Leading International Marathi News Daily
रविवार, ७ जून २००९

‘विम्बल्डन’ स्पर्धेस १०० च्या वर वर्षे होऊन गेली. या १०० वर्षांत टेनिसच्या खेळपट्टय़ा बदलत्या, क्रीडांगणे बदलली, खेळाडूंचे शारीरिक, मानसिक तयारी बदलली, क्रीडांगणावरची वागणूक बदलली, वेष बदलले, खेळाचं अर्थशास्त्र बदललं आणि खेळाचं तंत्रही बदललं! या सर्व बदलांबरोबरच खेळाची सामुग्री किंवा आयुधेही बदलली. चेंडू बदलले आणि टेनिस रॅकेटस्ही बदलल्या! खास करून १९७० च्या दशकापासून टेनिस खेळात आमूलाग्र बदल झाला, कायापालट झाला!
टेनिस रॅकेटमध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलाने खेळाची गती, आक्रमकता, ताकद आणि तंत्रच बदलून टाकलं.
युरोपमधील टेनिसची वार्षिक जत्रा सुरू झाली! ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धापैकी ‘फ्रेंच खुली स्पर्धा’ २४ मेला खुली झाली ती
 

लाल मातीच्या खेळपट्टीवर. या स्पर्धेनंतर महिला खेळाडू उतरतील इंग्लंडमधील ‘ईस्टबोर्न’ या इंग्रजी खाडीवरील नयनरम्य गावातील हिरव्यागार गवताळ खेळपट्टीवर तर पुरुष मंडळी पश्चिम लंडनमधील ‘बॅरन्स कोर्ट’ या भागांत भरणाऱ्या ‘स्टेला आर्ट्वा’ स्पर्धेतील ‘लॉन्स्’वर (नैसर्गिक हिरव्यागार हिरवळीवर खेळला जाणार टेनिस म्हणजे ‘लॉन टेनिस!’) एकमेकांशी टक्कर घेतील! याच दरम्यान आमच्या घराजवळील ‘बेकनडम्’ येथेही हिरवळीवरची स्पर्धा होते. या तीनही स्पर्धाकडे सर्व खेळाडू बघतात ‘विम्बल्डन्’ची पूर्वतयारी म्हणून! हिरवळीवरच्या, इतर पृष्ठभागांच्या खेळपट्टींवरच्या खेळापेक्षा अगदी वेगळ्या असलेल्या खेळाचा सराव म्हणून!
या स्पर्धा संपेपर्यंत जून महिना उजाडलेला असतो आणि जगातील सर्व महान, सर्वात जुन्या, सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ‘विम्बल्डन’ स्पर्धा जून महिन्यांत भरतात. होतकरू असो वा व्यावसायिक टेनिसपटू असो, प्रत्येक खेळाडूची महत्त्वाकांक्षा, आयुष्यात एकदा तरी ही स्पर्धा जिंकण्याची असते. ‘सेंटर कोर्ट’वर प्रेक्षकांना अभिवादन करत सोनेरी चषकाची (पुरुषांसाठी) किंवा सोनेरी तबकाची (महिलांसाठी) चुंबने घेत जगापुढे मिरवायची प्रत्येक खेळाडूची महत्त्वाकांक्षा असते, स्वप्न असतं!
‘विम्बल्डन’ स्पर्धेस १०० च्या वर वर्षे होऊन गेली. या १०० वर्षांत टेनिसच्या खेळपट्टय़ा बदलत्या, क्रीडांगणे बदलली, खेळाडूंचे शारीरिक, मानसिक तयारी बदलली, क्रीडांगणावरची वागणूक बदलली, वेष बदलले, खेळाचं अर्थशास्त्र बदललं आणि खेळाचं तंत्रही बदललं! या सर्व बदलांबरोबरच खेळाची सामुग्री किंवा आयुधेही बदलली. चेंडू बदलले आणि टेनिस रॅकेटस्ही बदलल्या! खास करून १९७० च्या दशकापासून टेनिस खेळात आमूलाग्र बदल झाला, कायापालट झाला!
