Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

बीडमध्ये शेतकरी सुखावला
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येलाच पावसाचे जिल्ह्य़ात आगमन झाले असून शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाने जोराच्या वाऱ्यासह हजेरी लावली. खरीप हंगामात यंदा वेळेवर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. बीड जिल्ह्य़ात शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रचंड उकाडा वाढला तर जोराच्या वाऱ्यासह पावसाने आगमन केले. अवघ्या पाऊण तासात पावसाने सर्वदूर हजेरी लावत पाणी पाणी केले. तब्बल ४५ अंशांपेक्षा जास्त तापमानाने भाजून निघालेल्या जिल्ह्य़ाला वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने हायसे वाटले. बीड शहरात अचानक पावसाच्या आगमनाने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

नांदेड महापौर-उपमहापौरांची गच्छंती
नांदेड, ६ जून/वार्ताहर

नियुक्तीपूर्वी ठरल्यानुसार महापौर-उपमहापौरपदाचा कालावधी संपल्याने या पदावर लवकरच नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नवीन मिनी सह्य़ाद्री अतिथी गृह इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मनपात काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. मनपा निवडणुकीनंतर झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या नियुक्तीच्या वेळीच सव्वा वर्षांचा कालावधी ठरला होता. त्यानुसार हा कालावधी पूर्ण झाल्याने अनेक नगरसेवकांनी आपल्याकडे बदलाची मागणी केली.

संत ज्ञानेश्वरांचे आजोबा श्रीधरपंत यांच्या समाधीचा जीर्णोद्धार
बीड, ६ जून/वार्ताहर

राज्य शासनाचे पुरातत्त्व खाते, प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे तब्बल आठशे वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या संत ज्ञानेश्वर यांचे आजोबा श्रीधरपंत ऊर्फ गोविंदपंत यांच्या बिंदुसरा नदीच्या काठावरील समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारातून ८ जून पासून सुरु होत आहे. बीड जिल्हा संत व देवदेवतांची भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे. आद्यकवी मुकुंदराज महाराज, संत दासोपंत, ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीचा वैद्यनाथ, सबंध कोकणवासीयांचे कुलदैवत असलेली अंबाजोगाईची योगेश्वरी, बुट्टेनाथ, कपिलधारचे मन्मथस्वामी, तलवाडय़ाची त्वरितादेवी अशी मोठी परंपरा आहे.

घोरपडे
‘या वर्गाला प्रवेश मिळाला म्हणून आपण पत्रकार झालो, असा ज्यांचा समज झाला असेल, त्यांनी कृपया दोन इंच खालून चालावं..’ दि. २७ जानेवारी १९८६. पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटय़ूट’मधील एका वर्गात ‘भावी पत्रकार’ सरसावून बसले होते. प्रवेश न मिळालेले (आणि वर्गात बसायला जागा न मिळालेलेही) काही जण बाहेर उभे होते. ज्यांचं ऐकायला सारेच अनावर उत्सुक होते, त्या चंद्रकांत घोरपडे यांनी, तिथं असलेल्या सगळ्या पाच-पन्नास ‘भावी पत्रकारां’चा त्रिफळा पहिल्याच चेंडूवर उडवला.

‘कायम’ शब्द काढून शाळांना अनुदान देण्याची मागणी
लातूर, ६ जून/वार्ताहर

सरकारने स्वीकारलेल्या शाळांबाबतीतील ‘कायम विनाअनुदान’ धोरणातील ‘कायम’ हा शब्द वगळून शाळांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक व पदवीधर आमदारांसह हजारो शिक्षकांनी १ जूनपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सन २००१ मध्ये शासनाने ‘कायम विनाअनुदान’ धोरण स्वीकारले व डिसेंबर २००१ पासून राज्यात सर्व प्रकारचे शाळा व महाविद्यालये ही कायम विनाअनुदान तत्त्वावर देण्यात येऊ लागली. परंतु डिसेंबर २००१ पूर्वी कायम विनाअनुदान धोरण नसतानाही अनेक शाळांना कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेली आहे.

