.
चौकापाशी दोघींचे रस्ते वेगळे झाले. ती बसनं जाणार होती.
जान्हवीची पावलं भराभर पडू लागली. स्टेशन जवळ येऊ लागलं तसं तिला जाणवलं, या घनघोर पावसात आपण एकटय़ाच निघालोय. स्टेशनवर तर ही गर्दी उसळलेली. गाडीत चढायला, पाय ठेवायलासुद्धा जागा नाही, अशी गाडी भरून आलेली. उलट प्रवास करून सी.एस.टी.ला जावं, हे उत्तम. ती जिना चढून गाडी व्ही. टी.ला जाते त्या प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. आभाळातून खळाखळा ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता. जणू प्लॅटफॉर्मएवढाच एकूण जगाचा व्यास आहे. या गोल, अर्धवट झाकण असलेल्या डब्यावर पाऊस कोसळतोय, किंवा हा डबाच पावसाच्या समुद्रात तरंगतोय. अक्राळविक्राळ दैत्य असावा तसा हा पाऊस. भीतीची लहर मनावर पसरली. ‘त्या’ ऐतिहासिक २६ जुलैची आठवण येतेय. खूप व्याकूळ व्हायला होतंय. नयनाही आज बरोबर नाहीए. खचाखच भरून दोन ट्रेन्स खाली जाणाऱ्या गेल्या. व्ही. टी.ला जाणारी गाडी येत नाहीए. आपण तिकडे उभं राहिलो की अपट्रेन लागोपाठ येतील! आपण ‘अप’ला जायचं ठरवलं की ‘डाऊन’ ट्रेनचा मारा. हे नेहमीचंच. असा पाऊसही नेहमीचाच. पण आज मन फारच हुरहुरतंय. तिनं पर्समधून मोबाईल काढून त्याला फोन लावला.
‘‘पाऊस पडतोय खूप.’’
‘‘म्हणजे? पडतोच आहे. मग?’’
‘‘मग काय?’’ तिचा स्वर रडवेला.
‘‘अगं, बोल. पाऊस पडतोय, हे सांगायला फोन केलास का?’’
‘‘हो!’’
‘‘च्! कमाल करतेस! निघ मग लवकर.’’
तो कामात व्यस्त होता. तिचा व्याकूळ स्वर त्याला समजला नाही.
‘‘निघालेच आहे रे.’’
‘‘मग, आणखी काय आता?’’
‘‘अरे, गाडीला हीऽऽ गर्दी. मी व्ही. टी.ला अप जाईन, असं ठरवलंय तर गाडीच नाही. पंधरा मिनिटं झाली..’’
‘‘तू ना, कमाल बाई आहेस. यू मीन- पंधरा मिनिटं थांबून कंटाळा आलाय म्हणून फोन करतेस? ठेव आता. मोबाईलची नंतर खरी गरज लागेल.’’
‘‘अरे, आताही खरी गरज म्हणूनच करतेय फोन. मघाचं मळभ आता माझ्या मनात दाटलंय. हुंदका फुटेल असं वाटतंय. मला भीती वाटतेय रे! तू येतोस का व्ही. टी. स्टेशनवर?’’ तिनं निकरानं विचारलं.
‘‘अगं बाई, माझे आई! मी नरिमन पॉइंटला आहे. अजून माझं काम संपलेलं नाही. ते संपल्यावर मी निघणार, व्ही. टी.ला पोचणार.. तोपर्यंत तू ‘ठाणा’ क्रॉस करशील! तुझी ती नयना की फैना आज नाहीये का?’’ त्याने ठणठणीत आवाजात विचारलं.
‘‘नाहीये.’’
‘‘नसू दे. निघालीयेस ना? पकड एखादी ट्रेन. स्लो मिळाली तरी चालेल. घराच्या दिशेने प्रवास सुरू कर. मुलं वाट बघत असतील. ठेव आता फोन. मला कामं आहेत. तुमच्यासारखे काही पळालेत- कामं टाकून..’’
एवढं बोलेपर्यंत एक ट्रेन आली होती- व्ही. टी.ला जाणारी. ती त्यात बसली. आता व्ही. टी.ला गेल्यावर लागेल ती लागेल. ती गाडी जाहीर झाली- कल्याण स्लो लोकल. स्टॉपिंग अ‍ॅट ऑल दि स्टेशन्स. असू दे-स्लो तर स्लो. थोडा उशीर होईल.