टेनिस रॅकेटमध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलाने खेळाची गती, आक्रमकता, ताकद आणि तंत्रच बदलून टाकलं. पूर्वी रॅकेटची रुंदी ९ इंच किंवा २३ सेंटीमीटर असे आणि वजन १३-१४ औंस किंवा ३६९-३९७ ग्रॅम असे. सध्याच्या रॅकेटस्ची रुंदी १ इंचाने वाढून १० इंच झाली. पण वजन कमी होऊन ८-१२ औंस किंवा २२७-३४० ग्रॅम्स एवढं झालं. पूर्वी रॅकेटच्या तारा किंवा ‘दोऱ्या’ गाईच्या कातडीच्या बनवलेल्या असत तर सध्याच्या कृत्रिमतेच्या जमान्याप्रमाणे सध्याच्या ‘तारा’ किंवा दोऱ्या कृत्रिम ‘मोनोफिलामेंटस्’च्या (synthetic monofilaments) असतात. आणि याच दोऱ्यांनी टेनिस खेळात खरी क्रांती केली आहे!
व्यावसायिक टेनिसपटू या दोऱ्यांना ‘द लक्सीलॉन शॉट’ असं म्हणतात आणि हा शॉट ‘येत असताना’ ऐकू येतो! उष्ण कटीबंधातल्या एखाद्या किटकाप्रमाणे फुत्कारत फिस्कारत रागाने जणू काही ओरडत चेंडू मधली जाळी भेदून जातो!
या दोऱ्यांचा एक प्राणघातक, मारक घटक किंवा ‘नैसर्गिक शक्ती’ म्हणजे ‘वरची फिरवणूक’- ‘टॉप स्पिन’! पूर्वीचे व्यावसायिक खेळाडू व सध्याचे टेनिस शिक्षक ‘स्कॉट मकोन’ म्हणतात, ‘‘एका रेषेतील किंवा रेषांतील खेळातून टेनिस आता वळणांचं झालं आहे. जेथे ‘टॉपस्पिन’मुळे अत्यंत कमी अंशांच्या वळणात, खोलवर चेंडू क्रीडांगणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो.’’ टेनिस आता ‘पिंग पाँग’ खेळासारखा खेळ झाला आहे!’’
‘लक्सीलॉन शॉट’चा उगम आहे, ‘लक्सीलॉन’ इंडस्ट्रीज या छोटेखानी, शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यासाठी लागणारे खास दोरे आणि स्त्रियांच्या चोळ्यांचे पट्टे तयार करणाऱ्या बेल्जियन उद्योगात. आजही ‘लक्सीलॉन’ ही दोन्ही उत्पादने बनवत आहे. तीन वेळा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा जिंकून, जगातील नंबर १ चा टेनिस खेळाडू असा सन्मान मिळवणाऱ्या ब्राझिलच्या गुस्टाव्ह कर्टन याने १९९७ मध्ये आपली रॅकेट ‘लक्सीलॉन को-पॉलिमर मोनोफिलामेंट’ या दोऱ्यांनी विणली आणि आक्रमक खेळाने, अगदी खाली जाणाऱ्या फटक्यांनी (dipping shots) आपल्या विरोधकांत, स्पर्धकांना आश्चर्यचकित करून गोंधळात टाकलं, संभ्रमात पाडलं! फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकण्याचे श्रेय गुस्टाव्हो कर्टन ‘लक्सीलॉन शॉट’ या जबरदस्त कृत्रिम दोऱ्यांना देतात!
