Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

पुस्तकाचे पान - जिवंत इतिहास
‘मत इतिहास’ व ‘जिवंत इतिहास’ अशा दोन दृष्टिकोनांतून इतिहासाकडे पाहता येते. ज्या इतिहासाचे समकालीन जीवनाशी जैविक नाते नसते किंवा ज्या इतिहासाचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागत नाही त्याला ‘मृत इतिहास’ म्हणता येईल. (उदा. प्राचीन इजिप्तचा इतिहास- जसे पिरॅमिड्स, प्राचीन इजिप्तचे राजे.) याउलट ज्या इतिहासाचे समकालीन जीवनाशी जैविक नाते असते वा ज्याचे प्रतिबिंब आपल्या सध्याच्या जीवनात दिसते वा ज्याचा संदर्भ आपल्या जीवनात काही दिसतो त्याला ‘जिवंत इतिहास’ म्हणता येईल (उदा. पश्चिमी जगाचा प्रबोधन काळापासूनचा गेल्या पाच/सहा शतकांचा इतिहास- जसे पश्चिमी विज्ञान व तंत्रज्ञान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद, समाजवाद, इहवाद, मानवकेंद्री दृष्टिकोन इत्यादी विचार. दुसरे उदाहरण म्हणजे आधुनिक भारताचा गेल्या सुमारे दोन-अडीच शतकांचा इतिहास- जसे भारतीय प्रबोधन चळवळ,
 

भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास, राष्ट्रीय चळवळीची विचारधारा इत्यादी). १८५७ चा उठाव- स्वातंत्र्य समर ही घटना काही बाबतीत ‘जिवंत इतिहासा’चा भाग असल्याचे आढळते.
१८५७ च्या उठावाला नुकतीच १५० वर्षे झाली. या पाश्र्वभूमीवर माधव दातारांनी ‘१८५७’ या विषयावर हे पुस्तक लिहिले आहे. विशेष म्हणजे सुमारे १५८ पाने एवढय़ा लहान मर्यादेतही रूढ तसेच अद्ययावत साधनांचा आधार घेत समकालीन जागतिकीकरणाचे संदर्भ लक्षात घेऊन एक अतिशय चांगले पुस्तक लेखकाने वाचकांना दिले आहे व याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
‘१८५७’ हा विषय असूनही लेखकाने प्रास्ताविकात उठाव काळातील सर्वाना ठाऊक असलेल्या घटनाक्रमाचा संक्षिप्त आढावा घेऊन उठावाच्या इतर अंगांच्या (जसे १८५७ बाबतचे वैयक्तिक अनुभव, घटनांचे स्वरूप व कारणमीमांसा, आर्थिक परिमाणे, उठाव व लोकसहभाग, उठाव आणि आपण) चर्चेवर अधिक भर दिला आहे. यामुळे पुस्तकाची पृष्ठसंख्या लहान असूनही विषयाला न्याय देता आला आहे. पूर्व लेखनाचा आढावा घेतल्यावर १८५७ च्या घटनांचे बहुरंगी व व्यामिश्र चित्र समोर येते. या व्यामिश्रतेमुळे ‘अंतिम सत्य’ दिसत नाही हे खरेच व याचे कारण सत्य विविधांगी असल्याचे जाणवते. तरीही लेखकाला काही मत व्यक्त करावे लागतेच. त्यानुसार लेखकाच्या मते १८५७ च्या घटना एक ‘उठाव’ होता. यामुळे १८५७ चे दैवतीकरण वा राक्षसीकरण या दोन्ही गोष्टी टळल्या. ब्रिटिश गेल्यानंतर साठ वर्षांनी १९४७ पूर्वीच्या इतिहासाकडे निकोपपणे पाहणे जरूर असल्याचे पुस्तकाच्या वाचनानंतर जाणवते.
‘वैयक्तिक अनुभव’ या प्रकरणात सहा देशी व ब्रिटिश व्यक्तींच्या आत्मकथनांचा विचार करण्यात आला आहे. त्यांत वरसईच्या विष्णुभट गोडसेभटजींच्या आत्मकथनाचा (माझा प्रवास) समावेश आहे. या संदर्भात लेखकाने केलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे. वैयक्तिक अनुभव नोंदवणारे ब्रिटिश लेखक (आर्थर लांग वा शेफर्ड) हे ब्रिटिशांच्या बाजूने घटना बघतात वा त्यात सहभागी होतात. त्यांना ब्रिटिश भूमिकेची सत्यता मान्य होती. याउलट ‘गोडसेभटजी भोवतालच्या घटना पाहणारे तटस्थ निरीक्षक होते.. या घटनांशी त्यांचा काही संबंध आहे किंवा या संदर्भात त्यांचे काही कर्तव्य असू शकते, अशी भावना त्यांच्या लिखाणात आढळत नाही. भारतातील राष्ट्रीय जाणिवांचा विकास होण्याची सुरुवात अजून व्हायची होती, हे या प्रवासवर्णनातून स्पष्टपणे जाणवते.’
