Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

राजकीय नेते कार्यक्रमास उशिरा का येतात?
- म. ई. तंगावार, उदगीर.

बहुतांश राजकीय नेते दारिद्य्ररेषेखालील जीवन जगत असल्याने त्यांना घडय़ाळ वापरणे परवडत नाही.

टीव्ही सिरियल्स महिलांनाच जास्त का आवडतात?
- अक्षता ठुबे.

आपले नवरे बाहेर काय उद्योग करीत असतील याचे दर्शन सिरियल्समधून घडते.

काका, बेरोजगारीवर काही मार्ग सापडतो का?
- निर्मल आढाव, पुणे.

अलीकडच्या काळात स्वत:ची कामे स्वत: करण्याची वाईट सवय बोकाळली आहे. भारतातले कोटय़वधी लोक सकाळी उठल्यावर दाढी करतात. तीच जर दुसऱ्याकडून करून घेतली तर..

सर्जनशील साहित्यिक म्हणजे कसा?

 

- श्रीपाद कुलकर्णी.
ज्याचे साहित्य विसर्जनशील नाही तो.

सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य काय?
- सुषमा मराठे, ठाणे.

दिवसेंदिवस बाहेरचे जेवण परवडेनासे होत चाललेय.

वय वष्रे ६१. सुंदर बाईकडे बघण्याची सवय जात नाही?
- लक्ष्मण.

एकतर तुम्ही गॅलरीऐवजी घरात बसा आणि सर्वच बाया सुंदर दिसत असतील तर मात्र डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा.

तुम्ही कधी कुणावर प्रेम केलेय का?
- योगेश शिबे, मुंबई.

बायकोसुद्धा हे सदर वाचत असल्याने याचे उत्तर देता येत नाही.

नाणी आपली केविलवाणी त्यांचा दोष काय? यापुढची ओळ सुचत नाही हो.
- संदेश ढगे. शहापूर.

