Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

टिकलीएवढे देश - अस्पर्शित देवभूमी
प्युअटरे रिकोच्या पूर्वेस कॅरिबिअन महासागरात वसलेला शेकडो लहानमोठय़ा बेटांचा समूह ओळखला जातो, तो व्हर्जिन आयलंड्स या नावानं.. त्यातली ब्रिटीश सागरी सरहद्दीत मोडणारी साठेक बेटं ओळखली जातात ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स या नावाने. तर अमेरिकन आणि स्पॅनिश सागरी सरहद्दीत मोडणारी तशीच आणखी काही बेटं जगाला ठाऊक आहेत, ती अमेरिकन व्हर्जिन आयलंड्स किंवा स्पॅनिश व्हर्जिन आयलंड्स म्हणून..
दक्षिण अमेरिकेतल्या आरावाकांनी ख्रिस्तपूर्व १०० साली हा देश वसवला असं सांगण्यात येतं. पण त्यांच्या वस्तीचा तेव्हाचाच
 

काय, तेव्हापासून ख्रिस्तपूर्व १५०० पर्यंतचा तसा कोणताच ठोस पुरावा कुणाकडेही उपलब्ध नाही. त्यानंतर मात्र आरावाकांना तिथून हुसकावण्यात आलं. त्यांची जागा मग लेसर अ‍ॅंटिल्स आयलंडवरच्या कॅरिब नावाच्या एका जमातीनं घेतली. त्या जमातीच्याच नावानं हा महासागर ओळखला जातो.
अन्य अनेक देशांप्रमाणेच या भूमीचं पहिलं दर्शन घडलं ते जगप्रवासावर निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबसाला. ते साल होतं १४९३. कोलंबसाची ती दुसरी जगसफर होती. त्या भूमीचं ते कोवळं सौंदर्य पाहून कोलंबसाला आठवण झाली ती सेंट उर्सुलाची आणि तिच्या ११००० हजार सख्यांची. त्यांचं स्मरण म्हणून कोलंबसानं या भूमीला नाव दिलं ‘व्हर्जिन आयलंड्स’..
१६ व्या शतकात स्पेनच्या राजानं या बेटांवर दावा सांगितला. पण त्यानं तिथं कधीच वास्तव्य केलं नाही. पुढल्या काळात इंग्रज, डच, फ्रेंच सर्वानीच त्या परिसरावर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू केले. स्वाभाविकपणे चाचे लोकांचं अधिक फावलं. अखेरीस १६४८ च्या सुमारास डचांनी या बेटांवर कायमचं वास्तव्य करण्यात, तिथे आपली वसाहत स्थापन करण्यात यश मिळवलं. पण तेही जेमतेम २०-२५ र्वषच टिकलं.
१६७२ मध्येच त्यातल्या टोरटोला बेटावर इंग्रजांनी कब्जा केला. पुढल्या सातआठ वर्षांत शेजारची अ‍ॅनेगडा आणि व्हर्जिन गोर्डा बेटंही इंग्रजांच्या ताब्यात गेली. पण साठ बेटांच्या संकुलात सेंट थॉमस, सेंट जॉन आणि सेंट क्रॉइक्स अशी आणखीही काही उत्तम बेटं होतीच. १९२५ मध्ये अमेरिकेनं ती अवघ्या २५ लाखांना विकत घेतली. पण याशिवाय बीफ आयलंड, मॉस्क्विटो आयलंड, जिंजर आयलंड, सॉल्ट आयलंड अशी काही वेगळ्याच प्रकारची नावं असणारी बेटं या संकुलात आहेत ती वेगळीच. १६७२ ते १७३३ या काळात डचांनी तिथं आपलं राज्य प्रस्थापित केलं.
आकारानं लहान असली तरी या बेटांचं व्यावसायिक स्थानमहात्म्य मोठं होतं. जागतिक व्यापारासाठी ती भूमी सोयीची होती. मालाचा प्रवास टप्प्याटप्प्यानं करण्यासाठी मधले सुरक्षित थांबे म्हणून त्या बेटांना महत्व होतं. जागतिक व्यापारातले ते तेजीचे दिवस होते. ऊसाचं पीक सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीगत ठरणारं होतं. त्यातनं विदेशी चलनही मोठय़ा प्रमाणावर मिळेल अशी शक्यता दिसू लागली होती. इंग्लंडनं ते हेरलं आणि आफ्रिकेतून गुलाम आणून त्यांच्याकरवी या बेटांवर ऊसाचं पीक घ्यायला सुरुवात केली. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा ऊसमहिमा व्हर्जिन आयलंड्सच्या सुबत्तेत भर घालत राहिला.