पूर्वी वापरत असलेले नैसर्गिक दोरे (gut strings) जे गाईपासून बनवलेले होते आणि बहुतेक व्यावसायिक खेळाडू वापरत होते. आज अगदी अदृश्य झाले आहेत! यंदाच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेतील ६५ टक्के पुरुष खेळाडू आणि ४५% स्त्री खेळाडू ‘लक्सीलॉन’ दोरे वापरत आहेत आणि जे खेळाडू हे दोरे वापरत नाहीत ते लवकरच वापरायला लागतील! बेल्जियममधील ‘अँटवर्प’ (जगातील सर्वात मोठी हिऱ्यांची ठोक बाजारपेठ जेथे फक्त ज्यू आणि गुजराथी लोक राज्य करतात!) येथील ‘लक्सीलॉन’ हा कौटुंबिक उद्योग मोठमोठय़ा खेळाडूंना असलं उत्पादन वापरण्यासाठी पैसे देत नाही आणि सर्व खेळाडूंना मग ते कितीही मोठे असोत, ‘लक्सीलॉन’ दोरे विकत घ्यावे लागतात, असं असूनही! व्यावसायिक टेनिस जगात जेथे मोठमोठे खेळाडू अनेक वस्तूंच्या, अगदी खेळाच्या साधनांसहीत, वापरासाठी त्यांच्या जाहिरातीसाठी मोठमोठय़ा रकमा असतात तेथे रॅकेटचा दोरा विकत घ्यावा लागतो यावर विश्वास बसत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे!
परंतु लॅक्सीलॉन फटक्याचा मारा, दणका खरोखरच ‘लक्सीलॉन’ दोऱ्यांमुळे निर्माण होतो का? ‘ज्या इंचाने टेनिस कायमचं बदललं’ (The Inch that changed Tennis forever) या आपल्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या लेखात सिडनी विद्यापीठाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक रॉड क्रॉस (Rod Cross) म्हणतात, ‘‘जेव्हा टेनिस साधनसामग्री निर्मात्यांनी टेनिस रॅकेटची रुंदी एक इंचाने वाढवली, ९ इंचाची १० इंच केली. तेव्हा ‘वरच्या फिरवणुकीच्या फटक्याचा’ (top spin) कायापालट झाला! ‘संरक्षणात्मक लोंबकळल्या’ (looping) फटक्याचा कायापालट ‘सूर मारणाऱ्या स्फोटकांत’ (dive-bomb) झाला! त्याचबरोबर रॅकेटच्या लाकडी चौकटीऐवजी (frame) हलक्या धातूंच्या चौकटी आल्या आणि आता तर धातूंऐवजी शिशाच्या (graphite) अत्यंत हलक्या पण कमालीच्या मजबूत चौकटी वापरात आहेत. रॅकेटची रुंदी फक्त १ इंचाने वाढवल्याने रॅकेट पुढे एका बाजूस झुकवता येते, कलती ठेवता येते. त्यामुळे खालपासून वपर्यंत रॅकेट फिरवता येते, झोकात देता येतो आणि रॅकेटची चौकट कडेस चेंडू मारताना, तुटण्याची भीती राहात नाही.
या अत्यंत परिणामकारक, नाविन्यपूर्ण बदलानंतर टेनिसमध्ये फारसा बदल झाला नाही असं रॉड क्रॉस यांचं मत आहे. बदल घडला तो खेळाडूंच्या शरीरयष्टीत, खेळाच्या तंत्रात. पण त्यामुळे १९७० च्या दशकातील खेळाडू क्रीडांगणावरचे, लगतचे जे फटके (ground strokes) मारत होते, त्यातून जी फिरकत (spin) निर्माण करत होते त्याच्या पाच पट अधिक फिरकत आजचे खेळाडू आपल्या शरीरयष्टी, तंत्र आणि ‘कमावलेल्या १ जादा इंच रुंदी’तून निर्माण करतात. १९७० च्या दशकात खेळाडूंना एक अधिक इंच मिळाला आणि त्यांनी १ मैल घेतला!