पद्मसिंहांना पाठीशी घालू नका-उद्धव ठाकरे
उस्मानाबाद, ६ जून/वार्ताहर

खासदार म्हणून निवडून आलेल्या पद्मसिंहांना पाठीशी घालू नका. निष्पक्षपणे चौकशी करा अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. कळंब येथे मतदारांचे आभार मानण्यासाठी ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. हत्या, मारामाऱ्या ही राष्ट्रवादीची संस्कृतीच आहे. लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाची हत्या, पवनराजे यांची हत्या आणि अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी या संस्कृतीचाच भाग असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांबाबत पद्मसिंहांनी खुली चर्चा करावयास हवी होती, पण त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणून असल्या कटाचे घाणेरडे प्रयोग झाले.

बसच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
औरंगाबाद, ६ जून/प्रतिनिधी

सायंकाळी ४.३० वा. एका खासगी ट्रॅव्हल्स बसने भडकल गेट भागात रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला धडक दिली. या धडकेत ८ वर्षीय बालिकेचा जागीच अंत झाला. वर्षां संजय खोतकर असे मृत बालिकेचे नाव असून, ती भडकल गेट भागातच राहत होती. सायंकाळी रस्ता ओलांडत असताना जुगनू ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने (क्र. एमएच-२०-डब्ल्यू-९८५८) तिला जोरदार धडक दिली. या धडकेत बालिका जागीच ठार झाली. अपघात लक्षात येताच रस्त्यावरील वाहनधारकांनी बस थांबविली. ही बस टीव्ही सेन्टर येथून बाबा पेट्रोल पंपकडे जात होती. बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिर्झा अजहर बेग या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लातूरच्या बनसोडे यांच्या चित्रांची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड
लातूर, ६ जून/वार्ताहर

लातूरचे चित्रकार रवी बनसोडे यांच्या ‘बुद्ध व त्यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील दोन चित्रांची निवड आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली आहे. हे चित्र प्रदर्शन इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे होणार आहे. मूळचे लातूरचे असलेले रवी बनसोडे यांचे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठात झाले असून ते पीएच.डी. आहेत. लहानपणापासून चित्र काढण्याचा छंद असलेले रवी बनसोडे यांनी आपल्या छंदाचे रूपांतर करियरमध्ये केले असून यापूर्वी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भारतातील प्रख्यात जहांगीर कलादालन, मुंबई व प्रतिदेव कलादालन, लंडन येथे झाले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना मोलाचे मार्गदर्शन लातूरचे प्रख्यात चित्रकार दत्ता बनसोडे, सुरेंद्र जगताप, बालाजी चव्हाण यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी भारतातून अनेक चित्रकारांकडून चित्रे मागविली गेली होती व त्यातून उत्कृष्ट कलाकृतीची निवड या चित्र प्रदर्शनासाठी करण्यात आली. यात रवी बनसोडे यांनी चितारलेली ‘बुद्ध आणि अंगुलीमाल व बुद्ध सेरिज’ या दोन चित्रांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

हिंगोली जिल्ह्य़ातील शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर
हिंगोली, ६ जून / वार्ताहर

जिल्ह्य़ातील अनेक शिक्षकां १२ वर्षे सलग सेवेनंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाली नव्हती; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर यांनी मंजूर करून शिक्षकांना न्याय दिला असल्याची चर्चा जिल्हा परिषद विभागात चालू आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्य़ातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना १२ वर्षे सलग सेवेनंतर ६ जून २००९ ला मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर यांनी ३१६ शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर केली आहे. यात ३० सेवानिवृत्त शिक्षकांचाही समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना १२ वर्षे सलग सेवेनंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर होते, तर २४ वर्षांनंतर निवड श्रेणी मंजूर होते. शिक्षकांचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न माज्रीकर यांनी निकाली काढल्याने अनेक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वसमत नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी;दांडेगावकर व हाफिज यांच्यात दिलजमाई
हिंगोली, ६ जून/वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अवघ्या पंधरा दिवसांवर आलेल्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीमुळे वसमत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, संपर्कमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज या दोघांची औंढा नागनाथ येथे गुप्त बैठक झाली. या बैठकीत दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्षश्रेष्ठींवर सोडण्यात आला आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता असून शिवसेनेला बहुमत नसताना मिळालेले अध्यक्षपद, तसेच नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अब्दुल हाफिज यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केल्याने दांडेगावकर व हाफिज यांच्यात दरी निर्माणझाली होती. दोन्ही काँग्रेसकडे नगराध्यक्षपदासाठी बहुमत असताना राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान गैरहजर राहिल्याने शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले होते. असे पुन्हा होऊ नये यावर दोघांत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक सांभाळण्याची जबाबदारी संपर्कमंत्र्यांची व नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्याचे ठरले.
विधानसभेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दांडेगावकर व हाफिज यांच्यात झालेली दिलजमाई चर्चेचा विषय झाली आहे.

