Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

इरजिक - वर्दीचा पाऊस
वर्दीचा पाऊस
व्याकुळ पृथ्वी
प्रखर उन्हात होरपळता
जळताना जागोजाग वणव्यात
नव्हती एकही हुंदका देत
प्रतिभासंपन्न थोर कवी अनिलांच्या ह्य़ा ओळी. आपल्या ह्य़ा मुक्तछंदाला त्यांनी ‘प्रेमजीवन’ नाव दिले असले, तरी
कवितेतली होरपळ किती दाहक आहे नाही! आणि ती सोशिकता? ग्रीष्म, उन्हाळा, माध्यान्ह ऊन हे विषय कवी अनिलांच्या
 

कवितेत पुन:पुन्हा येतात ते विदर्भाचे असल्यामुळे का? पण हा उन्हाचा वणवा आजकाल विदर्भातच काय, सगळ्या महाराष्ट्रातच पसरत चालला आहे. उन्हाळा आणि महागाई या दोन गोष्टी दरवर्षी वाढतच असतात.
एखाद्या गंभीर नाटकात विदूषकाने थोडा वेळ ‘एन्ट्री’ करावी अन् वातावरणाचा ताण हलका करावा असं काहीतरी घडतं. अशा धगीत वळवाचा पाऊस येतो अन् त्या किरकोळ शिडकाव्याचीसुद्धा मग बातमी बनते वर्तमानपत्रासाठी.
हा वळवाचा पाऊस किती गमतीशीर; कधी नुसता शिडकावा, तर कधी पन्हाळं वाहीपर्यंत. कधी नुसत्याच कुंद आभाळाने आहे त्या धगीत उकाडा वाढवणारा, तर कधी गारांचा सडा टाकणारा. धग कमी झाल्याचा आनंदही एक-दोन दिवसापुरताच. कारण अशा पावसाच्या थेंबातून जमिनीतली वाफ बाहेर येऊ लागते अन पुन्हा तोच कहर.
वळवाचा पाऊस हा काही जमीन भिजवणारा पाऊस नसतो. गारवाही आणणारा नसतो. हा पाऊस खरा पाऊस नाही. तो आहे दूत. तो पावसाळ्याचा दूत आहे. पाऊस येणार आहे, याची वर्दी देण्यासाठी तो पुढे येतो. येणाऱ्या पानकळाचा इशारा देण्यासाठी तो येतो. उन्हाळा संपणार आहे, पावसाळा सुरू होतो आहे, हा सावधानतेचा इशाराही तो देतो. पावसाळा येण्यापूर्वी काही तयारी करावी लागते. चुलीसाठी जळण लागते. लाकूडफाटा गोळा करून, पावसात भिजणार नाही अशा पद्धतीने तो नीट रचून ठेवावा लागतो. पावसाळा लागला तरी चुली पेटणार कशा? याची काळजी असते. हा वळवाचा पाऊस गाफील माणसांना सावध करतो. लाकूडफाटय़ाबरोबरच शेणाच्या गोवऱ्याही व्यवस्थित रचून, वर गवतकाडी टाकून शेणामातीने लिंपून- झाकून ठेवाव्या लागतात. गुराढोरांचा चारा, कडब्याच्या गंजी नीट शेकारून ठेवाव्या लागतात. मातीची घरं असतील तर माळवदावर पेंढ नीट दाबून, कुठं मुंग्यांनी बिळं केली असतील तर ती बुजवून साफसूप करावे लागते. गोरगरिबांची राहायची छपरं अन गुरांचे गोठे, वाडगेही शेकारावे लागतात अन् ज्या सावध, कष्टाळू माणसांनी ही कामं अगोदरच केली असतील, ती नीट झाली की नाही ते वळवाच्या पावसाने तपासून मिळते.
बालगोपाळांसाठी वळवाचा पाऊस म्हणजे मज्जाच. अंगावरचे सदरे फेकून ओलं ओलं व्हावं. फार चिंब करणारा नसतो हा पाऊस अन चिखलही होत नसतो त्या पावसानं. जमीन थोडी ओलीशार होतं. अशी अर्धवट ओली माती पायावर थापावी घोटय़ाइतकी उंच आणि हळूच पाय बाहेर काढावा. मातीच्या ह्या कोपी करण्याचा छंदच लागतो. दुसरा कोणीतरी हळूच त्या कोपीपुढे झाडाची फांदी रोवतो. खेळातले हे घर बनवताना मुलं किती तन्मय होतात. कधी वळवाचा पाऊस घेऊन येतो गारा. अशा गारा पकडणे, झेलणे, म्हणजे केवढा जल्लोष!
अशा पावसानं अन वाऱ्यानं आंब्याच्या झाडावरचे आंबे खाली पडतात, जांभळांचाही सडा पडतो. बहुतेक जांभळं पावसाच्या माऱ्यानं अन जमिनीवर आपटल्यामुळे फुटत राहतात अन सगळी जमीनही जांभळी होते. शेतकऱ्यांना अशा नुकसानीचा वाटा सहन करावा लागतो. पण खाणारांची चंगळ. वाया जाण्याऐवजी माणसाच्या मुखी पडावे म्हणून जो तो वाटतच सुटतो.
डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणतात, ‘नळ-दमयंती स्वयंवर हे केवळ प्रेमकाव्य नाही तर ते दूतकाव्य आहे. ‘मेघदूताचेही तसेच, पण मराठीत हा ‘दूतकाव्य’ प्रकार फार प्रचलित नाही, ह्य़ाची समीक्षा त्यांनी एका लेखात केली आहे. वळवाच्या पावसाला दूतकाव्याचा विषय बनवता येईल का? प्रतिभावंत आणि खऱ्या कवींसाठी हे आवाहन आहे.
मृगाचा पाऊस सुरू होतो, तो खरा पाऊस मानला गेला आहे. मृगनक्षत्राचे वाहन या वर्षी मोर आहे. पण कधीकधी ते गाढवही असते. ही गोष्टही गंमतशीर आहे. १४ जानेवारीला संक्रांत यावी तसे ७ जूनला मृगनक्षत्र येते. पाडव्याला कडूलिंब खावा, तसे मृगनक्षत्र सुरू होते. त्या दिवशी चिमूटभर हिंग खाण्याची पूर्वापार प्रथा खेडय़ापाडय़ात आहे. त्या दिवशी हटकून न पडणाऱ्या पावसाच्या वासाची इच्छा हिंगाच्या वासावर भागवून घ्यावी लागते.
खऱ्या पावसाअगोदर येणाऱ्या ह्य़ा वर्दी पावसाचे स्वागतच असते. तो पहिला पाऊस, का पहिल्या पावसाअगोदरचा पाऊस हे अलाहिदा,पण पावसाच्या शिडकाव्याने येणारा ‘मृद्गंध’ खराच असतो. हा मृद्गंध काही नेहमी अनुभवता येत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी पुण्याच्या एन.सी.एल.मध्ये हा ‘मृद्गंध’ देणारा सेंट बनवल्याची बातमी वर्तमानपत्रात आपण वाचली असेल. अशा कृत्रिम मृद्गंधामुळे पहिल्या पावसाचा भास होईल; पण खऱ्या पावसामुळे आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियासहित सगळे शरीरच रोमांचित होत असते,अणुरेणू चैतन्यमय होतात, ती अनुभूती अशा कृत्रिम पावसात आणि मृद्गंधातही नाही, हे खरे!
अरुण जाखडे
arunjakhade@padmagandha.com