Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

भारताच्या व्हॉइसरायनी पं. बापूदेव शास्त्रींच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन त्यांना अनेक पदव्यांनी सन्मानित केले होते. इ.स. १८७७ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया ‘राजराजेश्वरी’ झाल्याच्या सन्मानार्थ भारतीय विद्वानांना पदके प्रदान करण्यात आली. त्यात पं. बापूदेव शास्त्री अग्रगण्य होते. पुन्हा इ.स. १८७८ मध्ये १ जानेवारीला व्हिक्टोरिया राणीच्या निमित्ताने जो विशेष समारंभ झाला, त्यात पं. बापूदेवजींना सी. आय. ई.च्या उपाधीने विभूषित करण्यात आले. संस्कृत पंडितांमध्ये हा मान मिळविणारे ते सर्वप्रथम होते. इ.स. १८८७ मध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णजयंती निमित्ताने संस्कृत पंडितांच्या सन्मानार्थ ‘महामहोपाध्याय’ पदवी देण्याची सुरुवात करण्यात आली. त्याचे सर्वप्रथम मानकरी होते- पं. बापूदेव शास्त्री.
इ.स. १८९० मध्ये सात जूनला काशी येथे पं. बापूदेव शास्त्री यांचे देहावसान झाले.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात विद्वान पंडितांची उज्ज्वल परंपरा प्रकर्षांने मंडित झाली आहे. या मांदियाळीत पं. बापूदेव शास्त्रींचे कार्यकर्तृत्व दीपस्तंभासारखे राहिले आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरीच्या आसपास बेलणेश्वर नावाचे गाव आहे. तेथील बेलणेश्वर महादेवावरून या गावाचे नाव पडले. तेथे वेदपाठ परायण असलेले परांजपे आडनावाचे कुटुंब राहत असे. निरंतर महादेवाच्या उपासनेत असल्याने हे कुटुंब देव-परांजपे
 

नावाने ओळखले जाऊ लागले. काही कारणास्तव येथील चिंतामणी परांजपे हे बेलणेश्वर सोडून अहमदनगर जिल्ह्य़ातील ‘काय गाव टोका’ या गावास स्थलांतरित झाले. त्यांच्या मुलाचे नाव सदाशिव होते व त्यांच्या मुलाचे नाव होते सीताराम.
सीतारामशास्त्रींच्या पत्नी सत्यभामा. त्यांच्या पोटी बापूदेवचा जन्म कार्तिक शुक्ल षष्ठी, रविवार विक्रमी संवत १८७६ म्हणजेच इ.स. २४ ऑक्टोबर १८१९ ला झाला. वडिलांनी मुलाचे नामकरण ‘नृसिंह’ असे केले. परंतु प्रेमापोटी सर्वजण त्याला ‘बापू’ या नावानेच संबोधित असत. लहानपणच्या या नावानेच ते पुढे जीवनभर ओळखले गेले. लहानपणी बापू नेहमी आजारी राहत असल्याने आई सत्यभामा फार काळजीत राहायची. अगोदरची काही मुले न वाचल्याने त्या फार उदास असायच्या. कुलदेवता नरसिंहाची उपासना फलदायी ठरून नरसिंहाने स्वप्नात येऊन सांगितले की, हा शिशू चिरंजीवी व भाग्यशाली होऊन कुलाची प्रतिष्ठा वाढवेल. स्वप्नातील या आशीर्वादाने आनंदित सत्यभामा याच दिवशी बापूचा वाढदिवस साजरा करू लागली.