देशमुख महाविद्यालयाचा निकाल ८८.५ टक्के
लातूर, ६ जून/वार्ताहर

श्रीमती सुशीलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ८८.१५ टक्के लागला आहे. महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल ९९.४३ टक्के लागला असून कौशल्या सिंगन या विद्यार्थिनीने ७४.८३ टक्के गुण प्राप्त केले असून दीक्षा गंगावणे हिने ७८ टक्के गुण घेऊन कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळविला. वाणिज्य शाखेचा निकाल ८३.३३ टक्के लागला असून भाग्यश्री मरडे हिने ८२ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. स्वाती किणीकर ७५.६७ टक्के गुण घेत दुसरी आली आहे. ईश्वर गवळी याला विद्यार्थ्यांने ७५ टक्के मिळाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ८८.५४ टक्के लागला असून सचिन भोसले याने ७८.५० टक्के घेऊन महाविद्यालयात प्रथम आला आहे. पूनम पवारला ७५ टक्के, तर प्रशांत जाधवला ७१.१७ टक्के गुण मिळाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्राचार्या डॉ. मोहिनी देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

परीक्षा केंद्राच्या आवारात बंदीचे आदेश
औरंगाबाद, ६ जून/खास प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्य़ात विशेष समाजकल्याण अधिकारी व अन्य पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदीचे आदेश पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी दिले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरापासून १०० मीटरपर्यंत झेरॉक्स, टेलिफोन, एस.टी.डी., फॅक्स व ध्वनिक्षेपके बंद करणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तांनी कलम १४४(३) अन्वये मनाईआदेश जारी केला आहे. हा आदेश रविवारी, सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राला वादळाचा फटका
चाकूर, ६ जून/वार्ताहर

सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात ५ व आज ६ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी, ५ जून रोजी सायंकाळी वादळी पावसामुळे दवाखाना, निवासाचे तंबू, कँटीन व इतर साहित्य असे मिळून वीस लाखांचे नुकसान झाले व यात एक जवानाच्या पायास मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यापाठोपाठ आज (६ जून) सायंकाळी परत जोराचा वादळी पाऊस झाला. यात ९४ तंबूंचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

दुसऱ्याच्या नावावरील घर विकून पसार
औरंगाबाद, ६ जून/प्रतिनिधी

शहरात बनवाबनवीचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्याला बळी पडणारे अशा घटना घडून गेल्यावर न्याय मिळावा असा टाहो फोडताना दिसत आहे. घर, प्लॉट, विक्री व्यवसायातही फसवेगिरी करणाऱ्यांना प्रवेश मिळविला आहे. दुसऱ्याचे घर आपलेच असल्याचे भासवून ११ लाख रुपये उकळून एकजण फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेख सारीक शेख मुनीर आणि त्याची पत्नी घराच्या शोधात होते. त्यावेळी काजीवाडय़ातील सैय्यदनुरूद्दीन सय्यद शमसुद्दीन याने घर क्रमांक २/५/०७५ हे आपल्या मालकीचे असल्याचे शेख सारीक यांना सांगितले. घर अतिशय छान व व्यवहारही पटण्यासारखा होता. त्यामुळे त्यांनी बैठक घेऊन व्यवहार निश्चित केला. ११ लाख ३० हजार रुपये एवढी किंमतही शेख सारीकयांनी सैय्यद नुरूद्दीनला दिला. डिसेंबर २००८ मध्ये सौदा झाला, पैसेही देऊन झाले तरीही सैय्यद नुरूद्दीन हा सारीक दाम्पत्याला घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. वेळोवेळी त्याच्याकडे तगादा लावूनही घर मिळेना झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेख सारीक यांच्या लक्षात आले. तात्काळ त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली.