टेनिसच्या उत्क्रांतीत साधनसामग्रीचा कोणता वाटा आहे हे हेरणं किंवा दाखवणं हे अवघड आहे. १९९० च्या दशकाच्या शेवटी जो ताकदीचा, ताकदवान, अत्यंत जोरात फटके मारणारा खेळ विकसित झाला. त्याचं श्रेय जाणकार जास्त ताकदवान रॅकेट चौकटींना देतात. वजनाने हलक्या पण शक्तिमान चौकटींनी खेळ प्रभावी केला. पण १९९७ मध्ये ‘टेनिस मॅगेझीन’ने खेळाची एक चाचणी परीक्षा घेतली. त्यात त्यांना आढळून आलं की ८ फूट ५ इंच उंचीच्या ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ‘मार्क फिलिपुसीस्’ हा स्वत:च्या शीशाच्या चौकटीच्या रॅकेटने (graphite frame) तशी १२४ मैल वेगाने, २०० किलो मीटर वेगाने ‘सव्‍‌र्हिस’ करायचा. पण नेहमीच्या लाकडी रॅकेटने त्याची सव्‍‌र्हिस ताशी १२२ मैल, १९६ किलोमीटर वेगाने जायची! म्हणजे शिशाची चौकट व पारंपरिक लाकडी चौकट याने खेळाच्या दणक्यात फारसा फरक पडत नाही! निदान मार्क फिलीपुसीसच्या बाबतीत तरी!
३ वर्षांपूर्वी, दोऱ्यांचा (strings) खेळावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यास ‘आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने’ (International Tennis Federation) सुरुवात केली. अभ्यासात महासंघास आढळलं की, ‘पॉलिएस्टर मोनोफिलामेंट- कृत्रिम दोऱ्यांनी जुन्या दोऱ्यांपेक्षा थोडीशी जास्त फिरकी (spin) निर्माण होते. परंतु संघाच्या ‘शास्त्र विभागाचे’ प्रमुख ‘स्टय़ुअर्ट मिलर’ यांना कृत्रिम दोऱ्यांनी अधिक फिरकी का निर्माण होते याची निश्चित कारणमीमांसा, खात्री देता आली नाही. एक उपपत्ती सिद्धांत (theory) असा की असा की कृत्रिम दोरे गाईपासून बनवलेल्या दोऱ्यांपेक्षा ‘निसरडे’ असल्यामुळे जेव्हा चेंडू रॅकेटच्या जाळीदार रचनेस आघातानंतर खेचतो तेव्हा कृत्रिम धागे ताबडतोब चेंडूच्या चक्राकार फिरण्यास गती देतात!
अर्थातच कृत्रिम दोरे जरी फिरकीसाठी अधिक ताकद देत असले तरी त्या अधिकतर शक्तीचा योग्य तो उपयोग करून घेण्यासाठी खेळाडूंजवळ तंत्र कौशल्य हवं. स्टय़ुअर्ट मिलर यांच्या म्हणण्याप्रमाणे चेंडूस फिरकी निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक म्हणजे रॅकेटचा वेग!
सिडनी विद्यापीठातील रॉड क्रॉस याचं संशोधन दाखवत की, व्यावसायिक टेनिसपटूंना दोऱ्यांविषयी जेवढं महत्त्व वाटत तेवढं प्रत्यक्षात नाही. दोऱ्यांना उगाचच फाजील महत्त्व देण्यात येत आहे! जरी बहुतेक व्यावसायिक टेनिसपटूंना आपल्या दोऱ्यांच्या ताणांबद्दल काटेकोर, अचूक तपशील हवे असतात तरीसुद्धा गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका पाहणीत, अभ्यासात असं आढळून आले की ९०% व्यावसायिक खेळाडूंना २ वेगळ्या चौकटीत, रॅकेटमध्ये दोऱ्यांच्या ‘ताणा’तील ६ पाऊंडस, २०७ किलो फरक समजला नाही. जाणवला नाही! जे खेळाडू ‘लक्सीलॉन’ दोरे वापरतात, त्यांना त्या दोऱ्यांतील ‘कडकपणा’ जाणवतो, समजतो आणि चेंडूच्या आघातानंतर चेंडू परतवताना मारक, आक्रमक आणि परिणामकारकरीत्या चेंडू परतवता येतो! ‘लक्सीलॉन’ उद्योगाचे प्रमुख व्यवस्थापक ‘निको व्हॅन मॉल्डेरेन’ (Nico Van Malderen) यांच्या मते त्यांच्या अंतर्गत चाचण्यांतून आढळलं की त्यांचे दोरे इतर दोऱ्यांपेक्षा वास्तवतेत अधिक शक्तिमान, ताकदवान आहेत. चेंडूस आक्रमक ‘वरची फिरकी’ (top spin) देण्यासाठी, टेनिसपटू ‘लक्सीलॉन्’ वापरतात. कारण त्यांना वाटते की, त्यामुळे तोच वेग, आक्रमकता, प्रभाव निर्माण करण्यासाठी कमी सायास करावे लागतील, रॅकेट कमी फिरवावी लागेल!
