Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

कडक उन्हाळा पडला. तहानेनं जीव अगदी कासावीस झाला होता. कुणाचंही शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. पाणी प्यायला वर्गाबाहेर जायची परवानगी मागावी म्हटलं, तर शाळेतलंही पाणी संपलं होतं. केव्हा एकदाची शाळा सुटते, असं प्रत्येकाला वाटू लागलं. सर्वाची सारखी चुळबुळ सुरू झाली. कुणी पंख खाजवत होतं, कुणी वाकुल्या दाखवत होतं तर कुणी चोच मारत होतं.
अन् ‘काऽव काऽव काऽव..’ शाळेची घंटा वाजली. कल्लोळ सुरू झाला. साऱ्यांनीच कावकाव केली. वर्गानुरूप शिस्तबद्ध रांगेत बसलेले कावळे पंख फडफडवत सैरभैर उडू लागले. उकाडय़ामुळे हैराण झाल्यामुळे त्यांनी पंख पसरून घिरटय़ा घातल्या, पण नंतर दबक्या आवाजात पाणी - पाणी करत सारे पाण्याच्या शोधात निघाले.
काऊ, एकाक्ष व वायस- तिघा मित्रांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं होती. काऊने विचारलं, ‘‘काय करावं? पाण्याची शोधाशोध करायला कुठे जावं?’’
‘‘आपण प्रथम जंगलाकडे जाऊ,’’ वायसने सुचवलं.
‘‘जंगलाकडे का जायचं? तळं आटलं नि नदीही कोरडी पडली. पाणी कुठून मिळवणार?’’ एकाक्षने प्रश्न केला.
‘‘अरे, पाण्यासाठी खास बांधलेल्या कुंडात वन विभागाने निश्चितच पाणी सोडलं असेल. आपण तिकडेच जाऊ,’’ वायसने मत मांडलं.
तिघेही उडत उडत निघाले. सारे जंगल त्यांनी धुंडाळले, पण अगदी कोरडा दुष्काळ पडल्यामुळे कुठेही पाण्याचा थेंब दिसत
 

नव्हता. ते निराश झाले. वृक्षवल्लींमुळे केवळ उन्हाची भगभग कमी झाली होती. जरा थंड वाटलं. मात्र घसे कोरडे पडले. कावकाव करण्याचेही त्राण त्यांच्यात उरले नव्हते. पाण्यासाठी त्यांच्या जिवाची तगमग सुरू झाली होती. दीनवाणे बिचारे पुन्हा गावाच्या दिशेने पंख फडफडवू लागले.
उडता उडता एकाक्षचं लक्ष एका घराच्या गच्चीकडे गेलं, ‘‘ए, त्या गच्चीवर जाऊ, तिथे माठ दिसताहेत.’’
तिघांनी चार-पाच वेळा घिरटय़ा घातल्या. गच्चीत माणसाचा वावर नसल्याचा अंदाज घेऊन कठडय़ावर झेप घेतली. प्रत्येकाने बुबूळ फिरवताच दोन माठ व एक काचेचं मोठं भांडं नजरेस पडलं. टुणटुण उडय़ा मारत ते तिथे गेले. दोन्ही माठांत व काचेच्या भांडय़ात थोडं थोडं पाणी असल्यामुळे त्यांच्या चोची पाण्यापर्यंत पोहचत नव्हत्या. पुन्हा प्रश्न समोर उभे राहिले, ‘काय करावं? पाणी कसं प्यावं?’
प्रथम वाटणी झाली. एकाक्षने काचेचं भाडं निवडलं. काऊ अन् वायसला एक-एक माठ मिळाला. प्रत्येकाने स्वेच्छेने युक्ती योजून स्वत:ची तहान भागवायची, असं ठरलं.
काऊला गोष्टी ऐकण्याचा भारी नाद होता. झोपायच्या वेळी त्याची आई त्याला रोज नवी गोष्ट सांगे. त्याला चतुर कावळ्याची गोष्ट आठवली. त्याप्रमाणे घराभोवतालचा एकेक दगड चिमुकल्या चोचीत आणून त्याने चिकाटीने माठात टाकायला सुरुवात केली. पाणी हळूहळू वर येऊ लागलं.