मनोचिकित्सा विभागप्रमुखाविरुद्ध सभापतींची तक्रार
औरंगाबाद, ६ जून /प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. काळे यांच्याविरुद्ध पालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे सभापती व रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे सदस्य संजीव रिडलॉन यांनी तक्रार केली आहे. डॉ. काळे यांचे मुंबई येथे खासगी रुग्णालयात असून त्यामुळेच ते शासकीय रुग्णालयात अनुपस्थित राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. काळे यांनी कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित राहणे अनिवार्य असताना ते आठवडय़ातून दोन ते तीन दिवस गैरहजर राहतात. शासकीय रुग्णालयात हजर असतानाही ते रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांशी अरेरावीने बोलतात, असे रिडलॉन यांनी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रविड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रिडलॉन यांनी दोन वेळा त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मलाही ते भेटले नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. अभ्यागत समितीसमोर हा प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे.
शासनाचा मोठा पगार उचलायचा आणि सेवा मात्र खासगी रुग्णालयात करायची, असा हा प्रकार आहे. डॉ. काळे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

मेट्रो शूजचे दालन औरंगाबादमध्ये सुरू
औरंगाबाद, ६ जून /खास प्रतिनिधी

मेट्रो शूजने औरंगाबाद शहरातील पहिले दालन निराला बाजार भागातील तापडिया सुपर मार्केटमध्ये सुरू केले आहे. शनिवारपर्यंत या दालनात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २० टक्के सूट देण्यात आली आहे. ही सूट मेट्रोसह अन्य ब्रॅण्डस्वर उपलब्ध आहे. फॅशन जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. युवा वर्गात फॅशनबद्दल जागरूकता वाढत आहे. अशा ग्राहकांसाठी मेट्रो शूज पादत्राणाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल, असा विश्वास मेट्रो शूज कंपनीचे व्यवस्थापक खलिद माजिद यांनी व्यक्त केला. या दालनामध्ये पुरुषांसाठी ुव महिलांसाठी विविध श्रेणी उपलब्ध आहे. तसेच हॅण्डबॅग, पाकिट, बेल्ट आणि पादत्राणांची काळजी घेणारे उत्पादनही येथे उपलब्ध असणार आहे

मारहाणीच्या घटनांमध्ये दोघे जखमी
औरंगाबाद, ६ जून /प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबेगावहून आसेगावला रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला ४ ते ५ जणांनी लाठय़ा, काठय़ांनी बेदम मारहाण केली. असेगाव येथील महादेव मंदिरानजीक ही घटना घडली. प्रभू नारायण बागूल (वय १९, रा. आसेगाव) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो रिक्षा घेऊन गावाकडे जात असताना हॉटेल त्रिशूल येथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अन्य एका घटनेत सिडको एन-६ येथील स्मशानभूमीनजीक असलेल्या हॉटेलजवळ महेबूबखान जमीरखान (वय ४०, रा. उस्मानपुरा) यांच्यावर अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महेबूब यांचा हात, पाय आणि छातीवर वार करण्यात आले. वार करणारे कोण होते हे समजू शकले नाही.

हातकडीसह आरोपी पळाला!
गेवराई, ६ जून / वार्ताहर

गेवराई न्यायालयात तारखेसाठी आणलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी गेवराई बस स्थानकावर पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह पळून गेला. त्याला दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून येथे आणले होते. आरोपी पळताच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोरख कानिफनाथ पवार (रा. पाचोड) पारलेस पंडित काळे (रा. वडीगोद्री) व प्रकाश ऊर्फ हन्या सुखदेव भोसले (रा. रेवकी, ता. गेवराई) या तिघांना बुधवारी गेवराई येथील न्यायालयात तारखेसाठी आणले होते. गेवराई स्थानकावर उतरल्यावर पोलीस बेसावध असल्याचे पाहून पवार याने पलायन केले. तो पळताच पोलीस कॉन्स्टेबल येडुबा तेलुरे यांनी हवेत गोळीबार केला. पण तो थांबला नाही. चार पोलिसांनी पाठलाग करूनही आरोपी हाती लागला नाही.