त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे बापूचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीस अष्टाध्यायी, पिंगलसूत्र, रूपावली, अमरकोश इ. ग्रंथांचे अध्ययन त्याने केले. मौंजीनंतर वेदपठण केले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे विस्मृती होऊ लागली. तेव्हा सीतारामशास्त्री नागपूरला नोकरी करीत होते. म्हणून बापूला ते नागपूरला घेऊन गेले. तेथे रघुवंश, लघुकौमुदी इ. ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे नोकरीच्या बदलीमुळे वडिलांबरोबर बापू पुण्यास गेला. तेथे पं. पांडुरंग तात्या दिवेकर यांच्या पाठशाळेत गणितशास्त्राचे अध्ययन केले. परंतु वडिलांबरोबर ते पुन्हा नागपुरास आले. येथे पं. धुंडिराज मिश्र यांच्याकडून लीलावती, बीजगणित इ. प्रसिद्ध ज्योतिष ग्रंथांचे शिक्षण घेतले.
बापूदेवांचे वडील सीताराम शास्त्री यांचे स्नेही एक आंग्ल विद्वान लान्सलाट विल्किन्सन हे त्यावेळेस सिहोर येथील ‘पोलिटिकल एजन्ट’ होते. ते पाश्चात्त्य गणिताचे विद्वान होते. त्यांनी बापूच्या हुशारीबद्दल प्रशंसा ऐकल्यावर नागपूरला त्याला भेटावयास बोलावले. त्या भेटीत बीजगणितासंबंधीच्या त्याने दिलेल्या उत्तराने विल्किन्सनसाहेब अतिशय खूश झाले. परंतु सिद्धांत गणिताबाबत त्याचे ज्ञान तोकडे आहे असे पाहून बापूदेवला ते सिहोरला घेऊन गेले. तेथे पं. सेवाराम यांच्याकडे ‘सिद्धान्त शिरोमणी’ ग्रंथाचे अध्ययन करण्याची त्यांनी व्यवस्था केली. तसेच बीजगणित व रेखागणित स्वत: विल्किन्सन साहेब शिकवीत. अशा तऱ्हेने बापूदेवने गणित विषयात पारंगतता मिळविली. इतके प्रगाढ पांडित्य प्राप्त झाल्यावर गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज काशीच्या ज्योतिष विभागाचे अध्यापकपद मिळावे, अशी बापूंची इच्छा होती. परंतु विल्किन्सनसाहेबांच्या अचानक निधनामुळे त्यांची इच्छा तेव्हा पूर्ण होऊ शकली नाही. लान्सलाटचे भाऊ मेजर टी. विल्किन्सन नंतर नागपूरचे रेसिडंट नेमले गेले. बापूदेवने एका प्राचीन शिलालेखाची नक्कल इतकी सुंदर व शुद्ध तयार करून साहेबास दिली, ज्यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी २०० रुपयांचा पुरस्कार दिला व त्यांच्या शिफारशीनुसार बापूदेव शास्त्रींची १५ फेब्रुवारी १८४२ ला गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज काशी येथे ज्योतिष अध्यापकपदावर नियुक्ती झाली.
त्याकाळी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पाठय़पुस्तकांचा फारच अभाव असे. तेव्हा बापूदेव शास्त्रींनी सिद्धांत तथा गणितशास्त्री विषयाचे नवीन ग्रंथांची निर्मिती व संपादन केले. इंग्रजी भाषेचेही अध्ययन केले. बापूदेव शास्त्रींची विद्वत्ता, विनयशीलता व ग्रंथलेखन यामुळे सर्व विद्यार्थी व प्रिन्सिपॉल वेलेन्टाइन प्रसन्न व प्रभावित झाले. आठ वर्षे अध्यापन झाले. इ.