परंतु, पूर्वीचा जागतिक क्रमांक १ चा खेळाडू जिम कुरिअर म्हणतो, ‘‘तंत्रज्ञान नक्कीच बदल घडवून आणत आहे. बदलाचा वेग वाढवत आहे. पण माझ्या मते तुम्ही आपल्या सर्व खेळाडूंना १९५० पासूनच्या खेळाच्या तंत्रात, तंत्रज्ञानात जाण्यास भाग पाडलंत तर ते पूर्वीच्या खेळाडूंपेक्षा, त्या पिढय़ांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आक्रमक खेळतील. नवीन शैली, ढंग त्यांच्यासाठी उत्तम प्रकारे काम करत आहे!’’
मानव आणि खेळाची नाविन्यपूर्ण साधनसामुग्री, आधुनिक तंत्रज्ञान यांचा एकमेकांवर जो काही नक्की परिणाम व्हायचा असेल तो होऊ दे. पण त्यामुळे टेनिसप्रेमींना खळबळजनक, थरारक, क्रांतिकारक खेळ बघायला मिळतो आहे!
अनिल नेने लंडन
AnilNene@aol.com

टेनिसचा सामना सुरू झाला की, चाहत्यांच्या केंद्रस्थानी जसा खेळाडू असतो अगदी तसाच प्रत्येक खेळाडूच्या केंद्रस्थानी असतो टेनिसचा चेंडू. अशा या टेनिसच्या चेंडूविषयीची रोचक माहिती..
आज आपण हिरव्यागार रंगातला टेनिसचा चेंडू प्रत्येक स्पर्धेत पाहतो. पण पूर्वी टेनिसचा चेंडू कातडय़ाचा बनविलेला असे आणि त्या कातडय़ाच्या चेंडूत प्राण्यांच्या किंवा माणसाच्या केसांचा वापर केलेला असे. १४८०मध्ये लाकडाचा भुसा, वाळू, लोकर यांच्या वापरासह तयार केलेले असत. कालांतराने चेंडूमध्ये बदल होत गेले. १८व्या शतकात लोकरीच्या पट्टय़ांनी गुंडाळलेला चेंडू तयार केला गेला. त्याभोवती पांढरे कापड शिवले गेले. मूळ टेनिससाठी असे चेंडू वापरले जात पण १८७०मध्ये लॉन टेनिसचा उगम झाल्यानंतर चेंडू तयार करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या रबराचा उपयोग होऊ लागला. पुढे १९७२मध्ये पिवळ्या-हिरव्या रंगाचे चेंडू वापरले जाऊ लागले, पण त्याआधी, कोर्टच्या पाश्र्वभूमीनुसार काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे चेंडू वापरले जात. सध्या जो रंग चेंडूसाठी वापरला जातो, त्याला ‘ऑप्टिक यलो’ असे म्हणतात. हा रंग उपयोगात आणण्यामागचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारची पाश्र्वभूमी असली तरी हा चेंडू खेळाडूला सहज दिसू शकतो. नारिंगी रंगाच्या चेंडूचाही वापर करण्याचा विचार केला गेला, पण दूरचित्रवाणीवर सामने दाखविताना हा चेंडू दिसण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या चेंडूला पसंती दिली गेली नाही.
व्यावसायिक टेनिससाठी तीन प्रकारचे चेंडू वापरले जातात. क्ले कोर्ट, लॉन टेनिस, कार्पेट व हार्ड कोर्ट यांच्यासाठी वेगवेगळे चेंडू उपयोगात आणले जातात. २००२पूर्वी एकाचप्रकारचे चेंडू सर्व कोर्ट्सवर वापरले जात.