मुलाचा खून झाल्याची पित्याची तक्रार
हिंगोली, ६ जून / वार्ताहर

वसमत तालुक्यातील सतीपांगरा येथील बालाजी संभाजी सरोदे (वय २०) या तरुणाचा मृतदेह अकोली शिवारात शनिवारी सापडला. त्याच्या वडिलांनी बालाजीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. बालाजीला शुक्रवारी फोनवर बोलत बाहेर पडला. रात्री घरी परतलाच नाही. पोलीस उपअधीक्षक राहुल श्रीरामे व पोलीस निरीक्षक मंगल चव्हाण यांना शनिवारी अकोली कालव्यात एक प्रेत असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळास भेट दिली. केवळ नऊ दिवसांपूर्वीच बालाजीचा विवाह झाला होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन
अंबाजोगाई, ६ जून/वार्ताहर

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई हेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाडय़ात लक्षणीय यश मिळविलेल्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सेना पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी, तसेच देवीचे दर्शन घेण्यासाठी आपला दौरा आखला आहे. माता योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे आले आहे, असे कळताच त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली. यावेळी श्री. ठाकरे म्हणाले की, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यापूर्वी दोन वेळा योगेश्वरी देवीच्या दर्शनास आले होते. मी प्रथमच देवीच्या दर्शनाला आलो आहे. यावेळी देवल कमिटीच्या वतीने ठाकरे व देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर शहरातील पत्रकारांनी चर्चेसाठी वेळ मागितला असता ठाकरे म्हणाले की, मी फक्त देवदर्शनाला आलो आहे. हा राजकीय दौरा नाही, असे सांगून त्यांनी पत्रकारांशी अधिक बोलण्याचे टाळले.

जळकोट तालुक्यात वीज पडून एक ठार, दोन जखमी
जळकोट, ६ जून/वार्ताहर

विजांचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह आज जळकोट तालुक्यात पाऊस पडला. डोंगरकोनाळी (ता. जळकोट) येथे विनोद नारायण शिंदे या १९ वर्षीय तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. मृताचे वडील नारायण केरबा शिंदे (वय ५०) व तुकाराम सटवाजी सोनकांबळे (वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. वीज पडल्याने येथील पाच शेळ्या, तर घोनसी येथे एक म्हैस ठार झाली. ही घटना सायंकाळी घडली. या घटनेतील तिघेजण शेतात काम करीत असताना अचानक वादळी वारा आणि पाऊस सुरू झाल्यामुळे हे सर्वजण शेतातील वडाच्या झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी झाडावर वीज पडली आणि त्यात विनोद शिंदे याचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींवर जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच आर. बी. कदम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भाजपचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, चंदन पाटील आदींनी भेट दिली. डोंगरकोनाळी येथे पाच शेळ्याही ठार झाल्या. घोनसी येथे गुंडेराव रामचंद्र डावळे यांची एक म्हैस ठार झाली.

उड्डाणपुलावरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
लातूर, ६ जून/वार्ताहर

भरधाव वेगात जात असताना उड्डाणपुलाच्या कठडय़ाला धडक बसून एक युवक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गिरीश कालिदास लाठकर हा पुणे येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या लग्नासाठी लातूरला आला होता. ४ जूनला सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या एमएच-२४-पी-२५२९ या स्कुटीवरून उड्डाणपुलावरून तो भरधाव वेगात जात होता. स्कुटीवरील त्याचा ताबा सुटून ती उड्डाणपुलाच्या कठडय़ास जोरात आदळली. यानंतर गिरीश उड्डाणपुलाच्या खाली फेकला गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत गिरीश लाठकरचे औरंगाबाद येथील अतीक्षा कुलकर्णी हिच्याशी ६ जूनला लग्न होणार होत. त्याचे वडिल महाराष्ट्र बँकेत अधिकारी आहेत, तर आई केशवराज विद्यालयात शिक्षिका आहे. लातूर शहरात उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू होण्याची आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे.