स. १८५० मध्ये काशीचे कलेक्टर मॅकलॉइडसाहेबांनी बापूदेव शास्त्रींना गणित विषयावरील ग्रंथांची निर्मिती करण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी ‘बीजगणित’ ग्रंथ हिंदी भाषेत लिहून १८५० मध्ये मुंबईहून प्रकाशित केला. या विद्वत्तापूर्ण पुस्तकासाठी तेव्हाच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी बापूदेव शास्त्रींना दोन हजार रु. पुरस्कार देऊन सन्मान केला. त्याच सुमारास ‘इंग्लिश जर्नल ऑफ एज्युकेशन’ या नियतकालिकात सिद्धान्त ज्योतिष विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये अनेक चुका असल्याचे बापूदेव शास्त्रींनी दर्शवून दिल्याने लेखकास त्या मान्य कराव्या लागल्या. इ.स. १८६१ मध्ये बापूदेव शास्त्रींनी ‘सूर्यसिद्धांत : सोपपत्तिका’ नामक ग्रंथाची रचना केली. तिचे इंग्रजी भाषांतर लान मिलेट विल्किन्सन यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या ‘बिब्लोथिका इंडिका’ ग्रंथमालेत टिपणींसहित प्रसिद्ध केले आहे. याच ग्रंथाच्या ‘गोलाध्याय’चा सुद्धा इंग्रजी अनुवाद प्रकाशित होऊन ख्यातीप्राप्त झाला. पाश्चात्त्य गणित तत्त्वावर आधारित त्यांचा संस्कृतमधील ‘सरल त्रिकोणमिती’ ग्रंथ शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही आजही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
महामनीषी पं. बापूदेव शास्त्रींनी संस्कृतमध्ये १२ ग्रंथ, हिंदीमध्ये ४ ग्रंथ तर इंग्लिशमध्ये २ ग्रंथ इ.स. १८५० ते १८७५ या काळात प्रसिद्ध केले. त्यांची सूची पुढीलप्रमाणे- संस्कृत १. सूर्यसिद्धांत- सोपपत्तिका, २. फलितविचार, ३. सायनवाद : ४. मानमंदिर- वर्णनम, ५. प्राचीन- ज्योतिषाचार्याशय- वर्णनम, ६. तत्त्वविवेक- परीक्षा, ७. विचित्र- प्रश्नसंग्रह: सोत्तर: ८. अतुलयंत्रम्, ९. पंचक्रोशियात्रानिर्णय: १०. नूतनपंचांगनिर्माणम, ११. पंचांगोपपादनम, १२. सिद्धांत शिरोमणि ग्रंथे चलगणितम.
हिंदी : १. बीजगणितम् २. व्यक्तगणितम् ३. भूगोलवर्णनम् ४. खगोलसार:
इंग्लिश : १. एलिमेंट्स ऑफ अरिथमेटिक, दोन भाग, २. एलिमेंटस् ऑफ अलजिब्रा.
पं. बापूदेव शास्त्री यांना त्यांच्या अलौकिक विद्वत्तेसाठी अनेक मानसन्मान प्राप्त झाले. इ.स. १८६४ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल (एशियाटिक सोसायटीची मानद सदस्यता ऑनरेरी मेंबर) प्रदान करण्यात आली. ‘सूर्यसिद्धांत’ या ग्रंथाची पंजाबचे तेव्हाचे गव्हर्नर मॅकलॉइड यांनी भरपूर प्रशंसा केली. ‘बीजगणित’च्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनावर प्रसन्न होऊन तेव्हाचे ले. गव्हर्नर सर विलीयम म्युअर यांनी पं. बापूदेव यांना प्रयाग येथे किमती रेशमी वस्त्र व एक सहस्र मुद्रा देऊन सन्मानित केले. त्यांच्या विद्वत्तेचा आदर व्हावा म्हणून इ.स. १८७० मध्ये भारताच्या व्हॉइसरॉयने बापूदेव यांना कोलकाता विश्वविद्यालयाचे मानद सदस्यत्व (फेलो) बहाल केले. त्यांनी सूर्य व चंद्रग्रहणाची निर्धारित केलेली वेळ क्षणभरही बदलली नाही. याने प्रसन्न होऊन काश्मीर महाराजांनी इ.स. १८७३ मध्ये त्यांना पश्मीनाची महागडी शाल व एक सहस्र मुद्रा देऊन गौरवान्वित केले. इ.स. १८७५ मध्ये काशीनरेशांच्या विनंतीनुसार त्यांनी नव्या नूतन पंचांगाची सुरुवात केली. त्यासाठी महाराजांनी त्यांना दोनशे रुपयांचे पेन्शन जाहीर केले.