वाणी आपली उदासवाणी याविण दुसरे काय?
नायगावकर काका

रस्त्याच्या कोपऱ्यावर मिस मार्था मिचमची एक छोटीशी बेकरी होती. (या बेकरीत जायचं म्हणजे प्रथम तीन पायऱ्या लागतात आणि तुम्ही दरवाजा उघडलात की आत एक घंटा किणकिणते.)
मिस मार्था ४० वर्षांची होती. तिच्या बँकेच्या खात्यात दोन हजार डॉलर्स होते. दातांच्या पंक्तीत दोन खोटे दात होते आणि छातीत एक अतिशय दयाळू हृदय धडकत होते. तिच्यापेक्षा रूपाने, गुणांनी आणि परिस्थितीनेही सुमार मुलींची लग्नं होऊन गेली होती.
तिच्या बेकरीत आठवडय़ातून दोन-तीनदा एक गृहस्थ खरेदीसाठी येऊ लागला होता आणि त्याच्याविषयी तिला खूपच आपुलकी वाटू लागली होती. हा एक मध्यमवयीन, चष्मा लावणारा आणि एक तपकिरी रंगाची मोठय़ा कडांची हॅट डोक्यावर काळजीपूर्वक घालणारा माणूस होता तो.
तो इंग्रजी बोलताना जर्मन धाटणीने उच्चार करीत असे. त्याचे कपडे जुनाट आणि काही ठिकाणी रफू केलेले असत. कधी कधी ते चुरगळलेले व ढगळही असत, परंतु एकूण तो नेटनेटका दिसत असे आणि त्याचे वागणेही शिष्टाचारपूर्वक असे.
तो नेहमी दोन मोठे शिळे पाव खरेदी करीत असे. ताजे पाव पाच सेंटला एक तर शिळे पाव पाच सेंटला दोन मिळत. तो या दोन शिळ्या पावांखेरीज दुसरे काहीही खरेदी करीत नसे.
एकदा मिस मार्थाने त्याच्या बोटावर लाल तपकिरी रंगाचे डाग बघितले. तेव्हा तिची खात्रीच पटली की, तो नक्कीच एखाद्या पोटमाळ्यावरच्या कोंदट अंधाऱ्या खोलीत राहत असला पाहिजे. तो तिथेच आपली चित्रे काढीत असेल आणि शिळ्या पावावर गुजराण करीत असेल. मिस मार्थाच्या बेकरीत मिळणाऱ्या चविष्ट पदार्थाचा तो फक्त विचारच करू शकत असेल.
मिस मार्था जेव्हा जेव्हा आपल्या जेवणाच्या टेबलाजवळ बसून मटनचॉप्स, कुरकुरीत रोल्स, जॅम व चहा यांचा समाचार घेत असे तेव्हा तेव्हा तिला सारे शिष्टाचार काळजीपूर्वक सांभाळणाऱ्या त्या गरीब चित्रकाराची आठवण येत असे आणि आपल्या कोंदट पोटमाळ्यावर बसून शिळा पाव खाण्यापेक्षा त्याने या टेबलावर आपल्यासमोर बसून हे सुंदर पदार्थ खावेत असे तिला वाटे. तुम्हाला आधीच सांगितले आहे त्याप्रमाणे तिचे हृदय अतिशय कनवाळू आणि दयाळू होते.
त्याच्या व्यवसायाबाबतच्या आपल्या तर्काची पुष्टी करण्यासाठी मिस मार्थाने एक युक्ती योजली. तिने अलीकडेच एका सेलमध्ये एक पेंटिंग विकत घेतले होते व ते आपल्या बेडरूममध्ये लावले होते. ते काढून तिने ते बेकरीमध्ये पावाच्या काऊंटरमागच्या शेल्फवर ठेवले.
पेटिंगमध्ये व्हेनिसमधील एक दृश्य होते. चित्रात दर्शनी भागात एक भव्य संगमरवरी चौक होता. (तसे मुळी चित्रावर लिहिलेलेच होते.) हा भव्य चौक पाण्याला लागूनच होता. पाण्यात गोंडोला (त्यात पाण्यात हात घालून बसलेल्या स्त्री सकट.) ढग, आकाश या सगळ्यात छाया-प्रकाशाच्या खेळाचा भरपूर उपयोग केला होता. कुठल्याही चित्रकाराचे लक्ष या चित्राकडे वेधले गेलेच असते.
दोन दिवसांनी तो गृहस्थ आला.
‘‘कृपया दोन शिळे पाव द्या.’’
‘‘तुमचे हे चित्र तर फार सुंदर आहे मॅडम!’’ तो आपल्या जर्मन वळणाच्या इंग्रजीत म्हणाला.
‘‘होय ना?’’ पाव बांधून देता देता मार्था म्हणाली, मीसुद्धा कलेची चाहती आहे. (नाही! कलाकारांची वा चित्रकारांची चाहती म्हणणं जरा घाईचं होईल!!) आणि पेंटिंग्जचीही. हे पेंटिंग चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं ना?’’