तिनं घरी फोन केला.. ‘‘काळजी करू नका. मी ट्रेनमध्ये आहे. नंतर मोबाईलची रेंज कदाचित मिळणार नाही.’’
‘‘सावकाश ये घरी. वाटेत गाडी थांबली तर ट्रॅकवर उडय़ाबिडय़ा मारायच्या नाहीत बरं. आणि स्वयंपाकाची चिंता नको. खिचडी साधीशी करणार आहे मी..’’
डोळे मिटल्यावर तिला जाणवलं- पापण्या एकमेकींशी युद्ध केल्यासारख्या मिटायला तयार नाहीत. मनाची ही पोकळी भरून काढायला फक्त तो जवळ असायला हवा होता. अगदी धावत येऊन भेटला नसता तरी मनातला गडद अंधार निदान त्याला समजायला हवा होता. नुसता लांबून धीर दिला असता तरी जवळ असल्यासारखं वाटलं असतं.
पण नाही! नुसता पाऊस पडतोय, हे सांगायला मी फोन केला, असं ठरवून त्यानं वासलात लावली. २६ जुलै २००५ नंतर तीन पावसाळे झाले. थोडंबहुत पाणीही साठलं. मी त्याला काकुळतीला येऊन विनवलं नाही. पण आज काहीतरी हुरहुरत असेल, असं त्याला का वाटलं नाही? विचारावं तरी! छे! तो स्वत:मध्येच मग्न. घरी मुलं आहेत, म्हणाला. वाट बघत असतील. असतीलच. पण त्यांना आजीची सोबत आहे. मला हवी होती रे आज सोबत.. फक्त तुझी. या धुवाँधार पावसाच्या पडद्यात शिरून मन खूप मागे गेलं. बारा वर्षे ओलांडून मागे गेलं. असाच पाऊस कोसळत होता. मी लोअर परळला होते तेव्हा. तू आता आहेस तिथेच होतास- नरिमन पॉइंटला. मोबाइल नव्हतेच कुणाकडे. पण ऑफिसमध्ये लंच टाइमलाच फोन केलास. मला भेटायचं ठरवून टाकलंस. म्हणालास, पावसात गोंधळ होतो गाडय़ांचा. एकत्र जाऊ या.
त्या दिवशी कोणाच्याही नजरांची पर्वा न करता ती त्याच्यासोबत ‘जेन्टस्’ डब्यात चढली. काही कुतूहलमिश्रित कौतुकाने त्या नवपरिणित जोडीकडे बघत होते, तर कित्येकजण असूयेनंदेखील. पण हे सगळं सुखच वाटत होतं तिला. पूर्ण प्रवास सुखानं भिजला होता. स्टेशनवरून उतरल्यावर रिक्षावाले अफाट पैसे मागत होते, पण आज तो उदार होता. रिक्षावाल्याशी त्याने जराही हुज्जत घातली नाही. वाटेत रिक्षा बंद पडली. तिथं गजरेवाला होता. गजरा घेण्यासाठीच बंद पडली, असा अर्थ त्याने लावला. रिक्षा चालू होईपर्यंत जान्हवीने गजरे माळले आणि तो धुंदावला. जगातलं सगळं सुख आज त्या दोघांच्या पायाशी लोळण घेत होतं. तो दिवस मी मनाच्या कुपीत जतन करून ठेवलाय.. कोरून ठेवलाय. अलीकडेच झालेला २६ जुलैचा पाऊस मनावर ओरखडा उमटवून गेलाय.
कोणीतरी दानशूरानं खिलवलेले बटाटेवडे खाऊन पोट भरलं आणि निवाऱ्याला संकटग्रस्त लोकांसाठी उघडलेल्या सेवा केंद्रात जागा मिळाली. चक्क झोपायला गादी दिली. बदलायला कपडे दिले. नयना सोबतीला होती म्हणून सारं सुसह्य़ झालं. त्याही प्रसंगी आठवतंय- नयना म्हणाली, ‘‘किती भली माणसं आहेत- नाही! राहायला निवारा. चक्क बदलायला मॅक्सी दिलीय. ही बघ- ही कॉटनची आहे. तुला पॉलिस्टर चालत नाही ना? ही त्यातल्या त्यात वाटतेय कॉटनची !’’