भारताच्या व्हॉइसरायनी पं. बापूदेव शास्त्रींच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन त्यांना अनेक पदव्यांनी सन्मानित केले होते. इ.स. १८७७ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया ‘राजराजेश्वरी’ झाल्याच्या सन्मानार्थ भारतीय विद्वानांना पदके प्रदान करण्यात आली. त्यात पं. बापूदेव शास्त्री अग्रगण्य होते. पुन्हा इ.स. १८७८ मध्ये १ जानेवारीला व्हिक्टोरिया राणीच्या निमित्ताने जो विशेष समारंभ झाला, त्यात पं. बापूदेवजींना सी. आय. ई.च्या उपाधीने विभूषित करण्यात आले. संस्कृत पंडितांमध्ये हा मान मिळविणारे ते सर्वप्रथम होते. इ.स. १८८७ मध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णजयंती निमित्ताने संस्कृत पंडितांच्या सन्मानार्थ ‘महामहोपाध्याय’ पदवी देण्याची सुरुवात करण्यात आली. त्याचे सर्वप्रथम मानकरी होते- पं. बापूदेव शास्त्री.
पं. बापूदेव शास्त्रींचे भारतीय पंचांग निर्मितीत विशेष योगदान नेहमीच अविस्मरणीय राहील. त्यांच्या दृक्-सिद्ध पंचांगाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आधुनिक यंत्रांद्वारे निर्मित ग्रहवेधांवर आधारित आहे. या पंचांगाची सुरुवात बापूदेव शास्त्रींनी इ.स. १८७६ मध्ये केली. त्यांच्या नव्या पद्धतीस मान्यवर ज्योतिषांची मान्यता मिळावी म्हणून तेव्हाच्या परंपरेनुसार सभा बोलाविण्यात आली. बापूदेव शास्त्रींनी १५ पानी आपला सिद्धांत व भूमिका सभेपुढे सादर केली. प्रसिद्ध मैथिल ज्योतिषी नीलांबर झा यांनी नव्या प्रणालीचे खंडन करून विरोध दर्शविला. बराच वेळ चर्चा होत राहिली. परंतु त्यांना इतर कुणीच साथ दिली नाही. त्यामुळे ते सभेतून निघून गेले. उपस्थितांनी बापूदेव शास्त्रींच्या मतांना मान्यता दिली. हे पंचांग आजही प्रकाशित होत असते.
काशीच्या गव्हर्मेट कॉलेजमध्ये ४७ वर्षे अध्यापन करून इ.स. १८८९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तेव्हा त्यांचे वय ७० होते. त्याच्या पुढील वर्षीच म्हणजे इ.स. १८९० मध्ये सात जूनला काशी येथे त्यांचे देहावसान झाले.
सूर्यकांत कुळकर्णी


प्रश्नमंजूषा क्रमांक ९
(राजहंस प्रकाशनाच्या सहकार्याने)
उत्तरे
१. मराठीतल्या एका सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि सदरकाराने कोल्हटकरी नाटकांचे विडंबन करणारे ‘मेलो मेलो मेलो ड्रामा’ अर्थात ‘कोसळे आज इथे देव्हारा’ हे नाटक लिहिले. त्याचे लेखक कोण?
उत्तर : क. मुकुंद टाकसाळे. मराठी विनोदात मानाचे स्थान पटकावणारे मुकुंद टाकसाळे कथाकार आणि सदरकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अनंत कान्हो यांनी दिग्दर्शित केलेले ‘मेलो मेलो मेलो ड्रामा’ हे टाकसाळ्यांचे नाटक गाजले होते.