स्वातंत्र्य मिळेपर्यंत १८५७ च्या घटनांकडे अभ्यासकांकडून कसे पाह्यले गेले व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या घटनांकडे कसे पाह्यले गेले याचा विस्तृत आढावा ‘घटनांचे स्वरूप व कारणमीमांसा’ या प्रकरणात लेखकाने घेतला आहे. त्यात बेंजामिन डिझरेली, जॉन लॉरेन्स (पंजाबचा कमिशनर), डेव्हिड युरेकहार्ट, जी. बी. मॅलिसन, कार्ल मार्क्‍स यांसारख्या परदेशी निरीक्षक- लेखकांचा जसा समावेश आहे तसाच स्वातंत्र्यवीर सावरकर, जवाहरलाल नेहरू, न. र. फाटक, अशोक मेहता, अमरेश मिश्रा, शेषराव मोरे इत्यादी भारतीय लेखकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’), न. र. फाटक (‘अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी’), शेषराव मोरे (‘अठराशे सत्तावनचा जिहाद’), अमरेश मिश्रा व मार्क्‍स आणि एंगल्स यांच्या लेखनाचा विशेष विचार लेखकाने केला आहे. या सर्व लेखकांचा आढावा घेतल्यानंतर लेखकाने अशोक मेहतांचे १८५७ वरील लेखनाच्या संदर्भातील निरीक्षण दिले आहे. ते असे : की, ‘..स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय भारतीयांना १८५७ बाबत भावनेच्या आहारी न जाता विचार करणे कठीण होईल.’ या पुस्तकाचे लेखक पुढे म्हणतात की, ‘..अलीकडे प्रसिद्ध झालेली काही पुस्तके (मोरे, २००७ व मिश्रा, २००८) पाहता! स्वातंत्र्य मिळाल्यावरही तसे करणे अजूनही कठीणच आहे, असे दिसते.’ या बाबतीत मला असे वाटते की, १८५७ च्या घटना अजूनही तशा फार दूर नाहीत व त्यामुळे तटस्थ लेखन कठीण आहे. दुसरे असे की, सर्वमान्य व तटस्थ लेखन नेहमीच कठीण असते व तशी अपेक्षा- आग्रहही नसावा. सुदैवाने आपण लोकशाही व्यवस्थेत राहत असल्याने सर्वच तऱ्हेचे विचार, लेखन वाचकांपुढे असते व ते इतिहास लेखनाबाबतही लागू आहे. वाचकांपुढे विविध दृष्टिकोन पुढे आल्याने सत्याची व्यामिश्रताही पुढे येईल.
१९५७ च्या उठावाचा विचार करताना ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक परिणामांस भारतीयांनी काहीसे कमी लेखल्याचे म्हटले आहे. ‘आर्थिक परिमाणे’ या प्रकरणात लेखकांनी उठावामागील आर्थिक घटकांचा विचार केलाय. आर्थिक कारणांचे महत्त्व स्पष्ट करताना प्रकरणाच्या अखेरीस लेखकाने खालील निरीक्षण नोंदविले आहे- ‘१८५७ च्या उठावाच्या स्फोटाला कारणीभूत ठरलेली वरील आर्थिक कारणं दारूगोळा मानली तरी स्फोट होण्यास जी ठिणगी आवश्यक होती ती ब्रिटिशांच्या राजवटीत आपला धर्म धोक्यात येईल या हिंदू व मुसलमानांतील भावनेने पुरविली.’
‘१८५७ चा उठाव व लोकसमुदाय’ या प्रकरणात १८५७ च्या उठावाला व्यापक जनसमुदायाची सहानुभूती होती, असे म्हटले आहे. उठावाचे नेतृत्व जरी सरंजामशाही असले तरी या उठावात हिंदू व मुसलमानांनी बरोबरीने मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता. असे नसते तर हा उठाव सुमारे वर्षभर टिकला नसता व ब्रिटिशांनाही उठाव दडपण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले नसते. कंपनी सरकार व जनता यांच्यात दरी होती व या जाणिवेतून पुढे कंपनीकडून सत्ता काढून घेण्यात आली. (१८५८) प्रकरणाच्या अखेरीस लोकगीतांत १८५७ चे प्रतिबिंब कसे उमटले याचा थोडक्यात निर्देश करण्यात आला आहे. लोकसाहित्यातून ब्रिटिशांची प्रतिमा अशी दिसते की, ‘फिरंगी गोरा तर आहेच, पण त्याशिवाय तो लुटारू आहे, देशावर ताबा मिळवणारा, आपल्यावर हुकमत चालविणारा व आपला धर्म व जात भ्रष्ट करणारासुद्धा आहे..’ एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश लोकसाहित्यात या युद्धाची दुसरी बाजू दिसते. ‘पण आता दीडशे वर्षांनंतर या घटनांचा विचार करताना या भावनिक कल्लोळापलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे’ असे लेखकाने अखेरीस म्हटले आहे. हा बुद्धिवादी दृष्टिकोन रास्त असला तरी १८५७ मध्ये मनाने गुंतलेले असा दृष्टिकोन किती स्वीकारतील, याची शंका आहे. याचे उदाहरण म्हणजे अमरेश मिश्रांचे १८५७ वरील लेखन. लेखकाने मागील प्रकरणात मिश्रांचे मत दिलेय. मिश्रा यांच्या १८५७ च्या डाव्या आकलनानुसार १८५७ चा ‘हा लढा अजून चालूच आहे’ (पान ९२). अशाच आकलनातून भारतीय कम्युनिस्टांनी १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले हे नाकारले होते. (हा अर्थातच मोठय़ा चर्चेचा-वादाचा मुद्दा आहे.)