टेनिस चेंडूंचे उत्पादन प्रामुख्याने आशिया खंडात अधिक प्रमाणात होते. तयार होणाऱ्या १० चेंडूंतील ९ चेंडू आशियातच बनतात. याचे मुख्य कारण म्हणजे चेंडू तयार करण्यासाठी ज्या रबराची गरज असते, ते रबर आशिया खंडात उपलब्ध आहे.
चेंडू तयार करताना दोन पोकळ पृष्ठभाग परस्परांवर चिकटविले जातात. त्याआधी, चेंम्डूच्या आतील भागात रसायने टाकली जातात. या रसायनांना कार्यान्वित करण्यासाठी उष्णतेचा वापर होतो. चेंडूसाठी जे दोन पोकळ पृष्ठभाग कारखान्यात एकमेकांवर चिकटविले जातात, त्यावेळी त्यावर दाब देण्यात येतो.
टेनिस चेंडू बनविण्यासाठी सर्वाधिक खर्चिक असे ‘फेल्ट’ चे आवरण वापरले जाते. चेंडू तयार होत असताना फेल्ट वितळवून चेंडूवर लावले जाते. त्यामुळे चेंडू वाऱ्याचा प्रतिकार उत्तमरित्या करू शकतो.
प्रत्येक वर्षी सुमारे ३०० दशलक्ष टेनिस चेंडू तयार केले जातात.
या टेनिस चेंडूंवर पुनप्र्रक्रिया करणे शक्य नसल्याने काही समस्या निर्माण होतात. प्रमुख स्पर्धांमध्ये वापरण्यात आलेल्या चेंडूंच्या सहाय्याने दुर्मिळ जातीच्या उंदरांच्या रक्षणासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली जाते.
टेनिस चेंडू विकले जाण्यापूर्वी किंवा वापरले जाण्यापूर्वी विशिष्ट दाब असलेल्या बंदिस्त जागी ठेवले जातात. त्यातून बाहेर काढल्यास चेंडूमधील दाब कमी होत जातो. पण पुन्हा आवश्यक तो दाब त्यात निर्माणही करता येतो.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने टेनिस चेंडूंबाबत काही नियम आखून दिले आहेत. त्यानुसार टेनिस चेंडूचे वजन ५६.७ आणि ५८.५ ग्रॅम यांच्यादरम्यान असायला हवे. या चेंडूचा व्यास ६३.५ ते ६६.७ मिलीमीटर या दरम्यान असायला हवा. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने सुमारे टेनिस चेंडूंच्या सुमारे २०० विविध ब्रॅण्ड्सना मंजुरी दिलेली आहे.
टेनिस चेंडूचा वापर करतानाही खेळाडू आपली आवड जपतात. काही खेळाडू दाब नसलेले चेंडू उपयोगात आणतात. जे वजनाला हलके असतात.
मध्यभागी रबर असलेले चेंडू अजूनही वापरले जातात. लॉन टेनिसच्या चेंडूंचा उगम होण्यापूर्वी या चेंडूचा वापर होत असे. पण अजूनही मूळ टेनिस खेळण्यासाठी केंद्रस्थानी रबर असलेले चेंडू वापरले जातात.