तिच्या डोळ्यांत पाणी आलं तेव्हा. इतका वेळ बधीर होऊन पाण्यात चालत असलेली, सिद्धी-सौरभच्या आठवणीने बेजार झालेली, मोबाईलची रेंज मिळत नाही म्हणून हैराण असलेली, बिनदिक्कत कुठलाही वडा पोटात ढकलणारी ती- नयनानं असं आवर्जून म्हटल्यावर रडूच लागली एकदम. नयना तिच्यापेक्षा बरीच ज्युनियर. केवळ एका ऑफिसमध्ये काम करतो, म्हणून झालेली मैत्री! पण आज ती आई किंवा ताई झाली होती तिची!
हे सगळं तिनं घरी गेल्यावर खूप कौतुकानं सांगितलं. सासूबाईंनी भोपळ्याचे घारगे केले की आता त्या स्वत:हून नयनाला आवडतात म्हणून वेगळे देतात तिच्यासाठी! व्यक्त करण्याची त्यांची पद्धत. आणि हा तिला नयना की फैना म्हणतोय!
मनात ती सुगंधी आठवण आणि २६ जुलैची आठवण यांची सरमिसळ झाली. त्यात नयनाची सोबत नाही. इतकं अस्वस्थ वाटून गेलं.
मोबाईलच्या आवाजानं ती दचकली.
‘‘कुठे आहेस?’’ त्याचा आवाज.
कुठे आहोत आपण? गाडी चालतेय की थांबलेय? कोणतं स्टेशन गेलंय? नेमकं तेव्हा गाडीतनं ‘स्पीकर’वरून सांगितलं गेलं- ‘कुर्ला! अगला स्टेशन कुर्ला.’
ती सावरून म्हणाली, ‘‘कुर्ला येईल आता.’’ कुर्ला आलंच तेवढय़ात. मग रेंज गेली. हा कुठे आहे आता? निघाला असेल का? तिनं घडय़ाळात पाहिलं. चक्क सहा वाजले होते. म्हणजे कुल्र्यापर्यंत गाडीने पाऊण तास घेतलाय. खडबडून जाग आल्यासारखी ती उठली आणि तिनं समोरचीला बसायला दिलं. तिच्याकडून कळलं- गाडी दादपर्यंत ठीक चालली होती, पण सायनला अर्धा तास थांबली. आता नीट जाईल. गाडय़ा व्यवस्थित सुरू आहेत. मग तिनं त्याला फोन करून रूक्ष आवाजात विचारलं, ‘‘तू कोठे आहेस?’’
‘‘व्ही.टी.ला. आता सुटेलच गाडी. फास्ट ट्रेन मिळालीय.’’
बस्स्! याहून काही बोलायचं नव्हतंच तिला.
मग नयनाला तिनं फोन लावला. नयना चेंबूरला आईच्या घरी पोचली होती. तिनं सांगितलं, ‘‘अगं, सायनजवळ ड्रेन पाइपचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तो आता सॉल्व्ह झालाय. आता पोचशील व्यवस्थित.’’
घाटकोपर स्टेशनवरून गाडी हलली तेव्हा कर्णकटू आवाजानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. एका इमारतीला लागून घातलेला मांडव पुरा भिजला होता. मोडल्यासारखा वाटत होता. पण पार्किंगच्या जागेत बँडवाले ‘शो मस्ट गो ऑन’च्या नियमानुसार जीव काढून वाजवत होते. डंबटकर.. डंबटकर अशा टिपिकल आवाजात धूमधडाका चालू होता.