२. ‘साष्टांग नमस्कार’, ‘ब्रँडीची बाटली’सारख्या विनोदी नाटकांच्या लेखकाचे हे आत्मचरित्र आहे-
उत्तर : अ. कऱ्हेचे पाणी. आचार्य अत्रे यांची ही नाटके आणि विशेषत: ‘तो मी नव्हेच’ हे नाटक रंगभूमीवर विक्रमी ठरले आहे. अत्र्यांनी ‘श्यामची आई’, ‘ब्रह्मचारी’ यासारखे चित्रपटही काढले. त्यांचे तीन खंडातले आत्मचरित्र ‘कऱ्हेचे पाणी’ म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे.
३. गाडगीळांच्या ‘बंडू’ कथांमध्ये त्याची पत्नी स्नेहलता आणि हा मित्र नेहमी आढळतो-
उत्तर : ड. नानू. मराठी नवकथेचे एक उद्गाते गंगाधर गाडगीळ यांनी बंडू हे मध्यमवर्गीय पात्र निर्माण करून अनेक विनोदी कथा लिहिल्या. ‘बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती’सारख्या एकांकिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
४. ठणठणपाळ या नावाने जयवंत दळवी यांनी चालवलेल्या सदराचे नाव काय?
उत्तर : अ. घटका गेली पळे गेली. जयवंत दळवी यांचे हे खुमासदार शैलीतले सदर वीस वर्षांहून अधिक काळ चालले होते. साहित्य क्षेत्रातील घडामोडींवर मार्मिक विनोदी शैलीत चिमटी काढणारे हे सदर विलक्षण लोकप्रिय होते.
५. पुलंच्या साहित्याचे संकलन ‘पुलं एक साठवण’ या नावाने कोणी केले आहे?
उत्तर : ड. जयवंत दळवी. स्वत: उत्तम विनोदी लेखक असणाऱ्या जयवंत दळवी यांनी अत्यंत कष्टपूर्वक आणि उत्साहाने हे संपादनाचे काम केले.
६. जेम्स बाँड ब्रिटिश गुप्तहेराच्या व्यक्तिरेखेची टिंगल करणाऱ्या ‘जनू बांडे’ या व्यक्तिरेखेच्या विनोदी कथा कोणी लिहिल्या?
उत्तर : क. रमेश मंत्री. ‘सह्याद्रीची चोरी’सारख्या अफलातून विनोदी कथा लिहिणाऱ्या रमेश मंत्री यांनीच ‘जनू बांडे’च्या धमाल कथा लिहिल्या.
७. ‘माकडाच्या हाती शँपेन’ या नाटकाचे लेखक कोण?
उत्तर : क. विवेक बेळे. प्रेम आणि लग्न आणि त्याबाबतचे पूर्वग्रह यांची खुमासदार खिल्ली उडवणारे हे नाटक डॉ. विवेक बेळे यांनी लिहिले. पेन्सिल, चाकू आणि पुस्तक असल्या धमाल नावाच्या पात्रांच्या या नाटकातली आनंद इंगळेची भूमिका विशेष गाजली.
८. ‘निशाणी डावा अंगठा’ हा पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित चित्रपट कोणाच्या कादंबरीवर आधारित आहे?
उत्तर : अ. रमेश इंगळे. कागदावर आदर्श वाटणाऱ्या ‘साक्षरता अभियाना’सारख्या कोणत्याही योजनेचे अंमलबजावणीत कसेतीनतेरा वाजतात याचे अफलातून विनोदी चित्रण करणारी ही धमाल कादंबरी. रमेश इंगळे ‘ऐवजी’ या अनियतकालिकाचे संपादक आहेत.
९. अमेरिकेविषयी ‘एक बेपत्ता देश’ अशा शीर्षकाचा लेख ‘जावे त्यांच्या देशा’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात आहे. त्याचे लेखक कोण?
उत्तर : ब. पु. ल. देशपांडे. पुलंच्या युरोप आणि अमेरिकेच्या प्रवासवर्णनाचे हे गाजलेले पुस्तक. अतिशय प्रसन्न खुमासदार शैली आणि मार्मिक चिंतन ही पुलंच्या प्रवासवर्णनाची लक्षणे या पुस्तकात कळसाला गेली आहेत.