‘‘उत्तम चित्रात नेहमीच तोल सांभाळलेला असतो असे नाही’’, तो म्हणाला, ‘‘त्यातली प्रमाणबद्धताही नेहमी खरी नसते. गुड मॉर्निग मॅडम.’’
त्याने त्याचे पाव घेतले. कमरेत थोडे झुकून तिला अभिवादन केले आणि घाईघाईने निघून गेला.
होय. तो नक्कीच चित्रकार असला पाहिजे. मिस मार्थाने ते चित्र परत आपल्या बेडरूममध्ये नेऊन ठेवले.
चष्म्याच्या काचेआडून त्याचे मृदू आणि दयाळू डोळे कसे चमकत होते! त्याच्या भुवया कशा जाड आणि रेखीव होत्या, चित्रातली प्रमाणबद्धता त्याने कशी एका दृष्टिक्षेपात ओळखली आणि अशा या गुणी कलावंताला शिळ्या पावावर गुजराण करावी लागावी ना! परंतु साऱ्याच अलौकिक प्रतिभेच्या चित्रकाराला दोन हजार डॉलर्स बँकबॅलन्स, एक बेकरी आणि एक कनवाळू हृदय यांचे पाठबळ मिळाले तर कलाक्षेत्रात किती चांगले होईल ना!
पण हे सारे स्वप्नरंजनच आहे, बरे मिस मार्था!!
आता, अलीकडे तो आला की, काऊंटरच्या पलीकडून थोडय़ा गप्पा मारीत असे. मिस मार्थाची आनंदी बडबड ऐकण्यासाठी जणू तो आसुसलेला असे.
परंतु तो कायम शिळा पावच खरेदी करीत राहिला. केक, अ‍ॅपल पाय किंवा इतर कुठलाही रुचकर पदार्थ न घेता फक्त शिळा पाव घेत राहिला.
दिवसेंदिवस तो बारीक आणि निराश दिसू लागला आहे, असे तिला वाटू लागले. त्याची ती दोन शिळ्या पावांची अपुरी खरेदी पाहून तिच्या हृदयात कळ उठे. त्याला काहीतरी ताजे, चविष्ट, पोट भरणारे खाद्यपदार्थ द्यावेत म्हणून तिच्या मनाची घालमेल होई, पण ते देण्याची तिची हिंमत होत नसे. अशाने त्याचा अपमान होईल, असे तिला वाटे. कलावंत अतिशय स्वाभिमानी असतात हे तिला माहीत होते.
अलीकडे मिस मार्थाची राहणीही टापटिपीची होऊ लागली होती. काऊंटरपलीकडे उभे राहताना ती निळ्या ठिपक्यांचे रेशमी जाकीट घालू लागली. बेकरीमागच्या छोटय़ा खोलीत ती क्वीन्सची फळे आणि बोरॅक्स यांचा विलक्षण काढा उकळवून पिऊ लागली. हा काढा बायका आपली कांती तेजस्वी करण्यासाठी पितात हे तिला माहीत होते.
एके दिवशी तो नेहमीप्रमाणे आला. पाच सेंटचे नाणे त्याने काऊंटरवर ठेवले आणि दोन शिळ्या पावांची मागणी केली. मिस मार्था ते घ्यायला वळतच होती तेवढय़ात एक मोठा कर्कश घणघणाट ऐकू आला. आणि आगीचा बंब जवळ येऊ लागला.
साहजिकच काय झाले आहे ते बघायला तो दाराकडे धावला. मिस मार्थाच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली आणि तिने या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले.
दहा मिनिटांपूर्वी तिच्या दूधवाल्याने किलोभर ताज्या लोण्याचा मोठा गोळा आणून दिला होता. काऊंटरमागच्या शेल्फच्या खालच्या खणात तो होता. एका मोठय़ा सुरीने तिने दोन्ही पावांमध्ये खोल खांचा केल्या, त्यामध्ये भरपूर लोणी भरले आणि पाव दाबून होते तसे केले.
तो जेव्हा दारातून परत आत वळला तेव्हा ती पाव कागदात गुंडाळत होती.
नेहमीप्रमाणे चार इकडच्या तिकडच्या गप्पा करून तो जेव्हा गेला तेव्हा आपले धडधडते हृदय आवरीत मिस मार्था स्वत:शीच हसली.
तिने जरा जास्तच धीटपणा दाखवला होता का? तो दुखावला तर जाणार नाही ना? नक्कीच नाही! खाद्यपदार्थ थोडेच बोलू शकतात? आणि लोणी हे काही एका कुमारिकेच्या फाजील धारिष्टय़ाचे द्योतक होऊ शकत नाही!
त्या साऱ्या दिवसभर ती याच गोष्टीचा विचार करीत राहिली. तिने केलेली ही गोड फसवणूक लक्षात आल्यावर तो काय करेल याची ती कल्पना करीत राहिली.
त्याच्या त्या पोटमाळ्यावरच्या खोलीत स्टॅण्डवर कॅनव्हास ठेवून तो आपले पेंटिंग करीत असेल- कलासमीक्षकांनाही ज्यात उणिवा सापडणार नाहीत अशी प्रमाणबद्धता असणारे ते पेंटिंग- आपले रंग आणि ब्रश तो आता बाजूला ठेवील-