बॉलबॉय

क्रीडाक्षेत्रात काही मोजकेच प्रकार आहेत, ज्यांत निश्चित असा गणवेश नाही. त्यामुळे तिथे कोणत्याही फॅशनला वाव आहे, अर्थात मर्यादा ओळखूनच. अशा क्रीडाप्रकारांत टेनिसचा समावेश करता येईल. विम्बल्डन वगळता एकूणच टेनिसमध्ये फॅशन वज्र्य नाही. किंबहुना, फार पूर्वीपासून बदलती फॅशन हा टेनिसचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. त्यामुळे आज कोर्टवर प्रेक्षक जमतात ते केवळ टेनिस बघायला नाही तर बरोबरीने फॅशनची मजा लुटायलाही. ही फॅशनही केवळ महिलांपुरती मर्यादित नाही, पुरुष टेनिसपटूही फॅशनेबल दिसण्यात अग्रेसर आहेत. तरीही टेनिसचाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो महिला टेनिसमधील फॅशन. १८६०च्या जमान्यात टेनिससाठी विशिष्ट असा गणवेश नव्हता. त्यामुळे महिलांसाठी त्यावेळी पायघोळ झगे, हातात ग्लव्हज, डोक्यावर टोप्या, पूर्ण बाह्यांची घट्ट अशी जॅकेट्स असा पेहराव असे. विम्बल्डनमध्ये मात्र १८९०च्या काळात पांढरे कपडे हे सक्तीचेच असत. १९०५मध्ये महिला टेनिसच्या फॅशनमध्ये ‘क्रांती’ घडली. मेरी सटनने आपल्या वडिलांचाच शर्ट विम्बल्डनमध्ये घातला. पण लांब बाह्यांचा तो शर्ट तिला त्रासदायक ठरू लागल्याने तिने बाह्या वर करून खेळायला सुरुवात केली. पहिल्या महायुद्धापर्यंत महिलांच्या फॅशनमध्ये बदल झाला नाही. १९२२मध्ये मात्र महिलांच्या फॅशनने वेगळे वळण घेतले. सुझान लेन्गलेन चक्क स्कर्ट घालून कोर्टवर उतरली. डोक्यावर हॅटऐवजी तिने हेडबँड बांधला होता. तो इतका लोकप्रिय झाला की, लोक पुढील सामन्यात ती कोणत्या रंगाचा हेडबँड वापरणार यावर पैजा लावू लागले. १९३०मध्ये डोक्यावर टोपी न घालता टेनिस खेळण्यास मान्यताच मिळाली. १९३२मध्ये अ‍ॅलिस मार्बलच्या रूपात शॉर्ट्स घालून टेनिस खेळण्याची नवी स्टाइल आली. दुसऱ्या महायुद्धानंतर तर ज्या कपडय़ांना महिलांच्या दृष्टीने त्याज्य मानले जाई, तेच कपडे पुढे स्त्रिया टेनिससाठी वापरू लागल्या. त्यात स्कर्ट्स, शॉर्ट्स, कमी बाह्यांचे शर्ट यांचा त्यात समावेश होता.
१९४९मध्ये या फॅशनमध्ये चाहत्यांच्या भुवया उंचावणारा बदल झाला. गेटरुड मोरानने विम्बल्डनमध्ये आपल्या पांढऱ्या गणवेशात परिधान केलेल्या अंतर्वस्त्राने तर जबरदस्त खळबळ उडविली. लंडन डेली एक्स्प्रेसने आठवडय़ातून पाचवेळा त्याचे वृत्त प्रसिद्ध करून खप वाढविला.
१९९०च्या काळात तर विल्यम्स भगिनींनी आपल्या नवनव्या फॅशननी सर्वांनाच थक्क केले. अ‍ॅना कुर्निकोव्हा तर खेळापेक्षा फॅशनमध्येच अधिक बहरली. विल्यम्स भगिनींचे तोकडे, भडक, रंगीबेरंगी कपडे, कानातील मोठेमोठे डूल, केसांमध्ये माळलेले मणी यांची जोरदार चर्चा होऊ लागली. त्यांची ही फॅशन परेड विम्बल्डनमध्येही होत असे. छायाचित्रकारांसाठी तर ती पर्वणीच होती. फॅशनमधील त्यांच्या या मुक्त वावरामुळे पुढे त्यांनी आपापल्या नावाने फॅशनही बाजारात आणली.
सेरेनाने आपले नाव उलट करून त्या नावाने फॅशनला बाजारपेठ मिळवून दिली. व्हीनसही त्यात मागे राहिली नाही.
सध्याही फॅशनचे हे जलवे पाहायला मिळतातच. आजकाल केसांची फॅशनही महिला टेनिसचा नवा ‘ट्रेंड’ ठरू पाहात आहे. डोक्यावर टोपी घालण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर आता खेळाडू डोळ्यावर गॉगल्स लावून खेळू लागल्या आहेत. टेनिसपटूंच्या बूटांचे नवे ब्रॅण्ड चाहत्यांना खुणावू लागले आहेत.
महेश विचारे