‘‘अरे, एकानंतर एक दगड माठात टाकून पाणी वर येईपर्यंत किती वेळ जाईल!’’ एकाक्षनं त्याला डिवचलं.
‘‘जाऊ दे. माझी काहीच हरकत नाही. पाण्याशिवाय आपल्याला जगता येणं अशक्य! नेटाने काम केलं तर निश्चितच तहान भागेल.’’
एकाक्षच्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू झालं. लवकरात लवकर अगदी कमी श्रमात पाणी कसं मिळवता येईल, यावर तो विचार करू लागला. त्याने एकदा दूरदर्शनवर एका कावळ्याला चोचीने काचेचं भाडं फोडून तृषा शांत करताना पाहिलं होतं. ‘‘ठरलं. तोच प्रयोग करायचा!’’ त्याने निर्धार केला.
चोच घासून-पुसून साफ केल्यावर एक बुबुळ नाचवत त्याने भांडय़ाचा पाणी असलेला भाग न्याहाळला व त्यावर धारदार चोचीने मिजाशीत जोराने आघात करायला सुरुवात केली. दोन-तीन वेळा चोच मारताच काचेच्या भांडय़ाला तडा गेला. आनंदाच्या भरात उडय़ा मारत अहंकाराने तो मित्रांना म्हणाला, ‘‘बघा, बघा! माझ्या सुपीक डोक्यातील कल्पना फळाला आली.’’
‘‘अहाहा! तूच बघ.’’ वायसने हसत हसत मान काचेच्या भांडय़ाकडे वळवली. काचेला तडा जाताच पाणी झरझर खाली गळलं नि मातीच्या घराच्या गच्चीत जिरलं. एकाक्षचं तिकडे दुर्लक्षच झालं. ‘ग’ची बाधा झाली होती नं! एक थेंबही पाणी प्यायला न मिळाल्यामुळे तो हताश झाला.
‘‘अरे, अशी तोडफोड करणं वाईट. स्वत:च्या जिवाला शांती मिळण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करण्यात काय अर्थ! अतिरेकी वृत्ती नेहमी नाशाला कारणीभूत ठरते,’’ वायसने एकाक्षला समजवलं.
‘‘माझं चुकलंच! आता तू काय करायचं ठरवलंस?’’
‘‘ते समोर शहाळ्याचं दुकान बघ. लोक शहाळ्याचं पाणी एका नळीने पितात. आपण कचऱ्यांच्या टोपलीत फेकलेल्या नळ्या घेऊन येऊ व माझ्या माठातलं पाणी पिऊ.’’
दोघांनी त्या पोकळ नळ्या मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदार सारखा त्यांना हाकलून देई. वायसने निराश न होता कल्पक बुद्धीचा उपयोग केला. त्या घरापुढील अंगणातील केळीच्या झाडाच्या पानाचा तुकडा कापला. त्याची पोकळ नळी तयार केली आणि तिचं एक टोक माठातील पाण्यात बुडवून दुसऱ्या टोकाने दीर्घ श्वास घेत पाणी वर ओढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अपयश आलं, पण मग सरावाने यश मिळालं. प्रयोग यशस्वी ठरला. एकाक्ष नि काऊने त्याच्या कल्पकतेचं कौतुक केलं. त्यांना मित्राचा अभिमान वाटला. तिघेही मनसोक्त पाणी प्यायले. तृप्त झाले.
शोभा जोशी

आपण खात असलेल्या फळं आणि भाज्यांमुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. अनेकदा या फळांच्या आकाराचे आपल्या शरीरातील कुठल्या तरी अवयवाशी साधम्र्य असते. ते कसे, ही गंमत आपण पाहू!