कोरडा पाव आणि पाणी एवढेच असलेले आपले जेवण घेण्याची तो तयारी करेल. तो पावाचा एक मोठासा तुकडा कापेल आणि- ओ?
मिस मार्था लाजली. खाता खाता ते लोणी तिथे ठेवणाऱ्या हातांचा तो विचार करेल का? तो आपला..?
बेकरीच्या दाराची बेल कर्कशपणे वाजली. कुणीतरी धाडधाड पावले टाकीत आत येत होते.
मिस मार्था दरवाजाकडे धावली. तेथे दोघेजण उभे होते. त्यापैकी एकजण तरुण होता. त्या पाईप ओढणाऱ्या तरुणाला तिने पूर्वी कधीच पाहिले नव्हते. दुसरा माणूस तिचा चित्रकार होता.
त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. नेहमी काळजीपूर्वक डोक्यावर बसणारी हॅट मागे सरकली होती. केस अस्ताव्यस्त झाले होते. त्याने दोन्ही हातांच्या मुठी वळल्या होत्या आणि तो त्या उगारून तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होता- तिच्याकडे- मिस मार्थाकडे!
‘‘मूर्ख!’’ तो किंचाळला ‘‘बेअक्कल बाई!’’ (बाई..? मिस मार्था मनातल्या मनात विव्हळली)
तो तरुण माणूस त्याला बाजूला न्यायचा प्रयत्न करू लागला.
‘‘मी जाणार नाही! मी तिला सांगितल्याशिवाय जाणार नाही..’’ आपल्या हातांनी काऊंटर बडवत तो रागाने उद्गारला.
‘‘तुम्ही माझा पुरता सत्यानाश केला आहे’’ तो ओरडत होता. त्याचे निळे डोळे चष्य्याआडून आग ओकत होते. ‘‘एखाद्या मांजरीसारखे नको त्या गोष्टीत नाक खुपसायची तुम्हाला काय गरज होती?’’
मिस मार्थाचे हातपाय गळले. तिने मागच्या शेल्फचा आधार घेतला आणि एका हाताने आपले रेशमी जॅकेट घट्ट पकडले. त्या तरुणाने चित्रकाराचा खांदा धरून त्याला बाहेर न्यायचा प्रयत्न केला.
‘‘चला चला! आता पुरे झाले!!’’ तो तरुण म्हणाला. त्याने चित्रकाराला कसेबसे दरवाजाबाहेर काढून फुटपाथवर नेले आणि मग तो परत आत आला.
‘‘मला वाटतं, हा सगळा काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगितलंच पाहिजे.’’ तो तरुण म्हणाला. ‘‘या गृहस्थाचं नाव ब्लूमबर्गर आहे. तो आर्किटेक्चरल ड्रॉईंग्ज काढणारा ड्राफ्टस्मन आहे. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. नव्या सिटी हॉलच्या आराखडय़ावर तो गेले तीन महिने काम करतो आहे. या आराखडय़ावर एक मोठी स्पर्धा ठेवली आहे. त्यावर एक मोठ बक्षीसही लावलेले आहे. त्याने आपला आराखडा पूर्ण करून सर्व रेषा शाईने फायनल केल्या. तुम्हाला माहीत आहे का, की प्रत्येक ड्राफ्टस्मन आपले ड्रॉईंग प्रथम पेन्सिलने काढतो आणि शाईने ते पूर्ण केले की पेन्सिलच्या रेषा पुसण्यासाठी तो शिळ्या पावाचा चुरा वापरतो. इंडियन रबरापेक्षाही तो जास्त चांगले काम करतो.’’
‘‘ब्लूमबर्गर इतके दिवस येथूनच पाव खरेदी करत होता. पण मॅडम काय सांगू, लोण्याने माखलेला पाव म्हणजे त्याच्या ड्रॉईंगचे, त्याच्या तीन महिन्यांच्या मेहनतीचे काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना नाही- ते ड्रॉईंग आता काही उपयोगाचे राहिले नाही. रेल्वेत सँडविच विकणारा फक्त आपली सँडविच गुंडाळण्यासाठी ते वापरू शकेल.’’
मिस मार्था जड अंत:करणाने मागच्या बाजूच्या छोटय़ा खोलीत गेली. तिने आपले निळ्या ठिपक्यांचे रेशमी जाकिट काढून टाकले व पूर्वीचा तपकिरी रंगाचा जुना सर्जचा कोट चढवला आणि क्वीन्सची फळे आणि बोरॅक्सचा काढा खिडकीतून बाहेर फेकून दिला.
मूळ कथा- ओ. हेन्री.
अनुवाद- शीला कारखानीस

