Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

स्मरणरंजन - तेरी चमकती आँखों के आगे..
कुठल्याही नायकाची गृहस्वामिनी आणि त्याची पडद्यावरची कुठलीही नायिका या दोघींमध्ये विस्तव जात नाही म्हणतात. दोघीही स्त्रियाच. पण औरत का दुसरा नाम जलन, मत्सर, असूया, वगैरे वगैरे. विश्वास बसत नसेल तर राज कपूरच्या पत्नीपासून सुरुवात करून थेट आताच्या अक्षयकुमारच्या बायकोपर्यंतचा रोमहर्षक इतिहास पडताळून बघा. अनेक दुर्मिळ दस्तावेज हाती लागतील.
मात्र, या फोटोतल्या दोघीजणींना पाहिल्यावर थोडा वेगळा प्रकार दिसतोय खरा! ‘नववधू प्रिया मी बावरते’ थाटात पलंगावर बसलेल्या निम्मीची ओळख पटायला वेळ लागणार नाही. शिवाय पलंगाची फुलांच्या माळांनी केलेली सजावट बघितल्यावर ही मधुचंद्राची रात असावी, हा तुमचा होरा शंभर टक्के
 

बरोबर आहे. याचाच अर्थ हा निम्मीच्या लग्नाच्या वेळचा फोटो असून, कोणीतरी बाई तिला भेटवस्तू देतेय, असा होतो. पण तुमचा हा अंदाज पूर्णपणे चुकला म्हणून समजा. मुळात २९ एप्रिल १९५६ या दिवशी निम्मीचं लग्न होईलच कसं? तेव्हा तर तिचा ऐन उमेदीचा काळ होता. जरा ‘बसंत बहार’, ‘भाई भाई’ आठवून बघा.
आता फोटोत दिसणारी दुसरी स्त्री.. तिचं नाव- संतोष. थोडं विचित्र वाटतंय, पण ते खरं आहे. पन्नासच्या दशकात हीरो असलेल्या शेखरची ती पत्नी. हा शेखर म्हणजे ‘आँखे’त नलिनी जयवंतचा, ‘नया घर’मध्ये गीता बालीचा आणि ‘आखरी दाव’मध्ये नूतनचा नायक होता. रफीचं सदाबहार सोलो ‘तुझे क्या सुनाऊँ मै दिलरुबा’ त्यानेच पडद्यावर पेश केलं होतं. त्यानेच निर्माण केलेला ‘छोटे बाबू’ नावाचा सिनेमा सेटवर गेला तेव्हा त्याच्या मुहूर्ताच्या वेळचा हा फोटो आहे. या चित्रपटात सहनायकाच्या भूमिकेत अभि भट्टाचार्य होता. त्याच्याबरोबर निम्मीचं लग्न झाल्यावर सुहागरात साजरी करण्याचा प्रसंग मुहूर्ताच्या वेळी घेण्यात आला. नववधूच्या वेशात सजलेल्या निम्मीने दिलेला पहिलाच शॉट ओ.के. झाला आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
शॉट संपल्यावर निम्मी पलंगावरून उठणार, एवढय़ात शेखरच्या पत्नीने लगबगीने जाऊन तिला गाठलं. तिच्या हातात कसलातरी छोटासा डबा होता. मग तिने निम्मीला हाताची ओंजळ पुढे करायला सांगितली आणि डबा उघडून त्यातल्या सुवर्णमुद्रा तिच्या ओंजळीत रित्या केल्या. मोजून एकावन्न! खरं तर निम्मीला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती पार गोंधळून गेली. तेव्हा शेखरनेच पुढे होऊन तिला सांगितलं की, त्याच्यातर्फे हे ‘सरप्राइज गिफ्ट’ होतं. मग तिथे जमलेल्या मंडळींकडे निम्मीची स्तुती करीत तो उद्गारला होता, ‘प्रसंग कुठलाही असो, सेटवर निम्मीने कधीच कुणाची अडवणूक केली नाही. सहकार्यासाठी ती नेहमीच आघाडीवर असते. तिच्या आजवरच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टोकन म्हणून तिला ही छोटीशी भेट दिली, एवढंच!’
ओंजळभर चकचकीत सुवर्णमुद्रा पाहिल्यावर निम्मी भारावून गेली असणार, यात वादच नाही. ध्यानीमनी नसताना अचानक मिळालेल्या या मौल्यवान भेटीने तिचे डोळे नक्कीच चमकून उठले असतील. हे सगळं पाहिल्यावर आपल्यासारखे सर्वसामान्य रसिकजन- ‘त्यावेळी सोन्याचा भाव काय असेल हो, आता त्याचे किती पैसे मिळाले असते,’ यासारखे नतद्रष्ट विचार मनात आणून कुढत बसू.
परंतु मदनमोहनसारख्या कलंदर संगीतकाराला निम्मीच्या या चमकत्या डोळ्यांवरून सुरेख द्वंद्वगीत सुचलं असावं. या खेपेस शीर्षक म्हणून त्याच गाण्याचा मुखडा देण्यात आलाय. गाणं ओळखायला थोडं अवघड आहे खरं! पण रेडिओ सिलोन ऐकणारे दर्दी श्रोते आणि जाणकार रसिकांना मात्र तलत- लताच्या या मधाळ द्वंद्वगीताची आठवण पुन:प्रत्ययाचा आनंद देणारी ठरेल.
विजय शिंगोर्णीकर