१०. खालीलपैकी कोणत्या पुस्तकास मानाचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार नाही?
उत्तर : ड. विशाखा. ज्ञानपीठविजेते लेखक- कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना मुख्यत: कवितेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. खांडेकरांना मात्र ‘ययाती’ या कादंबरीसाठीच ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले होते.
११. ‘हसरी गॅलरी’ या नावाने कोणत्या व्यंगचित्रकाराच्या चित्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे?
उत्तर : ब. शि. द. फडणीस. आपल्या वैशिष्टय़पूर्ण व्यंगचित्रांनी रसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या फडणीसांच्या निवडक हास्यचित्रांचे हे संकलन, किर्लोस्कर मासिकात पुलंचे प्रवासवर्णन ‘अपूर्वाई’ येत असे. त्याला फडणीसांच्या चित्रांची अप्रतिम सजावट होती.
१२. ‘व्यंकूची शिकवणी’ आणि ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ या गाजलेल्या विनोदी कथांचे लेखक कोण?
उत्तर : द. मा. मिरासदार. मुख्यत: ग्रामीण भागातील गमतीजमती आणि विसंगतींवर धमाल विनोदी कथा लिहिणाऱ्या मिरासदारांच्या निवडक कथांच्या ‘मिरासदारी’ या संग्रहात या दोन्ही कथा समाविष्ट आहेत.
संजय भास्कर जोशी
prashnamudra@gmail.com
विजेत्यांना ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे
प्रथम - रुपये १००० ,
द्वितीय- रुपये ५००, आणि
तृतीय- रुपये ३०० अशी बक्षिसे दिली जातील.
अकरा किंवा त्याहून जास्त उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना राजहंस प्रकाशनातर्फे सवलत कुपनांची भेट दिली जाईल.

तो..गेली कित्येक वर्षे तो तिथे उभा आहे.
त्यानं नक्की किती पावसाळे पाहिलेत,
हे कुणालाच नक्की माहीत नाही.
त्याच्या एकंदर विस्तारावरून
शंभरी गाठलेली असणार, याची खात्री पटते.
त्याच्या पारंब्या जमिनीत रुजत गेल्या, तसा सरत्या वर्षांगणिक त्याचा विस्तारही वाढत गेला.
जागेची टंचाई नव्हती,
की पाण्याची कमतरता नव्हती.
ज्याला जसं भावलं, तसं त्यानं तिथं साम्राज्य निर्माण केलं.
आपला वंशविस्तार त्यालाही सुखावत होता.
समृद्धीच्या खुणा वाढतच होत्या.
साहजिकच तिथे एक मस्त चौसोपी वाडाच तयार झाला.
पिढय़ांमागून पिढय़ा सामावल्या जाऊ लागल्या.
या भरल्या गोकुळात धुसफूस नाही. भांडणतंटे नाहीत.
कागाळ्या नाहीत.
कुरघोडी, सत्ता, स्पर्धा असे राजकारण नाही.
आहे ते फक्त सामंजस्यानं, आनंदानं राहणं.
live and let live चा संदेश देत.
त्यामुळेच त्याच्या छत्रछायेत घटकाभर विसावलं तरी मिळते प्रचंड मानसिक शांती-
जी आज खूप महाग झालीये. पैसे खर्च करूनही मिळत नाही.
पण हा मात्र त्याच्या छायेत विसावणाऱ्या
प्रत्येकाला ही शांती देतो.
फुकट आणि अगदी भरभरून.
देता घेशील किती दो करांनी, अशी अवस्था होते.
मोठे सगळ्या चिंता-काळज्या याच्या झोळीत घालून हळूहळू निश्चिंत होत असतात.
तेव्हा छोटे त्याच्याभोवती पिंगा घालण्यात मग्न असतात.