प्राध्यापिका म्हणून सखीचा आज पहिलाच दिवस. सखीने वर्गात पाऊल टाकायला आणि कोणाच्या तरी मोबाईलवर ‘वेलकम’ची धून वाजायला एकच गाठ पडली. किंचित संकोचत, किंचित स्मितहास्य करत सखीने प्लॅटफॉर्मवरच चढून खुर्चीकडे जाताना नेमका साडीचा पदर टेबलाच्या कोपऱ्यावर अडकला. लगेच मोबाईलवर धून वाजली, ‘काँटोसे खिंचके ये आँचल,’ सखीने पदर नीट सोडवून घेतला आणि खुर्चीवर बसण्यापूर्वी भरलेल्या वर्गाकडे एक अशांत नजर फिरवली. जेवढी मुलं तेवढे मोबाईल्स आणि तेवढे रिंगटोन्स कमीत कमी. शिवाय कोणाकोणाकडे दोन- दोन मोबाईल्स. आज आपलं काही खरं नाही. शिवाय ही साडी सावरत शिकवायचं. कठीणंच दिसतंय एकंदरीत.
बापुडवाणं झालं तिचं तोंड. तेवढय़ात पाठच्या बेंचवरून धून वाजली. ‘ये दिल ना होता बेचारा’. सखीने लगेच चेहऱ्यावरून इस्त्री फिरवली. पडलेलं तोंड नीट केलं. आणि कॅटलॉग उघडला. ‘येस मॅडम’, ‘प्रेझेंट मॅडम’, ‘याप्’, ‘येप्’, ‘या’- अशा निरनिराळ्या शब्दांत मुलं प्रेझेंटी देत होती. तेवढय़ात ‘‘मे आय कम इन मॅडम?’’ दरवाजातून एका पिवळ्या- धम्मक सलवार- कमीजने विचारलं. लगेच डाव्या रांगेतून धून आली. ‘निंबुडा- निंबुडा- निंबुडा’. वर्गभर खसखस पिकली. ‘‘येस कम इन’’, सखी म्हणाली. पण ते पिवळं लिंबू कुठल्याशा बाकावर जाऊन स्थिरावल्यानंतरही निंबुडाची धून आणि खसखस चालूच होती. वर्गाला शांत करण्यासाठी सखीने टेबलावर दोन्ही हातांचे तळवे आपटले. ‘ढप- ढप- ढप- ढप’. लगेच उजव्या रांगेतला मोबाईल वाजला, ‘नगारा नगारा- नगारा बजा’. पुन्हा वर्गभर हशाची लाट उसळली. प्रेझेंटी घेऊन होता- होता मधल्या फळीतला मोबाईल वाजू लागला, ‘सागर जैसी आँखोवाली ये तो बता तेरा नाम है क्या’, आपल्यासाठी ही धून वाजलीय हे न कळल्यासारखं दाखवत सखीने शिकवायला सुरुवात केली. पण सहजासहजी ऐकतील तर ती कॉलेजची मुलं कसली? आणि योग्य वेळी न वाजतील तर ते त्यांचे मोबाईल कसले? सखीने उत्तर देण्याआधीच पुढच्या रांगेतल्या मुलीच्या मोबाईलवर धून वाजली, ‘मेरा नाम है चमेली’. चला मिळालं बुवा परस्परच उत्तर, असा विचार करत सखीने शिकवणं सुरूच ठेवलं. पाचव्या बाकावरची दोन मुलं मजेत गप्पा मारताहेत पाहून मात्र रागावली ती. ‘‘मी इथं शिकवतेय आणि तुमचं लक्ष नाहीये अजिबात.’’ ताबडतोब मोबाईल बोलायला लागला, ‘सबकुछ सिखा हमने, न सीखी होशियारी.’