टोमॅटोचे आत चार कप्पे असतात आणि ते रंगाने लाल असतात. आपल्या हृदयाचेही चार कप्पे असतात नि त्यांचा रंगही लाल असतो. संशोधनाअंती हे सिद्ध झालंय की, टोमॅटोमध्ये असलेले लायकोपाइन हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.
द्राक्षाचा टांगून ठेवलेला घड हा हृदयासारखा दिसतो आणि त्यातील एकेक द्राक्ष हे रक्तपेशीसारखी दिसते. संशोधनामुळे हाही निष्कर्ष हाती आला आहे की, द्राक्षांमुळे हृदयाचं कार्य सक्षमपणे सुरू राहतं.
कवच फोडलेल्या अक्रोडाचं रूप पाहून कुणालाही पटेल की, अक्रोड हे मानवी मेंदूसारखं दिसतं. मेंदूप्रमाणे अक्रोडमध्ये डावा आणि उजवा भाग असतो. मेंदूवर जशा वळ्या दिसून येतात, तशाच अक्रोडवरही दिसून येतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते, असंही म्हटलं जातं.
राजमा ज्याला ‘किडनी बीन्स’ असं संबोधलं जातं, ते मूत्रिपडाचे कार्य उत्तम होण्यासाठी मदत करतात. त्यांचा आकारही मूत्रपिंडासारखाच असतो.
सेलेरी, बोक चॉय, हबर्ब या सलाडमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचं रुप हे हाडांसारखंच असतं. या भाज्या खाल्ल्याने हाडांना बळकटी येते. हाडांमध्ये २३ टक्के सोडियम असतं आणि या भाज्यांमध्ये असलेल्या सोडियमचा वाटाही २३ टक्के इतकाच असतो. तुमच्या अन्नात पुरेसे सोडियम नसेल, तर तुमची हाडं ठिसूळ बनतात.
अ‍ॅवाकॅडो, वांगं आणि पेर आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात आणि गर्भ तसेच गर्भाशयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आकारही बऱ्याच प्रमाणात शरीराच्या या भागांसारखा असतो. संशोधनाअंती असं सिद्ध झालंय की, जी स्त्री आठवडय़ातून एखादं अ‍ॅवाकॅडोचं फळ खाते, तिचा ‘हार्मोनल बॅलन्स’ उत्तम असतो तसेच वजनही आटोक्यात राहते आणि त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी असते. ज्याप्रमाणे गर्भधारणा झाल्यापासून बाळ जन्माला येण्याचा काळ हा नऊ महिन्यांचा असतो, त्याचनुसार परागकणापासून परिपक्व फळ होण्यासाठी अ‍ॅवाकॅडोला तब्बल नऊ महिने लागतात. अ‍ॅवाकॅडो, वांगं आणि पेर यांच्यात अनेक पोषक घटक असल्याचेही संशोधन सांगते.
रताळ्याचा आकार हा स्वादुपिंडासारखा असतो आणि विशिष्ट प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रताळी उपयुक्त ठरतात.
कांदा हा शरीराच्या पेशींसारखा दिसतो. आज संशोधनाअंती हेही सिद्ध झालंय की, कांद्यामुळे शरीरपेशीतील अनावश्यक घटक दूर होण्यास मदत होते. तो डोळ्यांत गेल्यावर डोळ्यांत पाणी येते, त्यामुळे डोळ्यांतील विशिष्ट पापुद्रे स्वच्छ होण्यास मदत मिळते.
गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. गाजरामुळे डोळ्यांजवळील रक्तप्रवाह सुधारून डोळ्यांचे कार्यही व्यवस्थित चालते, हे आता विज्ञानाने सिद्ध केलंय.
शरीरातील अनिष्ट घटकांचा निचरा होण्यासाठी लसूण उपयुक्त ठरते. शरीराला अपायकारक ठरणारे घटक नाहीसे करण्याचं काम लसूण करते.