मुलांची पिकनिक घेऊन आलेल्या टीचर कौतुकानं
‘हँगिंग रूटस’ दाखवत असतात.
आतापर्यंत फक्त पुस्तकात पाहिलेली हँगिंग रूटस
प्रत्यक्षात बघताना छोटय़ांचे डोळे मोठे झालेले असतात.
तेच कुतूहल वृक्ष अभ्यासकांच्या चेहेऱ्यावर असतं.
तेही याचं वय, त्याची वैशिष्टय़े, त्याच्याबद्दलची माहिती एकमेकांबरोबर शेअर करत असतात.
वर्षांनुवर्षांची परंपरा याला..
प्रत्येकाकडे काही ना काही सांगण्याजोगं आहेच.
इथे अठरापगड जातीची, वेगवेगळी माणसं एकत्र झाली आहेत.
प्रत्येकजण वेगवेगळ्या हेतूनं आलेला.
आणि त्यानंही सगळ्यांना छान सामावून घेतलंय.
त्याला सवय झालीये याची.
येणाऱ्यांचं तो मनापासून स्वागत करतो.
मुंबईसारख्या अवाढव्य शहरात
एकमेकांच्या संगतीत वेळ काढण्यासाठी आलेल्या
त्या ‘दोघांना’ एक छानसा आडोसा मिळतो आणि
त्यांचा सगळ्या जगाशी संबंधच तुटतो.
ते त्यांच्या विश्वात रमलेले असताना,
झाडाखाली विसावलेल्या कुणा माहेरवाशिणीच्या डोळ्यात आठवणी दाटून येतात.
दोन पारंब्या एकत्र बांधून तयार केलेले झुले..
त्यावर बसून घेतलेले झोके, मारलेल्या गप्पा,
भावी आयुष्याची स्वप्न बघत केलेली चिडवाचिडवी..
नकळत काजळकडा ओलावतात.
तिला हलकेच जवळ घेता घेता
त्याचंही मन भूतकाळात जातं.
सूरपारंब्या खेळायला.
मित्रांबरोबर केलेली धमाल आठवते.
तोही नॉस्टॅल्जिक होतो.
मुलांना सूरपारंब्याबद्दल सांगायला लागतो.
मुलांचे चेहेरे कोरे.
कारण सूरपारंब्या म्हणजे काय
हेच माहिती नसतं.
बाबा, इथे सूरपारंब्या खेळूया आपण?
मुलं विचारतात.
तो आजूबाजूला नजर टाकतो.
अनेक दमले भागले जीव त्याच्या सावलीत पहुडलेले असतात.
सूरपारंब्या खेळून ते शांत क्षण त्यांच्या हातातून हिरावून घेण्याचं त्याच्या जिवावर येतं.
नाही रे बेटा, इथं शक्य नाही.. तो मुलांना समजावतो.
मुलं हाईड अँड सीक खेळायला निघून जातात.
बघता बघता दिवस उतरणीला लागतो.
घरटय़ाकडे परतायची वेळ होते.
पण निरोप घेण्याआधी अनेक दिवसांनी एकत्र आलेल्या सगळ्यांचा ग्रुप फोटो काढायचं ठरतं.
ग्रुप फोटोसाठी याच्या नैसर्गिक कमानीपेक्षा
अधिक योग्य जागा ती कोणती?
भराभरा सगळे त्या कमानीखाली उभे राहतात. अगदी ऐसपैसपणे. एक मस्त फोटो निघतो.
आजच्या दिवसाच्या आठवणी फोटोत बंदिस्त होतात.
ए, आम्हालाही फोटोची कॉपी पाठव हं..
सगळ्यांनी आवर्जून सांगितलेलं असतं.
तो कॉपीज काढतो. छान माऊंट करतो.
ती तिच्या सुवाच्य अक्षरात खाली लिहिते.
या वटवृक्षासारखेच दीर्घ आयुष्य आपल्याला लाभू दे.
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com