मग मात्र सखीला अत्यंत संताप आला. ती ताड्कन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर पाय आपटून म्हणाली, ‘‘स्टॉप धिस नॉन्सेन्स.’’ तेवढय़ात धून वाजली, ‘लाल छडी मैदान खडी, क्या खूब लडी.’ आपण लाल रंगाची साडी नेसलोय आणि धून आपल्याला उद्देशूनच आहे, हे सखीला कळलंच.
‘‘मी आता प्रिन्सिपलकडे तक्रारच करणाराय तुमची.’’- मुलं हसली.
‘‘हसताय काय? खोटं नाहीये सांगत.’’
‘झूट बोले कौआ काटे, काले कौअेसे डरियो’. या वेळी धून चक्क पहिल्या बाकावरून वाजली.
‘‘वा! पहिल्या बाकावरची मुलं सिन्सिअर असतात, हा माझा समज खोटा ठरवलाय तुम्ही.’’
लगेच त्याच बाकावरच्या दुसऱ्या मुलीचा मोबाईल वाजला, ‘साथी हाथ बढाना साथी रे’ सखी म्हणाली, ‘‘काय म्हणू तरी काय मी तुम्हाला?’’
या वेळी मोबाईल नव्हे तर सगळ्यांनी तोंडानेच धून वाजवली, कोरसमध्ये, ‘‘कुछ ना कहो. कुछ भी ना कहो,’’ कधी एकदा लेक्चर संपल्याचे टोले पडतायत आणि कधी एकदा वर्गाबाहेर पडतोयसं झालं होतं सखीला. अख्ख्या वर्गाचं कोरस सुरूच होतं, ‘समय का यह पल थमसा गया है.’
या वेळी सखीच्या मोबाईललाच कळलं काय म्हणावं ते- ‘है हाल तो दिलका तंग तंग, तू रंग जा मेरे रंग- रंग, बस चलना मेरे संग- संग, है गुजारिश.’
‘‘थ्री चिअर्स फॉर मॅडम, हिप हिप’’ मुलांनी ‘‘हुर्रे’’ म्हणायच्या आधीच लेक्चर संपल्याची घंटा झाली आणि सखीबरोबरच सगळा वर्गही ‘चलना मेरे संग संग’ झाला.
वर्गात मोबाईल आणायला बंदी व्हावी आणि आणलेच तर ‘स्विच्ड ऑफ’ ठेवावे, अशी मागणी करायला सखीने सरळ प्रिन्सिपलची खोली गाठली. दारावर ‘टक टक’ केले.
‘‘कम इन,’’ प्रिन्सिपल म्हणाले. सखीचा लालबुंद चेहरा पाहून सरांनी विचारलं, ‘‘काय झालं मिस टिपणीस?’’
‘‘मोबाईलचं अतिक्रमण होतंय सर शिकवण्यावर. आज अख्ख्या लेक्चरमध्ये एक वाक्यदेखील शिकवू दिलं नाही मुलांनी मला.’’
‘‘आज पहिलाच दिवस आहे मिस टिपणीस. आज असंही शिकवणं अपेक्षित नव्हतंच. शिवाय आज ‘मोबाईल डे’ पण आहे ना?’’
‘‘मोबाईल डे? असा ‘डे’पण सुरू झालाय का सर?’’
‘‘होय. आणि सर्वाधिक रिंगटोन्स सादर करणाऱ्या वर्गाला विद्यार्थी मित्र मंडळाने बक्षीसही लावलंय.’’
‘‘काय म्हणताय सर? पण उद्यापासून तरी काही तरी कारवाई केली पाहिजे सर. नाही तर शिकवणार कसं?’’
‘‘काही घाबरू नका मिस टिपणीस’’ पुढचं सरांचा मोबाईलच म्हणाला, ‘जिसका है ये तुमको इंतजार मैं हूँ ना?’
सखी काय बोलणार? बाहेर पडता पडता दोनच शब्द तिच्या ओठी होते, ‘‘जय हो.’’
डॉ. सुमन नवलकर