एवढय़ा पावसात बिचाऱ्यांना लग्न उरकावं लागतंय. मुळात हे धूमधाम करून लग्न करायचं कशाला? दोघांनी एकत्र राहण्याचा एवढा डंका कशाला? अर्थात् हे लग्नानंतर बारा वर्षांनी सुचलेलं शहाणपण. जन्मभराच्या सोबतीसाठी हे लग्न! हवी तेव्हा सोबत मिळतेय कुठे? मग लग्न तरी कशाला करायचं? हेही उशिरा सुचलेलं शहाणपण. बसायला मिळाल्यानं इतका वेळ उभी असलेली ती कुणी परकी सुखावली होती. असावा म्हणून जवळ ठेवलेला बिस्किटाचा पुडा तिनं काढला. जान्हवीला बिस्किटं देऊ केली. या देवाणघेवाणीचं जान्हवीला हसू येऊ लागलं. अशावेळी नयना बरोबर असली की नुसतं ‘डोळ्यांनी’ हसता येतं. काहीही न बोलता नुसता कटाक्षानं कळतं. हे असले प्रसंग तर गाडीमध्ये नेहमीचेच.. शाळेत असताना कॅडबरीच्या चांदीच्या बदल्यात मिळणारे रंगीत मणी जागवणारे.
हे त्याला सांगितलं तर म्हणेल, ‘‘तू म्हणजे ना, कुठून कुठे पोचतेस!’’
आणि तू? तू तर कुठून कुठे पोचला आहेस. ‘मी येतो राणी’ म्हणायच्या ऐवजी ‘अगं बाई- माझे आई’पर्यंत पोचला आहेस! माझी भीतीची लहर, तुला भेटण्याची ऊर्मी तुझ्यापर्यंत न पोचण्याइतका दूर गेला आहेस. सगळीच नाती अशी निबर का होत जातात? सवयीनं? की वाढ होते हा निसर्गाचा नियम म्हणून? कोवळं पान वाऱ्याबरोबर डुलतं. मग पिवळं होतं. निबर होतं.. नि पार सुकून मातीत जातं. एवढं सहज घडतं हे सारं?
तिनं खिडकीतून पाहिलं. पावसाची धार जरा बारीक होती, पण नेटानं तो पडतच होता.
स्टेशनवर पाय ठेवताच ती रिक्षाच्या रांगेकडे तडक चालू लागली. ती घरी पोचली तेव्हा मुलं गॅलरीत वाट बघत होती.
तिला पाहताच सासूबाईंना हायसं वाटलं.
‘‘वेळेवर आलीस हो. आत्ताच खिचडीवर झाकण घातलं बघ. फ्रेश हो..’’
ती फ्रेश होतेय, तोवर मुलांचा उत्सव सुरू झाला. ‘बाबा आले, बाबा आले..’ असा.
आला तो मुळी उत्साहानं निथळत. शिवाय एकीकडे हुकूम सोडत.. ‘‘छत्री गॅलरीत ठेव सिद्धी. बॅग जरा पुसून ठेव रे सौरभ. मला टॉवेल दे गं.’’
त्याची फास्ट गाडी. कोठेही फारशी थांबली नाही. ४८ तास पाऊस पडणार, या अपेक्षेनं त्याच्या ऑफिसनं सुट्टी जाहीर केली आहे. या सगळ्याचा आनंद घेऊन तो पावसाचं वर्णन ‘मज्जा.. मज्जा’ असल्यासारखं करत होता. ती मात्र त्याच्या ऑफिसमधल्या कामचुकार आणि पळणाऱ्या लोकांसारखी लवकर निघूनही आताच पोचली होती. चिंबून, कुचंबून गेली होती. फ्रेश होऊन आली तरी फ्रेश वाटत नव्हतं.
तो वेळेवर आल्याच्या आनंदात सासूबाईंनी डाळीचं पीठ भिजवलं. ‘‘दोन-तीन बटाटे दे गं काप करून. त्याला भजी आवडतात अशा पावसाळी हवेत.’’
मग भजी तयार झाली. पापड तळले गेले. ताकाला फोडणी लावली. भागवाभागवी करण्यासाठी खिचडी- असा बेत राहिला नाही. उलट, चंगळच वाटली मुलांनाही.
झोपायला जाण्याआधी सासूबाईंनी देवापुढे साखर ठेवली.
‘‘विसरले बघ. देवाला बोलले होते मघाशी. पावसाची दोघंजण सुखरूप येऊ देत म्हटलं.’’
म्हणजे त्यांनाही आज हुरहूर वाटत होतीच!
खोलीत आल्यावर जान्हवीनं कपाट उघडलं.
‘‘आता काय शोधते आहेस?’’
‘‘एखादा पावसाळी ड्रेस बघून ठेवते उद्यासाठी. मला काही सुट्टी नाही डिक्लेअर झालेली.’’