आमदार अमरसिंह पंडित यांच्या अपमानास्पद वक्तव्याने पत्रकार नाराज
गेवराई, ६ जून/वार्ताहर

विदेश दौऱ्यावरून परतलेल्या आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराई येथील पत्रकारांना त्यांच्या संपर्क कार्यालयावर चहापानाच्या निमित्ताने वार्तालाप करण्यासाठी बोलावले. याप्रसंगी सुसंवाद करण्याऐवजी आमदार पंडितांनी पत्रकारांवरच रोष व्यक्त केला. आमदारांच्या या भूमिकेने पत्रकारांत तीव्र नाराजी पसरली आहे. गेवराई येथील आमदार अमरसिंह पंडित मागील आठवडय़ात परदेश दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर परतल्यानंतर त्यांनी गेवराईतील पत्रकारांना कृष्णाई या संपर्क कार्यालयावर चहापानासाठी निमंत्रित केले होते. तालुक्यातील विविध प्रश्नांवर तसेच राजकीय स्थितीवर चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आमदार पंडित यांनी या वेळी दोन संपादकांविषयी तसेच तीन स्थानिक वार्ताहरांविषयी अपमानास्पद विशेषणे वापरून त्यांच्याविषयी रोष व्यक्त केला.
पत्रकारांसमोरच त्यांच्याविषयी हीन भाषा वापरल्याने उपस्थित पत्रकारांना आश्चर्य तर वाटलेच, त्यासोबत अवमान झाल्याची खंत वाटली.

सूतगिरणीच्या गोदामाला आग; करोडो रुपयांचा कापूस खाक
परळी वैजनाथ, ६ जून/वार्ताहर

येथील संत जगमित्र सूतगिरणीचे कापसाचे गठ्ठे ठेवलेल्या गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीत करोडोंचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी जवळपास १० अग्निशमन चार तासांपासून प्रयत्न करीत होते. सकाळी आग विझविण्याचे काम सुरूच होते. सूतगिरणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. तालुक्यातील जिरेवाडी शिवारात संत जगमित्र सूतगिरणीत रुईचे गठ्ठे ठेवण्याचे मोठे गोडाऊन आहे. त्याला अचानक आग लागली. या गोडाऊनलगत विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या उडाल्याने त्यावर बसलेल्या कबुतराने पेट घेतला. तो कबुतर रुईच्या गठ्ठय़ांवर पडल्याने रुईने तात्काळ पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. परळी, नगर, औष्णिक विद्युत केंद्र, अंबाजोगाई, गंगाखेड, बीड, लातूर आदी ठिकाणांहून अग्निशमन बंब मागविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते. या आगीच करोडोंचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी खासदार गोपीनाथ मुंडे, सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे आदींनी भेटी दिल्या.

उध्दव ठाकरे यांचे गंगाखेडमध्ये जोरदार स्वागत
गंगाखेड, ६ जून / वार्ताहर

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे शनिवारी परभणीला गंगाखेडमार्गे जात असताना परळी नाका येथे त्यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत करीत संत जनाबाई यांची प्रतिमा भेट दिली.
ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, तालुकाप्रमुख भाऊसाहेब जामगे, शहरप्रमुख अ‍ॅड्. मनोज काकाणी, शिक्षक सेना जिल्हा संघटक बाळासाहेब राखे, महिला जिल्हा संघटिका सखु लटपटे व शिवसैनिकांनी ढोल-ताशे तसेच फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत केले. यावेळी त्यांना संत जनाबाई यांची प्रतिमा भेट देण्यात आले. श्री. ठाकरे यांनी उपस्थितांचे परभणीचे शिवसेना खासदार अॅड्. गणेश दुधगावकर यांना निवडून दिल्याबद्दल आभार मानले.