तीन मित्र आपल्या बाईकवरून भरधाव वेगाने गावातील चौकातून चालले होते, त्यांना अशा स्थितीत पाहून ट्रॅफिक पोलिसाने त्यांना हात दाखवला. त्याच वेळी तिघांतील एक ओरडला, ‘‘हवालदारसाहेब.. बाजूला बघा! आम्ही तिघेच इतक्या मुश्किलीने बसलो आहोत, त्यात आणखी तुम्ही कुठे बसणार?’’

पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या एका महिला उमेदवाराला परीक्षेत कॉपी करताना पाहून परीक्षक म्हणाला, ‘‘मॅडम, तुम्ही जर फक्त रोज एक तास अभ्यास केला असता, तर तुम्हाला इतके कष्ट पुरले नसते,’’ कॉपीच्या मोठय़ा गठ्ठय़ाला नाचवत ती महिला ओरडली, ‘अभ्यास केलेला आहे ना सर! त्यामुळेच तर उत्तरे इतक्या पटापट सापडताहेत!’
-आर. ए. कौर, जळगाव.

एका वकिलास समजते, की आपल्या अशिलाने केसचा निकाल लागण्याच्या दोन दिवस आधी न्यायाधीशास बरेच पैसे लाच म्हणून दिलेयत.
वकील (अशिलास) : तू नक्की केस करणार, कारण तो न्यायाधीशांनाच घेण्याच्या विरोधात आहे.
अशील : नाही मीच जिंकणार ही केस, कारण मी पैसे विरुद्ध पार्टीच्या वतीने पाठवलेयत!
-रमेश कारेकर, कोथरूड, पुणे.

बराच वेळ ड्रम वाजवून सतावणाऱ्या मुलास समजाविण्याच्या सुरात बाबा म्हणाले, ‘‘तू आता या वेळी घरात वाजवत बसू नकोस. ही वेळ माझी वाचण्याची, रेडिओवरील बातम्या ऐकण्याची व गाणी ऐकण्याची आहे.’’
मुलगा : ‘‘बरं बाबा. मी वचन देते, की मी आता तुम्हाला बिलकूल त्रास देणार नाही. तुम्ही झोपल्यावर वाजवीन!’’
-रमेश कारेकर, कोथरूड, पुणे.

वैद्य : ‘हं सांगा आपल्याला काय होतंय?’
रोगी : ‘वैद्यजी माझ्या कंबरेत ना अचानक दुखायला लागतं.’
वैद्य : अच्छा, मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो, कंबरेत कळ किंवा दुखायला लागायच्या बरोबर २० मिनिटे अगोदर या गोळ्या घ्यायच्या. कळलं?

‘या आत या! कुत्र्याला घाबरू नका.’
हाडमोडय़ाने घरी आलेल्या पाहुण्यांना सांगितले ‘का काय तो चावत नाही?’
हेच तर आम्हाला पण पाहायचं
आ.. आजच नवीन आणलंय त्याला!

रेल्वेच्या रूळावर झोपलेल्या हाडमोडय़ाला एकाने विचारलं ‘आपण हे काय करताय?’ हाडमोडे म्हणाले, ‘मी मरायला आलोय’
‘अच्छा, पण मग काखेत चप्पला कशाला ठेवल्यात?’ ‘गाडी लेट होऊ शकते ना!’
-जयकिशोर नार्वेकर, मालाड

एक कारकून : गरीब बिचारा आचरेकर, अगदी ठार बहिरा झालाय, मला वाटतंय, की त्याची नोकरी बहुधा जाणार! दुसरा कारकून : तू मूर्ख आहेस, साहेबांनी त्याची जास्त पगारावर- तक्रार निवारण विभागप्रमुख म्हणून नेमणूक करणार आहेत.
-रमेश कारेकर, कोथरूड, पुणे.

छापता छापता
आमचे प्रतिनिधी गगनराव ठेंगणे यांजकडून,
कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे पाऊस पडतो असे वेधशाळेने सांगितल्यापासून अनेक शेतकरी कंबरेला कमी दाबाचे पट्टे बांधू लागले आहेत. या अंधश्रद्धेचा नरेंद्र दाभोलकर यांनी निषेध व्यक्त केला असून, पट्टय़ांचे उत्पादक व वेधशाळा यांनी एकत्र येऊन रचलेला हा डाव असल्याचा आरोप केला आहे.

उंच इमारती व पूल यांचे अडथळे येत असल्याने सलगपणाने स्कायरेल उभारणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. यावर उपाय म्हणून ही रेल्वे टप्प्याटप्प्याने कार्यरत होणार आहे व मधले अंतर प्रवाशांना कंपनी आपल्या खर्चाने चालत नेणार असल्याचे समजते.

You know what I did before I married? Anything I wanted to.
Henny Youngman

My wife and I were happy for twenty years. Then we met.
Rodney Dangerfield

A good wife always forgives her husband when she's wrong.
Milton Berle

Marriage is the only war where one sleeps with the enemy.
Anonymous

First Guy (proudly): "My wife's an angel!"
Second Guy: "You're lucky, mine's still alive."

Happy Married life
मुकुंद देशमुख
mukdesh123@rediffmail.com