‘‘बघा रे पोरांनो, तुमची आई जळतेय माझ्यावर!’’ खो-खो हसत तो म्हणाला.
तिचा चिडका चेहरा बघून तो पुन्हा हसला. ‘‘थट्टासुद्धा कळत नाही तुमच्या आईला.’’
थट्टा कळण्यासाठी मनाची जी खिडकी उघडी असावी लागते, ती आज बंद आहे.
ती जेवढी कोमेजलेली होती, तेवढाच तो टवटवीत, प्रसन्न होता. मुलं झोपल्याची खात्री होताच त्यानं तिच्या दंडाला स्पर्श केला. तिच्या थंड प्रतिसादावरून तो काय ते लगेचच समजला. त्याला थोडा अंदाजही आला होता.
‘‘छान मूड आहे. मस्त पावसाळी हवा आहे, तर तू चिडलेली, दमलेली. तरी बरं, इतर बायकांसारखं तुला काही ओटय़ाशी उभं नाही राहावं लागलं- आल्या आल्या! गरमागरम सुग्रास तयार बेत. दमायला काय झालं?’’
दमायला फक्त काम करूनच होतं का रे? आणि पावसाळी हवा तर संध्याकाळीसुद्धा होतीच की. अंधारात करण्याजोगं प्रेम तुला करता येतं. मला तर तू दिवसासुद्धा हवा होतास. तुझी सोबत हवी होती. किमान ही सोबत मला हवी वाटते, हे तुला कळायला हवं होतं. पण झिडकारलंस तू. अंधारून येणारं मनावरचं मळभ थोडं दूर करायचं होतंस. आता तर डोळ्यांतून पाऊसधारा सुरू झाल्यात..
तिला तिच्या वहीत लिहून ठेवलेली कविता आठवली..
वीज बावरली
ढगाला बिलगली
ढगाने मात्र
झिडकारलं तिला
डोळ्यात तिच्या आले चटकन् पाणी
पाऊस पडला ठिकठिकाणी.
त्यानं तिला जबरदस्तीनं स्वत:च्या बाजूला कुशीला वळवलं.
डोळ्यांतलं पाणी पाहून तो चक्रावला. एवढा आपण काय गुन्हा केला, ते कळेना त्याला.
‘‘तू रडते आहेस?’’ त्यानं हलक्या आवाजात, पण उंच स्वरात विचारलं.
‘‘सांग ना, काय झालं? एवढय़ा पावसाची वेळेवर आलीस.. आता रडायला काय झालं?’’
‘‘काही नाही!’’ ती ठाम.
‘‘तू ना हल्ली चिडतेस पटकन्. कारण तरी सांग-का रडते आहेस?’’
काय याला सांगू मी? पाऊस सवयीचा झाला की मातीला गंध उरत नाही, हे?
‘‘काय झालंय तुला? तू बदललीयस खूप. चिडकी आणि रडकी झाली आहेस.’’
‘‘तूही बदललास. खूपच बदललास- नाही?’’
‘‘अच्छा! म्हणून रडते आहेस? हे सगळे ‘हार्मोनल इम्बॅलन्स’चे परिणाम आहेत. केव्हाही रडू येतं.’’ तो पुटपुटला. हार्मोनल काही नाहीये, माझं छान चाललंय सगळं. आपल्या नात्यात ‘इम्बॅलन्स’ झालाय. अतिपरिचयानं असेल.
तसा तो समजूतदार आहे. संसार बारा वर्षांत नुसताच फळला, फुलला नाही, तर पक्व झालाय.
त्यानं मुळीच दांडगाई केली नाही.
‘‘रडण्याचं कारण तर सांगशील?’’ त्यानं तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. रडण्याचं कारण आपण असू शकतो, हे त्याला उमगत नव्हतं.
परवाच्या रविवारच्या पुरवणीत पस्तिशी ओलांडलेल्या स्त्रियांबद्दल माहिती आली होती, तशीच रडतीय ही!
मी कारण तरी काय सांगू? एखादा क्षण असतो- प्राजक्त फुलासारखा.. नाजूक. ओंजळीत अलगद घेतला नाही तर मातीत सांडून जातो, एवढंच. कदाचित- आता मीही त्याचा सुखाचा क्षण पावसात फेकून दिला आहे.
वसुंधरा घाणेकर