पाण्याचा थेंब आणि दिवा यांचे
सूक्ष्मदर्शक यंत्र
काचेची एक पट्टी घेऊन ती तुमच्या डोक्यावरील केसांवर घासा. काचेवर तेलाचा एक सूक्ष्म थर असल्याचे तुम्हाला दिसेल. आता काचेवर काळजीपूर्वक पाण्याचा एक थेंब सोडा (आकृती क्र.१). पाण्याचा हा थेंब अर्धगोल आकाराच्या बहिर्गोल भिंगाचा आकार घेतो (आकृती क्र. २). या पाण्याच्या बहिर्गोल भिंगात एखादे छोटे अक्षर किंवा मुंगी सोडून पाहा काय दिसते ते. (आकृती क्र. ३). मुंगीचे पाय मोठे दिसतात ना? आता काळजीपूर्वक काचेची पट्टी उलटी करा. पाण्याचा थेंब काचपट्टीवर खाली लटकताना दिसेल. या लोंबकळणाऱ्या पाण्याच्या थेंबावर बरोबर बसेल, असा पाण्याचा आणखी एक थेंब काचपट्टीवर वरच्या बाजूला (आकृती क्र. ४) सोडा. आता पट्टीच्या खाली अर्धगोल भिंग आणि पट्टीवर आणखी एक अर्धगोल भिंग असे तयार झाले. काय, आता मघाशी पाण्याच्या थेंबात पडलेली मुंगी अगोदर दिसली, त्यापेक्षाही अधिक मोठी दिसते ना? (आकृती क्र. ५). हाच प्रयोग पाण्याच्या थेंबाऐवजी खोबऱ्याच्या तेलाचा थेंब किंवा ग्लिसरीनचा थेंब वापरून पुन्हा करून पाहा. तेलाच्या थेंबामुळे मिळणारे चित्र स्पष्ट आणि मोठे दिसते का?
४० वॉट, झिरो वॉट आणि बॅटरीचा छोटा बल्ब घेऊन त्यातली तार सावकाशपणे काढून टाका. आता हे बल्ब पाण्याने अर्धे भरा (आकृती क्र. ६) बल्बमध्ये भरलेल्या पाण्याची पातळी, बल्बच्या गोलाकार काचेशी एक प्रकारचे बहिर्गोल िभगच बनवते. तीच छोटी मुंगी सर्वात मोठी दिसते. बल्बची वक्रता - गोलाई आणि वस्तूचे मोठे दिसणे यातील परस्परसंबंध तुमच्या लक्षात येतो का?
डॉ. अरविंद गुप्ता, आयुका

साहित्य - लाल, हिरवा कार्डपेपर, घोटीव कागद, कटर, पंचमशीन, ग्लुस्टिक, स्केचपेन, रंग, पेन्सिल
कृती - एका आय़ताकृती लाल कार्डपेपरला मधून दुमडा आणि पुढील बाजूला पेन्सिलने पाने, फुले काढून घ्या. ही फुले कटरच्या सहाय्याने कापून घ्या. आता तुमचा लाल कार्डपेपर पोकळ फुलांच्या - पानांच्या आकाराचा दिसेल.
आता हिरव्या रंगाच्या कार्डपेपरचा आयत मधोमध दुमडा. ह्या दुमडीच्या मध्यावर झिगझ्ॉग कात्रीने आडवी आडवी चिर देऊन आतील बाजूला ढकलून वरून दाब द्या आणि बाहेर ढकला. आता आपल्याला साधारण उघड-बंद होणार तोंड दिसेल.
या बाजूलादेखील फुला-पानांचे आकार काढा व रंगवा. तोंडाच्या वरील बाजूला डोळे काढून बाजूंनी पाकळ्या रंगवा. एक हसरे फूल तयार करा.
आता हिरवा कागद व लाल कागद एकमेकांच्या पाठीला पाठ करून चिकटवा.
या कागदावर काढलेल्या फुला-पानांच्या आकारांना पंच मशीनने टिकल्या केलेल्या कागदाच्या आकारांनी सुशोभित करा.
अर्चना जोशी
vinarch68@gmail.com