पण गुलामगिरी नष्ट करण्याच्या दिशेनं उचलली गेलेली पावलं, वादळांनी घातलेला गोंधळ आणि युरोप, अमेरिकेत ऊस पिकला जाऊ लागल्यानं कमी झालेली मागणी यामुळं या सुबत्तेला काहीसं ग्रहण लागत गेलं. अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ लागला.
१९६० मध्ये ब्रिटिशांनी या बेटांना वसाहतीचा अधिकृत दर्जा दिला. १९६७ मध्ये तर ती स्वायत्त झाली. स्वायत्ततेनंतरच्या काळात ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सच्या अर्थव्यवस्थेला खरा हातभार लावला तो पर्यटनानं आणि अर्थविषयक सेवा देणाऱ्या यंत्रणेनं. आज ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स ही कॅरिबियन महासागरातील सर्वाधिक श्रीमंत बेटं म्हणून गणली जातात. तिथलं दरडोई सरासरी उत्पन्न या घटकेला ३८,५०० अमेरिकन डॉलर इतकं आहे.
एकटय़ा पर्यटन उद्योगाचा ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सच्या अर्थव्यवस्थेतला उत्पन्नाचा वाटा ४५ टक्क्यांचा. हजारो अमेरिकन पर्यटक दरवर्षी ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सला भेट देत असतात. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ही संख्या गेली होती सुमारे पाच लाखांच्या घरात.. पांढऱ्या शुभ्र वाळूचे किनारे, प्रवाळांचे साठे आणि प्रदूषणरहित पर्यावरण यापेक्षा वेगळं पर्यटकांना काय हवं असतं!
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्सच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे तिथे नोंदल्या जाणाऱ्या ऑफशोअर कंपन्या. जगाच्या पाठीवर सर्व मिळून असलेल्या ऑफशोअर कंपन्यांपैकी ४१ टक्के कंपन्या एकटय़ा ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्समध्ये नोंदल्या गेल्या आहेत. त्यांची एकूण संख्या साडेपाच लाखांपेक्षा अधिक असावी. करांमध्ये मिळणारी मोठी सवलत हे एक कारण अशा कंपन्यांची नोंदणी होण्यात असतं.
१९५९ सालापासून ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्सचं अधिकृत चलन आहे अमेरिकन डॉलर. २००३ मध्ये नोंदली गेलेली ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सची लोकसंख्या आहे अवघी २२ हजार.. त्यातले ८३ टक्के आहेत आफ्रो-कॅरिबियन.. त्यांचे मूळ वंशज म्हणजे ब्रिटीशांनी आणलेले ऊसाच्या मळ्यावर काम करणारे मजूर.. एकूण लोकसंख्येपैकी ८७ टक्के प्रॉटेस्टंट ख्रिश्चन..
ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सवरचे रस्ते एकूण ११३ किलोमीटर लांबीचे.. म्हणजे मुंबईहून निघालं तर खोपोलीपर्यंत गेलं की देशाची हद्दच संपायची. बीफ आयलंड एअरपोर्ट या नावानं ओळखलं जाणारं विमानतळ हे देशातलं मुख्य विमानतळ. ते आहे टॉटरेला बेटाच्या पूर्वेला. पण क्विन एलिझाबेथ ब्रिजवरून तिथं सहज पोचता येतं. रोड टाऊन हे ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सवरचं मुख्य शहर. खरं तर ती राजधानीच..
बेटांच्या प्रशासनाची कार्यकारी सूत्रं तशी राणीच्या हाती. पण प्रत्यक्षात सारा कारभार पाहतात ते राणीनं नेमून दिलेले गव्हर्नर. २००७ साली ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सनं नवी राज्यघटना स्वीकारली. त्याच वर्षी निवडणुकाही झाल्या. ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सला संसद नाही, तिथे आहे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल. तिचे १३ सभासद निवडले जातात; तेव्हा त्यांच्याचबरोबर पंतप्रधानाचीही निवड होते. २००६ साली गव्हर्नर म्हणून डोव्हिड पिअरे यांनी सूत्रं घेतली तर ऑगस्ट २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राल्फ ओह्णनिल पंतप्रधान झाले.
ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स कुख्यात आहेत ती ड्रग ट्रॅफिकिंगसाठी. तिथला सारा ड्रग साठा प्रामुख्यानं जातो तो अमेरिकेतच. ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्सच्या स्थैर्याला सर्वाधिक धोका आहे तो त्यापायीच..
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com