‘१८५७ चा उठाव आणि आपण’ हे या पुस्तकातील शेवटचे व महत्त्वाचे प्रकरण आहे. १९४७ नंतर १८५७ कडे वेगळ्या दृष्टीने पाहणे शक्य झाले व याला कारण बदलती परिस्थिती होते. १९४७ पूर्वी स्वातंत्र्य चळवळ हिंसक वा अहिंसक मार्गाने व्हावी का याबाबत मतभेद होते, पण लेखकाने म्हटल्याप्रमाणे हे मतभेद ऐतिहासिक बनल्याने स्वातंत्र्य चळवळीचे नाते १८५७ च्या घटनांशी जुळवणे सोपे बनले. लेखकाने पुढे मार्मिक निरीक्षण या नात्याबद्दल नोंदविले आहे. लेखक म्हणतात की, ‘हौतात्म्य पत्करलेल्या शिपायांबद्दल.. राणी लक्ष्मीबाई किंवा तात्या टोपे यांसारख्या नेत्यांबद्दल आदर व्यक्त करणे पण त्याचे मार्ग (सशस्त्र लढा) व उद्दिष्ट (धर्मरक्षण) यांबद्दल मौन पाळणे असा मार्ग स्वीकारला गेला.’ पण हे अर्थातच अपरिहार्य व वाजवी होते. कारण लोकशाही व्यवस्थेत हिंसक मार्गाला स्थान नाही व धर्मनिरपेक्षतेस धार्मिक मुद्दे गौण ठरतात. मात्र डाव्या विचाराच्या लेखकांना १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध अजूनही संपलेले नाही, असे वाटते. म्हणून भांडवलदार, जमीनदार व विदेशी साम्राज्यवादी शक्तींना नेस्तनाबूत केल्याशिवाय खरी लोकशाही व खरे स्वातंत्र्य मिळणार नाही असे वाटते. येथे अर्थातच साम्राज्यवाद अमेरिकी साम्राज्यवाद आहे.
लेखकाने जागतिकीकरणाच्या संदर्भात वर उल्लेखिलेल्या साम्राज्यवादाच्या मुद्दय़ाचा परामर्श घेतला आहे. या संदर्भात लेखकाचे पुढील निरीक्षण डाव्यांनी लक्षात घ्यावे. ते असे ‘..आपले राष्ट्र सशक्त व संपन्न बनले तर आणि तरच अमेरिकन साम्राज्यवादाला प्रतिबंध करण्याची आपली ताकद वाढू शकते. पण राष्ट्रीय समस्या सोडविण्याला प्राधान्य न देता साम्राज्यवादाला विरोध करण्याच्या जुन्या कल्पनांना आपण कवटाळून बसलो तर आपली राष्ट्रीय उद्दिष्टय़े तर साध्य होणारच नाहीत, पण साम्राज्यवादाला विरोध करण्याची आपली कुवतही मर्यादितच राहील..’ आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत भारताची भूमिका काय असावी व या व्यवस्थेत डोळसपणे कसे सामील व्हायचे याचा पुनर्विचार होऊ शकला तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात आत्मविश्वासाने सहभागी होऊन भारताच्या प्रगतीला अधिक वेगवान बनविण्यास प्रयत्न करता येईल व तसे करण्यात आपण यशस्वी झालो तर आणि तरच १८५७ च्या स्मृती जागविण्याचे राष्ट्रीय लाभ मिळू शकतील.’
याच प्रकरणात १८५७ चे धडे (अंतर्गत ऐक्याची, हिंदू-मुसलमानांनी एकत्र होण्याचे महत्त्व वगैरे), नेहरूंचे आर्थिक धोरण (केंद्रीय नियोजन, सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाची भूमिका, देशी उद्योगांना संरक्षण इत्यादी), गेल्या २०-२५ वर्षांत जगात झालेले बदल, जपान, कोरिया, सिंगापूरच्या तुलनेत धोरणात्मक बदल करण्यासाठी आवश्यक असलेल्या लवचिकतेचा आपल्याकडील अभाव, चीनमधील धोरणात्मक बदल व नंतरची चीनची वेगवान प्रगती व १९९१ मध्ये भारतात झालेले आर्थिक धोरणातील बदल या सर्व मुद्दय़ांचा वाजवी परामर्श लेखकाने घेतला आहे.
१८५७ चा उठाव :
काल आणि आज
माधव दातार
कॉन्सेप्ट बुक्स
पृष्ठे - १६४,
मूल्य - १५० रुपये

म. मो. पेंडसे